सावित्री महाकाव्याविषयी जी अनेक आकर्षणे आहेत त्यापैकी एक महत्वाचे आकर्षण म्हणजे जर तुम्ही कोणत्याही कारणाने खिन्न झाले असाल , उदास झाले असाल तर अशा वेळी या महाकाव्यातील कोणताही एखादा भाग वाचून तुम्ही पुन्हा उल्हसित होता . या महाकाव्याच्या काव्य-पंक्तीत असणार्या लयबद्धतेत अशी काही जादू आहे की जी तुम्हाला प्रसन्न करते . गेल्या शतकाच्या तिसर्या आणि चौथ्या दशकात , जेंव्हा श्रीअरविन्द या महाकाव्याचे पुनर्लेखन करीत होते तेंव्हा सार्या युरोपला दुसर्या महायुद्धाच्या भीषणतेने ग्रासून टाकलं होतं किंवा त्यानंतर त्या उद्ध्वस्ततेच्या भयानक अंनुभवातून जग हळू हळू बाहेर येत होतं . हा सारा काळ जगासाठी आणि विशेषत: युरोपसाठी उद्विग्नतेचा , निराशेचा होता . हा असा काळ होता जेंव्हा पाश्चिमात्य जग पोथींनिष्ठ भौतिकवादातून निखालस दहशतवादाकडे वाटचाल करीत होतं . हा काळ श्रद्धाहीनतेचा , आध्यात्मिक उद्ध्वस्ततेचा आणि बौद्धिक निराशेचा होता . या काळात निराशेच्या गर्तेत पडलेली मानवता उत्क्रांतीच्या एका अवघड टप्प्यातून मार्गक्रमण करीत होती . गेल्या तीन शतकात विज्ञान आणि तत्वज्ञान यामध्ये झालेल्या क्रांतिने असा एक दृढ समज निर्माण केला होता की मानव हा अपघाताने निर्माण झालेला आहे आणि त्याच्या आवाक्याबाहेर असणार्या महान शक्तींच्या खेळातील तो एक क्षुल्लक प्यादं आहे .
श्रीअरविंदाना अर्थातच ही निराशा आणि खिन्नता मान्य नव्हती . त्यांच्या मते ही निर्मिती आणि त्यातील मानव ही काही निर्हेतुक भ्रामक कल्पना नाही किंवा ती निर्मिती आकस्मिक अपघातही नाही . त्यांनी त्यांच्या लिखाणातून असे प्रतिपादन केले होते की हे जग म्हणजे एक दुर्दैवी अपघात नाही तर तो एक हळू हळू उलगडत जाणारा चमत्कार आहे . सावित्री महाकाव्य लिहून त्यांनी याबाबत खूपच स्पष्टता आणली आहे . किंबहुना मानव आणि त्याचं पृथ्वीतलावरील जीवन याविषयी त्यांनी सारे वातावरण आशा आणि आशावादाच्या कंपंनांनी भारून टाकलं आहे . हे जे त्यांनी केलं ते मानवतेला सर्वत्र घेरून टाकणार्या अंध:काराच्या शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी . त्याचाच परिणाम या काव्य-पंक्तींवर दिसून येतो . आशा , प्रकाश आणि आशावाद यांनी ते सारं काव्य दुमदुमून टाकलं आहे .
असाच एक भाग पहिल्या पुस्तकाच्या चौथ्या कॅंटोमध्ये आहे . श्रीअरविन्द आपणास थोर देवतांविषयी सांगत आहेत . त्या देवतांना उत्क्रांतीचा हेतु माहीत आहे आणि ते जगातील घटंनांमध्ये दैवी पद्धतीनेच मध्ये पडतात . हे सारे बहुधा वैश्विक पातळीवर घडते . पण तुम्ही आम्ही त्यांना महत्वाचे आहोत का ? का आपण महत्वपूर्ण ठरण्यासाठी खूपच क्षुल्लक आहोत ? पण अचानक श्री अरविन्द आपल्याकडे वळतात , आपले हात धरतात आणि मंत्र सामर्थ्याने ओतप्रोत भरलेल्या या पंक्तीनी आपल्याला आश्वस्त करतात की आपणही महत्वपूर्ण आहोत .
Alive in a dead rotating universe
We whirl not here upon a casual globe
Abandoned to a task beyond our force;
Even through the tangled anarchy called Fate
And through the bitterness of death and fall
An outstretched Hand is felt upon our lives.
It is near us in unnumbered bodies and births;
In its unshaken grasp it keeps for us safe
The one inevitable supreme result
No will can take away and no doom change,
The crown of conscious Immortality,
The godhead promised to our struggling souls
When first man’s heart dared death and suffered life.
