भारतीय राष्ट्रवादाचा प्रेषित, देशभक्ती आणि राष्ट्रोद्धाराचा महान उद्गाता, आणि प्राचीन ऋषि-मुनींच्या परंपरेतील आधुनिक द्रष्टा महर्षि असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या महायोगी श्री अरविंदांची १४९ वी जयंती १५ ऑगस्टला साजरी होत आहे . श्री अरविंदांच्या जन्मदिनीच भारत स्वतंत्र व्हावा हा केवळ योगायोग नव्हता तर थंड गोळ्याप्रमाणे बनलेल्या राष्ट्रात ज्यांनी चैतन्य निर्माण केलं, लाखो तरुणांच्या हृदयात असणार्या देशप्रेमाच्या ज्योतिला आपल्या लेखनानं आणि ओजस्वी वाणीनं प्रज्वलित केलं आणि पुढे ४० वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जनमानसाची तयारी केली त्या अरविन्दबाबूंच्या कार्याचं महत्व देशवासीय जरी कालांतराने विसरले असले तरी नियती विसरू शकत नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या ७५ व्या जन्मदिनी नियतीनं त्यांना स्वतंत्र भारताचा जणू नजराणा अर्पण केला .
वयाच्या ७व्या वर्षापासून २१व्या वर्षापर्यंत अरविन्दबाबुना त्यांच्या वडिलांनी इंग्लंडला शिक्षणासाठी ठेवलं होतं ते मुख्यत: त्यांना भारतीय भाषा, संस्कृती, विचारधारा यांचा वारासुद्धा लागू नये म्हणून. आणि तरीही अरविंदांच्या हृदयात तेवत असलेली राष्ट्रप्रेमाची ज्योत विझली तर नाहीच पण उफाळून आली. आय.सी.एस ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही ब्रिटिशांची चाकरी त्यांनी नाकारली आणि मातृभूमीची वाट धरली ती राष्ट्रमुक्तीचा ध्यास घेऊनच .
आपल्या लेखणीच्या सामर्थ्यांनं आणि ओजस्वी वाणीनं भारताच्या गतवैभवाची आठवण करून देऊन त्यांनी तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीचा अंगार फुलवला. राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे तर ती आपली माता आहे, देवता आहे असे ते मानत. आणि अशा या मातेला जर एखादा राक्षस बंदिस्त करून तिचं रक्त पीत असेल तर मिळेल ते साधन वापरुन, जमेल त्या मार्गाने तिला मुक्त करणं हे तिच्या मुलांचं आद्यकर्तव्य ठरतं असं ते निक्षून सांगत .
बंकिमबाबूंच्या वंदे मातरम’या गीतामधील मंत्रसामर्थ्याची त्यांना जाणीव झाली आणि मग त्या दोन शब्दांनी अभूतपूर्व अशी क्रांति घडवली.
“ १९०५ साली सुरू झालेल्या वंगभंगाच्या चळवळीला तात्विक बैठक त्यांनीच पुरवली आणि या चळवळीमुळेच पुढील लढ्याचा पाया घातला गेला व गांधींचा
मार्ग सुकर झाला” अशा शब्दात त्यांचा गौरव करताना पंडित नेहरूंनी म्हंटलयं की “ त्यांचं राजकीय जीवन फारतर ५ वर्षांचं . पण ते एखाद्या धूमकेतुसारखे आले आणि आपला प्रकाश फाकून निघूनही गेले . “ सशस्त्र क्रांतीकारकांना त्यांची सहानुभूती होती, मार्गदर्शनही मिळत होतं परंतु भावी काळात महात्मा गांधींनी यशस्वी केलेल्या शांततामय असहकाराची, स्वदेशीच्या पुरस्काराची आणि परकीय मालावरील बहिष्काराची सूत्रबद्ध विचारधारा वंदे मातरम या नियतकालिकातून त्यांनी मांडली होती आणि वंगभंगाच्या चळवळीत प्रत्यक्षात उतरवलीही होती . नैतिक सामर्थ्य आणि शांतिपूर्ण दबाव यांच्या सहाय्यानं
रक्तहीन क्रांतीची शक्यताही त्यांनी वर्तवली होती . आणि यावरूनच डॉक्टर
करणसिंग यांनी म्हंटलयं की “ असहकार , बहिष्कार यांचे शस्त्र वापरुन गांधीजींनी ब्रिटीशांना नामोहरम केलं पण त्या विचारांचा भरभक्कम पाया गांधीजी भारतात येण्याच्या १० वर्ष आधी श्री अरविंदानी घातला होता हे आपल्याला विसरून चालणार नाही. “ १९०८ साली अलिपूर बॉम्ब खटल्यामध्ये ब्रिटिश सरकारनं त्यांना गोवलं आणि एक वर्ष तुरुंगात डांबून ठेवलं याच काळात त्यांच्या जीवनाचा सांधा बदलला. तुरुंगातील साधना काळात त्यांना
“ सर्वम खलू इदम ब्रम्हम“ चा साक्षात्कार झाला . यथावकाश त्यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर आंतरिक आदेशानुसार आपली योगसाधना तीव्र करण्यासाठी त्यांनी पोंडीचेरीस प्रयाण केलं .
