हरिभजनावीण काळ घालवू नको रे
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ||
परमेश्वराचे भजन , चिंतन न करता आपला वेळ फुकट घालवू नका . खरं ज्ञान आपल्या अंतर्यामीच आहे . पण त्याची आंस निर्माण करणारा जो दीप अंतरंगात आहे तो विझू देऊ नका . त्यासाठीच परमेश्वराचं सतत चिंतन करा . अशा प्रकारचा उपदेश कळवळून देणारं हे गीत , अभिषेकी बुवांनी गायलं असल्यामुळे , संत सोहिरोबांनी रचलेलं आहे हे अनेकांना ठाऊक असेल परंतू त्यातील अनेकांना सोहिरोबांचा जीवनप्रवास , कार्य , काव्यनिर्मिती याबद्दल फारशी माहिती नसेल .
बरेच वर्षापूर्वी रविन्द्र पिंग्यांचा कविवर्य बोरकरांवर लिहिलेला एक लेख वाचनात आला होता . त्या लेखात बोरकर पिंग्यांना म्हणतात –– ‘’ पिंगे , सोहिरोबा अंबियेचं उदाहरण काय सांगतं ? अन्नाला महाग झालेला सारस्वत तो पण आपल्या कवित्वाच्या बळावर तो महादजी शिंद्याला चार शब्द सुनावून आला . ही अचाट निर्भयता त्या निर्धन कोंकण्याकडे कशामुळे रे आली ? साक्षात्कारी कवितेमुळे . “ तसं सोहिरोबांच नाव यापूर्वीही मला ठाऊक होतं . पण या लेखानं माझं कुतुहूल जाग्रुत झालं . आणि मग कोणत्यातरी अनाकलनीय अशा पद्धतीनं सोहिरोबांविषयीची माहिती , त्यांची कविता , त्यांचे ग्रंथ इत्यादी गोष्टी हळू हळू माझ्याकडे जमू लागल्या .
— अंबिये घराण्याची वाटचाल —
सोहिरोबांचा जन्म जरी त्याकाळी वाडी सरकारच्या मुलुखात असणाऱ्या पेडणे तालुक्यातील पालिये गांवी झाला असला तरी अंबिये घराणं हे मुळचं गोव्यातलं . त्यांचं मूळ गांव साष्टी तालुक्यातील ‘ कुठ्ठाळ ‘ . हे गांव एके काळी फार मोठ्या नांवारुपास आले होते . त्यास ‘ क्षेत्र कुशस्थळी ‘ असे म्हणत . श्री मंगेशाचे देवालय प्रथम याच गांवी होते . सोळाव्या शतकांत पोर्तुगीजांनी या भागावर कब्जा करून बाटवाबाटवी सुरू केली . इ.स. १५६० च्या सुमारास साष्टी तालुक्यातील जवळ जवळ २००/३०० मंदिरं नष्ट करण्यात आली खुद्द श्री मंगेशाचं लिंग ग्रामस्थांनी रातोरात हालवलं आणि ते सध्याच्या प्रियोळ मुक्कामी नेण्यात आलं. अनेक कुटुंबांनी आपलं गांव सोडलं आणि जवळपासच्या सुरक्षित ठिकाणी धांव घेतली . अंबिये कुटुंब पेडणे तालुक्यातील पालिये गांवात जाऊन तेथे स्थायिक झालं . अंबिये कुटुंब सुविद्य आणि सदाचारी होतं . लनकरच ते गांवचे कुळकर्णी झाले आणि वंशपरंपरेने ते कुळकर्णीपद चालू राहिले
—- जन्म आणि संसार —
सोहिरोबांचा जन्म इ.स. १७१४ साली झाला . त्यांचे मूळ नांव अच्युत पण कौतुकाने त्यांना ‘ सोयरू ’ म्हणत , त्याचेच मोठेपणी सोहिरोबा झाले . मुलगा झाला म्हणून सोहिरोबांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला . पण हा मुलगा इतर मुलांच्या जोडीनं नाचण्या बागडण्यात सहभागी होत नव्हता . काहींसा गंभीर प्रक्रुतीचा हा मुलगा कसल्यातरी तंद्रीत असायचा . आई वडिलांना काळजी वाटायची . पण एक दिवस एक साधूपुरुष त्यांच्या घरी आला . आई वडिलांनी सोयरोबांना त्याच्या