One who has shaped this world is ever its lord:
Our errors are his steps upon the way;
He works through the fierce vicissitudes of our lives,
He works through the hard breath of battle and toil,
He works through our sins and sorrows and our tears,
His knowledge overrules our nescience;
Whatever the appearance we must bear,
Whatever our strong ills and present fate,
When nothing we can see but drift and bale,
A mighty Guidance leads us still through all.
After we have served this great divided world
God’s bliss and oneness are our inborn right.
A date is fixed in the calendar of the Unknown,
An anniversary of the Birth sublime:
Our soul shall justify its chequered walk,
All will come near that now is naught or far. Savitri : ( 59 / 462-490 )
ही पृथ्वी , जिचे वर्णन शास्त्रज्ञ एक भू-गोल म्हणून करतात आणि जी स्वताभोवती फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत असते , ती एखाद्या यांत्रिकी घड्याळाप्रमाणे फिरत राहणारे विश्व नाही . ती मृत नाही आणि अचेतनही नाही . आपणही निर्हेतुकतेने या गोलावर गरगर फिरत नाही आहोत आणि आपल्याला आपल्या मर्यादेच्या पलीकडे असणारे कार्य करण्यासाठी इथे सोडून देण्यात आलेले नाही . थोडक्यात ईश्वर जेंव्हा आपल्यावर एखादे कार्य सोपवतो तेंव्हा ते करण्यासाठी आवश्यक असणारी शक्तीही तो देत असतो . हे खरे आहे की आपण इथे जे जीवन जगतो ते अनेकदा गोंधळ आणि अव्यवस्था निर्माण करणार्या घटनांनी भरलेले असते आणि त्या सार्यामध्ये कोणताही स्पष्टपणा आणि हेतु आपणास दिसत नसल्याने आपल्या जीवनावर अंमल गाजवणार्या शक्तीस आपण ‘ विधिलिखित ‘ म्हणतो . जीवन हे अनेकदा खूप निष्ठुर आणि असह्य असतं , विश्वासघात , द्रोह , मृत्युचा कडवटपणा इत्यादि अनेक कटू अनुभवाना आपल्याला तोंड द्यावे लागते . श्रीअरविन्द हे काहीही नाकारत नाहीत , जीवनाची ही कुरूप आणि वेदनामय बाजू ते मान्य करतात . जीवन हा जवळ जवळ सर्व काळ चालणारा कठोर संघर्ष आहे . परंतु हे सारे असतांनाही श्रीअरविन्द आपणास स्पष्ट शब्दात ग्वाही देतात की या सर्वाच्या मागे , ते विधिलिखित आणि त्याचा लहरीपणा याचेही मागे , आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी , आपले रक्षण करण्यासाठी एक अदृश्य हात असतो . ( पंक्ति – १ ते ६ )
हा हात आपल्या अगदी जवळ असतो आणि ज्या असंख्य जन्मातून आणि जीवनातून आपण प्रवास केला आहे त्या सर्वात तो आपल्याला मार्गदर्शन करीत आला आहे . अचानक श्री अरविन्द आपणास वर उचलून धरतात आणि जीवनाचं एक विशाल , प्रमाणबद्ध दर्शन घडवतात . एखादा आपला दृष्टीकोन जितका अधिक संकुचित करतो तितक्या प्रमाणात आपल्या जीवनातील घटनांचे महत्व आणि परिणाम त्याला अधिक जाणवू लागतात . पण जर आपण त्याच घटनांकडे अनेक जन्मांपासून चालत आलेल्या आणि यापुढेही अनेक जन्म चालू राहणार्या जीवनयात्रेतील अनेक घटनांपैकी एक म्हणून पाहू लागलो तर