राष्ट्रीय चळवळीला श्री अरविंदानी गूढ आध्यात्मिक रंग दिला . संपूर्ण स्वातंत्र्याचं ध्येय समाजासमोर ठेवलं , भारतीय संस्कृतीच्या महान वारशाची पुनर्स्थापना करून समाजात नवचैतन्य निर्माण केलं आणि संपूर्ण चळवळीला मानवी एकतेच्या व्यापक ध्येयवादाशी जोडणारा आध्यात्मिक राष्ट्रवादाचा नवा विचार मांडला. श्री अरविंदांचा राष्ट्रवाद हा जसा परराष्ट्रांविषयी द्वेषभावना ठेवणारा नव्हता तसाच तो संकुचित पुंनर्जीवन साधणाराही नव्हता . किंबहुना संपूर्ण मानवी समाजाला आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठीच भारताचा उदय होत आहे अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून त्यांचा राष्ट्रवाद हा खर्या अर्थाने मानवी ऐक्याचा आदर्श दाखवणारा आंतरराष्ट्रीयवाद होता .
महाराष्ट्राचा दैदीप्यमान इतिहास आणि मराठी बाणा यांचा योगी अरविंदानी त्यांच्या लिखाणात गौरव केलेला आढळतो. त्यांना मराठी भाषा तर समजत होतीच पण ते मोडी लिपीही शिकले होते. योगसाधनेचे प्राथमिक धडे त्यांनी गिरवले ते योगिराज विष्णु भास्कर लेले यांच्या मदतीने. महाराष्ट्रातील संत व त्यांचे कार्य याविषयी त्यांना आदर होता. विशेषत:
समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढलेले दिसतात. छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख तर त्यांनी अवतारी पुरुष म्हणून केला आहे. देश, धर्म, आणि आपला स्वामी यांच्यावरील निष्ठेने आपल्या प्राणांची बाजी लावणार्या बाजीप्रभु देशपांडेच्या शौर्यगाथेने ते प्रभावित झाले आणि त्या कथेवर एक दीर्घ काव्य लिहून बाजीला त्यांनी इंग्रजी वाङ्ग्मयात अमर केलं. लोकमान्यांशी तर त्यांचा समसमा संयोग झाला होता. भारताचे स्वातंत्र्यलढ्यातील ईश्वरदत्त सेनानी अशा शब्दात त्यांनी टिळकांचा गौरव केला होता.
भारतीय संस्कृतीवर आधारलेली आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी त्यावर विचार मांडून राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था त्यांनी स्थापन केली. भारतीय संस्कृतीचा पाया या ग्रंथातून अध्यात्मिकता हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि तेच अंतिम ध्येय आहे हे त्यांनी दाखवून दिले. वेदमंत्र हे केवळ कर्मकांडा साठी वापरले जात असले तरी त्यामागे गूढ, आध्यात्मिक अर्थ आहे हे आपल्या ‘ सिक्रेट्स ऑफ द वेदाज’ या ग्रंथातून सिद्ध केलं.
“ ह्युमन सायकल “ या ग्रंथातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतिची समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून चिकित्सा केली. भावी काळातील कविता कशी असेल त्याचे दर्शन घडवणारा “ फ्यूचर पोएट्री “ हा ग्रंथ लिहिला. दोन जागतिक महायुद्धानी ग्रासलेल्या आणि भयभीत झालेल्या मानवतेला प्रेम आणि आनंद यांची ग्वाही देणारं, दिव्य जीवनाच्या उष:कालाची नांदी ठरणारं ‘सावित्री ‘ हे वैश्विक महाकाव्य लिहीलं आणि त्या दिव्यजीवनाकडे जाण्यासाठी सर्व पारंपारिक योगमार्गांच्या संयोगीकरणातून पूर्णयोगाचा मार्ग दाखवला .
श्री अरविंदांच्या योगदर्शनात परमेश्वराचा अंतर्यामी, विश्वात्मक, विश्वरूपी, निर्गुण, निराकार, व सच्चिदानंद स्वरूप इत्यादि सर्व रूपात साक्षात्कार करून घेण्याचा संकल्प आहे. मात्र वैयक्तिक, सांसारिक, किंवा पारलौकिक सुखाची प्राप्ती हा पूर्णयोगाचा उद्देश नाही. आपल्या अंतरंगात असणार्या आणि सूप्त असलेल्या दिव्य संभावनांचा विकास हा या योगाचा खरा अर्थ व उद्देश. मानवी जीवनाच्या अंध:कारापासून पलायन करणे म्हणजे योग नव्हे तर त्या अंध:कारात दिव्य प्रकाश उतरवून अज्ञानात बुडालेल्या असार, दु:खमय जीवनात प्रेम आणि आनंद निर्माण करणे हा पूर्णयोगाचा उद्देश . श्री अरविंदांचा योग जीवनाभिमुख आहे . विश्व आणि जीवन यांना माया मानून त्यातून निवृत्त होऊ पाहणारा नाही. अर्थहीन देहदंडन आणि रसहीन वैराग्य यांना त्यात स्थान नाही.
वेद , उपनिषद आणि भगवद्गीता यांची विचारधारा आणि आधुनिक उत्क्रांतीवाद यांची सांगड घालून श्री अरविंदानी ते चिरंतन सत्य एका नव्या अविष्कारात आणि शास्त्रीय परिभाषेत समाजासमोर ठेवलं . मानवाला पृथ्वीतलावरील दैवी जीवनाच्या शक्यतेचा मार्ग दाखवणार्या या थोर आधुनिक तत्ववेत्या महर्षिने ५ डिसेंबर १९५० रोजी आपल्या भौतिक देहाचा जरी त्याग केला असला तरी त्यांची दिव्य चेतना आणि त्यांनी निर्माण केलेलं विचारधन पोंडीचेरी आश्रमाच्या माध्यमातून आजही लाखो लोकांना दिव्य जीवनाचा मार्ग दाखवत आहे .
नरेंद्र नाडकर्णी
टेलि.: ९९६९७१७९८९/ ई मेल: [email protected]
( हा लेख प्रथम १५ ऑगस्ट २०१३ रोजी लोकसत्ताच्या पुणे एडिशन मध्ये प्रसिद्ध झाला )