Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • General
  • Kharkar Ali
  • General

Kharkar Ali

Narendra Nadkarni March 15, 2023

खारकर आळी  सुरू  होते  जांभळी नाक्यापासून  आणि  पोहोचते  थेट  कळव्याच्या  खाडीवर . वाटेत  प्रथम  उजवीकडे  एक  फाटा जातो ती  महागेरी , खारकर आळीला समांतर  जाणारी  . त्याच  ठिकाणी  एक  फाटा  डावीकडे  जातो  ती  कडवाची  गल्ली कलेक्टर  ऑफिस जवळ  स्टेशनरोडला  मिळणारी . पुढे  डावीकडे  एक  फाटा  जातो तो सखाराम महाडीक रोड , सीकेपी हॉल वरून  कोर्ट नाक्याला  जाऊन  मिळणारा . यानंतर  खाडीकडे  पोहोचण्यापूर्वी  एक  चौक  आहे  तिथे  डावीकडे  जाणारा  रस्ता  पोलिस  कमिशनरच्या  ऑफिसवरून  कोर्ट नाक्याला  मिळतो तर  उजवीकडे  जाणारा रस्ता महागेरीला  जाऊन  मिळतो.

आमची  म्हणण्याचे  कारण  माझा  जन्म  खारकर आळी मधला . आणि  त्यानंतर  १९७४ अखेर पर्यन्त  म्हणजे  ३६  वर्षे मी  खारकर आळीत  राहिलो . माझी सारी जडण घडण  त्या  आळीतच  झाली . आळीतील  सारी  कुटुंबं  पिढीजात  तिथेच  राहत होती  आणि  त्यामुळे  आळी  म्हणजे  एक  मोठे  कुटुंबच  होते . प्रत्येक कुटुंबाच्या सुख दु:खात इतरांचाही सहभाग असे . एखादा मुलगा मॅट्रिक पास झाला की सर्वांना पेढे द्यावे लागत . सत्यनारायण , गणपति-गौरी इत्यादि कार्यक्रमात एकमेकांच्या घरी हजेरी असायची सार्वजनिक गणपति नव्हता पण पूजा अथवा अन्य निमित्ताने चक्री व्याख्यानासारखे कार्यक्रम आणि मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा , करमणुकीचे कार्यक्रम व्हायचे .

            विशेष म्हणजे आज ठाणे शहरात अन्यत्र नावारूपाला आलेल्या तीन मोठ्या संस्थांचे जन्मस्थान खारकर आळी आहे . त्या तीन संस्था म्हणजे १ ) मराठी ग्रंथ संग्रहालय २ ) आर्य क्रीडा मंदिर , आणि ३ ) मो ह विद्यालय . आणि चौथी मोठी संस्था खारकर आळीतच निर्माण झाली व तिथेच मोठी झाली ती म्हणजे सिकेपी भवन . 

           त्या काळातील  अनेक  थोर  व्यक्ति  तिथे  राहत होत्या , काही थोर व्यक्ति काही काळ वास्तव्य करून गेल्या . सर गोविंदराव प्रधान यांचे सारखी ब्रिटिश आमदानीत मंत्रिपद भूषविलेली व्यक्ति , बाबा किर्तीकर , दादाजी गावंड , बाबासाहेब प्रधान यांच्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील थोर व्यक्ति , नाडकर्णी वकील , कोतवाल वकील तेंडुलकर वकील यांच्यासारख्या स्वातंत्र्य लढ्यात त्यागमय जीवन जगलेल्या व्यक्ति , रा स भागवतां सारखे थोर तत्वज्ञ  यांचेपासून आजतागायत अनेक क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीमुळे खारकर आळीचा इतिहास हा निश्चितच गौरवास्पद ठरतो. तिथून कोर्ट जवळ  असल्याने  वकील  आळी  म्हणता येईल  इतके  वकील  खारकर  आळीत  राहत होते . आज  ४५ वर्षानी  खारकर आळीचं  स्वरूप  पार बदलून  गेलं  आहे . उंच उंच इमारती झाल्या  आहेत  तर  काही  भागात  छोटी  बाजारपेठ  निर्माण  झाली  आहे . ते सारं पाहून  जुन्या  आठवणी  जागृत  होतात . असो .

           आता  मुळात  या  आळीला  खारकर आळी  असे  नाव  का पडले  ?  आळीच्या  शेवटच्या   भागात  जो  खारकर वाडा  आहे  त्यांचे  पूर्वज  एका संस्थानात दिवाण होते . संपूर्ण खारीगाव त्यांचे मालकीचे असल्याने त्यांना खारकर हे आडनाव मिळाले पुढे या खारकर कुटुंबातील अनेक व्यक्तींनी खाडीच्या पश्चिमेकडील भागात  आपली घरे बांधली होती व  त्यावरून  या  भागाला  खारकर आळी  असे  नाव  पडले .

           खाडीच्या  बाजूने  सुरुवात  केली  की  प्रथम  ठाणावाला  यांची  मोठी  वाडी  होती . याच  वाडीतील  एका  जागेत  गोपाळराव अक्षीकर यांनी 2 नोवेंबर 1892 रोजी स्थापन केलेल्या ज ए इ च्या मिडल स्कूल जागा मिळाली आणि त्या शाळेस मोहनलाल हरगोविंददास हे नाव प्राप्त झाले . पुढे अनेक वर्षांनंतर प्रभात सिनेमा मागील जागेत शाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली . १९१७ मध्ये शाळेस १२५ वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता      

          त्यानंतर  वैशंपायन  वाडी . यातील  पहिले  एक  मजली  घर  प्रा. नाना  करंदीकर  यांचे,  नाना  रुईया  कॉलेज मध्ये  गणिताचा  प्राध्यापक  होता . त्याचा  संस्कृत  भाषेचाही  अभ्यास  दांडगा  होता . नानाच्या पत्नी  मंदावहिनी या  ठाण्यातील एक  निष्णात  वकील  म्हणुल  ओळखल्या  जातात . काही  काळ त्या  सरकारी  वकील होत्या .  याच  घरात  तळमजल्यावर  ५० वर्षापूर्वीच्या काळातील  मराठी  सिनेमातील  देखणा  नायक  विवेक  राहत  असे . सारा  महाराष्ट्र त्याला ‘ विवेक ‘ म्हणून ओळखत  असला  तरी  आमच्या  खारकर  आळीत  तो ‘ गप्या अभ्यंकर ‘ म्हणूनच ओळखला जात  असे . पुढे तो  पुण्यास  राहू  लागला . वाडीत  दोन तीन  बैठ्या  चाळी  होत्या . त्यापैकि  एकातलं  सर्व परिचित आणि  मनमिळावू   व्यक्तिमत्व  म्हणजे  श्रीधर  उर्फ  शंभ्या आठवले . शंभ्या  फ्लूट  उत्तम वाजवत  असे . नाना करंदीकर आणि शंभ्या आठवले हे दोघे    माध्यमिक शिक्षणोत्तर  विद्यार्थी  संघ  आणि  आल्मेडा  लायब्ररी  यांच्या संस्थापकांपैकी होत. या दोघांमुळेच माझा या संस्थांशी संबंध जुळला .    .

           त्यानंतर  एक  विस्तीर्ण  पटांगण  आहे . त्यातील अर्ध्या  भागात  मागील  बाजूस  मराठी  ग्रंथ संग्रहालयाची  मोठी  वास्तु  होती . किंबहुना  आजही  ती  वस्तु  भग्नावस्थेत  उभी  आहे . महाराष्ट्रातील या पहिल्या मराठी ग्रंथालयाची स्थापना १ जून १८९३ रोजी महाराष्ट्र सारस्वतकार कै. वि ल भावे यानी केली . मात्र वरील वास्तू बांधून तिचे उद्घाटन ८ जून १९३० रोजी ह भ प ल रा पांगारकर यांचे झाले .  संग्रहालयाच्या  भव्य दिवाणखान्यात  शास्त्रीय  संगीताचे  कार्यक्रम सुद्धा होत  असत . साधारण  १९५० च्या  सुमारास  असेल  मंगेशराव  रेगे वकील यांनी  एक  शास्त्रीय संगीत  मंडळ  स्थापन केले  होते त्यांचे वतीने  हे  कार्यक्रम होत . पुढे १ मार्च १९४० पासून स्टेशन  रोड  वरील  वास्तूत  संग्रहालय  सुरू  झाले  तरी  खारकर  आळी  शाखा दर  रविवारी  चालू  असे व  मी  व माझ्यासारख्या  आळीतील अनेकांना  त्याचा लाभ घेता  आला .

       संग्रहालयाच्या  पुढील  बाजूस  वकील लोकांच्या  क्लबची  छोटी  वास्तु  होती . वकील मंडळी  संध्याकाळी  तेथे  जमून  काहीजण  बैठे  खेळ खेळत  तर  काही  जण  टेनिस वगैरेही  खेळत .  विशेष  म्हणजे  वकील  लोकांचा  एक  क्रिकेटचा  संघही  होता . कर्णधार  होते  सबनीस वकील . माझे  वडील  डी एम नाडकर्णी  वकील  होते विकेटकीपर ओपनिंग बॅट्समन . त्याशिवाय  टीम  मध्ये  असायचे  माधवराव हेगडे , वालावलकर , बाळासाहेब चिटणीस , पागनीस , ओवळेकर , कोतवाल  इत्यादि वकील .

      त्या  पटांगणाच्या उर्वरित  भागात   पूर्वी   आर्य क्रीडा मंडळ  आणि  राष्ट्रीय सेवा संघ  यांच्या शाखा  भरत    असत  . आर्य क्रीडा मंदिराची स्थापना जून १९२७ मध्ये हरी अनंत वीरकर मास्तर यांनी केली . पुढे कालांतराने नवपाडा येथील जागेत वास्तु उभारून संस्थेचे कार्य सुरू झाले .   आता  त्याच  जागी  धर्मवीर  आनंद  दिघे  यांचे  समाधी-स्थळ  आहे . 

         धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाच्या  समोरील  बाजूस  डाव्या  कोपर्‍यावर  खारकरांचा  वाडा होता . आता  वाडा  नाही. तिथे  इमारती  उभ्या  आहेत . मात्र माझ्या डोळ्यासमोर अजूनही ते मुख्य घर , बाजूचं चंदूकाकांचं घर आणि मधलं पटांगण आहे . खारकरांच्या या  वाड्यात पूर्वापार रामजन्माचा उत्सव साजरा होत असे . खारकरांनी जतन केलेला देव्हारा , पाळणा वगैरे गोष्टी सुंदर व सुबक आहेत . माझ्या लहानपणापासून  मी  या  उत्सवास  जात  आलो  आहे . ठाण्यातील जवळ जवळ सर्व प्रतिष्ठित मंडळी या उत्सवास आवर्जुन हजेरी लावत .आज जरी वाडा नसला तरी खारकरांनी खाली ओपन हॉल ठेवला आहे तिथे उत्सव साजरा होतो . हेमचंद्र खारकर हे अनेक वर्षे  सी के पी क्लबचे  कार्यवाह  होते . त्यांचे धाकटे बंधु बाळ हे कौपीनेश्वर मंदिरातील धार्मिक कार्यक्रम  आयोजित करणार्‍या  आर्य समाजाचे  कार्यवाह  आहेत . बाळचा मुलगा सुदेश हा त्याच्या इतर व्यवसायांच्या जोडीने एक उत्तम योगशिक्षक म्हणूनही नावारुपास आला आहे , रोज सकाळी त्याचे योगाचे वर्ग वरील हॉलमध्ये भरतात .

       या  रामजन्माच्या  उत्सवातील  एक  मजेदार  आठवण  सांगितल्याशिवाय  राहवत नाही . मी  साधारण ७ / ८  वर्षाचा असेन . रामजन्म  झाला होता . आम्ही  मुलं , म्हणजे  मी , सदानंद ( भिसे ) वगैरे  पाळण्याच्या जवळच  बसलो  होतो . धार्मिक विधी  झाले  असल्याने  भटजीबुवा  काहीतरी  आणण्यास  उठले  आणि  सदांनंदला  म्हणाले  ”  बाळ ,

ही  पाळण्याची  दोरी  धरून  हळू हळू  ओढ . मी  येतो  दोन  मिनिटात ” पण आमच्या  बाळची  हळू  हळू ची  व्याख्या  तेज  होती . सदाने  दोरी  अशी  हालवली  की  प्रभू राम पाळण्यातून  खाली  पडले . एकच  गोंधळ  उडाला . सारे  धावत  आले  आणि  रामाला  पुन्हा  पाळण्यात  ठेवला . खारकरांच्याकडच्या  रामजन्म  उत्सवाचा  विषय  निघाला  की मी  आणि  सदा  अजूनही  हसत  बसतो  ते  त्या  प्रसंगाच्या  आठवणीने . असो.

         खारकर वाड्याला  लागूनच  कोपर्‍यावर  एक  एकमजली  घर आहे . आता  ते  बंद  दिसते . पण  तरीही  तिथून  जातायेताना  सहज  नजर  वर जाते , मनोमन  हात  जोडले  जातात , माझ्या  आधीच्या  पिढीपासूनचा  मो. ह. विद्यालयातील  प्रत्येकजण  तिथे  नतमस्तक  होतो.  गुरुवर्य  एस. वी . कुलकर्णी  यांचे  ते  वसतिस्थान . खरं  म्हणजे  एस. वी.  हे  ठाण्यातील  सर्वांनाच  आदरणीय  असे  व्यक्तिमत्व होते . गुरुवर्यांचेही त्यांच्या विद्यार्थ्यांवर अपरंपार प्रेम होते . त्यांच्या शेवटच्या आयुष्यात मी अनेकदा त्यांना भेटायला जात असे . गेलो की तासभर गप्पा व्हायच्या पण मुख्य विषय असायचा खारकर आळीतले त्यांचे विद्यार्थी . प्रत्येकाची नाव घेऊन चौकशी व्हायची . एखाद्याला मिळालेले यश ऐकून खूप आनंद व्हायचा तर एखाद्याला आलेले अपयश ऐकून त्यांच्या चेहेर्‍यावर सुद्धा व्यक्त केलेल्या हळहळीचे भाव उमटायचे . आमची १९५५ ची बॅच त्यांची खूप आवडती होती . २००१ मध्ये या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली . अविनाश कोरडे आणि बळवंत कर्वे यांनी मेहनत घेऊन आयोजन केले . आम्हीही सर्वांनी मदत केली आणि सरांचा सत्कार आणि आमचे सम्मेलन  असा छान कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमा आधी सरांची प्रकृती बिघडली होती . पण कार्यक्रम झाल्यावर ते इतके आनंदात होते की मला म्हणाले – अरे तुमच्या या कार्यक्रमाने मला संजीवनी मिळाली . असे होते त्यांचे आपल्या विद्यार्थ्यांवर विलक्षण प्रेम . काही विद्यार्थ्यांच्या जन्मतारखाही सरांकडे टिपलेल्या होत्या . त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मदिनी सकाळीच सरांचा आशीर्वादपर फोन जायचा . अशा त्या भाग्यवंतामध्ये मीही एक होतो. एका कार्यक्रमात सदानंद भिसे म्हणाला होता – ” सरांच्या नावातच सविनय वृत्ती आहे ” कुणाला वाटतं एस वी म्हणजे सौजन्य वृत्ती , शालीन वृत्ती , सुकोमल वृत्ती मला मात्र ते दिसले ते प्रेमं मूर्ती म्हणूनच .           

         ह्या  डाव्या  कोपर्‍यावर  जसा  खारकर वाडा  होता  तसाच  समोरच्या  कोपर्‍यावर  काहीसा  आंतमध्ये  डॉक्टर  भागवतांचा  वाडा  आणि  आंतील  भव्य  बंगला

होता . अलीकडच्या  सर्वांना  ठाऊक  असणारे  डॉक्टर  प्रभाकर भागवत  यांचे  वडीलही  डॉक्टर  होते . त्यांना  सर्वजण  अण्णा  म्हणत . त्यांच्या  तोंडात  कायम  भला मोठा   चिरूट  असायचा . तो  चिरूट तोंडात  ठेऊनच  ते  तपासायचे , बोलायचे . त्यांचे  वडील  बापूसाहेब  भागवत  हे  ठाण्यातील  प्रसिद्ध  वकील  होते  व  त्यांनीच  हा  प्रशस्त  बंगला  बांधला  होता . बापूसाहेब भागवतांचा त्या काळातील म्युलक लायब्ररी म्हणजेच आजचे नगर वाचन मंदिर वगैरे अनेक संस्थांशी निकटचा संबंध होता . बापूसाहेब भागवत हे माझे आजोबा माधवराव नाडकर्णी ,वकील यांचे समकालीन आणि स्नेही . माझ्या आजोबांचे अकाली निधन झाल्यावर माझे वडील मुंबईस आजोळी गेले . त्याच काळात भागवतांचा बंगला बांधला जात असल्याने भागवत कुटुंब आमच्या बंगल्यात काही काळ वास्तव्यास होते , अशा तर्‍हेने भागवत आणि नाडकर्णी कुटुंबाचे संबंध तीन पिढ्यांचे होते .  महाराष्ट्रातील  सुप्रसिद्ध  थिओसोफिस्ट  प्रा . राजाराम  सखाराम  भागवत हे  बापूसाहेबांचे दुसरे  चिरंजीव . रा. स  भागवत  यांनी  थिओसोफीवर  लिहिलेली  अनेक  पुस्तके  आजही  प्रसिद्ध  आहेत  व  अनेक  ग्रंथालयात  उपलब्ध  आहेत . फार पूर्वी  ठाणे शहरातील अथवा जवळपास राहणारे आणि थिओसोफीचा अभ्यास करणारे यांची भागवतांच्या घरी आठवड्यातून एकदा बैठक असे . दादा गावंड , ज ना ढगे , दिवाकर घैसास , राजाभाऊ भावे यांच्यासारखे अनेक थिओसोफिस्ट तेथे जमून चर्चा करीत .     

        भागवतांच्या वाड्याला  लागूनच  असलेल्या  एकमजली  घरात  वरच्या मजल्यावर  बाळासाहेब  चिटणीस  वकील  राहत  असत . ६ फूट  उंच  असणार्‍या  बाळासाहेबांचे  व्यक्तिमत्व  जसे  आकर्षक  होते  तसेच  त्यांचे  बोलणेही  प्रभावी  होते . भारतीय  वायु सेनेतील  माजी  व्हाईस एयर मार्शल  हेमंत चिटणीस  हे  बाळासाहेबांचे  ज्येष्ठ  पुत्र .                                               

ठाण्यातील  अनेक  जण  सेनादलात   गेले  परंतु  एव्हढ्या  वरच्या  पातळीवर  गेलेले  हेच  आहेत . बाळासाहेबांचा दूसरा मुलगा बाबा हाही पुढे वरिष्ठ कोर्टातील एक प्रसिद्ध वकील म्हणून नावारूपास आला .

        चिटणीसांच्या  शेजारील  घरात  रिसवडकर  कुटुंब  राहत  असे . वर्गमित्र  मनोहर  रिसवडकर  आमच्या  बरोबर  तर  खेळत  असेच  शिवाय  आर्य क्रीडा मंडळातील  विविध  खेळ , बॅंड पथक यातही  भाग घेत  असे . निवृत्ती नंतर  अलिबागच्या  अलीकडे  पिंपळभाट  या  गावातील  वसाहतीत  तो  जाऊन  राहिला . स्वामी समर्थांचे  एक  सुंदर मंदिर  त्याने  तिथे  उभे  केले . मंदिर कसे असावे त्याचा एक आदर्श त्याने निर्माण केला  मंदिराच्या  माध्यमातून  संस्कार वर्ग  सुरू  केले . तसेच एक  व्यायाम  शाळा  सुरू  केली . सांघिक  खेळ , कवायती , मल्लखांब  आणि  एक  बॅंड  पथक  सारे  काही  जोमाने  सुरू  आहे .  त्या  सार्‍या  पंचक्रोशीत  रिसवडकर काकांविषयी सर्वांना  असणारा  आदर  पाहिला  आणि  केवळ  वर्गमित्र  म्हणून  नव्हे  तर  आपल्या  खारकर  आळीतला  एक  म्हणून  अभिमान  वाटला . काही वर्षापूर्वी त्याच्या ह्या आदर्श मंदिरावर मी  ” दिशा ” या मासिकात एक लेख लिहिला होता .

        बाजूला एक बैठे घर होते तिथे काही काळ भाऊराव ओक वकील रहायचे ते पुढे तलावपाळीवर रहावयास गेले . काही काळ ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते .  

         रिसवडकरांच्या  समोरील  बाजूस  जोगळेकरांचा  वाडा  होता . आता  तिथे  इमारती  उभ्या  आहेत . वाड्यात  शिरल्यावर  जोगळेकरांचे  एकमजली  प्रशस्त  घर  होते

जोगळेकर  कुटुंब  पहिल्या  मजल्यावर  राहत  होते . त्यांचा  एक  मुलगा  माधव  हाही  वायुदलात  पायलट  होता  .

        जोगळेकरांच्या  घरात  तळ मजल्यावर  माझ्या लहानपणी  वामनराव  ओक  वकील  राहत  होते . वामनराव  ओक हे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  ठाण्यातील  प्रमुख  होते . घंटाळी  भागात  त्यांच्या  नावाने  एक  रक्तपेढी  चालू  आहे . ओकांचे  कुटुंब  पुढे  स्टेशन जवळील  त्यांच्या  जागेत  राहण्यास  गेले . वामनरावांचे चिरंजीव  श्रीनिवास  ओक  हेही  वकील  होते  शिवाय  ते  न्यू इंग्लिश स्कूल  या  शाळेचे  प्रमुख  ट्रस्टी  होते .  त्यांचेच  चिरंजीव  श्री  अभय  ओक  हे  गेली  अनेक  वर्षे  मुंबई  उच्च न्यायालयाचे  न्यायाधीश  होते .  मध्यंतरी त्यांची  कर्नाटक  उच्च  न्यायालयाचे  प्रमुख  न्यायाधीश  म्हणून नेमणूक झाली होती . आणि आता तर ते सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश झाले आहेत .

          जोगळेकर  वाड्याच्या  समोर  डॉक्टर टेम्बे  यांचे  घर आणि  त्याचे  शेजारी पी वी जोशी  वकील  यांचे  घर . या घरात पहिल्या मजल्यावर  दाबके वकील आणि दुसर्‍या मजल्यावर पी व्ही जोशी वकील . हे दोन्ही वकील ठाणे शहरात निष्णात कायदेपंडित म्हणून ओळखले जात .  माझ्या  आठवणीत  हे  पी वी जोशांचे  घर  असले  तरी मुळात  हे  घर  कोतवाल  वकील यांचे  होते . कोतवाल  वकील हे  स्वातंत्र्य  लढ्यात  होते . ते  पहिल्या  मजल्यावर  राहत  तर  तळमजल्यावर  कॉंग्रेसच्या  स्वयंसेवकांची  छावणी  असे . कोतवाल  वकिलांप्रमाणे  त्यांच्या  पत्नी  यशोदाबाई  या  सुद्धा  राजकीय  आणि  सामाजिक  कार्यात  सक्रिय  होत्या . ठाणे  शहरातील  पहिल्या  नगरसेविका  म्हणून  त्या  निवडून  आल्या  होत्या .

           ज्याप्रमाणे  पी वी  जोशी  यांचे  घर  हे  पूर्वी  कोतवालांचे  होते  आणि स्वातंत्र्य चळवळीचे  एक  केंद्र  होते  त्याचप्रमाणे  त्याच्या समोर  असणारा  एक  सुंदर  बंगला  हा  जरी  एस वी प्रधान  वकिलांचा  म्हणून  सर्वांना  ठाऊक  असला  तरी  तो  बंगला  मुळात  आमचा  म्हणजे  नाडकर्णी  वकिलांचा  होता . माझे आजोबा माधव राव नाडकर्णी वकील यांनी हा बंगला खारकरांकडून सदर जमीन विकत घेऊन १८९३ साली बांधला होता . द्वारकानाथ माधव नाडकर्णी वकील , माझे वडील , हे लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीत पडले . पुढे ते ठाणे शहर कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले  व त्या नात्याने १९३० सालच्या सत्याग्रहात भाग घेतल्या बद्दल त्यांनी ६ महीने तुरूंगवासही भोगला होता . त्याच काळात बाळासाहेब खेर , ना ग गोरे इत्यादींशी त्यांचे संबंध निर्माण झाले .  त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अनेक वेळा कॉंग्रेस कमिटीचे सदस्य आमच्या घरी येत व त्यांच्यात विचारविनिमय होत असे . हाच धागा पकडून ब्रिटिश सरकारने हा बंगला ‘ कॉंग्रेस हाऊस ‘ आहे असे जाहीर करून पुढे काही काळ बंगला जप्त केला होता .  सर्व कुटुंबाला घराबाहेर काढलं . पप्पांना शास्त्रीय संगीताची खूप चांगली जाण होती . त्यांचा आवाजही खूप गोड होता . स्वातंत्र्य लढ्याच्या काळात प्रभातफेरीचे नेतृत्व करताना ते देशभक्तीपर गीते म्हणत तेंव्हा अनेक जाणकार ती मुद्दाम ऐकण्यास येत. याच काळात पप्पा ठाणे नगरपालिकेवर निवडून गेले होते . स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष या नात्याने काम करताना त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली.  परकीय मालावर बहिष्कार टाका असे जेंव्हा गांधीजींनी संगितले तेंव्हा पप्पानी बंगल्याच्या आवारात आपल्या जवळील ऊंची लोकरीचे कोट पॅंटस , मुलींचे रेशमी फ्रोक्स या सर्वाची जाहीर होळी केली होती . त्यानंतर त्यांनी पुढील ४० / ४५ वर्षे म्हणजे शेवटचा श्वास घेई पर्यंत जाड्या भरड्या खादीचे कपडे वापरले .  या बंगल्यात बाबासाहेब आंबेडकर एक दोन वेळा आले होते . १९३७ च्या सुमारास नेहरू ठाण्यात आले होते व त्यांची सभा स्मशान भूमीच्या जवळील मैदानात झाली होती तेंव्हा अध्यक्ष या नात्याने पप्पा त्यांचे समवेत होते . तेंव्हापासून त्या मैदानास जवाहर मैदान असे नाव पडले होते त्याच जागेवर आता दादोजी कोंडदेव स्टेडीयम साकार झाला आहे. पप्पानी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपले तन मन धन राष्ट्रकार्यासाठी अर्पण केले ते तरुण वयात देशभक्तीची उर्मि निर्माण झाली होती म्हणून. त्यांचा पिंड राजकारण करणार्‍याचा नव्हता . आणि त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ते राजकीय जीवनापासून दूर गेले . काही काळ सरकारी वकील म्हणून काम केले तरी त्यांची वकिली ही मुख्यात: गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठीच झाली . त्यासाठी अनेकदा ते स्वताच्या खिशातूनही खर्च करून त्या गरीब स्त्रियांना न्याय मिळवून देत . संपूर्ण कुटुंबाचाही या न त्या पद्धतीने लढ्यात सहभाग होता . माझी मोठी बहीण प्रभा हिला १९४२ च्या चलेजाव आंदोलनात वयाच्या फक्त १५ व्या वर्षी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला .आमची आई व मोठी बहीण भांनुताई यांनी परकीय मालाविरोधात पिकेटिंगचे काम केले तसेच आईने साक्षरता प्रसाराचेही काम कोणताही गाजवजा न करता केले. ठाण्यातील महिला मंडळाच्या कार्यातही आईचा सहभाग होता .   अशा तर्‍हेने खारकर आळीतील  कोतवाल आणि  नाडकर्णी यांची ही घरे असलेला भाग हा स्वातंत्र्य  चळवळीचे केंद्र होता .

          या बंगल्याच्या शेजारीच हजारे यांचा वाडा. हजारे यांचे कुटुंबही राष्ट्रीय चळवळीत सहभाग असणारं . दादा हजारे अनेक वर्षे समर्थ सेवा मंडळाचे शास्ता होते . आता त्यांचे धाकटे बंधु अनिल हजारे हे शास्ता आहेत . हजाऱ्यांच्या वाड्यात मागील बाजूस भाऊ कदम हा एक थोर हरहुन्नरी कलावंत राहत होता मात्र त्याने आपली सारी कला राष्ट्रसेवादलाच्या कार्याला समर्पित केली होती . कलापथकाच्या कार्यक्रमातून त्याचे दर्शन होत असे . मला आठवतय १४ ऑगस्ट १९४७ ला रात्री १२ वाजता हजारे यांच्या वाड्यासामोर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यप्राप्तीचा क्षण राष्ट्र सेवा दलाने साजरा केला होता . ध्वजवंदन माझे वडील आणि एक स्वातंत्र्यसैनिक नाडकर्णी वकील यांचे हस्ते झाले . आजही तो क्षण स्मरणात आहे . आपण स्वतंत्र झालो याचा प्रत्येकाला केव्हढा आनंद झाला होता . माझ्या वडिलांना आपण  जो काही त्याग केला त्याचं चीज झालेलं पाहावयास मिळालं  याचा आनंद तर अवर्णनीय होता . या ठिकाणी समर्थ सेवा मंडळ आणि हनुमान व्यायाम शाळा यांचे बाबत एक गोष्ट नमूद करायला हवी . १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्रीच्या  १२ वाजतानाच्या त्या क्षणाची आठवण जागवण्यासाठी गेली ७२ वर्षे ही संस्था १४ ऑगस्टला रात्री १२ वाजता ध्वज वंदनाचा कार्यक्रम साजरा करते . ध्वजारोहणासाठी अनेक वर्षे एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आमंत्रित केले जात असे . पण आता बहुतेक स्वातंत्र्य सैनिक काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे स्वातंत्र्य सैनीकाच्या कुटुंबातील व्यक्तीस आमंत्रित करण्याचा निर्णय संस्थेने घेतला . आणि त्यानुसार १४ ऑगस्ट २०११ रोजी ध्वजारोहण करण्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केले . अर्थातच हा बहुमान माझा नसून माझ्या वडिलांचा व त्यांनी केलेल्या त्यागाचा होता . मात्र माझ्या जीवनातील तो एक अविस्मरणीय असा क्षण होता . पपांचे स्मरण करीतच मी तो बहुमान स्वीकारला . मी एक सर्वसामान्य माणूस आहे याचे पूर्ण भान ठेऊनच आणि सर्वसामान्यानी केलेल्या त्यागाचा गौरव करत उचित असे विचार मांडले .  असो.            

          पी वी जोशी  यांच्या  घरापलीकडे  सर  गोविंदराव  प्रधान  यांचा  दोन  मजली  प्रशस्त  बंगला  होता  .  बंगल्याच्या  पुढील  बाजूस   कारंजे  असलेला   सुंदर  बगीचा  होता  तर  मागील  बाजूस  मोठे  पटांगण  आणि   मोटारीचे   गॅरेज  होते . या बंगल्यातील पहिल्या मजल्यावरील २ दिवाणखाने अजूनही माझ्या स्मरणात आहेत . एक हॉल चौकोनी मोठा होता सगळीकडे बसायला सोफा सेट्स होते . भिंतींवर सर गोविंदराव व त्यांची पत्नी यांची मोठी तैलचित्रे होती . अतिशय सुंदर अशी मोजकीच झुंबरे होती . या हॉलला लागून एक लांबलचक हॉल होता . त्या काळात तो बहुदा मेजवानीसाठी वापरला जात असावा तिथेही अनेक तैलचित्रे होती . गोविंदराव प्रधान हे एक निष्णात कायदेपंडित होते . ब्रिटिश सरकारने त्यांना ‘ सर ‘ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता व त्या नंतर त्यांना मुंबई इलाख्याचे मंत्रिपदही बहाल केले होते गोविंदरावांच्या मुलांपैकी मदन गोविंद प्रधान हे मुंबई फायर ब्रिगेडचे प्रमुख अधिकारी होते . त्यांचे ठाण्यातील राहणे माझ्या स्मरणात नाही . गोविंदरावांचे दुसरे चिरंजीव शांताराम उर्फ रावकाका हे पहिल्या मजल्यावर राहत . त्यांचा मुलगा सुभाष हा आमचा वर्गमित्र . ९ वी पर्यन्त तो आमच्याबरोबर एम एच हाय स्कूल मध्ये होता . नंतर त्याचे कुटुंब वरळीला राहावयास गेल्यावर तो किंग जॉर्जला गेला  आम्ही अनेक मित्र त्यांच्या वाड्यात क्रिकेट खेळावयास जात असू . सुभाष एक चांगला क्रिकेटर होता . पण तो पुढे सोलिसिटर झाला. त्याची पत्नी कुंदा म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि महाराष्ट्र सरकारचे पहिले प्रसिद्धी प्रमुख वसंतराव देशमुख यांची कन्या . गोविंदरावांचे तिसरे चिरंजीव जयंत उर्फ बापुकाका हे एक अत्यंत रुबाबदार असे व्यक्तिमत्व . सुरूवातीस एक उत्तम क्रिकेटर म्हणूनही ते प्रसिद्ध होते . पुढे कॅल्टेक्स या कंपनीत ते मोठ्या हुद्दयावर होते .  त्यांची पत्नी सिनिकाकी , पूर्वाश्रमीची पाटकर . तिचे वडील माझ्या वडिलांचे कॉलेज मधील स्नेही असल्याने विवाहानंतर ठाण्यात असेतोपर्यंत ती आमचेकडे अनेकवेळा येत असे . गोविंदरावांचे चौथे चिरंजीव शरद काका . त्यांचा विवाह गिरगावातील डॉक्टर गोठोस्करांच्या मुलीबरोबर झाला होता – वेणुकाकी . पुढे ते इंग्लंडला गेले .  

           १९५२ / ५३ सालापर्यंत प्रधान कुटुंबातील सर्वजण खारकर आळी सोडून मुंबईस रहावयास गेले. त्यानंतर त्या जागेत ‘ बाबासाहेब प्रधान ‘ हे एक थोर आध्यात्मिक व्यक्तिमत्व रहावयास आलं . बाबासाहेबांना जाता येताना आम्ही पाहत होतो . त्यांची राहणी उच्चभ्रू गटात मोडणारी असल्यामुळे त्यांची अध्यात्मिकता कुणालाच समजली नाही. खरे आध्यात्मिक असल्यामुळे त्यांनीही त्याचा गाजावाजा केला नाही . पुढे अनेक वर्षानी ते खारकर आळी सोडून गेल्यावर त्यांचे ‘ साद देती हिम शिखरे ‘ हे पुस्तक जेंव्हा प्रसिद्ध झाले तेंव्हा त्यांचा मोठेपणा सर्वास समजला . शंकर महाराजांनी त्यांचेवर विशेष अनुग्रह केला होता

           पी वी जोशी यांचे घर आणि प्रधांनांचा बंगला यांचेमधून आंत जाणारा रस्ता कोतवालांच्या घराकडे जायचा . मो ह विद्यालयातील गुप्ते बाई ह्या पूर्वाश्रमीच्या कोतवाल व ह्याच कोतवाल कुटुंबातील .

.           सर गोविंद रावांच्या बंगल्या शेजारी एक एकमजली घर होतं . त्यातील पहिल्या मजल्यावर तेंडुलकर वकिलांचं वास्तव्य होतं . तेंडुलकर वकील हे सुद्धा एक निष्ठावान स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते . स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास अण्णानी  शहापूर भागात आदिवासी आणि शेतकरी समाजात फार मोठं कार्य उभं केलं होतं . अण्णा स्वत: अत्यंत प्रामाणिक होते आणि इतर प्रत्येकाने तसे असायलाचं हवे असा त्यांचा हट्टाग्रह असायचा .  त्यामुळे ते सरकारी वकील म्हणून काम करीत असताना पोलिसांकडून थोडीशी हयगय झालेली दिसली तर ते संतप्त होत . त्यामुळे पोलिस अधिकारी त्यांना वचकून असत . अण्णा हे बालपणीचे स का पाटील यांचे मित्र . स का पाटील जेंव्हा म्हणाले की ” यावच्चंद्रदिवाकरौ मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ” तेंव्हा अण्णा खूप भडकले आणि त्यांनी स का पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन खरडपट्टी काढली होती . अण्णा विद्वान आणि खूप अभ्यासू होते . खरं म्हणजे कोंग्रेस पक्षाने अशा विद्वान , प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदारकीचे तिकीट द्यायला हवे होते . पण असे प्रामाणिक , न्यायनिष्ठुर , दुर्वास मुनि राज्यकर्त्यांना परवडत नाहीत . अशा व्यक्ति उपेक्षित राहतात आणि कालांतराने समाज त्यांना विसरून जातो . मात्र अण्णांची एक आठवण चांगलीच लक्ष्यात आहे . कोणत्या तरी एका कार्यक्रमानिमित्त प्रबोधनकार ठाकरे आले होते . अध्यक्षस्थानी अण्णा होते . भाषणात प्रबोधंनकारानी इतिहासातील काही घटनाविषयी  त्यांचे विचार मांडले . अण्णांचाही इतिहासाचा  सखोल अभ्यास होता . त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रबोधनकारांचे मुद्दे खोडून काढले यामुळे प्रबोधनकार काहीसे नाराज झाले . आयोजकांचीही पंचाईत झाली . असे होते अण्णा . आपले विचार परखडपणे मांडल्याशिवाय ते कधीही राहत नसत . पपांचे आणि अण्णांचे संबंध सख्ख्या भावासारखे होते . पपा शांत आणि मृदु स्वभावाचे तर अण्णा तिखट , जहाल . त्यांचे अनेकदा वाद होत मात्र त्यांचे नाते आणि परस्पराविषयी असणारे प्रेम अभंग होते .     

             तेंडुलकर वकिलांच्या घराशेजारी रणदिवे यांचा वाडा . या वाड्यात आमचा  बालमित्र मंगेश गुप्ते राहायचा . मंगेश चित्रं छान काढायचा . रांगोळी छान काढायचा . मंगेशचा भाऊ अप्पा याने कोतवालांच्या वाड्यात एक छोटा प्रिंटिंग प्रेस टाकला होता . त्याच्या मुलाने म्हणजे समीर गुप्ते याने तो प्रेस नावारूपाला आणला , पण केवळ प्रेस नावारुपाला आणून समीरची निर्मितीक्षमता त्रुप्त होणारी नव्हती . त्याने एक सिनेमाही निर्माण केला होता . आज समीर गुप्ते हे एक सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे . सी के पी खाद्य महोत्सव सुरू करून त्याने त्याला साऱ्या महाराष्ट्रत एक नाव मिळवून दिले . सी के पी क्लब चा तर तो ट्रस्टी आहेच पण त्याशिवाय अखिल भारतीय सीकेपी समाजाचाही तो आता अध्यक्ष झाला आहे .   

              हजारे यांच्या वाड्याशेजारी तात्या कानडे यांचे घर आणि त्यामागे घाटी आळीचा अर्धा भाग . तात्या कानडे हे एक शांत वृत्तीचे सद्गृहस्थ होते . तुकाराम महाडीक रोड वर पाटील यांच्या वखारीला लागून त्यांची पिठाची गिरणी होती . तात्यांचा धाकटा मुलगा सुभाष हा पुढे ठाणे शहर कोंग्रेसचा अध्यक्ष झाला. काही काळ तो नगर सेवक सुद्धा होता .

             कानडे यांच्या घराशेजारी पाटील यांचे घर आणि चाळ येते . या चाळीतील पहिलेच कुटुंब मोरे यांचे . रमाकांत मोरे हा आमचा वर्ग-मित्र . सुभाषच्या वाड्यात आमच्या बरोबर क्रिकेट खेळणारा आमचा सवंगडी . शाळेपासून त्याला नाटकात काम करण्याची हौस होती . त्यावेळेची एक मजेदार गोष्ट आठवली . शाळेचा वर्धापन दिन होता . करमणुकीच्या कार्यक्रमात रमाकांत फ्लूट वाजवायला माइक समोर बसला आणि वाजवण्याच्या जोरदार अॅक्शन करीत होता . दोन मिनिटात मुलांच्या लक्ष्यात आलं की तो फक्त अॅक्शन करीत होता आंतमध्ये पडद्याच्या मागे फ्लूटची रेकॉर्ड लावली होती . मुलांनी आरडाओरड सुरू केली आपलं बिंग फुटलेलं पाहिल्यावर रमाकांत हसत हसत उठून आंत पळाला .  पुढे मॅट्रिक झाल्यावर एका कंपनीत काम करताना तो फावल्या वेळात आपली अॅक्टिंगची हौस भागवीत असे . पण नियतीची इच्छा वेगळीच होती . कंपनीच्या कामगार संघटनेच्या कार्यात तो भाग घेऊ लागला , भाषणे करू लागला . आणि शेवटी तो ‘ भारतीय कामगार सेना ‘ या शिवसेनेच्या संघटनेचा कार्यवाह झाला. मात्र एव्हढ्या मोठ्या पदावर असतांनाही त्याचे वास्तव्य त्या चाळीतच होते .

            पाटलांच्या चाळीत काही काळ वास्तव्य करून गेलेली दुसरी ठाण्यातील कलाक्षेत्रातील प्रसिद्ध  व्यक्ति म्हणजे ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तबला वादक गौरू तेलवणे . तेलवणे हे विनायकराव घांग्रेकरांचे शिष्य . तेलवणे  यांनी ठाणे शहरात अनेक तबलावादक घडविले. तेलवणे हे ठाणे नगर पालिकेत नोकरी करीत होते . त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने साजरे होत असलेल्या अनेक संगीत समारोहांचे आयोजनही ते करीत असत .

            यानंतर पाटील यांचे मुख्य घर . जगन पाटील व त्यांचे सर्व कुटुंब हे आगरी समाजातील एक अत्यंत पुढारलेले , सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंब होते . जगन पाटील हे पूर्वी एक उत्तम क्रिकेटपटु होते . प्रथम मो. ह. विद्यालयातून खेळताना १९२४ साली त्यांनी तेरेदेसाई मेमोरियल टूर्नामेंट केलेले शतक हे ठाण्याच्या मैदानावरील पहिले शतक म्हणून गणले जाते . पुढे जगन पाटील फ्रेण्ड्स यूनियन मधून खेळू लागले .   ठाणे नगरपालिकेत १५  वर्षे नगर सेवक म्हणून ही ते निवडून आले होते . १९४२ साली नगरपालिकेने पास केलेल्या ‘ चले जाव ‘ ठरावामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला . जगन उर्फ भाऊ  पाटील हे एक अत्यंत शांत स्वभावाचे सज्जन गृहस्थ होते . चलेजाव चळवळींनंतर राष्ट्रवादाचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता . सक्रिय राजकारणात ते पडले नाहीत मात्र खादीचे कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी कायम पाळले .  पुढे त्यांचा मुलगा वसंत हाही अनेक वर्षे नगरसेवक होता . जगन पाटील यांची बहीण चंपूताई मोकल या ‘ बी ए बी टी ‘ पर्यन्त शिकल्या . त्या काही काळ  बी जे हायस्कूल  या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या . त्यानंतर १९६२ साली त्या कॉंग्रेस पक्षातर्फे विधान सभेच्या निवडणुकिस उभ्या राहून निवडून आल्या व ठाणे शहराच्या ‘ आमदार ‘ झाल्या . अशा रीतीने खारकर आळीने ठाणे शहराला एक आमदारही दिला .  

          पाटील यांची चाळ आणि पुढील दांडेकर वाडा यांचेमध्ये एक छोटीशी गल्ली आहे  ती सरळ जाऊन महागेरीला मिळते . त्या गल्लीतून सरळ महागेरीत पोहोचल की समोरच आमचा मित्र शाहू दलाल याचे घर . शाहू महागेरीत राहत असला तरी सर्व मित्र खारकर आळीतले असल्यामुळे तो खारकर आळीतलाच झाला होता . क्रिकेट खेळता खेळता तो एक उत्कृष्ट टेबल टेनिस खेळाडू झाला . सेंट्रल रेल्वेकडून खेळला . पण तरीही क्रिकेटवर त्याचे खरे प्रेम होते . एक चांगला अंपायर म्हणून त्याने नाव मिळवले . त्याचा शारीरिक फिटनेस उल्लेखनीय आहे . वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत तो ५ तास उन्हात उभे राहून अंपायरिंग करीत होता ते केवळ क्रिकेट वरील त्याच्या प्रेमामुळेच . गोवा स्वतंत्र झाल्यावर १९६३/६४ च्या सुमारास मी माझा मावसभाऊ महेश याच्याबरोबर गोव्यातील कुर्पे या त्याच्या गावी गेलो होतो त्यावेळी शाहू पण आमच्याबरोबर आला होता . आम्ही तिघानी तेंव्हा सारा गोवा पालथा घालून सारी मंदिरं , चर्च पाहिली . गोव्यात भात आणि मासे भरपूर मिळाल्याने शाहू खूष होता . भारताने ब्रेबोर्न स्टेडीयमवर औस्ट्रेलियावर मिळवलेला पहिला वहिला विजय पाहण्याचे भाग्य मला लाभले ते केवळ शाहूमुळे . त्या वेळेस नोकरी करीत असल्याने मॅचचे तिकीट शेअर करून मी दुसर्‍या व चौथ्या दिवशी मॅच पाहिली होती . पाचव्या दिवसाचे तिकीट माझेकडे नव्हते . पण सकाळीच शाहू माझ्याकडे आला आणि म्हणाला ” अरे चल , मी आहे ना ? आज तर एकदम धमाल आहे ” तो  मॅनेजिंग स्क्वाड मध्ये असल्याने त्याने मला त्याच्याबरोबर आंत नेले . आणि त्यामुळे तो अविस्मरणीय क्षण पाहण्याचे भाग्य मला मिळाले . धन्यवाद ,               

           त्यानंतर दांडेकर वाडा . तेथील रमेश कुळकर्णी हे काही काळ नगरसेवक होते त्याचे शेजारी कारखानीस वकिलांचे घर . कारखानीस वकिलांचा एक मुलगा रमेश वकील होता मात्र पुढे तो मुंबईस रहावयास गेल्याने खारकर आळीशी त्याचा संबंध राहिला नाही . कारखानीस वकिलांच्या घरात खाली टिपणीस व प्रधान असे दोन भाडेकरू . त्यातील टिपणीसांच्या घरी माझे लहानपणापासून खूप कौतुक होत असे . त्यामुळे कान्होले , निनाव इत्यादि पदार्थाची मला गोडी लागली आणि पुढे मोठा झाल्यावर सोड्याच्या खिचडीची .  

            कारखानीस वकिलांच्या घराशेजरी कामत वाडा . कामतांची दोन घरे होती . पुढील घर खारकर आळीत तर मागील घर महागेरीत . याच कामतांच्या घरात माझा १९३८ साली जन्म झाला. आम्ही साधारण पणे १९४२ पर्यन्त कामतांच्या घरात राहिलो त्यामुळे मला त्या घराच्या फार आठवणी नाहीत . या ठिकाणी एक गोष्ट सहज म्हणून नमूद करतो . खारकर आळीत कायस्थ समाजच बहुसंख्येने होता व त्याखालोखाल कोकणस्थ व देशस्थ ब्राम्हण . सारस्वत ब्राम्हणांची जेम तेम ४ घरे होती . आम्ही नाडकर्णी , कामत , तेंडुलकर व पुढे येणार्‍या गावंड चाळीतील दिवाडकर .

             या घराला लागूनच ईश्वरलाल प्राणजीवनदास यांचे घर होते . त्या घरात त्यावेळेस तळमजल्यावर अभ्यंकर वकील राहत होते आणि वरील मजल्यावर एन टी केळकर सर , सध्याचे ठाणे शहराचे ‘ आमदार संजय केळकर ‘ यांचे आजोबा व मोह विद्यालयाचे मुख्याध्यापक , हे  राहत होते . या दोघांनीही ते घर सोडल्यावर म्हणजे १९४२ साली आम्ही तळमजल्यावर राहावयास गेलो. त्यानंतर त्या घरात १९७४ पर्यन्त म्हणजे माझ्या वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत राहिलो.

           आम्ही कामतांचे घर सोडल्यावर  माझा बालमित्र मनोहर जोशी याचे कुटुंब कामतांच्या घरात राहावयास गेले . मनोहरचे वडील रामभाऊ जोशी हे  मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अनेक वर्षे कार्यवाह होते . यांच्या काळात त्यांनी ग्रंथालयातील पुस्तकांची सूची प्रसिद्ध केली होती . मनोहर मराठी घेऊन  ‘ एम ए ‘ झाला आणि सचिवालयात प्रसिद्धी खात्यात वरिष्ठ पदावर होता . ‘ आयुर्वृत्त ‘ या द्वैमासिकाचा तो अनेक वर्षे संपादक होता . त्याशिवाय सुप्रसिद्ध ‘ वसंत ‘ मासिकातून त्याचे अनेक लेख व पुस्तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत . अलीकडे पर्यावरणवादी म्हणून प्रसिद्धीस आलेला रोहित जोशी हा त्याचाच मुलगा .  

             आमच्या घराला सलग्न असलेले जोशींचे घर . निर्मलाबाई जोशी या तिथे शिशुवर्गाची शाळा चालवीत होत्या .  तेथे तळमजल्यावर शामराव ठोसर राहत होते . त्यांना आम्ही शामाकाका म्हणत असू  . श्यामाकाका हे तरुणपणी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते . पुढे त्यांनी ठाणे शहरात क्रिकेट , बॅडमिंटन इत्यादि खेळाचे साहित्य विकण्याचा व्यवसाय सुरू केला . अलीकडच्या काळात त्यांच्या स्मूर्तीप्रीत्यर्थ ”ठोसर टूर्नामेंट ‘ चालू झाली होती . त्या कुमार वयात शामाकाकांसारख्या अनुभवी खेळाडूशी क्रिकेट वर गप्पा मारणं म्हणजे एक फार मोठीच पर्वणी होती .

            आमच्या घरासमोर महाजन वाडी होती . या वाडीतील पुढील अर्ध्या भागात नगरपालिकेची मुलींची मराठी शाळा होती . मागील अर्ध्या भागात गुजराथी समाजाच्या दोन चाळी होत्या . त्यातील गणात्रा बंधु आमचे चांगले मित्र होते . 

             आमच्या घरावरून थोडे पुढे गेल्यावर अरुण चित्रेचे घर . अरुण आमचा जवळचा मित्र . अरुण अत्यंत मेहनती आणि जिद्दी होता . त्यांचे मोडकळीस आलेले जुने घर पाडून तिथे ६ मजली चित्रे टावर उभा राहिला तो केवळ अरुणच्या जिद्दीमुळे . नोकरी संभाळून तो त्यांच्या शेतावरही देखरेख करायला जायचा वेळ प्रसंगी तिथे राहायचा आणि हे सारे हसत हसत चालू असायचे आणि त्यातून त्याला एकप्रकारचा आनंद मिळायचा . खूप मजा यायची तो समवेत असला की .  

             अरुण चित्रेच्या घराशेजारी  एम एस प्रधान वकिलांचे घर . या घरात खाली देशपांडे मास्तर राहत होते देशपांडे मास्टर मो ह विद्यालयात माझ्या आधीच्या पिढीला शिक्षक होते . आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या अनेकांना मी  त्यांच्या पुढे नतमस्तक होताना पाहिले आहे . त्यांचे शेजारी कारखानीस मास्तर .

             तिथून थोडे पुढे दादा तेली राहत होते त्यांच्या घरात तेलाचा घाणा चालताना आम्ही पाहिला आहे . घाण्यावरचं तेल विकायला ते पुढील बाजूस बसलेले दिसत .

             दादा तेली यांच्या घराच्या समोर मोतीलालची चाळ  आणि त्या चाळीशेजारी गावंडांची चाळ . हे गावंड कुटुंबही ठाणे शहरातील आगरी समाजातील एक सुशिक्षित , सुसंस्कृत आणि सुखवस्तू कुटुंब . अशा या सुखवस्तू कुटुंबात दत्ताराम उर्फ दादा गावंड या थोर आध्यात्मिक व्यक्तीचा जन्म ४ सप्टेंबर १९१७ रोजी झाला . दादा हे उत्तम क्रिकेटपटू होते . काही काळ ते नगरपालिकेवरही निवडून गेले होते . त्यांना शिकारीचाहि शौक होता . अशीच एकदा शिकार करताना त्यांनी एक ससा मारला पण त्यानंतर त्या सशाची झालेली तडफड पाहून त्यांचं मन द्रवलं . त्यानंतर त्यांनी शिकार करणं सोडून दिलं . त्याच सुमारास त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले . कुटुंबाची सारी जबाबदारी दादांवर आली. पण ती जबाबदारी पार पाडताना दादा मात्र विचार करू लागले होते की हे जीवन म्हणजे काय आहे ? मृत्यू का येतो ? आणि मग पुढे काय ? यानंतर दादा थिओसोफी कडे वळले . रा स भागवतांपासून कृष्णमूर्ती पर्यन्त सर्वांशी संवाद साधू लागले . रमण महर्षींकडे गेले . अनेक आध्यात्मिक पुस्तकं वाचली . पण प्रत्यक्ष अनुभव येत नसल्याने त्यांना चैन पडत नव्हते . मन तळमळत होते . याच काळात ते आपल्या कौटुंबिक जबाबदार्‍या मात्र पार पाडत होते . सर्व बहीणींची आणि नंतर धाकट्या भावाचे लग्न लावून दिल्यावर मात्र ते मोकळे झाले . आणि १९५५ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी एक दिवस सज्जन गडाच्या डोंगर उतारावर असलेल्या एका झोपडीत जाऊन राहिले . ७ महीने एकांतवासात मौन पाळून आणि चिंतनात मग्न राहून ते राहिले . अनेक आपत्तीना न डगमगता त्यांची साधना चालू होती . शेवटी अंतरीक विस्फोट होऊन त्यांना आत्मज्ञान झाले , अतिशय गहिरा असा आध्यात्मिक अनुभव आला . या घटनेनंतरही १९ वर्ष महाबळेश्वर येथील जंगलात एकांतवासात राहून दादाजींनी त्या चैतन्यमय उर्जेला अंतर्बाह्य कार्य करू दिलं . पुढे दादाजीना भारतात आणि अमेरिकेत अनेक अनुयायी मिळाले . १४ वेळा अमेरिका व इतर कांहीं देशांना त्यांनी भेटी दिल्या . त्यांच्या व्याख्यानाची व प्रश्नोत्तरांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत . ‘’ Beyond the Mind , Towards the Unknown , Intuitive Intelligence , A Pilgrimage Unto Oneself ‘’ ही इंग्रजी मधील तर  ‘’ चाहूल अज्ञाताची , मनाच्या पलीकडे , चैतन्याचा विलास ‘’ ही मराठीमधील पुस्तकांची नांवे . दादाजींना लहानपणी छायाचित्रणाची आवड होती पुढे त्या साऱ्या आवडी त्यानी झटकून टाकल्या मात्र सिद्धयोगी झाल्यावर त्यांच्यातील स्रुजनशीलतेला आध्यात्मिक उर्जेची जोड मिळाली व दादाजींनी अनेक सुंदर निसर्ग-द्रुश्यं आपल्या कॅमेऱ्याने टिपली . त्याचेही एक सुंदर पुस्तक आहे . येउर येथे त्यांचा निवांत आश्रम होता . आमच्या कुटुंबाचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते . एकदा आम्हाला डॉक्टर सतीश गावंड यांच्याकडून समजलं की ते येउरला आहेत . आणि मग मी , लता , आक्का , भांनुताई आणि वसंतराव त्यांच्या भेटीस गेलो . प्रथम काही जुन्या गप्पा झाल्या . नंतर मात्र त्यांनी त्यांचे विचार आम्हाला सांगितले . त्यानंतर अधून मधून मी त्यांना भेटत होतो . त्यांच्या काही इंग्रजी काव्य रचंनांच मराठी भाषांतर त्यांनी केलं होतं . पाडगावकरांनी त्यात काही दुरुस्त्या केल्या होत्या .  ते बाड पुन्हा लिहून काढण्यासाठी मी त्यांना काही दिवस मदत केली . सकाळी ९ वाजता त्यांचेकडे जाऊन ५ वाजेपर्यंत मी त्यांचे समवेत असे . त्यांचं असं सान्निध्य मला लाभलं . मला त्यांचं आकर्षण होतं . त्यांचेबद्दल आदरही होता . पण कसे कुणास ठाऊक मी त्यांना चिकटून राहिलो नाही . माझा मार्ग पुढे बदलायचा होता .  त्यामुळे येऊर येथे त्यांचे वास्तव्य असताना मला त्यांच्या सहवासाचा थोडाफार लाभ मिळाला . ” चाहूल अज्ञाताची ” या त्यांच्या पुढे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे हस्तलिखित दुरुस्त करण्याच्या निमित्ताने मी त्यांचेकडे जाऊन बसत असे .  त्यांच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर ” उदय वैश्विक प्रज्ञेचा ” हे २००९ मध्ये मंगेश पाडगांवकर यांचे हस्ते प्रकाशित झाले त्या दिवशी प्रकाशनाच्या कार्यक्रमास जवळ जवळ ४०० / ५०० लोक हजर होते . प्रकाशन झाल्यावर दादाजी भाषण करताना म्हणाले – आता मी अज्ञातवासात जाणार आहे , माझा राम राम घ्यावा , हे ऐकून सर्वजण हेलावून गेले . नंतर प्रत्येकास ते भेटले . त्यादिवशीचं त्यांच तेज आजही स्मरणात आहे . त्त्यानंतर दादाजींनी सर्वांचा निरोप घेतला व ते सज्जन गडापासून ७ किलोमीटर अंतरावर बोरणे गांवातील ‘तपोवन’ या आपल्या आश्रमात जाऊन राहिले  व तिथेच २९ जानेवारी २०१२ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला .

         गावंडांच्या चाळीत तळमजल्यावर माझ्या लहानपणी वीरकर मास्तर राहत होते . ठाण्यातील साम्यवादी गटातील एक प्रमुख म्हणून ते गणले जात . ठाणे शहरातील आर्य क्रीडा मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते . त्याचाही एक किस्सा आहे . महागेरीच्या तोंडावर असलेल्या एका घराला एकदा आग लागली . ठाणे नगरपालिकेचा आगीचा बंब त्याकाळी कुचकामी होता . वीरकर मास्तरांनी त्याप्रसंगी दोनचार तरुण गोला करून मोठ्या हिमतीने ती आग विझवली व त्यातूनच पुढे आर्य क्रीडा मंदिर सारखी संस्था निर्माण करण्याची कल्पना पुढे आली आणि साकार झाली .   

          गावंड यांच्या चाळी शेजारी असलेल्या एकमजली घरात नाचणे वकील राहत होते त्यांचे दोन्ही मुलगे वसंत आणि अरुण हे राष्ट्रसेवादलात कार्यरत होते . अरुण नाचणे हा पुढे एल आय सी नॅशनल एम्प्लॉईज यूनियनचा अनेक वर्षे सेक्रेटरी होता ..

           नाचणे यांच्या घरासमोर श्रीमणी- हटकर यांचे घर . नागेश हटकर हा चांगला चित्रकार होता . पण त्याने स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले . काही काळ बाबा आमटे व प्रकाश आमटे यांचेबरोबर कार्य केल्यावर त्याने पालघर-डहाणू भागातील आदिवासी समाजासाठी कार्य सुरू केले .  

           श्रीमणी-हटकर यांच्या घराशेजरी नाना करमरकर वकील यांचे घर आणि यानंतर खारकर आळीचा मुख्य भाग संपतो . यापुढील जांभळी नाक्यापर्यंत प्रथम डावीकडे गुजराती समाजाचे मंदिर . थोडे पुढे कासम बंधूंचे घर आणि खाली बाबूभाई कासम यांचे चष्म्याचे दुकान . या बाबूभाईनी पुढे आपले दुकान नारळवाला यांचे चाळीत हालवले आणि पुढे त्यांनी  होमिओपॅथी आणि युनांनी पद्धतीचा अभ्यास करून वैद्यकी सुद्धा सुरू केली .

           कासम यांच्या घराशेजारी ‘ सेंट्रल पॉवर लौंड्रि ‘ आणि मुरलीधर वाईकरांचे ‘ विजय केश कर्तनालय ‘ त्या काळात हे सलून प्रसिद्ध होते . ठाणे शहरातील अनेक लोक केस कापण्यासाठी इथेच येत . त्या काळातील अनेक प्रतिष्ठित डॉक्टर , वकिलांच्या घरी जाऊन त्यांचे केस कापण्याचे काम मुरलीधर वाईकर हेच करत असत.  आणि त्याच्या पुढे ठाण्यातील प्रसिद्ध ‘ पेढ्या मारुति ‘ चे मंदिर . या मारुतीच्या तोंडात कायम पेढे भरलेले असतात म्हणून त्यास पेढ्या मारुति म्हणतात.  

          याच्या समोरील बाजूस गंगादास ठाणावाला व खारीवाला यांची घरे व खाली  त्यांच्या पेढ्या . गंगादास ठाणावाला यांचा मुलगा चिमणभाई  हा पुढे सरकारी वकील झाला .

          महागेरी ही तर खारकर आळीला समांतर जाणारी गल्ली पण कडवाची गल्ली हा तर एक फाटा पण या दोहोंचा समावेश आम्ही कधी खारकर आळीत केला नाही मात्र गणपत जयराम रस्ता हा खारकर आळीचाच भाग मानीत आलो.

          अरुण चित्रेच्या घरासमोर गणपत जयराम रस्ता सुरू होतो आणि थेट कोर्ट नाक्याला जाऊन मिळतो . या रस्त्यावर डावीकडे गुजराथी प्राथमिक शाळा होती तर उजवीकडे पाटील यांची वखार . या वखारीत मे महिन्यात एक गणपती मूर्तिकार येऊन आपला व्यवसाय सुरू करीत . निरनिराळ्या आकारातील , रूपातील आणि वेशातील मूर्ती बनताना पाहणं हा एक आम्हाला लहानपणी लागलेला छंद होता .

            इथून थोडे पुढे गेल्यावर डावीकडे बाबा कीर्तीकरांचा वाडा . बाबा एक साधू पुरुष होते . तरुणपणी ते उत्तम फोटोग्राफर होते . गिरगावात त्यांचा पहिला आणि एकमेव स्टुडिओ होता . भारतातील अनेक संस्थानिक आणि श्रीमान फोटो काढण्यासाठी त्यांचेकडे येत असत पुढे दत्तभक्त असलेल्या बाबांनी टेंबेस्वामींकडून अनुग्रह घेतला . साधना केली . दाढी-मिशा आणि भरघोस केस यामुळे बाबा एखाद्या हृषी प्रमाणे दिसत . त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं . त्यांना काही सिद्धि प्राप्त झाल्या होत्या असे म्हणत . त्यांच्या वाड्यात त्यांचे सुंदर असे खाजगी दत्त-मंदिर होते . या मंदिरात एका बाजूला दत्ताची सुंदर मूर्ति तर शेजारी गायत्रीदेवीची मूर्ति होती. बाबांचे एकूण रूप उग्र असल्यामुळे तसेच ते स्पष्टवक्ते असल्यामुळे सर्वसाधारण लोक त्यांना घाबरत . मात्र माझ्या वडिलांवर त्यांचा लोभ होता.प्रत्येक संकष्टीला ते मोरगावला त्यांच्या गाडीने जात. जाताना ते माझ्या वडिलांना बरोबर घेऊन जात . त्यांच्या कडे दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असे . सुप्रसिद्ध गायक आणि दत्तभक्त आर एन पराडकर हे काहीवेळा आले होते व त्यांनी दत्त स्तुतिपार गाणी म्हंटली होती . एकदा बाल गंधर्वांचे गाणे झाले होते .    

             बाबांच्या घराला लागून आगासकारांचे बैठे घर होते . प्रा. मुकुंदराव आगासकर

पूर्वी येथे राहत होते. मुकुंद राव रुईया कॉलेज मध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते . जनसंघाच्या तिकीटावर त्यांनी एकदा विधानसभेची आणि एकदा लोकसभेची निवडणूक लढविली होती . मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत . मुकुंदराव उंच ,शिडशिडीत गोरेपान होते . अतिशय धीर गंभीर आवाजातील त्यांची भाषणे ऐकावीशी वाटत .

             आगासकरांच्या घराशेजरी प्रागजी ठक्कर यांचा वाडा . या वाड्यात सर्वांनाच आदरणीय वाटणारे असे प्रभाकर हळदणकर व प्रभाताइ हळदणकर राहत . प्रभाकर हे जवळच असलेल्या टी जे हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक होते तर प्रभाताइ शिक्षिका होत्या . दोघेही साम्यवादी होते . प्रभाताई ह्या पूर्वी साम्यवादी विद्यार्थी संघटनेत कार्यरत असल्याचे मला ठाऊक होते . शिवाय याच वाड्यातील पप्या आणि मुकुंद हे सातघरे बंधु म्हणजे ठाण्याच्या स्पोर्टिंग कमिटीचे आधारस्तंभ .    

             ठक्कर वाड्यासामोर कोतवालांचा वाडा . दिलीप कोतवाल आमचा बालमित्र . आम्ही सारे सुभाष प्रधानच्या वाड्यात एकत्र क्रिकेट खेळणारे . दिलीप खूप चांगला क्रिकेटर होता . मो ह विद्यालयाचा तो कप्तान होता . पोद्दार कॉलेज मधुनही तो खेळला . पण त्याने आपले सारे लक्ष्य आपल्या अभ्यासावरच मुख्यत: ठेवले होते . एम कॉम व कायद्याची परीक्षा उत्तम प्रकारे पास होऊन काहीसा लाजरा बुजरा व मितभाषी असणार्‍या दिलीपने पुढे मात्र अनेक नामांकित कंपन्यात कंपनी सेक्रेटरी म्हणून उत्तम प्रकारे काम केले.

           कोतवालांच्या वाड्याशेजारी भिसे यांचा वाडा . भिसे हे पूर्वीचे ओवळे गावाचे ईनामदार . सदानंद भिसे हा माझा बालमित्र . आम्ही सुभाष प्रधानच्या वाड्यात क्रिकेट खेळलो . शाळेत अगदी मॅट्रिक पर्यन्त आम्ही एकाच वर्गात होतो . सदा अभ्यासात खूप हुशार होता . त्याचं हस्ताक्षर म्हणजे मोत्याचे दाणे . आमच्या वर्गात कायम पहिल्या नंबरवर असणार्‍या होसिंगला सदाने सहावीत चितपट करून पहिला नंबर पटकावला होता . आणि तो कसा  तर एक आव्हान स्वीकारून . त्याला घरी सांगण्यात आलं होतं की तुझा जर पहिला नंबर आला तर तुला नवी कोरी बॅट मिळेल. सदा एक उत्कृष्ट क्रिकेटर होता .  तडफदार बॅटिंग आणि मध्यम-गती बोलिंग करताना मधेच गुगली टाकून बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारा . रुईया कॉलेज आणि नंतर लॉं कॉलेज मधून खेळला . मुंबई विद्यपीठाकडून सुद्धा खेळला , आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. पण दुर्दैवाने म्हणा अथवा आणखी कशाने म्हणा मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवू शकला नाही . पण पुढे बँक ऑफ इंडिया , स्पोर्टिंग ठाणे , फ्रेंड्स क्लब मधून खेळून त्याने कांगा लीग , टाइम्स शिल्ड इत्यादि टुर्नामेंट गाजविल्या . ठाणे मैदानावरील त्याचा नाबाद २५६ चा विक्रम कायम आहे . पुढे तो ठाण्यात एक यशस्वी वकील झाला. १९७४ मध्ये सर्वपक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवार म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढवून निवडून आला . त्यावेळी खारकर आळीतील प्रत्येक घरात जाऊन प्रचार करताना त्याचे समवेत मी होतो.  जसा रणजी प्लेयर म्हणून शिक्का मिळाला नाही तसाच नक्की होणार म्हणता म्हणता आमदारकीचं तिकीटही मिळालं नाही . अर्थात यात त्याचं काहीच नुकसान झालं नाही . आजही ठाण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा  विश्वात तो एक उत्तम वक्ता , हुशार वकील आणि सर्वांनाच हवा हवासा वाटणारा म्हणून ओळखला जातो. सदाचा मुलगा शेखर सुद्धा सदाप्रमाणेच वकील झाला . शिवाय अत्यंत तरुण वयात एक उत्कृष्ट अम्पायर म्हणूनही त्याला सारे ओळखतात . शेखरचा मुलगा आणि सदाचा नातू  शनय याने जेजूरीच्या खंडेरायांवर निघालेल्या सिरियल मध्ये छोट्या गणपतीची भूमिका साकारली होती .

         भिसे वाड्याच्या शेजारी जोशी वाडा . बापू जोशी हे एक नामांकित वैद्य होते . त्यांच्याच मुलाने पुढे तलावपाळीवर ‘ नमस्कार ‘ हॉटेल काढले होते . जोशी वाड्यात आमचे दोन शिक्षक राहत होते . त्यापैकी एक डोंगरे सर . डोंगरे सरानी हिन्दी आणि उर्दू  अशा दोन्ही भाषांचा खूप अभ्यास केलेला होता . ठाणे शहरात या दोन्ही भाषांच्या परीक्षांचे वर्गही  ते चालवीत असत . डोंगरे सर दिसायला खूप गंभीर आणि कडक वाटायचे त्यामुळे बहुतेक मुले त्यांना घाबरायची . पण पुढे माझा त्यांच्याशी अधिक परिचय झाल्यावर त्यांचे अंतरंग किती रसाळ होते ते मला समजले . त्यांना अध्यात्माचीही गोदी होती . माझे काका आणि मो ह विद्यालयातील माजी शिक्षक विजय बोंडसे हे पॉन्डीचेरी आश्रमात गेल्यानंतर डोंगरे सरानी अनेकदा त्यांची चौकशी करून माझ्याशी संवाद साधला होता . पण त्यावेळेस माझा त्या विषवाचा काहीच अभ्यास नसल्याने मी फारसे काही बोलू शकलो नाही . असो. जोशी वाड्यात एका टुमदार बंगलीत जोशीबाई राहत असत .     

        भिसे वाडा आणि जोशी वाडा यांचे समोरील बाजूस सी के पी हॉल आणि बाजूला टी जे हायस्कूल आणि एन के टी कॉलेज . त्याच्या पुढे डाक बंगल्याचा परिसर .

        सी के पी क्लबची मूळ स्थापना २ ऑगस्ट १८९१ रोजी झाली . आद्य संस्थापकात कै लक्ष्मण शिवराज उर्फ भाईसाहेब खारकर , सखाराम श्यामराव राजे , आत्माराम सीताराम  देशमुख , विनायकराव गुप्ते , जयाराम रघुनाथ खारकर , त्रिंबक रामचंद्र कोतवाल इत्यादींचा समावेश होता .        

         मला माहीत असलेल्या खारकर आळीत निदान काही काळ तरी वास्तव्य केलेल्या अनेक नामांकित व्यक्तींचा लेखाजोगा मांडला . त्यातील काही आध्यात्मिक , काही तत्वज्ञ , काही नामांकित वकील , डॉक्टर , कलावंत , क्रिकेटपटू , आदरणीय शिक्षक , प्राध्यापक , समाज सेवक , अशी विविध क्षेत्रातील मंडळी होती . पण या सार्‍या मंडळीची गुणवत्ता कोणत्या तरी काळात कोणत्या तरी पद्धतीने काही प्रमाणात काही लोकांपर्यंत तरी पोहोचली . पण असे एक अष्टपैलू , हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते की ज्यांच्या अनेक पैलूंचा अनेकांना थांग पत्ता लागला नाही .

         ‘त्यां’ चा जन्म श्रीमान ईनामदार कुटुंबात झाला होता . पण आपल्या गतवैभवाच्या जोरावर मोठेपणा मिरवणे त्यांना मंजूर नव्हते . त्यांचा स्वकर्तृत्वावर आत्मविश्वास होता . व्ही जे टी आय सारख्या प्रसिद्ध शिक्षण संस्थेतून ते इलेक्ट्रिकल इंजिनीअर झाले . काही काळ त्यांनी सरकारी नोकरी केली. पण गांधींच्या आदेशानुसार देशात सरकारी नोकर्‍या सोडायची जेंव्हा लाट आली तेंव्हा त्यांनी नोकरी सोडून दिली व स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला . ठाणे शहरातील पॉवर हाऊस बांधण्यात त्यांचा सहभाग होता . ‘शरीरमाद्यम खलू धर्म साधनं ” या उक्तीला अनुसरून त्यांनी तरुण वयात व्यायाम करून आपले शरीर बलदंड केले होते . मनगटाने दगड फोडणे , साखळदंड तोडणे असे सामर्थ्य त्यांनी प्राप्त केले होते . त्यांना नाटकांची आवड होती . ”  बार्डोलीचा पुण्यप्रभाव ” , श्रीकृष्णलीला अशी काही नाटके त्यांनी लिहून बसविली होती , त्यात स्वत: काम सुद्धा केले होते . ते स्वत: उत्तम चित्रकार होते  त्यामुळे नाटकातील पडदे स्वत: रंगवित . ‘ बेबंदशाही’ , ‘राज संन्यास’ ‘कीचकवध’ इत्यादि नाटकातील त्यांच्या भूमिका त्या काळी ठाण्यात गाजल्या होत्या. ते उत्तम मूर्तिकारही होते. लहानपणा पासून मराठी व इंग्रजी वाचनाची खूप आवड असलेल्या त्यांनी काही सुंदर काव्यरचनाही केल्या होत्या. परंतु हे सारे ते केवळ स्वत:च्या आनंदासाठी करीत असल्याच्या भावनेमुळे त्यांनी आपल्या कोणत्याही कलेला प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा बाळगली नव्हती .त्यांच्या निधनानंतर जवळ जवळ १५ वर्षानी त्यांच्या मुलांनी त्यांच्या कवितांचा संग्रह मंगेश पाडगांवकर यांचे हस्ते प्रसिद्ध केला तेंव्हा त्यांचा हा आणि असे अनेक पैलू समाजासमोर आले . त्यांच्या रचनेतील चार ओळी उद्धृत करून ‘ ते ‘ कोण ते उघड करतो.

 शस्त्राने न तुटे घणेही न फुटे जे ना जलाने भिजे

        अग्निने न जळे तसे न वितळे जे ना हिमाने थिजे

आहे ब्रम्ह असे अव्यक्त म्हणूनी जे लोचनांना न दिसे

        त्याला जोडूनि हात नित्य नमितो हा नम्र ‘ भाई भिसे ‘

लक्ष्यात आलं असेल ‘ ते ‘ म्हणजे माझा मित्र सदा भिसे याचे वडील  कै. भास्करराव भिसे ..

         वयाच्या ३६ व्या वर्षापर्यन्त मी खारकर आळीत राहिलो . ज्या अनेक लहान थोर व्यक्तींना मी प्रत्यक्ष पाहिलं अथवा ज्यांचेविषयी मला ऐकिव माहिती होती ती सर्व मी ग्रथित करण्याचा प्रयत्न केला . अजूनही आणखी अशा अनेक व्यक्ति असू शकतील ज्यांचे मोठेपण या ना त्या कारणाने मी समजू शकलो नसेन . या माहितीत कोणी आणखी भर टाकली तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे .

          या लिखाणाचा मुख्य हेतु खारकर आळी विषयी माहिती देण्याचा असला तरी माझ्या आठवणीतील जुन्या ठाण्याविषयी एक दोन गोष्टी सांगण्याचा मोह आवरत नाही.

          कौपीनेश्वर मंदिरात उत्तरेकडील बाजूस आज जे अतिशय सुंदर असे मारुति मंदिर आहे त्या ठिकाणी एक मोठा वट वृक्ष होता . त्या वृक्षाला एक मोठा पार बांधलेला होता आणि त्या पारावर एका घुमटीत मारुति मंदिर होते . १९४८ साली जे प्रचंड वादळ झाले त्यात तो वट वृक्ष उन्मळून पडला तो पार ही त्यामुळे उखडला गेला . त्याकाळी ठाणे स्टेशन कडे जाण्यासाठी स्टेशन रोड हा एकमेव मार्ग होता . तो महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे सारी वाहतूक बंद होती . वृक्ष तोडून वाहतूक सुरू करण्यास एक दोन दिवस लागले . पुढे कालांतराने नवीन छान स्वरुपात मारुति मंदिर बांधले गेले.

            आजच्या मासुंदा तलावाची व्याप्ती कौपीनेश्वर मंदिरा पर्यन्त होती. परंतु हा सारा तलाव ‘ हायसिंथ ‘ नावाच्या पाण वनस्पतीने व्यापलेला होता . व त्यामुळेच ठाणे शहराला मच्छरांचा फार मोठा त्रास होत असे. नगरपालिका दरवर्षी गणपति विसर्जनासाठी एक छोटासा कोपरा साफ करीत असे पण त्यानंतर एका महिन्यातच तो सारा भाग पुन्हा भरून जात असे. २ ऑक्टोबर १९५५ रोजी ठाणे शहरात एक अभूतपूर्व असे दृश्य दाखवणारी अविस्मरणीय अशी घटना घडली. तलावाच्या चारही बाजूस असंख्य लोक जमले . त्यात पुरुष होते . स्त्रिया होत्या , मुले , मुली आणि या सार्‍या आबालवृद्धानी त्या वनस्पति काढून बाहेर टाकण्यास सुरुवात केली. या अभूतपूर्व अशा श्रमदानात शहरातील सर्व संस्था एकदिलाने सहभागी झाल्या होत्या. त्या काळी फोटो वगैरे काढून ठेवण्याची पद्धत नव्हती . पण माझ्या वयाच्या सार्‍यांच्या डोळ्यासमोर अजूनही ते दृश्य तरळू शकेल . जवळ जवळ ९० % तलाव एका दिवसात साफ झाला होता . पण दुसर्‍या दिवसापासून सारी मंडळी आपआपल्या कामात गुंतली. . असेच दोन तीन महीने गेले असते तर पुन्हा निम्मा तलाव त्या वनस्पतिने  भरला असता . त्यानंतर सकाळी कॉलेजला जाताना आम्ही लखुनाना पूरोहित आणि रामकाका देशपांडे या दोन आदरणीय ज्येष्ठांना एका होडीत बसून वनस्पतीचा एक एक पुंजका काठावर आणून सोडून देताना पाहू लागलो. रामकाका हे ठाणे शहरातील जुने ख्यातनाम क्रिकेटर होते पण त्या सुमारास ते बर्मा शेल कंपनीत मोठ्या हुद्दयावर होते. रोज सकाळी त्यांचे एक तास श्रमदान चाले . लखुनाना हे टेंभी नाक्यावरील ‘ पूरोहित – दातार ‘ या वृत्तपत्र विक्रेत्या कंपनीचे मूळ प्रमुख. ते पुढे सज्जन गडावर जाऊन राहिले आणि तिथेच त्यांनी देह ठेवला . या दोघांनी केलेले बहुमोल कार्य विस्मरणात जाऊ नये आणि ठाणेकरांनी कृतज्ञ राहावे म्हणून हा उल्लेख. असो त्याच सुमारास  संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरून नगरपालिका सदस्यांनी राजीनामे दिल्यावर सरकारने व्यवस्थापक नेमला व त्यांनी तलावातीलच माती खणून काढून आजचा रास्ता तयार केला . 

       ================ $$$$$$$$$$$ =================

 ———–  नरेंद्र नाडकर्णी  

Continue Reading

Previous: संत श्री सोहिरोबानाथ
Next: जीवन साफल्य – ज्ञांनाची तपस्या

Related Stories

2a89645a-2c2e-4622-9854-eeb0a5161698.jpg
  • General

Late Sri Vijay R. Bondse ( 3rd May 1933 – 18th June 2011 )

Narendra Nadkarni March 26, 2023
cropped-cropped-sant-saribonath-ambiye-281x300-1
  • General

संत श्री सोहिरोबानाथ

Narendra Nadkarni March 15, 2023
  • General

Dadaji Gavand

Narendra Nadkarni March 9, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.