तेच प्रमाणबद्ध दर्शन बदलते , आणि आपणही अधिक अलिप्ततेने पाहण्यास समर्थ होतो . आणि मग आपल्या जीवनातील सुखाच्या आणि दु:खाच्या अशा दोन्ही घटनांकडे अधिक समतोल दृष्टीने पाहू लागतो . जीवनात अशी कोणतीही घटना अथवा अनुभव नाही ज्याचा अर्थ केवळ त्याच जीवनाच्या दृष्टीकोनातून सर्वस्वी समजू शकेल . आपल्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांची कारणे आणि परिणाम त्याच जीवनात अनेकदा आढळत नाहीत . कारणे कदाचित पूर्वजन्मात शोधावी लागतात तर परिणाम आपल्या भविष्यातील जीवनात ढकलले जातात . आपल्या अस्थित्वाच्या या विशालतेविषयी जेंव्हा आपणास जाणीव होते तेंव्हा आपण आपल्या दु:खद अनुभवांची अतिशयोक्ति टाळू लागतो आणि आपल्या किरकोळ विजयाना महत्व देण्याचेही बंद करतो
त्याच्या ह्या घट्ट पकडीतून तो हात आपल्या प्रयत्नांचे सर्वश्रेष्ठ उद्दीष्ट , केवळ या जन्मातील नव्हे तर सर्व जन्मातील , सुरक्षित ठेवतो आणि त्याचा एक परिणाम कोणतीही शक्ति नाकारत नाही , कोणताही अपघात त्यापासून आपल्याला वंचित करू शकत नाही आणि तो म्हणजे — जाणीवपूर्ण अमरत्वाचा मुगुट . अनेक जन्मापासून चालू असणार्या आपल्या दीर्घ आणि यातनामय जीवनयात्रेचे हेच सर्वश्रेष्ठ उद्दीष्ट आहे , उत्क्रांत होण्याच्या आपल्या प्रयत्नांची हीच सिद्धि आहे . आपले खरे अस्थित्व , आपला आत्मा , हा अमर आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही कारण आपण अज्ञानात बुडालेलो आहोत . सर्वश्रेष्ठ दैवी चैतन्य ज्याचं वर्णन सत-चित-आनंद म्हणून केले जाते त्याची संपन्नता आणि भव्यता यांचे प्रत्येक मानवामध्ये प्रगटीकरण करणे हाच उत्क्रांत पावणार्या या प्रवासाचा उद्देश आहे . आपण अमृतस्य पुत्र , अमरत्वाची मुले आहोत याची जाणीव आपल्या पृष्ठवर्ती भागासही होणं ही आपली दैवगति आहे . आपण आता कितीही क्षुद्र , कमजोर आणि दुर्दैवी दिसत असलो तरी तीच आपली दैवगति आहे . आणि श्रीअरविंदांच्या शब्दातला आणि सुरातला आत्मविश्वास पहा . ते आपल्याला खात्रीपूर्वक आश्वासन देत आहेत की कुणीही – अगदी या पृथ्वीतलावरील अथवा स्वर्गातील – आपला हा जाणीवपूर्ण अमरत्वाचा मुगुट हिरावून घेऊ शकणार नाही .
हा जाणीवपूर्ण अमरत्वाचा मुगुट काय सुचवतो ? तो असे सुचवतो की आजारपणा , शारीरिक र्हास आणि मृत्यू यांच्या वावटळीत असहाय्यतेने सापडल्यामुळे आपण जरी स्वताला कींव करण्याजोगा प्राणी समजत असलो तरी आपण तसे नाही आहोत , तो अशा प्रकारची जाणीव दर्शवतो की छोट्याशा सुखाच्या शोधार्थ एका सुपरमार्केटमधून दुसर्या सुपरमार्केटमध्ये भटकणारे आपण स्वताला जरी भिकारी समजत असलो तरी आपण तसे नाही आहोत तथापि आपण कितीही प्रयत्न केला तरी खरे सुख , आंतरीक आनंद हा आपल्याला काही थोडेसे क्षण सोडले तर चकवितच असतो असे दिसते . आणि म्हणून वस्तूत: आपण अमरत्वाची मुले आहोत आणि परमानंद , जाणीव आणि शक्ति यांचेप्रमाणेच सुख ही सुद्धा आपली प्रकृती आहे याची जाणीव होणं यालाच आपल्या अंतरंगात पडद्याआड असणार्या परमेश्वराची जाणीव होणं असं मानतात .
श्री अरविन्द त्यानंतर आपल्याला सांगतात की अज्ञानावस्थेतील या जीवन आणि मृत्यू यांचा अत्यंत अवघड असा उत्क्रांतीचा प्रवास सुरू करण्याचे मान्य करण्यापूर्वीच आपल्या आत्म्याना या परिपूर्णतेचे आश्वासन देण्यात आले होते ते जवळ जवळ असे स्पष्टपणे सूचित करतात की ज्याअर्थी हे आश्वासन परमेश्वराने दिले आहे त्याअर्थी आपल्याला असमर्थता , अज्ञान आणि मृत्यू यांच्या बंधंनातून बाहेर काढण्यास तोच बांधील आहे . तो सुद्धा करारातील त्याचा भाग विसरत नाही . आणि म्हणूनच स्वर्गीय शिकार्यासारखा तो या काळ मार्गावर आपला पिच्छा पुरवत असतो . आपण आपले उगमस्थान विसरतो , आपली खरी प्रकृती विसरतो कारण आपण आपले शरीर , जीवन आणि मन यांच्या बंधनाच्या प्रेमात पडलो आहोत . ( पंक्ति ७ ते १३ )
यानंतर हे जग निर्माण केल्यावर परमेश्वराचं या जगावर असणारं नियंत्रण नाहीसं झालं असावं अशा प्रकारचा आपल्या मनात निर्माण होणारा कुतर्क आणि भीती , श्रीअरविन्द एका ओळीत नाहीसा करतात . आपल्या भोवताली घडणार्या भयानक गोष्टी पाहिल्या की आपल्या मनात असे विचार येत नाही का ? आपल्याला वाटतं की जणू काही हे जग निर्मात्याच्या नियंत्रणातून बाहेर पडत आहे . आपण जेंव्हा माणसावर आणि सार्या राष्ट्रावर आघात करणारे दु:खद प्रसंग पाहतो , पूर , भूकंप यासारख्या अचानक उद्भवणार्या संकटांनी ही पृथ्वी आणि त्यावरील जीवन उध्वस्त होताना पाहतो तेंव्हा आपल्या मनात निश्चित विचार येतो की या निर्मितीचा कोणी नियंत्रक आहे की नाही . श्री अरविन्द आपणास आश्वस्त करतात की ज्याने हे जग निर्माण केलं तो या जगाचा कायमचा नियंता आहे , त्याचं या जगावर नियंत्रण आहे .
आपण जे काही करतो ते जर चुकल्यासारखे दिसत असेल तर त्याचे कारण म्हणजे ईश्वर आपणास तसे करू देतो कारण त्यामुळेच असे काही मार्ग खुले होतात ज्यामधून तो आपल्या जीवनात प्रवेश करू शकतो , एरवी ते मार्ग त्याला बंद असतात . सर्वसाधारणपणे आपण आपली कृती योग्य आहे की नाही ते ठरवतो ते त्या कृतीमुळे प्राप्त होणार्या भौतिक यशावर . ज्यामुळे सर्व भौतिक यश म्हणजे पैसा , प्रसिद्धी वगैरे प्राप्त होते त्यास आपण चांगले म्हणतो आणि ज्यामुळे भौतिक अपयश प्राप्त होते त्यास आपण वाईट ठरवतो . अशा प्रकारचं यश हे परमेश्वराला आपल्या जीवनात प्रवेश करण्यापासून रोखतं . आणि आपल्याला आपल्या मर्यादेत आत्मसंतुष्ट करतं . अनेकदा तथाकथित अपयश ज्यामुळे आपलं भौतिक नुकसान होतं ते आपल्याला क्षणभर आपल्याला आपल्या मार्गावर थांबवतं आणि आपल्या स्वताकडे आणि आपण कुठे चाललो आहोत त्याकडे एका नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास भाग पाडतं . हे एका महान जागृतीचे क्षण असतात जेंव्हा आपल्याला आपल्या पाठीशी ईश्वराचा श्वास जाणवतो .
ईश्वर आपल्या जीवनात नेहमीच हजर असतो , आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो . विशेषत: आपण चालत असलेला मार्ग जेंव्हा भयानक आणि परीक्षा घेणारा असतो तेंव्हा तो आपल्याबरोबर असतो , मार्गदर्शन करीत असतो . आपण जेंव्हा अत्यंत अवघड परिस्थितीशी सामना करीत असतो तेंव्हाही तो आपल्या समवेत असतो . त्याची कार्यप्रणाली मात्र खूपच विलक्षण असते . कधी कधी तो आपल्याला अशा मार्गावरून नेतो जे पापाचे आणि दु:खाचे असतात . हे असे तो का करतो तर आपला इगो-आधारीत अलगपणा आणि स्वयंपूर्णतेची जाणीव तसेच आपले गुण व चांगुलपणा यातून निर्माण होणारा उद्धटपणा या सर्व गोष्टींपासून त्याला आपल्याला परावृत्त करायचं असतं . पराभूत होऊन निराधार बनलेल्या स्थितीत आपण जेंव्हा मध्यरात्री आपल्या उशीवर अश्रु ढाळू लागतो तेंव्हा ईश्वर आपल्या समीप असतो . तो आपल्याला कधीही सोडून जात नाही . आपल्या प्रार्थनेला तो नेहमीच प्रतिसाद देईल असे नाही कारण आपण अनेकदा योग्य ते मागत नाही . जेंव्हा तो आपली प्रार्थना नाकारतो तेंव्हा आपल्या मागणीपेक्षा ती अधिक मोठी कृपा असते .
परमेश्वर नेहमीच आपल्या जीवनात आपल्याला मार्गदर्शन करीत असतो अशी श्रीअरविंदानी दिलेली खात्री ऐकल्यावरही आपल्यापैकी काहीजणाना असे वाटू शकते की त्यांच्या वाट्याला आलेले जीवन हे अत्यंत अवघड आणि दुर्दैवी आहे आणि म्हणून त्यांच्या बाबत जे काही घडलं तेंव्हा ईश्वर त्या परिस्थितीत होता हे मान्य करणं त्यांना अवघड जातं. अशा प्रकारचा विरोध , जणू काही , शमवण्यासाठी श्रीअरविन्द म्हणतात की एखाद्याचे सध्याचे जीवन कितीही वाईट असो , त्याच्या वाट्याला आलेलं जीवन कितीही शापग्रस्त असो तसेच ते हेही नाकारत नाहीत की एखाद्याला असेही वाटू शकते की — एखाद्या जहाजातून प्रवास करणार्या एखाद्या प्रवाशाला मध्यरात्री खाली समुद्रात फेकून दिले तर त्याची जी स्थिति होईल तशीच काहीशी आपली स्थिति आहे — परंतु हे सारं जरी असं वाटलं आणि असलं तरी आपण कधीही विसरून चालणार नाही की अशा भयानक परिस्थितीत सुद्धा एक सामर्थ्यशील मार्गदर्शन अशा प्रकारच्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या मागे कार्यरत असते आणि असे मार्गदर्शन हे आपल्याला जाणीवपूर्ण अमरत्वाच्या दिशेने ढकलत असते .
( पंक्ति १४ ते २३ )
या थोर पण अवघड अशा जगात आपल्या जीवनाला सर्व बाजूंनी घेरून टाकणार्या परिस्थितीमधून गेल्यावर परमेश्वराचा परमानंद आणि एकता हे आपले जन्मसिद्ध हक्क आहेत ही खात्री आपल्याला ईश्वराने दिली आहे आणि ती पूर्ण करण्यास तो बांधील आहे . आपली मुख्य अडचण ही आहे की आपला खाजगी कार्यक्रम , ईश्वराला आपल्यासाठी जे हवय त्याच्याशी सुसंगत नाही . आपण मर्यादित सुख मिळण्यासाठी धडपडत असतो . आणि जरी आपणास ठाऊक असलं की ही सुखं क्षणभंगुर आहेत आणि अनेकदा यांच्या पाठोपाठ या ना त्या रूपात येणार्या वेदना , दु:ख , आणि वैफल्य यांनी आपण ग्रासले जातो , तरी आपण ती मर्यादित सुखं मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो . आपलं आंतरीक अस्थित्व हे त्या मर्यादित सुखानी कधीही समाधान पावत नाही . त्याला अनंताची भूक असते . याची जाणीव होणे हीच फार मोठी जागृती आहे . ही जाणीव होण्यासाठी आपण जागृत होईपर्यंत आपल्या जीवनातील उलथापालथ म्हणजे केवळ या जाणीवेसाठी चाललेली तयारी असते . आणि म्हणून आपल्या जीवनात सुख आणि दु:ख हे आपापली भूमिका बजावित असतात . ( पंक्ति २४ – २५ )
अशा प्रकारची खात्री आपणास देऊन श्रीअरविन्द आपणास कोणत्याही अनिश्चिततेत ठेवत नाहीत . ते आपणास सांगतात की परमेश्वराच्या दैनंदिनीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाच्या सर्वश्रेष्ठ परिपूर्णतेची तारीख आधीच निश्चित केलेली आहे . त्या दिवशी आपला उदात्त जन्म होईल . आणि मग आपल्या आत्म्याला जीवनाच्या या निरनिराळ्या अंनुभवातून जाणं योग्य होतं असं वाटेल . आणि जेंव्हा आपण आपल्या उद्दिष्टाला पोहोचू आणि जीवनातील आपल्या निरनिराळ्या अनुभवांकडे मागे वळून पाहू तेंव्हा आपल्याला समजेल की या मार्गावर आपण अनुभवलेल्या प्रत्येक अपयशाचा एकूण प्रवासावर चांगलाच परिणाम झाला . आणि म्हणून जीवन हे सर्वथा चांगलेच आहे किंवा भविष्यातील चांगल्यासाठीची तयारी आहे .
( पंक्ति २६-२९ )
रुपांतरित : नरेन्द्र नाडकर्णी
From – Articles on Savitri by Late Dr Mangesh Nadkarni
================= $$$$$$$$$ ==================
.