सिद्धांजन या नावाने प्रसिद्ध झालेल्या ऋग्वेदावरील आपल्या भाष्याला लिहिलेल्या प्रस्तावनेत कपाली शास्त्रींनी हे भाष्य लिहिण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे .
पाश्चिमात्य पंडितांच्या गैरसमजांना दूर सारत श्रीअरविंदांनी वेदमंत्रांना गूढ आध्यात्मिक अर्थ आहे हे आपल्या ‘ Secrets of the Vedas ‘ या ग्रंथात दाखवून दिले होते . त्याचा शोध घेण्याचा मार्गही समोर ठेवला होता . तरीही पारंपारिक विचारधारेच्या बाह्य , अर्थात गुरफटलेल्या विद्वत् जनांचा विरोधी सूर कायम होता आणि म्हणून संहिता , ब्राम्हणे , उपनिषदे आणि मीमांसा आदि संपूर्ण वेदवाङमयाचा सखोल अभ्यास केलेल्या कपाली शास्त्रींना आपली लेखणी सरसावी लागली .
कपालीशास्त्री असे स्पष्टपणे म्हणतात की , वेदमंत्रांना गूढ आध्यात्मिक अर्थ आहे असे जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ आम्ही बाह्य , कर्मकांडात्मक अर्थ नाकारतो असा नव्हे . वेदकाळातील बहुजनसमाज अप्रगत होता आणि म्हणून ऋषी-मुनींना या ऋचा द्वैयार्थी रचाव्या लागल्या . उपनिषद् काळापर्यंत ब्रम्हज्ञानी ऋषींची परंपरा चालू असल्यामुळे त्या आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिबिंब उपनिषदांत पडलेले आपल्याला दिसते . त्यानंतर मात्र ही परंपरा काहीशी खंडित झाली आणि त्यामुळेच मध्ययुगीन काळात चालू असणाऱ्या पारंपारिक हिंदु धर्माचे आणि त्यांतील संकल्पनांचे प्रतिबिंब सायनाचार्य़ांच्या भाष्यात पडलेले दिसते . बहुसंख्य पाश्चिमात्य पंडितांनी हे भाष्य जसेच्या तसे स्वीकारून त्यावर आपली मल्लीनाथी केलेली असली तरी Prof. Cowell या पंडिताचे मत मात्र लक्षणीय आहे . तो म्हणतो – “ This work gives only a faithful image of that particular phase of its interpretation which the mediaval Hindus , as represented by Sayanacharya , have preserved . This view is interesting but deeper study is needed to pierce to the real meaning of these old hymns . “
निरुक्तकार यास्काच्या लिखितावर भाष्य करताना कपालीशास्त्री म्हणतात ——- “ Yask clearly mentions that no one without ‘ tapasya ‘ can make a successful attempt to know the meanings of the Mantra “ — यावरूनही वेदमंत्रांची गूढ व्रुत्ती स्पष्ट होते . शिवाय श्रीअरविंदांसारख्या महायोगी महर्षीने त्यांची उकल करेपर्यंत ते सारे गूढ का होते , ते ही स्पष्ट होते .