पायावर घातलं आणि आपली चिंता व्यक्त केली . तेंव्हा तो साधू म्हणाला – ‘’ चिंता करू नका . हा पूर्वजन्माचा योगी आहे . तुमच्या कुटुंबात परंपरेने ईश्वरभक्ती चालू आहे . तुम्ही उभयता सात्विक आहात म्हणून याने तुमच्या पोटी जन्म घेतला . ‘’ या घटनेनंतर सोयरोबांच्या आई वडलांनी त्यांना जसं खूप जपलं तसंच योग्य ते शिक्षणही दिलं . सोयरोबांच्या जन्मानंतर त्यांचे वडील अनंतराव यांची भरभराट झाली . आणखी दोन तीन गावांचं कुळकर्णीपद मिळालं . पुढे हे कुटुंब बांदे उर्फ एलिदाबाद येथे राहण्यास गेलं . सोहिरोबा फक्त १५ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि त्यामुळे कुटुंबाचा भार आणि कुळकर्णीपद अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागल्या . या दोन्ही जबाबदाऱ्या तर त्यांनी निष्ठेने पार पाडल्याच पण शिवाय याच काळात त्यांनी संस्क्रुत ग्रंथांचा , संतवाङमयाचा अभ्यास केला त्यावर मनन आणि चिंतन केलं . याच काळात त्यांची राजयोगाचीही साधना चालू होती . जवळ जवळ २० वर्ष म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षापर्यंत सोहिरोबा हा सारा भार शांतपणे वाहत होते . त्यानंतर मात्र अशी एक अद्भुत घटना घडली की ज्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली . त्यांचा सारा जीवनक्रम बदलून गेला .
—- साक्षात्कार —-
असेच एक दिवस सोहिरोबा नित्यनेमाची पूजाअर्चा करत होते . आणि अचानक वाडीसरकारचा हुकूम घेऊन एक जासूद आला आणि म्हणाला — “ सरकारांनी तुम्हाला तुरंत बोलावलं आहे .‘’ सरकारी कामामुळे पूजाअर्चाही धड करता येत नाही म्हणून सोहिरोबा खिन्न झाले . पण नाईलाज होता . दफ्तर बरोबर घेऊन निघण्याची तयारी केली . वाटेत भूक लागली तर खाण्यासाठी एक फणस घेतला आणि वाट चालू लागले . चालत चालत इन्सुलीच्या रानात पोहोचले . एका ओढ्याच्या काठी रम्य अशी जागा पाहून इथे थोडी विश्रांती घ्यावी , फणस खाऊन भूक भागवावी असा विचार त्यांच्या मनात आला . पथारी पसरली . हात पाय धुऊन प्रथम ईश्वराचं ध्यान केलं . आणि मग फणस फोडून खाण्यास सुरूवात करणार तोच “ बाबू , हमको कुछ देते हो ? “ असे गोड वाणीत उच्चारलेले शब्द कानावर आले . मागे वळून पाहिलं तर एक प्रसन्न वदनाचा उंच दिव्य पुरूष उभा होता . त्याच्या दर्शनानं सोहिरोबांची तहान भूक हरपली . दिव्य भाव मनात जाग्रुत झाले आणि त्यांनी तो अख्खा फणस उचलून त्या दिव्य पुरूषास अर्पण केला . त्या दिव्य पुरूषानेही तो अख्खा फणस हां हां म्हणता फस्त केला आणि ५ गरे प्रसाद म्हणून सोहिरोबांच्या हातावर ठेवले . मग त्याने सोहिरोबांच्या कानात एक मंत्र सांगितला व त्यांच्या ह्रुदयाला स्पर्श केला त्यासरशी सोहिरोबांची शुद्ध हरपली आणि ते समाधी अवस्थेत गेले काही वेळाने जेंव्हा ते भानावर आले तेंव्हा तो दिव्य पुरूष अंतर्धान पावला होता या साक्षात्काराने सोहिरोबांचा अंतर्बाह्य कायापालट झाला . एक वेगळेच तेज त्यांच्या मुखावर झळकू लागले .
