दिव्य परमात्म्याचा प्रत्यय मनामध्ये ज्ञांनाच्या स्वरुपात होतो . हे ज्ञान पुस्तकात मिळत नाही तर सत्याच्या प्रत्यक्ष साक्षात्कारातून व त्याच्या सामर्थ्यातून होते . हे ज्ञान ‘ पराविद्या’ म्हणून ओळखले जाते व ते मिळवण्यासाठी आधी मनाची तयारी व खूप तपस्या करावी लागते . पुस्तकी विद्या व अभ्यासामुळे मिळणार्या ज्ञांनाला ‘ अपरा विद्या ‘ म्हणजेच खालील स्तरावरचे ज्ञान समजतात .
माणूस हा मन असणारा प्राणी आहे . तो आपले ध्येय या जगावर केन्द्रित करून अर्ध-पशू अवस्थेत राहणार आहे की दिव्य जीवनावर नजर ठेऊन पराविद्येचा ध्यास घेणार आहे हे अखेर त्याच्या मनावर अवलंबून असते . मन जात्या सर्वत्र विखुरलेले असते व हजारो दिशांकडे धावत असते . मनाच्या तपामध्ये हे मन एकाग्र कसे करावे व ध्येयावरच कसे स्थीर करावे हा महत्वाचा भाग असतो. या अभ्यासात आत्म-निरीक्षण , आत्म-जाणीवेचे भान , एकाग्रता व अलिप्तता राखावी लागते . या अभ्यासामुळे मनाला शिस्त लागते . त्याचे व्यवहार अधिक अचूक होतात व स्मरण शक्ति वाढते .
यानंतरचे मनाचे तप बरोबर उलट्या प्रकारचे असते . या अभ्यासात मनाला एकाग्र व एकाच विषयावर केन्द्रित करायचे नसते तर उलट मनाचे क्षितिज विशाल करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतात . मन आपल्या कोत्या समजुतीना आणि भ्रमाना चिकटून बसलेले असते. सत्य हे बहुविध असते व त्याच्याकडे पोहोचण्याचे अनेक मार्ग आणि विचारधारा असतात . या विचारधारा आणि हे मार्ग यांना मन मोकळे ठेऊन समजावून घेणे गरजेचे असते . अशा प्रकारच्या अभ्यासाने मनाला उदारता येते. मनाला तावून सुलाखून इतरांची मते , त्यांचा मार्ग यांचा तौलनिक अभ्यास करून सतत वर्धिष्णू असणार्या जगातील प्रगतीपर तत्वांचा अभ्यास करून त्यांचा समन्वय साधणे शक्य होते.
फक्त योग्य विचारच मनात शिरतील याची साधकाला काळजी घ्यावी लागते . कारण विश्वात अनेक विचार लहरी प्रसारित होतात आणि प्रवेश करण्याची संधि शोधत असतात . विचारांवर नियंत्रण करण्याच्या या पद्धतीतून मानसिक शुद्धीकरण होते . सतत विचार नियंत्रण व मन:शुद्धितून अखेर मानसिक शांतिकडे प्रगति होते . ही शांति म्हणजे मनाला येणारी ग्लानि किंवा औदासिन्य नसते . उलट मन तरतरीत व सावध होते . विचार काही क्षणापुरते थांबतात व आपल्या मनाच्या अंतर्यामी एक गाढ शांति असल्याची जाणीव आपणास होते . हा निर्विचाराचा काळ वाढवण्याची सवय आपण करायला हवी . विचार बंद झाल्याने जी पोकळी निर्माण होते तेथे मनामध्ये या शांतीचे अवतरण होते अशी कल्पना सतत करा . मग तुम्हाला अनुभव येईल की ही शांतीची भावना तुम्हाला संपूर्ण वेढून टाकीत आहे . यातूनच पुढे साक्षात्कार , प्रकाश , अंतर्ज्ञान यांची शक्यता असते . व उच्च ज्ञान किंवा ‘ पराविद्या ‘ आपल्याला मिळण्याचा हाच मार्ग आहे .
आंतरीक शांति सुस्थापित करण्यासाठी मौनाची किंवा मितभाषीपणाची फार मदत होते . निष्कारण वटवट करून आपण आपली किती जीवनशक्ति वाया घालवतो त्याची आपणास कल्पना नसते . माणसांना विचार करण्यासाठी सुद्धा शब्द लागतात. किंबहुना ते बोलता बोलता विचार करतात. विचार करण्यासाठी शब्दांची गरज भासण्याची प्रवृत्ती माणसाच्या मानसिक शक्तीच्या विकासाबरोबर कमी कमी होत जाते व मानसिक शक्ति अत्त्युच्च पदाला पोहोचली की शब्दांची गरज संपते .
माताजी म्हणतात की एखाद्या आध्यात्मिक नसलेल्या कल्पनेला किंवा प्रतिक्रियेला जेंव्हा आपण शब्दांनी व्यक्त करतो तेंव्हा त्या विचाराने आपण नुकसान करणार्या क्रियेला चालना देतो व त्यास वातावरणात सक्रिय करतो. आपण बोललो नसतो तर ते विचार तसेच राहून एका विचार लहरीत लुप्त झाले असते . त्या ऐवजी बोलल्यामुळे ते वातावरणात सरकतात व त्यातून विसंवाद व अशांततेची चेतना निर्माण होते . म्हणजे सुप्त विचाराना चालना देऊन आपण आपल्या हित विरोधी प्रेरणेला जन्म देतो.
आपल्याला आध्यात्मिक अनुभव आला असेल व तो जर आपण बोलून व्यक्त केला तर त्याचे सामर्थ्य कमी होते व त्याची शक्ति कमी होते. ऐकणार्याच्या मनात त्याविरुद्धा प्रतिक्रिया किंवा असूया निर्माण होऊन त्या अनुभवाचा फायदा कमी होतो. म्हणून आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव आपण फक्त आपल्या आध्यात्मिक गुरूला सांगावे असा दंडक व नियम आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला आहे. हा नियम आत्मसाक्षात्काराला मात्र लागू नाही कारण आत्मसाक्षात्कार हा चेतनेत ठाम बसलेला असतो त्यामुळे तो शब्दांनी क्षीण होत नाही .
अशा प्रकारे मानसिक तपस्येचे शिखर म्हणजे शांति हे आहे. मनात सत्याचे अवतरण व्हावे यासाठी आदर्श परिस्थिति शांति निर्माण करते . शांतिमुळे अंतर्ज्ञान , प्रकाश साक्षात्कार , प्रेरणा यांना पोषक वातावरण निर्माण होऊन दिव्य परमेश्वराचे ज्ञान होते .
=============== ########## =================
संकलन — नरेंद्र नाडकर्णी . संदर्भ — ” Art o Living ” by M.P.Pandit
मराठी रूपांतर : सुहास टिल्लू