शरीरापासून आपण प्राणिक प्रेरणेकडे म्हणजेच ‘ प्राणशक्ती ‘ कडे वळू. . प्राणशक्ती शरीराला जोम देते . प्राण हा मानवाच्या प्रवृत्ती , हालचाल व क्रिया यांचे अधिष्ठान आहे . प्राण हा सामर्थ्याचा पाया आहे . प्रगति करण्याची धडाडी , धैर्य , इच्छा वासनांचे मूळ व महत्वाकांक्षेचे अधिष्ठान येथे असते . जेथे प्राणशक्ती दुर्बल असते तेथे जीवन क्रिया पण दुबळीच असते . ज्यांच्याजवळ प्राणशक्ती भरपूर आहे ते जीवनावर अधिकार गाजवितात . जर प्राणशक्ती पूर्णपणे विकसित असेल व विश्वातील प्राणशक्तीशी संपर्क साधण्याइतकी विशाल असेल तर तिला वैश्विक प्राणशक्तिपासूनही आधार मिळतो . जर प्राणशक्ति शुद्धीकरणाने व आकांक्षेने उच्च शक्तीला सन्मुख झाली तर आध्यात्मिक शक्तीचा अखंड पुरवठा मानवी प्राणशक्तिला होऊ शकतो. माताजी म्हणतात आपल्या, सहकार्यांच्या देवाण घेवाणीतून विशेषत: विरुद्ध लिंगाच्या सहकार्याच्या माध्यमातून प्राणशक्तीला वाढविणारा चौथा आधार असतो . प्रेमाच्या नावाखाली दोन भिन्नलिंगी व्यक्तीत ही प्राणीक चेतना कार्य करते .
* ज्यांना उच्च आध्यात्मिक जीवन जगावयाचे असते असे काही लोक प्राणशक्तीला गरजेपुरती वापरतात . या शक्तीला ते मोकळी सोडत नाही कारण ती बहुधा वाकड्या वाटेवर नेते . आणि म्हणून ते तिच्यावर सक्त बंधने घालून तिला ताब्यात ठेऊनच तिचा योग्य तो वापर करतात . तिच्या मुक्त लीला गरजेपुरत्या असल्या तरी त्यांचे दमन करतात . प्राणिक वासना जवळ जवळ मारून टाकतात. परंतु अशा रीतीने त्या वासनांचा आविष्कार जेंव्हा दडपला जातो तेंव्हा आयुष्य बेचव , शुष्क आणि रिकामे होऊन जाते .
* ज्याला पूर्णयोगात परिपूर्ण व्हावयाचे असते त्याच्या दृष्टीने वरील पद्धत सर्वथैव अनुचित आहे . कारण पूर्णयोगात इतर शक्तिंप्रमाणे प्राणशक्तिलाही स्थान आहे . या पद्धतीत कोणत्याही गोष्टीची सक्ती नाही तर उच्च पातळीवर जाण्यासाठि तिचे सहकार्य हवे आणि हा मार्ग निरीक्षण , परीक्षण आणि शिक्षण या तीन घटकातून जातो . साधक आपल्या शक्तीच्या हालचालीवर लक्ष्य ठेवतो , आपल्या इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष्य ठेवतो , प्रतिक्रियांची नोंद ठेवतो. प्रगतिपथावर नेणार्या क्रिया आणि अधोगतीस नेणार्या क्रिया यांना वेगळे करतो . चांगल्या मार्गावर नेणार्या प्रवृत्तींना उत्तेजन देऊन त्या अंगी बाणविल्या पाहिजेत आणि विरोधी प्रवृत्ती नाहीशा केल्या पाहिजेत असे तो मनावर ठसवितो . तो सारासार विचार करतो , भावनात्मक आवाहन करतो किंवा आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशा संवेदनेला हा मारतो किंवा आपल्यासमोर उच्चतम ध्येयशील व्यक्तिमत्वाचे उदाहरण ठेवतो. अशा पद्धतीने प्राणिक शक्तीला वळण लावून योग्य मार्गावर वळविली जाते .
* प्राणिक इच्छा ही इंद्रियांच्या द्वारातून झेपावते आणि आपल्या उपभोगासाठी त्यांचा वापर करते. नैसर्गिकरीत्या इंद्रियाना शिस्त नसते . त्यांना सारासार विचार करून क्रिया करण्यासाठी शिकवावे लागते . आपल्याला जे हितकारक नाही , अमंगळ आहे त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करावयास इंद्रियाना भाग पाडले पाहिजे . सुदृढ , सुंदर व सुसंवादी क्रियांचा संपर्क वाढवून त्यांचे स्वागत करण्यास इंद्रियाना शिकवावे लागते . त्यांना अशी सवय लावली की मग ते उत्स्फूर्तपणे असा सारासार विचार करून कल्याणकारी क्रियाच करतात. इंद्रियांचे तप त्यांना उपाशी ठेऊन त्यांचे दमन करून त्यांना नष्ट करणे हे नाही तर त्यांचा सदुपयोग करून त्यांच्यामार्फत ज्ञान व अनुभव मिळविणे , श्रेयस्कर प्रवृत्तींचा आपोआप स्वीकार करण्याचे व अहितकारक प्रवृत्तींचा त्याग करण्याचे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सौन्दर्य व सुसंवादाची उघडी द्वारे बनविणे हा इंद्रिय तपाचा खरा उद्देश आहे .
* हे प्रशिक्षण दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे व त्यासाठी संयम , सहनशक्ति, व इच्छाशक्ती यांना पणाला लावून माणसाला आपल्या वासनावृत्तींवर विजय मिळवावा लागतो या वासना सुरूवातीस प्रभावी आणि बंडखोर प्रवृत्तीच्या असतात. पण या मार्गावर प्रगति साधण्यासाठी आकांक्षा करणारा व्यक्तिमत्वाचा भाग आणि प्राणिक प्रवृत्ती यांच्यात सहकार आणि सद्भाव निर्माण करावा लागतो. सुधारणा व्हावी ही इच्छा व परिपूर्णतेकडे वाटचाल ही वासना-विकारांवर ताबा मिळवून आपल्या प्रत्येक क्रियेतून प्रतीत झाली पाहिजे . असा अभ्यास केल्यास प्राणिक वृत्ती आपल्या ध्येयमार्गावरील अडथळा न होता सहाय्यक होते . आत्मनिरीक्षण , आत्मशुद्धी , आत्मसुधारणा , तरतमभाव व ध्येयाच्या आसक्तीतून प्राणिक वृत्ती आपल्या खर्या स्वरुपात म्हणजे निस्वार्थी , उदार व उदात्त स्वरुपात प्रगटते .
श्रीअरविंदांच्या शब्दात ती परमेश्वराच्या लढाऊ सैनिकाच्या रूपात प्रगटते .
=============== ########### ================
संकलन — नरेंद्र नाडकर्णी , संदर्भ — ” Art of Living ” by M. P. Pandit
मराठी रूपांतर : सुहास टिल्लू