त्यानंतर सोहिरोबा तेथून निघाले ते तडक वाडीसरकारांच्या समोर हजर झाले . सरकारांना अभिवादन करून आणि त्यांच्या समोर दफ्तर ठेऊन म्हणाले – “ आजवर इमाने इतबारे तुमची सेवा केली . यापुढे हे आयुष्य ईश्वराला वाहिले आहे . निरोप असावा . मात्र एकच विनंति करतो – राज्यात गुत्त्यांना परवाने दिले जातात ते बंद करावे आणि गोरगरीब जनतेचा दुवा घ्यावा . “
सोहिरोबांना शक्तीपाताची दीक्षा देणारा तो दिव्य पुरूष म्हणजे साक्षात् महायोगी गोरक्षनाथ असावे असा काहीजणांचा समज आहे . सोहिरोबांनी त्याबाबत कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही . मात्र त्यांच्या एका काव्यातील —-“ गैबीप्रसादे गैबची झाले , आप आपणामध्ये लपले “ या पंक्तीवरून काहीजण असा कयास बांधतात की , गोरक्षशिष्य गहिनीनाध हेच सोहिरोबांचे गुरू असावेत गहिनीनाथांची समाधी ‘ गर्भगिरी ‘ नामक पर्वतावर असून हिंदू लोक त्यांना ‘’ गैबीनाथ ‘’ म्हणतात तर मुसलमान त्यांना ‘’ गैबीपीर ‘’ म्हणतात . असो . तर या घटनेनंतर सोहिरोबांनी वयाच्या फक्त ३५ व्या वर्षी आपल्या नोकरीनर लाथ मारली आणि ते ईश्वरचिंतनात आणि काव्यनिर्मितीत दंग झाले .
या घटनेनंतर संसारात असणाऱ्या सोहिरोबांनी ‘ दळण ‘ नांवाची एक मोठी मजेदार रुपकात्मक रचना केलेली दिसते . त्यामध्ये जाते कसले , पीठ कसले पडते ते सोहिरोबा रुपकात्मक भाषेत सांगतात —
दळू बाई दळूं | तोंवरीच गाऊ | दळण विसावें ते सुख सेवूं ||
अभ्यासाचे जाते | विकार कणवट | दळूनी करू पीठ वासनेचे ||
पुढे , वैराग्याचा अग्नी पेटवून भक्तीच्या तव्यावर भाकरी भाजू , असे सांगून , ते शेवटी म्हणतात —-
सोहिरा म्हणे ऐशी | सेविता भाकरी | नलगेचि चाकरी करणे आता ||
यावरून नोकरी सोडताना त्यांची मानसिकता कशी झाली होती ते स्पष्ट होते .