यज्ञ संकल्पना आणि वेदकालीन देवता यांचा प्रतिकात्मक भाषेत असणारा मनोवैज्ञानिक संबंध श्रीअरविंदांनी ‘ Secrets of the Vedas ‘ या आपल्या ग्रंथात दाखवून दिला आहे . त्याचे विस्त्रुत स्पष्टीकरण आपल्याला प्रस्तावनेच्या उर्वरित भागात वाचायला मिळते . प्रस्तावनेची अख्रेर करताना कपालीशास्त्री म्हणतात – “ वेदकालीन ऋषींची भाषा जेंव्हा आपणास समजू लागते , सांकेतिक शब्दांचा आपण अर्थ लावू लागतो तेंव्हा श्रीअरविंदांचे खालील शब्द आपणास आठवतात —-
‘’ Rigved ceases to be an obscure , confused and barbarous hymnal , it becomes the high – aspiring song of Humanity . Its chants are episodes of the lyrical epic of the soul in its immortal ascension . “
अशा प्रकारे , श्रीअरविंदांनी सुरू केलेल्या एका महान कार्याची सांगता यशस्वीपणे पार पाडण्याचे तितकेच महान कार्य ज्यांनी केले त्या कपालीशास्त्रींच्या जीवनाचा आणि कार्याचा आलेख हा वस्तुत: एका Larger Cosmic Plan चा एक भाग असावा असे वाटते , आणि म्हणून की काय , निरनिराळी पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीअरविंद , माताजी व कपालीशास्त्री यांचा एक Spiritual Triangle तयार झाला . श्रीअरविंद आणि माताजी या दोघांचे आशिर्वाद घेत कपालीशास्त्रींनी पूर्णयोगाची साधना केली आणि श्रीअरविंदांनी दाखवलेल्या दिशेने ऋग्वेदावरील भाष्याचे ४ ग्रंथ ‘ सिद्धांजन ‘ या नावाने सिद्ध करून नियतिने ठरवलेल्या कार्याची पूर्तता केली .
जवळ जवळ ५००० वर्षापूर्वी निर्माण झालेल्या वेदवाङमयाचा गूढ अर्थ उलगडून दाखवण्याचं हे महान कार्य नियतिने का घडवून आणलं असावं ?
भारतीय पुनरुत्थानाचा काळ —–
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाकडे आपण नजर टाकली तर जीवनाची जवळ जवळ सर्वच क्षेत्रे उजळून टाकणाऱ्या लोकोत्तर व्यक्ति त्या काळापासून कार्यान्वित झालेल्या दिसतात . आध्यात्मिक क्षेत्रात रामक्रुष्ण परमहंस , दयानंद सरस्वती , स्वामी विवेकानंद , श्रीअरविंद , साहित्यात कविकुलगुरू रविंद्रनाथ टागोर , सुब्रम्हण्यम् भारती , कलेच्या प्रांतात राजा रविवर्मा व आनंद कुमार स्वामी , विज्ञान क्षेत्रात सी व्ही रामन् व जगदीशचंद्र बोस , राजकीय पटलावर लोकमान्य टिळक , महात्मा गांधी , उपेक्षितांना प्रकाशाची दिशा दाखवणारे फुले , आगरकर , आंबेडकर व कर्वे , या आणि अशा इतरही अनेक व्यक्ती , त्यांनी केलेलं कार्य आणि गांठलेली उंची , हे सारं पाहिलं की वाटतं भारतीय पुनरुत्थानाचा नियतीने जणूं काही ध्यास घेतला असावा . आणि म्हणूनच वेदांचा गूढ अर्थ उलगडण्याची सुरूवात याच काळात व्हावी हाही एक त्याच पुनरुत्थानाचा भाग होता हे नाकारता येणार नाही .
पण मग यातून दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की हे भारतीय पुनरुत्थान अथवा वेदांचा गूढ अर्थ उलगडून दाखवण्याची नितांत आवश्यकता कशामुळे निर्माण झाली असावी .
पाश्चिमात्यांच्या ऋग्वेदावरील प्रतिक्रिया —-
१८६४ साली ऋग्वेदाची पहिली छापील आव्रुत्ती तयार झाली . सायनाचार्यांचे ऋग्वेदावरील भाष्यही याच आव्रुत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते . त्यानंतर ते वाचून आणि त्याचा सखोल अभ्यास करून पाश्चिमात्य पंडितांच्या वेदवाङमयावरील प्रतिक्रिया प्रसिद्ध होऊ लागल्या .
