आपल्या जीवनाचे ध्येय साफल्य हे आहे . हे साफल्य म्हणजे आपल्या गुणांचा , आपल्या शक्तीचा सर्वतोपरी विकास साधणे व तो इतक्या परिपूर्णतेला नेणे की ईहलोकातील ती सर्वोच्च पातळी असेल . अज्ञानाच्या बंधंनातून आत्म्याची मुक्ति करणे व आध्यात्मिक परिपूर्णता साधणे एव्हढाच त्याचा अर्थ नाही . शरीर , प्राणशक्ती , मन आणि आत्मा अशा चार घटकांचा मिळून मानव बनलेला आहे . आणि म्हणून आत्म्याबरोबरच अस्तित्वाच्या इतर घटकांचाही विकास साधायला हवा . माताजींनी अस्तित्वाच्या प्रत्येक अंगासाठी वेगळी तपस्या सांगितली आहे व त्या तपस्येचे फळ म्हणून ती परिपूर्णता साधली जाते .शरीरासाठी माताजींनी सौंदर्याची तपस्या , प्राणिक अंशासाठी शक्तीची तपस्या , मनासाठी ज्ञांनाची तपस्या आणि आत्म्यासाठी प्रेमाची तपस्या सुचविली आहे .
‘तपस्या’ या शब्दाचा अर्थ आपण आत्मक्लेश असा करतो तो येथे अभिप्रेत नाही . तपस्या म्हंटल्यावर आपल्या मनात रोजच्या जीवनातील सामान्य सुखांचा सक्तीने केलेला त्याग असा अर्थ येतो . आपण नेहमी खात असलेले अन्न ,नेहमी उपभोग घेत असलेल्या सुखसोयी यांचा त्याग करणे असा अर्थ होतो . थोडक्यात शारीरिक जीवन कठोरपणे दडपून टाकून त्याच्यावर निर्बंध घालून मार्गातील अडथळ्याप्रमाणे दूर
सारणे व आत्म्याच्या विकासासाठी हे तप करणे अशी सर्वसामान्य कल्पना आहे . जगणे म्हणजे अनावश्यक बोजा आहे असे मानून या ऐहिक अडथळ्यातून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक जीवनासाठी विकास साधणे अशी ही कल्पना आहे .
श्रीअरविन्द आणि माताजी यांच्या शिकवणुकीत मात्र तपस्येचा असा अर्थ नाही . जीवन जगणे म्हणजे शाप नाही . जीवनाच्या शक्ति बंधमुक्त करून मानवी जीवनाचे दैवी जीवनात परिवर्तन करायला हवे . या बदलासाठी तपस्या हे साधन आहे . पण ही तपस्या म्हणजे आत्मक्लेश शरीरताडन नव्हे तर स्वत:वर संयम ठेवून स्वत:वर प्रभुत्व मिळविणे हा आहे. आपल्या वैदिक ऋषिना तपस्या म्हणजे आपल्या सर्व शक्तीची एकाग्रता करून विशिष्ट ध्येय गाठणे असा अर्थ अभिप्रेत होता. चेतना उच्च पातळीवर नेऊन तिची शक्ति तीव्र करणे व त्या चेतनेने चिंतन करणे . श्री अरविंदांच्या शब्दात एका विषयावर किंवा एका ध्येयावर चिंतन करणे म्हणजे तपस्या होय .
—– सौंदर्याची तपस्या —-
दिव्य शक्ति अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने अवतरण करते . मानसिक पातळीवर ती ज्ञानरूपाने , प्राणिक पातळीवर ती शक्तिरूपाने आणि जड ,साकार पातळीवर ती सौंदर्याच्या रूपाने अवतरण करते . प्रत्येक साकाराच्या परिपूर्णतेत एक सौंदर्य असते व ते दिव्य असते . मानवाच्या बाबतीत सुद्धा त्याच्या जड देहाची परिपूर्णता म्हणजे परमेश्वराच्या साक्षात्काराचा एक मार्ग असतो . माताजींच्या शिकवणुकीत शरीर हा परिपूर्णता व परिवर्तन या चौथर्याचा पाया आहे . या शरीराच्या माध्यमातूनच या इहलोकी आत्मा, मन, आणि प्राणिक शक्ति यांचे अवतरण उच्च आणि उच्चतम चेतनेच्या स्वरूपात घडवून आणावयाचे असते . पण आपले जड शरीर सामान्यत: एक दुबळे साधन व कमकुवत पाया असतो . या शरीराला आपल्या सुप्त शक्तीची जाणीव करून देऊन , त्याला पूर्ण सचेतन करणे व ते एक तंदुरुस्त , साधन बनविणे हे एक तप आहे व शरीर असे विकसित करून ते दिव्य शक्तीच्या अवतरणासाठी योग्य असे प्रकाशित माध्यम बनविणे हे शरीराच्या तपस्येचे ध्येय आहे .
शरीर योग्य पद्धतीने घडविले पाहिजे . त्याचे अवयव , स्नायू , व मज्जातंतू त्यांच्या सर्वोच्च ताकदीपर्यंत विकसित केल्या पाहिजेत . प्रत्येकाने आपल्या प्रकृतीला मानवेल अशी शारीरिक व्यायामाची पद्धत ठरवायला हवी . व्यायाम असा हवा की शरीराच्या सगळ्या अवयवांची चपळ व मुक्त हालचाल झाली पाहिजे . त्याचप्रमाणे मज्जातंतूनाही व्यायाम झाला पाहिजे . कारण शारीरिक व मानसिक आरोग्याचे ते मूलाधार आहेत . शरीर बलवान करताना मज्जातंतूनाही पोलादी शक्ति आली पाहिजे . कारण जीवनातील तणाव व धक्क्यानी ते कोलमडता कामा नयेत . प्रचंड सहनशक्ति ताठपणे सोसण्याची शक्ति मानवी जीवन दिव्य जीवनात परिवर्तन करण्यासाठी लागते . स्वभावात शांति आणावी लागते . मन शांत व स्वस्थ असले तर मज्जासंस्था बलिष्ठ होते व हे बल जितके जास्त असेल त्या प्रमाणात शरीरावर हल्ले करणार्या आजाराच्या प्रेरणांना विरोध होतो व त्या प्रेरणा शरीरात प्रवेश करू शकत नाहीत .
शरीराची प्रत्येक हालचाल जाणीवपूर्वक चेतनेने करणे हे शारीरिक शिक्षणाचे ध्येय आहे . बेंगरुळ हालचाली व चुकीच्या उठण्याबसण्याच्या क्रिया प्रयत्नपूर्वक योग्य आसनात आणाव्या लागतात . उदा. पोक काढून बसणे प्रयत्नपूर्वक घालवून ताठ बसण्याची सवय लावावी लागते ही कला आपल्या पूर्वजांनी चांगल्याप्रकारे ‘ मुद्राशास्त्र ‘ या शास्त्रात बसविले आहे .
आपल्या जड शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते . शरीराची अवस्था नेहमी बदलते व त्याप्रमाणे अन्नाच्या गरजा बदलतात. त्यावेळी जुन्या सवयी मोडून नव्या सवयी लावून घेणे आवश्यक असते . अन्न कुठल्याही प्रकारचे असले तरी त्याची हाव असता कामा नये . अन्न फार खाऊ नये तसेच जास्तही खाऊ नये . आहाराच्या मानापेक्षा गुणवत्ता महत्वाची असते. अन्न फार तामसिक असू नये तसेच फार राजसीकहि असू नये . नेहमी मिताहार घ्यावा व तो घेताना पवित्र भावनेने अंतरात्म्याला अर्पण करून सावकाश जाणीवपूर्ण घ्यावा म्हणजे अन्न शरीराला पचते व पोषक ठरते .
अन्नांनंतर शरीराला महत्वाची असते निद्रा . निद्रा कशी हवी तर झोपून उठल्यावर सुस्ती येता कामा नये तर ताजेतवाने वाटले पाहिजे . जेवण आणि झोप यात २ ते ३ तासाचा अवधि असावा . जड पोटावर झोपल्यास भीतीदायक स्वप्ने पडतात . झोपण्यापूर्वी गंभीर विषयाचे वाचन , लेखन चर्चा करू नये . त्यामुळे मेंदू गरम होतो व आपण लगेच झोपी गेल्यास फक्त शरीर झोपते , मेंदूतील मज्जातंतू कार्यरत राहतात , विचारक्रिया चालूच राहते व त्यामुळे जाग आल्यावर थकवा जाणवतो . म्हणून झोपण्यापूर्वी मज्जातंतू शांत होणे आवश्यक असते . त्यासाठी झोपण्यापूर्वी एक कप गरम दूध किंवा सूप घ्यावे . थोडावेळ ध्यान करावे किंवा एकाग्रपणे अशी कल्पना करावी की आपण वरच्या दर्ज्यावर आरोहण करीत आहोत आणि झोपी जावे . आरोहणाची आकांक्षा झोपेतही चालू राहते व सर्व निद्रावस्था म्हणजे एक अखंड चालणारे ध्यान होते.
विश्रांतीमुळे ताजेतवाने झालेले शरीर रोजच्या कामात झोकून देणे आवश्यक आहे . मनापासून केलेल्या कार्यात जर झोकून दिले नाही तर क्रिया आदर्श होत नाही व शरीराला थकवा जाणवतो. यासाठी कोणतेही काम पूर्ण तादात्म्याने करावयास हवे . आपल्या अंगावर जे काम पडेल ते गोडी घेऊन करावे .प्रत्येक काम प्रगतिच्या मार्गावरील एक साधन असते . आपण जे कार्य हाती घेऊ ते निष्ठेने करावे व ईश्वराला समर्पण करण्याच्या भावनेतून करावे . अशा निर्धाराने जाणीवपूर्वक केलेले कार्य शरीराची शुद्धी करते , हीन भावनांना आणि वासनाना दूर करून आपल्यातील उच्च परिवर्तनाची सुरुवात करून देते . अशा तर्हेने केलेले कार्य कर्मबंधात न अडकविता उलट बंधंनातून मुक्ति मिळविण्यात सहाय्यक होते. अशा प्रकारे शरीराला वळण लावून त्यास दिव्य शक्तीच्या कार्यात जुंपले व ते दैवी इच्छेचे साधन झाले म्हणजे ते परमेश्वराशी एकरूप होऊ लागते . मग आकार आणि क्रियामध्ये सुसंवादाचे सौन्दर्य व प्रमाणबद्ध रचना निर्माण होते.
=================== ########### ======================
संकलन : नरेंद्र नाडकर्णी संदर्भ : ” Art of Living ” by M. P. Pandit
मराठी रूपांतर : सुहास टिल्लू