—- काव्य निर्मिती —
गहिनीनाथांच्या दर्शनानंतर आपली अवस्था कशी झाली त्याचे वर्णन करताना सोहिरोबा म्हणतात —
झाला ब्रम्हबोध लागली समाधी ||
सुषुम्नेच्या छिद्री | स्थिरावलो ब्रम्हरंध्री | भेदोनिया नादबिंदू ||
सोहिरा म्हणे काय वानूं | हारपले देहभानू | सद्गुरू भेटला सिद्ध ||
यानंतर सोहिरोबांच्या प्रतिभेला एक अलौकिक असं उधाण आलं . त्यांनी कुळकर्ण्याचं काम करताना घेतलेला जीवनाचा अनुभव , योगसाधनेतून मिळालेला अनुभव आणि नंतर साक्षात्कार झाल्यावर मिळालेल्या ज्ञानाचा आणि परमानंदाचा अनुभव आतां त्यांच्या काव्यातून प्रगट होऊ लागला . कविता करणारा तो कवी अशी आपली आजच्या जमान्यातली व्याख्या असली तरी आपल्या पूर्वजांच्या मते कवी म्हणजे द्रष्टा . त्याच्या अंतर्यामी जेंव्हा एखादा अनुभव दाटून येतो तेंव्हा त्याला त्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं . त्यावेळी त्याचा जीव जाणीवनेणीवेपेक्षा एका अत्यंत उच्च असा पातळीवर असतो . आणि त्या स्थितीतच तो अनुभव शब्दरूप घेऊन प्रगट होतो . सोहिरोबाही त्याच स्थितीला पोहोचले असल्यामुळे त्यांच्या मुखातून साक्षात्कारी कविता प्रगट होऊ लागली . ३ ते ४ वर्षाच्या कालावधीत ज्यांची ओवीसंख्या १५००० पर्यत होईल असे ५ अध्यात्म ग्रंथ त्यांनी निर्माण केले . त्यातील एकेका ग्रंथाच्या वैशिष्ठ्याकडे आपण नजर टाकू . म्हणजे सोहिरोबांच्या प्रतिभेचा आवांका किती प्रचंड होता ते आपल्या ध्यानात येईल .
सिद्धांतसंहिता — इ.स. १७४८ मध्ये लिहिलेला सोहिरोबांचा हा पहिला ग्रंथ . १८ अध्यायांच्या या ग्रंथात ७१९ संस्क्रुत श्लोक आहेत . एकेकासंस्क्रुत श्लोकावर तत्कालीन मराठीतून केलेल्या भाष्याच्या ४९१७ ओव्या आहेत . यातील पहिल्या अध्यायात ‘ आत्म्याचे अमरत्व ‘ या विषयाचे स्पष्टीकरण आहे तर पुढील एकेका अध्यायात त्रिविधताप , ज्ञानयोग , पीपलिका मार्ग , मुद्रा रहस्य , अवतारस्वरूप लक्षण , जन्मदु:ख , योग , पूर्ण समाधी , इत्यादी विषयांवर विवेचन केले आहे . अवतार तत्वावरील भाष्यात रामावतारातील व्यक्तीरेखा आणि घटना यांच्या प्रतिकात्मक स्वरूपातून त्यांनी केलेला आध्यात्मिक बोध मन थक्क करणारा आहे .
अद्वयानंद — इ.स. १७४९ मध्ये या ग्रंथाचे लेखन झाले . यात ८ प्रकरणे असून ५५४ ओव्या आहेत . निर्गुण विचार , हठयोग , राजयोग , सहज समाधीचे स्वरूप इत्यादी विषयांवर या ग्रंथामध्ये सखोल विवेचन करण्यात आले आहे .
पूर्णाक्षरी — हाही ग्रंथ १७४९ मध्येच लिहिला गेला . यात ९ प्रकरणे असून ४८९ ओव्या आहेत . यामध्ये अज्ञानलक्षण , विवेकनिरूपण , स्तवन , गुरूवाक्यप्रसाद , इत्यादी विषयांवर चर्चा आहे .
अक्षयबोध – ह्याही ग्रंथाची निर्मिती १७४९ मध्ये झाली . यामध्ये ४०८ ओव्या आहेत व त्यामध्ये योग आणि स्वरूप बोध लक्षणांवर त्यांनी निरूपण केले आहे .
महदनुभवेश्वरी – सोहिरोबांनी साकार केलेला हा सर्वात मोठा ग्रंथ . १७५० साली लिहिलेल्या या ग्रंथात १८ अध्याय असून ९०९३ ओव्या आहेत . मानवी जीवनात मानवाला अनेक अनुभव येतात पण ईश्वराचा साक्षात्कार हा त्या सर्व अनुभवातील महान अनुभव . त्या अनुभवाचे स्वरूप काय , साधन काय , तो कसा प्राप्त करायचा हे सांगण्यासाठी नाथांनी हा ग्रंथ लिहिला .