या प्रतिक्रियांतील जमेची बाजू म्हणजे जीवनाच्या बाह्यांगाचा एका त्रयस्थ भूमिकेतून अभ्यास सुरू झाला . वेदकाळ निश्चित करण्याच्या मुद्द्यावर विद्वानांमध्ये चर्चा सुरू झाली . आर्यांच्या एकूणच जीवनपद्धतीचा अभ्यास सुरू झाला . त्यांचे विवाह कसे होत होते ? त्यांचे अन्न कोणत्या प्रकारचे होते ? त्यांना काय वर्ज्य होते ? त्यांचे कपडे कशा प्रकारचे होते ? भौतिक जगातील चराचर स्रुष्टीविषयी त्यांना किती ज्ञान होतं ? त्यांचे संघ कशाप्रकारचे होते ? त्यांचे परस्पर संबंध कसे होते ? इत्यादी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा उहापोह सुरू झाला . वेदवाङमयाकडे आम्ही श्रद्धायुक्त मनाने पाहत असल्याने ज्या अनेक बाबींकडे आम्ही लक्ष्य पुरवले नव्हते त्या गोष्टी पाश्चिमात्यांच्या अभ्यासामुळे आम्हाला कळू लागल्या .
परंतु , यानंतर आमच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या संपत्तीचा वारसा आम्हालाच उलगडून दाखवण्याचे कार्य या पाश्चिमात्य पंडितांनी आपल्या शिरावर घेतले . त्यांतील कांहींचा हेतू प्रामाणिक असला तरी कांहींचा मात्र संशयास्पद होता . शिवाय , त्यांचे साधन होते बुद्धी , जे आध्यात्मिक सत्याचा वेध घेण्यास तुटपुंजे होते आणि त्यामुळे ज्या प्रतिक्रिया आल्या त्या काय सांगत होत्या ?
“ These Aryans were primitive people , nature – worshipping semi – civilized race , Poets of childish fancy , etc . “ त्यांच्या मते वेद म्हणजे मानवी संस्क्रुतीच्या प्राथमिक अवस्थेतील निसर्गदेवतांना केलेल्या प्रार्थना . भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी या निसर्गदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या कर्मकांडाचा तो एक भाग आहे . अशा तऱ्हेने वेदवाङमयाला कांहींसे गौण स्वरूप देण्यात आले . ब्रम्हज्ञानाची प्राप्ती केलेल्या आमच्या ऋषी-मुनींनी पाहिलेले , ऐकलेले ते मंत्र म्हणजे सुखासक्तीच्या तत्वांना उदात्ततेचा मुलामा दिलेले काव्य ठरले . केवळ वेदवाङमयावरच नव्हे तर आमच्या संपूर्ण संस्क्रुतीवर आणि जीवन पद्धतीवर निक्रुष्ट दर्जाचा छाप मारला जाऊ लागला .
या सर्व टीकांचे आमच्या समाजावर विपरित परिणाम होऊ लागले . त्या काळात आमचा समाज तमोगुणाच्या प्रभावाखाली होता . सारा देश एक थंड गोळा झाला होता . प्राचीन संस्क्रुतीची नाळ तुटली होती . अत्यंत खालावलेल्या जीवनात प्राचीन ज्ञानाची कास धरण्याची उत्कंठा कधीच लोप पावली होती . अशा प्रकारच्या या वातावरणात एका बाजूला भारतीय संस्क्रुतीच्या खच्चीकरणाची शक्यता निर्माण झाली तर दुसऱ्या बाजूला भारतमातेला मुक्त करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची भीतीही निर्माण झाली .
याच पार्श्वभूमीवर भारतीय पुनरुत्थानाच्या प्रक्रियेने जोर धरला . पण त्यासाठी मुळात Spiritual Revivalism ची आवश्यकता होती . धर्मात शिरलेल्या अनेक भोंगळ रुढी आणि परंपराच्यावर दयानंद सरस्वतींनी टीकेची झोड उठवली . Take Hinduism to Vedik Purity चा नारा दिला . बंगालमध्ये रामक्रुष्ण परमहंसांचा उदय झाला . त्यांनी तर भारतीय आध्यात्मिकतेला संजीवनी प्राप्त करून दिली . स्वामी विवेकानंदांना प्रेरक शक्ती पुरवून वैदिक धर्माचा झेंडा केवळ भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य देशातही फडकवला आणि त्या पाठोपाठ महायोगी श्रीअरविंदांनी वेद , उपनिषदे आणि भगवद्गीतेतील विचारधारेची आधुनिक स्वरुपात मांडणी केली , वेदमंत्रांच्या गूढ , आध्यात्मिक अर्थाचा शोध घेतला आणि प्रतिकात्मक भाषेच्या मागे दडलेल्या आध्यात्मिक सत्याची पुनर्स्थापना करून वेदांचे आध्यात्मिक महत्व आणि निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध केले .
परंतु , वेदांच्या या बाह्य अर्थाच्या अभ्यासातून पाश्चिमात्य पंडितांनी जे ऐतिहासिक निष्कर्ष काढले त्यामुळे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेवर कोणता विपरित परिणाम घडून आला त्याकडे एक नजर टाकू .
आर्य आणि द्रविड —–
गेली १०० वर्षे आपल्या देशातील इतिहासातून असे शिकवले गेले की सप्त सरितांच्या प्रदेशात प्रथम द्रविडांची वस्ती होती . उत्तरेच्या बाजूने आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना दक्षिण भारतात पिटाळून लावलं आणि उत्तर भारतातील सुपीक प्रदेशावर कब्जा मिळवला .
अशा प्रकारचा आमच्या संस्क्रुतीचा विक्रुत इतिहास आमच्या माथी कसा आणि कोणी मारला ? वेदवाङमयात देव आणि दानव यांच्या लढ्यांची वर्णने आहेत . पणी , दस्यू वगैरे मंडळी आर्यांच्या गाई पळवतात , त्यांच्या यज्ञात विघ्ने आणतात आणि म्हणून आर्य इन्द्राचे सहाय्य घेऊन त्यांचे पारिपत्य करतात . अशा प्रकारच्या या कथा वाचून पाश्चिमात्य पंडितांनी असा अंदाज बांधला की हे दस्यू , पणी म्हणजे द्रविड असावेत . त्यांच्या या निष्कर्षाच्या आधारावर आमचा प्राचीन इतिहास लिहिला गेला . मात्र त्यामुळे आमच्या देशात उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय असा एक ‘ Divide ‘ निर्माण झाला .
श्रीअरविंद प्रणित Secrets of the Vedas —–
या आणि अशा प्रकारच्या प्रतिकात्मक भाषेत लिहिलेल्या कथांचा सत्यार्थ जाणून घेण्यासाठी आपणास श्रीअरविंदांच्या ‘ Secrets of the Vedas ‘ या ग्रंथाचा आधार घेणे आवश्यक आहे . श्रीअरविंदांना त्यांच्या साधनाकाळात जाणवलं की इला , सरस्वती अथवा इन्द्रादि वैदिक देवता या विशिष्ठ मनोवैज्ञानिक अवस्थांशी जोडलेल्या आहेत . या देवता म्हणजे गहन मनोवैज्ञानिक आध्यात्मिक सत्याची प्रतिके आहेत . यज्ञ ही सुद्धा केवळ बाह्य क्रिया नसून आत्मशुद्धीसाठी व स्वताच्या पूर्णत्वासाठी जाणीवपूर्ण केलेली आंतरिक प्रक्रिया आहे . अशा पद्धतीने शब्दांचे आणि घटनांचे अर्थ लावण्यासाठी आपण वेदांतील अंगिरसाच्या कथेकडे नजर टाकू .
अंगिरसाची कथा आणि विश्लेषण —–
अंगिरस ऋषीच्या गाई पणी , दस्यू व व्रुत्र या दुष्ट लोकांनी पळवल्या आणि एका अंधाऱ्या गुहेत दडवून ठेवल्या . अंगिरस ऋषी यज्ञ करून इन्द्राकडे मदतीची याचना करतात . प्रसन्न झालेला इन्द्र सोमरस पिऊन युद्धास सज्ज होतो . स्वर्गलोकातील शिकारी कुत्री ‘ सरमा ‘ ही चोरांना शोधून काढण्याचा प्रयत्न करते . चोर तिला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतात . पण ती नकार देते . इन्द्राला चोरांची गुहा दाखवते . नंतर घनघोर युद्ध करून इन्द्र , पणी , दस्यु , व्रुत्र इत्यादी दुष्टांचा नि:पात करतो आणि गाईंना मुक्त करतो .
या कथेतील दुष्ट लोक म्हणजे अंधाराच्या , कुविचाराच्या किंवा अज्ञानाच्या शक्ती . पणी म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार करणारा म्हणजेच मानवातील अशा शक्ती की ज्या सतत ‘ Give and take ‘ चा विचार करत असतात . चिरंतन आनंदाऐवजी कसल्या तरी मोबदल्यात क्षणिक सुखाचा विचार करत असतात .
दस्यू म्हणजे भेदभाव करणारे , द्वेष करणारे , लुटमार करणारे . थोडक्यात , मानवाच्या चेतनेमध्ये अशा प्रकारचे भाव निर्माण करणाऱ्या शक्ती .
व्रुत्र म्हणजे झाकणारा , अडथळा आणणारा आणि म्हणून अशा शक्ती की ज्या आंतरिक सत्य झाकून टाकतात , व्यक्तिमत्वाला पूर्णतेकडे जाण्यास अडथळा आणतात .
गो याचा सांकेतिक अर्थ प्रकाश म्हणजे ज्ञान . आणि म्हणून पणी आणि दस्यू अंगिरस ऋषींच्या गाई चोरून , लपवून ठेवतात . याचा अर्थ साधकाचे दिव्य ज्ञान अंतरंगातील अजाग्रुत अशा अंधाऱ्या कोपऱ्यात दडवून ठेवले जाते .
आपली गायब झालेली संपत्ती प्राप्त करण्यासाठी अंगिरस ऋषी यज्ञ करतात . हा यज्ञ अर्थातच आंतरिक यज्ञ असतो . यज्ञाची वेदी साधकाचं शरीर असतं आणि समिधा असतात – कुविचार आणि वासना यांच्या . इन्द्र ही मनाच्या पातळीची देवता म्हणजेच सुप्रकाशित मन . ते प्राप्त व्हावे म्हणून ही साधना . सोम ही सुद्धा एक वैदिक देवता . Lord of Delight . परमानंदाची देवता आणि रस म्हणजे जीवनातील आनंद . सोमरस म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राच्या अंतर्यामी दडलेला दैवी परमानंद आणि म्हणून प्रसन्न झालेला इन्द्र सोमरस पिऊन युद्धास सज्ज होतो . म्हणजेच परमानंदाने धुंद झालेले सुप्रकाशित मन संघर्षास तयार होते .
विरोधी शक्तींना शोधून काढण्यासाठी इन्द्र सरमेची मदत घेतो . सरमा याचा वास्तविक बाह्य अर्थ स्वर्गातील शिकारी कुत्री . पण ते अंत:प्रेरणेचं प्रतिक आहे . ही सरमा म्हणजे अंत:प्रेरणा , दस्यू व पणी यांना शोधून काढते म्हणजे त्या त्या प्रकारचे कुविचार निर्माण करणाऱ्या शक्तींना हेरते . हे शत्रू तिलाही आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतात , म्हणजे जे चांगले ते श्रेयस करावे का जे प्रिय म्हणजे प्रेयस करावे , असं जे मानसिक द्वंद्व चालतं त्याचं हे प्रतिक . पण शेवटी साधकाची अंत:प्रेरणा सुप्रकाशित मनाशी एकनिष्ठ राहते . विरोधी शक्तींचा नाश होतो आणि गाई म्हणजेच दिव्य ज्ञान मुक्त होतं.
वेद वाङ्ग्मयात आणखी एक छोटीशी पण प्रतिकात्मक सुंदर कथा आहे ——
” कुत्स नावाचा एक राजा होता . दस्यु , पणि , वृत्र इत्यादि त्याचे शत्रू त्याला हैराण करीत होते . त्यांचे पारिपत्य करण्यासाठी तो शेवटी इंद्रदेवाची मदत मागतो . इंद्र येऊन त्याच्या रथात त्याच्या शेजारी बसतो . कुत्स इंद्राच्या सहाय्याने एकेका शत्रूचा नि:पात करीत जातो . युद्ध करीत करीत दोघे स्वर्गाच्या दारी येतात . परंतु युद्ध करून दोघेही माखले असल्यामुळे त्यातला कुत्स कोणता आणि इंद्र कोणता ते देवांनाही ओळखता आले नाही “
सदध्याच्या काळात ही कथा वाचल्यावर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात . इंद्र ही खरोखर व्यक्तिरेखा आहे का ? भूतलावर युद्ध करीत ते स्वर्गात कसे पोहोचले ? स्वर्ग कुठे आहे ? आणि कुत्स व इंद्र हे इतके एकरूप कसे झाले ? सर्वसामान्यपणे विचार केला असता या प्रश्नांची उत्तरे मिळू शकत नाहीत . मात्र ही कथा प्रतिकात्मक आहे हे लक्ष्यात घेतल्यास त्या प्रश्नांची उत्तरे सहजरित्या मिळू शकतील .
ही कथा आध्यात्मिक आहे . कुत्साला मोक्षप्राप्ती हवी आहे . त्याचे शत्रू म्हणजे मोक्षप्राप्तीच्या आड येणारे आंतरिक षड्रिपू . पणी , दस्यू , व्रुत्र यांचा सांकेतिक अर्थ आपण वरील कथेच्या अनुषंगाने पाहिला . इंद्र ही मनाची देवता म्हणून त्या आंतरिक शत्रुंवर विजय मिळविण्यासाठी कुत्स इंद्राची आराधना करतो व त्याच्या सहाय्याने आपल्या मनावर विजय प्राप्त करून मोक्ष प्राप्त करतो .त्याचे युद्ध म्हणजे आध्यात्मिक संग्राम होता . शेवटी तो इंद्राशी एकरूप होतो , नराचा नारायण होतो व त्यामुळे देवसुद्धा त्यांना ओळखताना बुचकळ्यात पडतात . असो
अशा प्रकारे प्रतिकात्मक भाषेत लिहिल्या गेलेल्या या कथांचा गूढ अर्थ जेंव्हा आपणास समजू लागतो तेंव्हा आपला प्राचीन इतिहास कसा विक्रुत झाला ते स्पष्ट होऊ लागतं . त्याचबरोबर श्रीअरविंदांनी आणि त्यांच्या प्रेरणेने कपालीशास्त्री यांनी केलेल्या बहुमोल कार्याचे उद्दिष्ट आणि महत्व आपल्या ध्यानात येते .
यानंतर आपण रामाय़णातील सती अहिल्येच्या कथेचा विचार करू .
सती अहिल्येची कथा ——
रामायणात आलेली सती अहिल्येची लोकप्रिय कथा आपणा सर्वानाच ठाऊक आहे . “ इन्द्रदेव आपला कुटील हेतू साध्य करण्यासाठी गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या अशा दोघांचीही फसवणूक करतात . सारा प्रकार ध्यानांत आल्यावर गौतम ऋषी जसा इन्द्राला शाप देतात तसाच अहिल्येलाही देतात . त्या शापाने अहिल्या शिळा होऊन पडते . पुढे रामायण काळात प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन होऊन पुनर्जीवित होते . “ अशा प्रकारची ही कथा जर आज २१व्या शतकातील तरुणांना सांगितली तर त्याचं आधुनिक मन कोणते प्रश्न विचारील ? —- “ हे देव सुद्धा असे कुवर्तनी होते कां ? आणि मग त्यांना देव कां म्हणायचं ? एखाद्या जिवंत माणसाचं दगडात रुपांतर कसं काय होऊ शकतं ? आणि पुन्हां वर्षानुवर्षे त्या स्थितीत राहिल्यावर पुन्हां त्या दगडाचे रुपांतर सजीव मानवात कसे काय झाले ? “ — अशा प्रकारच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देणं अवघड आहे . पण त्यामुळे त्या आधुनिक मनांना हा सारा भोंगळपणा वाटला तर त्यांना दोष देता येणार नाही . म्हणूनच प्रतिकात्मक भाषेत सांगितल्या गेलेल्या या कथांचा गूढ अर्थ समजण्यासाठी प्रतिकांचाच शोध घेण्याची गरज आहे .
देवांचा राजा इन्द्र ही काही एखादी व्यक्तिरेखा नाही . इन्द्र ही मनाच्या पातळीची देवता . एक Conscious Force . या शक्तीच्या प्रादुर्भावाने जसे चांगले विचार मनावर ताबा मिळवू शकतील त्याचप्रमाणे कुविचारही प्रभाव गाजवतील . आणि त्याप्रमाणे मन शरीराला कर्म करण्यास भाग पाडते . कुविचारांनी जर मनाचा ताबा घेतला तर सत्वगुणाचा ऱ्हास होतो प्रथम राजसिकता बळावते पण सत्वगुणाच्या अभावाने कोणताही संयम नसल्याने रजोगुण हळू हळू थकतो . मग तमोगुणाचा प्रभाव वाढत जातो . जडत्व हे तमोगुणाचे प्रतिक आहे . अहिल्येच्या मनाचा अशा विचारांनी ताबा घेतल्यामुळे तमोगुणाने तिचा संपूर्ण ताबा घेतला होता . आणि म्हणून तिची शिळा झाली असे सांकेतिक भाषेत म्हंटले गेले . अशा प्रकारे निर्माण झालेल्या तमोगुणाचा नाश दैवी प्रक्रुतीच्या , विभुतीच्या सहवासाने अथवा स्पर्शाने होऊ शकतो . रामायण काळात अशा प्रकारचा प्रभुरामचन्द्रांचा सहवास अहिल्येला मिळाला व त्या सहवासाने तिचा तमोगुण नाहीसा होऊन तिची सात्विकता तिला पुन्हा प्राप्त झाली , ती पावन झाली , पुनर्जीवित झाली .
महायोगी श्रीअरविंद आणि कपालीशास्त्री यांनी वेदमंत्रांचा गूढ अर्थ उलगडून दाखवला . वैदिक देवता म्हणजे काय ते स्पष्ट केलं . त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या कथांचा अर्थ लावल्यास आधुनिक मनाचे समाधान करता येईल .
श्रीअरविंदांच्या म्हणण्याप्रमाणे वेद म्हणजे मानवाने स्वताच्या पूर्णत्वासाठी केलेल्या साधनेचा व्रुत्तांत . आधुनिक काळातही सत्य , ज्ञान व आनंद यांच्या प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या साधनेस ते मार्गदर्शक आहेत आणि म्हणूनच ते टिकून राहिले आहेत . जोपर्यंत मानवी जीवनात परस्पर विरोधी शक्तींचा संघर्ष आहे तोपर्यंत वेदांचे महत्व राहणार आहे . वेद हे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्टही प्रगट करतात . आणि म्हणून वेदांच्या मनोवैज्ञानिक आध्यात्मिक अर्थाचे आकलन करून घेणे आणि त्याप्रमाणे जीवनात अनुसरण करणे आवश्यक आहे आणि म्हणून श्रीअरविंद म्हणतात — “ I believe the future of India and the world to depend on its discovery and on its application to the life in this world . “
—– नरेन्द्र नाडकर्णी
( हा लेख VPM समुहाच्या दिशा मासिकात सप्टेंबर २०१० मध्ये प्रसिद्ध झाला होता )
संदर्भ : 1) Lights on the Vedas 2) Versatile Genious .