वरील ५ ओवीबद्ध ग्रंथांशिवाय नाथांनी ‘ देहदूर्ग ‘ ही एक बखर गद्यात लिहिली आहे . त्याशिवाय मराठी व हिंदी अशा दोन भाषांतून त्यांनी जवळ जवळ ५००० पदे लिहिली . पण त्यातील फक्त ६१० पदे आज उपलब्ध आहेत . याचे मुख्य कारण असे की भावोत्कट अवस्थेत सोहिरोबांच्या मुखातून येणारी कविता लिहून ठेवण्याचे काम त्यांची विधवा बहीण करत असे . असे म्हणतात की या बहिणीलाही शिक्षण देऊन विद्यासंपन्न करण्याचे क्रांतिकारी कार्य नाथांनी स्वत:च केले होते . घरच्या गरीबीमुळे कविता लिहिण्यास कागद उपलब्ध नसत . आणि म्हणून ही बहीण फणसाच्या कोवळ्या पानांवर त्या कविता लिहून ठेवत असे . पुढे कधीतरी त्यांच्या मातोश्रींनी पानांचा तो गठ्ठा कचरा समजून जाळून टाकला . त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा कविता नष्ट झाल्या याशिवाय त्यांच्या बऱ्याचशा कविता त्यांच्या ठिकठिकाणच्या भक्तांनी लिहून ठेवल्या होत्या . पण त्या सर्वांचे वेळीच एकत्रीकरण झाले नाही व त्या कालांतराने नष्ट झाल्या .
त्यांच्या एकूणच काव्यरचनेवर भाष्य करताना कविवर्य बोरकर म्हणतात — “ त्यांच्या काव्यातील प्रसाद आणि लय ही विस्मयचकित करणारी आहे . त्यांची बहुसंख्य पदे राग-तालातील आहेत . त्यातले काही राग जितके अनवट आहेत तितकेच काही ताल बिकट लयीतील आहेत . यावरून सोहिरोबा हे उत्तम रागज्ञ व तालज्ञ होते असे वाटते , “
—- मध्यजीवन – उत्तरेस प्रयाण —-
वयाची चाळीशी होण्याच्या आंत सोहिरोबांना ज्याप्रमाणे योगसिद्धी प्राप्त झाली त्याचप्रमाणे त्यांची ग्रंथनिर्मितीही साकार झाली होती . पुढील २५ वर्ष सोहिरोबा सावंतवाडीपासून गोव्यापर्यंत सर्वत्र फिरत होते . भजन , कीर्तनाच्या माध्यमातून तापत्रयांनी पोळलेल्या अनेकांना त्यांनी दिलासा दिला असेल . अनेकांच्या मार्गातील अडथळे दूर केले असतील . पण विशेष म्हणजे आपला संसार चालवून , संसार करता करता मुक्ती मिळवता येते आणि नंतर संसार चालविला तरी मुक्तावस्थेस बाधा येत नाही असा प्रकारचा धडाच त्यांनी आपल्या वर्तनातून लोकांना दिला असावा .
वयाच्या जवळ जवळ ६६ व्या वर्षी म्हणजे इ.स. १७८० मध्ये आपल्या दोन्ही मुलांसह ते उत्तरेकडे यात्रेला निघाले . द्वारका , मथुरा , व्रुंदावन , काशी , प्रयाग इत्यादी पुण्यक्षेत्रांना भेट देऊन शेवटी ते उज्जैन येथील मल्लीनीथ मठात येऊन पोहोचले . ईश्वर चिंतनात सतत मग्न असणाऱ्या सोहिरोबांची किर्ती हळू हळू साऱ्या उज्जैनीत पसरू लागली . या सुमारास ग्वाल्हेरच्या महादजी शिंद्यांचा या भागावर अंमल होता . गोव्यातील पेडणे तालुक्यातील जीवबादादा केरकर हे महादजींचे सेनापती व प्रमुख कारभारी होते . त्यांच्या कानावर सोहिरोबांची किर्ती पोहोचली . तेंव्हा ते सोहिरोबांना आपल्या वाड्यावर घेऊन गेले . आता हे जीवबादादा कोण त्याकडे एक नजर टाकू .
—- बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर —-
जीवबादादा केरकर हे मुळचे गोव्यातील मोरजे गांवचे . मूळ आडनांव संझगिरी . पोर्तुगीजांच्या धामधुमीत त्यांचे कुटुंब पेडणे तालुक्यातील केरी गावात जाऊन स्थायिक झालं म्हणून ते ‘ केरकर ‘ झाले . जिवबादादा लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते . सर्व शास्त्रांत ते जसे पारंगत होते तसेच घोडदौड आणि तलवार चालवण्यातही त्यांनी प्राविण्य मिळवले होते . १५/१६ व्या वर्षी ते नशीब काढण्यासाठी पुण्यास गेले आणि सरदार बर्व्यांच्या पदरी राहिले . त्यांची हुशारी पेशव्यांच्या नजरेस आली आणि पेशव्यांनी त्यांना वाकनीसाच्या कामावर नेमले पेशव्यांच्या घरातील भोजनव्यवस्थेसह संपूर्ण कारभाराची सुत्रं त्यांच्या हातात आली . अशाच एका प्रसंगी महादजी पेशव्यांकडे आले असतां जिवबादादांचा चोख कारभार आणि समयसूचकता त्यांच्या नजरेस आली व त्यांनी पेशव्यांकडून त्यांना मागून घेतले . जिवबादादा आपल्या हुशारीच्या आणि शौर्याच्या जोरावर शिंद्यांचे सेनापती आणि विश्वासू सल्लागार बनले . पानिपतच्या पराभवानंतर उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा जो दबदबा निर्माण झाला आणि दिल्लीचे तख्तही शिंदेशाहीच्या आधीन झाले त्या सर्व युद्धांत आणि मसलतीत जिवबादादांचा महत्वाचा वाटा होता . खुद्द ग्वाल्हेर सुद्धा त्यांनीच गोहदवाला राणा यांजकडून जिंकून घेतले होते आणि म्हणून शिंद्यांनी त्यांना बक्षीसगिरी दिली . त्यावरून त्यांचे बक्षीबहाद्दर हे नांव रूढ झाले . असो . तर अशा या मातब्बर व्यक्तीस आपल्या गांवाकडून आलेल्या या थोर संताप्रती मनात अतीव आदर आणि भक्तीभाव निर्माण झाला . काही दिवस आपल्या घरी ठेऊन त्यांचा आदरसत्कार केल्यावर सोहिरोबांना महादजीच्या भेटीस नेण्याचा कार्यक्रम त्यांनी योजिला .. महादजी स्वत: काही कविता रचत असत . त्या त्यांनी वाचून दाखवल्या तर त्या चांगल्या आहेत असे म्हणावे असे जिवबादादानी सूचित केले त्यावर सोहिरोबा म्हणाले – “ चांगल्या असतील तर जरूर चांगल्या म्हणेन . “
—- महादजींची भेट आणि उपदेश —
ठरल्याप्रमाणे महादजींनी सोहिरोबांची भर दरबारात भेट घेतली . त्यांना उच्चासनावर बसण्याची विनंति केली . पण सोहिरोबांनी ती नाकारली व ते सामान्य जनांतच बसले . इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर महादजींनी आपल्या कवितांची वही सोहिरोबांना देऊन च्यांचा अभिप्राय मागितला . वही चाळून झाल्यावर नि:स्प्रुह व्रुत्तीचे सोहिरोबा म्हणाले – “ ज्या कवितेत प्रसाद नाही , साक्षात्कार नाही , भगवंताचे गुणवर्णन नाही ती कविता आम्हांस आवडत नाही , “
सोहिरोबांच्या या उद्गाराने भर दरबारात आपली बेअदबी झाली असे वाटून महादजींना राग आला व काहीसे चिडून ते म्हणाले – “ जानते हो हमारी दौलत क्या चीज है ? “ दिल्लीच्या तख्तावर कोणाला बसवायचं ते ठरवण्याची ताकद असणाऱ्या व्यक्तीचा तो प्रश्न होता . पण अत्यंत निर्भयपणे सोहिरोबा त्यांना म्हणाले —–
दौलत देख दिवानी मेरी | अपना मौज न करना फेरी ||
कोई दिन बनियाके दुकान | कोई दिन पर्वतपर ठिकान ||
तनके करत कारभार | हमारे छत्तीस खिजमतगार ||
मनपवनकी पागा | सोSहं पिलखानेकी जग्गा ||
अशा पंक्ती असलेले हे संपूर्ण गीत ऐकल्यावर सोहिरोबांचा निस्प्रुह बाणा अधिकार आणि विलक्षण काव्यसिद्धी पाहून पराक्रमी आणि धर्मपरायण असलेला महादजी नतमस्तक झाला आणि त्याने सोहिरोबांचा योगक्षेम सुखाने चालावा म्हणून त्यांना सोने-चांदी आणि मोहरांचा नजराणा अर्पण केला . पण ब्रम्हानंदात मश्गूल राहणाऱ्या सोहिरोबांना या संपत्तीची गरज नव्हती . आणि म्हणून त्या संपत्तीचा स्वीकार करण्यास नकार देऊन सोहिरोबा म्हणाले —-
अवधूत नही गरज तेरी | हम बेपर्वा फकिरी ||
तुम हो राजा | मै हो जोगी | प्रुथक पंथका न्यारा ||
चार कोट जहागिरी तुम्हारी | ओही पंथ हमारा ||
सोना चांदी हमकू नही चाहिये | अलखभुवनका बासी ||
महाल मुलुख सब झांट बराबर | हम गुरूनामोपासी ||
या प्रकारे ऐहिक वैभवाबद्दल आपणास वाटणारी तुच्छता दर्शवून अलक्ष्याचा वेध घेण्याचा उपदेश तिसऱ्या पदाने केला —-
स्वरूपी नजरा लावी ठीक | उदरा मागून खाणे भीक ||
स्वइच्छ असणे , अलक्ष पाहणे | भजन करू नको दांभिक ||
अचिंत्य स्मरणी , अगम्य करणी | अनादि आरंभिक ||
म्हणे सोहिरा निराकारी निराधारी | मन करणे राबीक ||
यानंतर पुढे महादजीबाबांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांना उज्जैन येथे एक मठ बांधून दिला .
—– विठ्ठलाचार्यास उपदेश —
उज्जैनचा मठ बांधुन होईपर्यंत सोहिरोबा एका धर्मशाळेत राहत होते . या धर्मशाळेत विठ्ठलाचार्य दीक्षित नांवाचे एक शास्त्री चंपा नांवाच्या एका परस्त्रीशी कामक्रीडेत दंग असल्याचे त्यांनी पाहिले . सोहिरोबांनी दोन पदे म्हणून त्यांना भानावर आणायचा प्रयत्न केला . विठ्ठलाचार्याँना ते रूचले तर नाहीच पण आपले बिंग आता फुटेल या भीतीने त्यांनी सोहिरोबांचा कांटा काढण्याचे ठरवले . सोहिरोबा ध्यानस्थ बसले असतां इतर दोन माणसांच्या मदतीने त्यांनी सोहिरोबांना एका शिलेवर घट्ट बांधलं आणि विहिरीत ढकलून दिलं . ईश्वर क्रुपेने शिला तर बुडली नाहीच पण त्यासमयी प्रगट झालेल्या ९ सिद्धींनी सोहिरोबांना मुक्त करून त्यांच्या मूळ ठिकाणी आणून बसवलं . विठ्ठलाचार्यांना हा प्रकार समजतांच सोहिरोबांच्या सामर्थ्याची त्यांना जाणीव झालीच परंतु आतां आपणावर ईश्वरी कोप होईल या भीतीने ते सोहिरोबांना शरण गेले व क्षमायाचना करूं लागले . तेंव्हा सोहिरोबा त्यांना म्हणाले – “ असे ओशाळे होऊ नका . देहबुद्धीचा त्याग करून आत्मस्वरूपी लक्ष लावलेत की कर्म आणि ज्ञान दोन्ही संपतील आणि तुम्ही सच्चिदानंदाचा अखंड अनुभव घेत रहाल . “ या विठ्ठलाचार्यांना उद्देशून सोहिरोबांनी जी ५ पदे म्हंटली ती “ विठ्ठलविवेक सुधापंचक ‘’ म्हणून प्रसिद्ध आहेत . विशेष म्हणजे शेवटच्या पदातील पुढील पंक्ती वाचल्यावर सोहिरोबांचे मन किती शांत व निर्वैर झाले होते ते समजते .
स्थान बरे जलवास | जेथे स्वप्नीं नसे खलत्रास || असे म्हणून पुढे म्हणतात –
म्हणे सोहिरा शेषशायी हा | झाला विठ्ठलदास ||
खल मित्रासम मानुनी केला | क्षीरसागर हा वास ||
—- सदेह वैकुंठगमन —-
अशा रीतीने १७८० मध्ये कोंकणातून उत्तर हिंदुस्थानात यात्रेसाठी निघालेले सोहिरोबा आतां उज्जैनात स्थिरावले होते . संत नामदेवांच्या नंतर महाराष्ट्राच्या संतमालिकेतील ते दुसरे संत की जे उत्तर हिंदुस्थानात गेले , हिंदीतून काव्यरचना केली आणि भगवद्भक्तीचा प्रसार केला . इ.स. १७९२ मध्ये म्हणजे साधारण ७८ व्या वर्षी चैत्र शुद्ध नवमीला ते अचानक नाहीसे झाले . आदल्या रात्री मठांत आपल्या नेहमीच्या जागी ते झोपले होते . सकाळी ते तिथे आढळले नाहीत . लोकांनी सर्वत्र शोध घेतला पण ते सांपडले नाहीत . त्यांच्या बिछान्यावर एक कागद सांपडला . त्यावर खालील ओवी लिहिलेली होती —-
दिसणे हे सरले | अवघे प्राक्तन हे मुरले ||
आलो नाही गेलो नाही | मध्ये दिसणें ही भ्रांती ||
दिसणे हाचि जन्म योगियां | ना दिसणे हा म्रुत्यू म्हणा ||
गैबीप्रसादे गैबचि झाले | आप आपणामध्ये लपले ||
मच्छिंदर गोरख जालंदर हे | न्याया आले स्वस्वरूपी ||
जाता जाता गमन ग्राम ते | समूळ कोठे ना गमले ||
म्हणे सोहिरा सतराचवदा | मधुमासाच्या नवमदिनी ||
सगूण स्वरूपी निर्गुण ठेले | अनुभव हरले स्वरूप कळे ||
अशा या सोहिरोबानाथांमध्ये आपल्याला ज्ञानदेव , नामदेव , एकनाथ आणि तुकाराम या सर्वांचा एक अनोखा संगम झालेला दिसतो .
ज्ञानदेवांप्रमाणे तेही नाथसंप्रदायाचे होते . शिवाय त्यांच्या ओव्याही तशाच मंत्रसिद्ध आणि अर्थपूर्ण आहेत . नामदेवांप्रमाणे उत्तर हिंदुस्थानात त्यांनी महाराष्ट्रधर्माची पताका रोवली . एकनाथांप्रमाणे संसारात राहून चोख व्यवहार करून भक्ती-ज्ञान-कर्म यांच्या समन्वयाचा गीताप्रणित आदर्श समाजापुढे ठेवला आणि शेवटी ‘ आलो नाही , गेलो नाही ‘ म्हणत तुकोबारायांप्रमाणे सदेह वैकुंठ गमन केले .
— नरेन्द्र नाडकर्णी
=================== $$$$$$$$$ ===================
आधार – १) महदनुभवेश्वरी
२) सोहिरोबांची कविता
३) श्री सोहिरोबानाथ अंबिये – कविवर्य बा भ बोरकर
( हा लेख “ चिंतन – दिवाळी अंक, २०१२ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला )