Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • Yog
  • Integral Yog – Part 1
  • Yog

Integral Yog – Part 1

Narendra Nadkarni June 18, 2023

     “  To  keep  the  fire  burning  is  our  part  ,  the  work  and  the  process  are  Her’s  “   हे विचार आहेत मंत्रविद्येचे थोर उपासक , विद्वान् संस्क्रुत पंडीत , एक श्रेष्ठ तांत्रिक , गणपतीमुनी आणि रमणमहर्षी यांचे शिष्य आणि शेवटी श्रीअरविंद आणि माताजी यांचेवर पूर्ण श्रद्धा ठेवून इंटिग्रल योगाचे श्रेष्ठ साधक बनलेले श्री टी व्ही कपालीशास्त्री यांचे . कपालीशास्त्री सांगतात की – आपल्या अंतरंगात निर्माण झालेली परमेश्वर प्राप्तीची आंच सतत जाग्रुत ठेवणं एवढंच काम साधकाने करायचं असतं , बाकी सारं त्या जगन्मातेच्या हातात असतं . याच श्रद्धेने कपालीशास्त्री २४ वर्ष श्रीअरविंद आश्रमात राहिले आणि याच  श्रद्धेच्या बळावर वेद वाङमयातील आध्यात्मिकता स्पष्ट करण्याचं श्रीअरविंदांनी सुरू केलेलं कार्य त्यांनी निष्ठेने पार पाडलं .

बालपण आणि विद्याभ्यास —-

        कपालीशास्त्रींचा जन्म ३ सप्टेंबर १८८६ रोजी मयलापुर , चेन्नई येथे एका ज्ञानसंपन्न ब्राम्हणाच्या कुटुंबात झाला . त्यांचे वडील विश्वेश्वरशास्त्री हे संस्क्रुतचे महापंडीत आणि श्रीविद्येचे थोर उपासक होते . भारद्वाज गोत्रातील शास्त्रीजींचे घराणे सामवेदी म्हणून प्रसिद्ध होते . भावी आयुष्यात इंग्रजी , तामिळ , तेलगू आणि संस्क्रुत अशा चार भाषांमध्ये कपालीशास्त्रींनी विस्त्रुत लेखन केलेलं दिसतं . पण या चार भाषांपैकी संस्क्रुतमधून केलेल्या लेखनात एक नैसर्गिक सहजता आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे . याचे कारण म्हणजे बालपणात शास्त्रीजींनी अभ्यासाचा आरंभ केला तोच मुळी संस्क्रुत भाषेचा . वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी रामायणाचं प्रथम वाचन केलं आणि त्यानंतर १२ व्या वर्षापर्यंत रामायणाची १२ पारायणे करून ते लोकांना रामायण समजावून सांगू लागले . लहानपणापासून ज्ञानत्रुष्णा असणाऱ्या आणि परमेश्वरी शक्तीवर श्रद्धा असणाऱ्या शास्त्रीजींनी आपल्या वडिलांक़डून श्रीविद्येची दीक्षाही घेतली होती . रोज सकाळी स्नान करून श्रीविद्या मंत्राचा १००८ वेळा ते जप करत . नवव्या वर्षी एका पायावर उभे राहून श्री ललिता त्रिपुरासुंदरी समोर त्यांनी हे पठण केलं होतं . कपालीशास्त्रींनी आपले माध्यमिक शिक्षण चेन्नई मधील हिंदू हायस्कूलमधून पूर्ण केलं . हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ज्योतिषशास्त्र , आयुर्वेद आणि रसशास्त्र यांचाही सखोल अभ्यास केला .

ऋगभाष्यांचा अभ्यास —-  

         लहानपणापासून पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा आणि मंत्रोपासना करणाऱ्या कपालीशास्त्रींना वेदवाङमयात गोडी होती . मात्र भारतीय संस्क्रुतीचा उगम ज्या वेदवाङमयातून झाला ते वेदमंत्र केवळ कर्मकांडाच्या उपयोगासाठी लिहिले गेले असावेत हे त्यांना रुचत नव्हतं. ५००० वर्षापूर्वी ब्रम्हज्ञानाची प्राप्ती केलेल्या आमच्या ऋषी-मुनींना अंतर्मनाच्या पडद्यावर दिसलेले हे मंत्र मुखोद्गत करून पुढच्या पिढ्यांकडे अत्यंत शुद्ध स्वरुपात सुपूर्त करण्याचे महान कार्य ज्या संस्क्रुतीने पार पाडले ते केवळ कर्मकांडाच्या उपयोगासाठी हे त्यांना मान्य होत नव्हतं . किंबहुना आध्यात्मिकतेच्या प्रयत्नांचा उगम आणि सर्वश्रेष्ठ अधिकार वेदांतच आहे आणि या वेदमंत्रांच्या केल्या जाणाऱ्या बाह्य अर्थामागे गूढ आंतरिक अर्थ दडलेला आहे असे त्यांना ठामपणे वाटत होते . म्हणूनच की काय , तामिळ भाषेत वेदांना —— मराई म्हणतात . मराई म्हणजे दडलेला ( Hidden ) .

        त्यानंतर कपालीशास्त्रींनी सायनाचार्यांचे ऋग्वेदावरील भाष्य वाचले . अत्यंत पांडित्यपूर्ण असे हे भाष्य ध्वनिशास्त्र , व्याकरण आणि व्युत्पत्तिशास्त्र यांच्या आधारावर केलेले आहे . वस्तुत: सायनाचार्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत वेदमंत्रांच्या बाह्य अर्थामागे गूढ आध्यात्मिक अर्थ असल्याचे मान्य केले आहे . मात्र सर्वसाधारण कर्मकांडासाठी त्यांनी व्यवहारोपयोगी असाच अर्थ लावला . अतिशय स्पष्टपणे आध्यात्मिक अर्थाचे दर्शन घडवणाऱ्या काही मोजक्या मंत्रांचा अपवाद वगळता ते भाष्य म्हणजे ऋग्वेदाच्या प्रचलित अस्पष्टपणाला चिरस्थायी रूप देणारे ठरते असे कपालीशास्त्रींना वाटले .

        वेदमंत्रांची ताडपत्रावर लिहिलेली उपलब्ध असणारी सर्वात जुनी प्रतही ७००/८०० वर्षापूर्वीची आहे . तर पहिली छापील प्रत १८६४ साली मॅक्समुल्लर साहेबाने छापून घेतली . १४ व्या शतकात प्रथमच झालेले आणि शास्त्रशुद्ध मानले गेलेले सायनाचार्यांचे भाष्य या पहिल्या छापील प्रतीत समाविष्ट करण्यात आले . त्यानंतर अनेक पाश्र्चिमात्य विद्वानांनी त्याच्या आधारावरच आपले निष्कर्ष काढण्यास सुरूवात केली . काहींना ते कर्मकांडात्मक वाटले तर काहींना प्राचीन आर्यांनी निसर्गदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या त्या भाबड्या प्रार्थना वाटल्या . हे सारे वाचून तरूण वयातील कपालीशास्त्री अस्वस्थ होत होते .

                 यानंतर , १२ व्या शतकात द्वैतवादाचा पुरस्कार करणाऱ्या मध्वाचार्यांचे ऋग्वेदावरील भाष्य़ कपालीशास्त्रींच्या वाचनात आले . त्यांनी असे प्रतिपादन केले होते की वेदमंत्रांना एकूण ३ अर्थ आहेत . त्यापैकी पहिला अर्थ हा प्रचलित कर्मकांडात्मक अर्थ , दुसरा वैश्र्विक देवतांना आवाहन करून प्रसन्न करण्यासाठी व तिसरा सर्वश्रेष्ठ परमात्म्याच्या प्राप्तीसाठी असणारा आध्यात्मिक अर्थ . मध्वाचार्यांच्या परंपरेतील १६ व्या शतकांत होऊन गेलेले राघवेन्द्रस्वामी यांनी ऋग्वेदातील ४० सुक्ते घेऊन तीनही मार्गांनी त्यांचा अर्थ लावून दिला होता . या सर्व वाचनाने कपालीशास्त्रींचे थोडेफार समाधान झाले असावे पण त्याच बरोबर वेदमंत्रांच्या गूढ आध्यात्मिक अर्थाचा शोध घेण्याच्या इच्छेचे एक सशक्त बीज त्यांच्या  मनाच्या गाभाऱ्यात पेरले गेले .

काव्यकंठ श्री वसिष्ठ गणपतीमुनी आणि रमण महर्षी —–

        परमेश्वर प्राप्तीची मनात निर्माण होणारी ओढ ही मुळात त्या मनाला दैवी स्पर्श झालेला असतो म्हणूनच होत असते . श्रीअरविंदांनी म्हंटलं आहे – “  One  who  chooses  the  Infinite  has  been  chosen  by  the  Infinite  . “ अशा रीतिने निवडलेल्या माणसाची पुढील मार्गक्रमणा सुद्धा त्या जगन्नियंत्याने आखून ठेवलेली असते . त्या दुर्धर मार्गावरून चालण्यासाठी मार्गदर्शन करणारा मार्गदर्शकही योजून ठेवलेला असतो आणि मग ज्याप्रमाणे भूमी तयार झाली की बीज आपोआप येऊन पडतं त्याचप्रमाणे शिष्य तयार झाला की गुरूची भेट घडून येते .

       याच न्यायाने १९०७ साली म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी कपालीशास्त्रींची त्यांचे पहिले गुरू काव्यकंठ श्री गणपती मुनी यांच्याशी भेट झाली .

       काव्यकंठ वसिष्ठ गणपतीमुनींचा जन्म आन्ध्र प्रदेशातील विशाखापट्टम जवळील एका खेड्यात झाला . त्यांचे घराणे वेदशास्त्रसंपन्न आणि मंत्रोपासना करणारे होते . श्रीगजाननाच्या प्रसादाने जन्म झाला म्हणून त्यांचे नांव गणपती ठेवले होते . विलक्षण स्मरणशक्ती असणारे गणपतीमुनी लहानपणापासून एकपाठी होते . वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत   रामायण , महाभारत , मेघदूत , शाकुंतल आणि अनेक शास्त्रीय ग्रंथ त्यांनी वाचले होते . गणित , ज्योतिषशास्त्रामध्ये तर त्यांचा हातखंडा होता . स्वताच्या आईची कुंडली पाहून तिचा म्रुत्यूयोग त्यांनी जाणला होता . संस्क्रुत भाषेत शीघ्र काव्यरचना करण्यात प्राविण्य दाखवल्याने त्यांना काव्यकंठ ही पदवी मिळाली होती . लहानपणापासून त्यांचा आध्यात्मिकते -कडेही ओढा होता . भगवान शंकराच्या दर्शनासाठी त्यांनी घोर तपश्र्चर्याही केली होती . पुढे त्यांनी रमणमहर्षींचे शिष्यत्व स्वीकारले . त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे जपजाप्य करणारा हा तेजस्वी ब्राम्हण आपली मात्रुभूमी पारतंत्र्यात खितपत पडली आहे म्हणून तळमळत होता . आणि क्रान्तिकार्याला मदत करण्यासाठी त्यांनी एक गटही बनवला होता .

       तेंव्हा असा हा अलौकिक व्यक्तिमत्वाचा गुरू कोणत्या तरी पूर्वसंकेतानुसार कपालीशास्त्रींना भेटला . त्यांच्या मार्गदर्शनाखाली कपालीशास्त्रींनी तंत्र आणि मंत्र विद्येचा सखोल अभ्यास केला . वेद , उपनिषद आणि इतर शास्त्रीय ग्रंथातील तत्वज्ञानाचा आध्यात्मिक अर्थ लावण्याच्या त्यांच्या पद्धतीने कपालीशास्त्री प्रभावित झाले. कपालीशास्त्रींचे मन कुठे झुकतंय ते गणपतीमुनीनाही जाणवत होतं आणि म्हणून त्यांनीही सांकेतिक भाषेत असणाऱ्या वेदमंत्रांचे स्पष्ट दर्शन घडवण्यासाठी कपालीशास्त्रींचं मन पक्कं केलं . तरुणपणीच गणपतीमुनींच्या संपर्कात आल्याने कपालीशास्त्रींच्या वाङमयीन आणि काव्यात्मक क्षमतेला बहर आला . कपालीशास्त्रींच्या ह्रुदयातही राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत होती . त्यामुळे ते ही गणपतीमुनींच्या राष्ट्रकार्याला मदत करू लागले . कपालीशास्त्री आपल्या या गुरूला देवासमान मानत असत कारण कपालीशास्त्रींची कोणतीही अडचण सोडवण्यासाठी ते ही धावून येत असत पण अंतरंगाच्या पोकळीत खोलवर जाऊन आत्म्याचा शोध घेण्याची वेळ आली तेंव्हा मात्र गणपतीमुनींनी कपालीशास्त्रींना रमणमहर्षींकडे जाण्याचा सल्ला दिला . कदाचित या सल्ल्यामागे आणखीही एक कारण असावं . वेदमंत्रांचा आध्यात्मिक अर्थ लावण्यासाठी कपालीशास्त्रींच्या मनाची तयारी होत होती . बौद्धिक क्षमताही निर्माण होत होती . परंतू मुळात वेदमंत्रांची निर्मिती बौद्धिक पातळीवरून झालेली नव्हती . अतिशय उच्च पातळीवरून आलेले ते शब्द ऋषी-मुनींच्या अंतरात्म्यांनी ग्रहण केलेले होते आणि म्हणून आत्म्याचा शोध घेऊन त्या उच्च पातळीशी संपर्क साधण्याची क्षमताही निर्माण होणे आवश्यक होते . परंतु रमणमहर्षींकडे गेल्यास कदाचित सर्वसंगपरित्याग करून संन्यास घ्यावा लागेल असे वाटून कपालीशास्त्री प्रथम तयार होत नव्हते . कपालीशास्त्रींचे एकूण विचार जीवनाभिमुख होते . परंतू , पुढे गणपतीमुनींनी सतत धरलेल्या आग्रहामुळे कपालीशास्त्रींनी १९११ मध्ये रमण महर्षींची भेट घेतली . परंतु या पहिल्याच भेटीत त्यांना काय मिळालं ते त्यांच्याच शब्दातून जाणून घेणं उचित ठरेल .—— “   I  approached  the  Maharshi  and  what  a  meeting  it  was  !  The  very  first  day  brought  a  change  in  my  being   and  no  amount  of  tapas   or  japa  would  have  given  me  an  indubitable  knowledge  of  spiritual  consciousness  and  a  correct  appreciation  of  the  truth  of  spiritual  life  that  the  Maharshi  gave  me  . “  

       सर्वसाधारणपणे रमणमहर्षी कोणालाही स्पर्श करत नसत . परंतु या पहिल्याच भेटीत त्यांनी कपालीशास्त्रींच्या ह्रदयाच्या ठिकाणी आपल्या हाताने स्पर्श केला . अशा थोर आध्यात्मिक विभुतिचा हस्तस्पर्श म्हणजे शक्तिपाताने दिलेली दीक्षाच ठरते . अशा तऱ्हेने रमण महर्षींच्या दर्शनाने आणि त्या हस्तस्पर्शाने प्रभावित झालेले , आमुलाग्र बदलून गेलेले कपालीशास्त्री त्यानंतर जवळ जवळ १८ वर्षे आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी अधून मधून रमणाश्रमाची वाट चालत राहिले .

शक्ती उपासक श्रीअरविंद ——

        योगी श्रीअरविंदांच्या अनेक शिष्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की त्यांच्या ह्रुदयात श्रीअरविंदांना भेटण्याची इच्छा प्रथम बीजरुपाने निर्माण झाली व नंतर य़थावकाश त्या बीजाचा व्रुक्ष होताना ती इच्छा फलद्रुप झाली व शेवटी ते साधक पुडूचेरी आश्रमात जाऊन विसावले . कपालीशास्त्रीही याला अपवाद नव्हते . १९०७ सालची गोष्ट . बंगालमध्ये वंगभंगाची चळवळ सुरू होती . तोकमान्य टिळक , लाला लजपतराय वगैरेंच्या नेत्रुत्वाखाली कॉंग्रेस पक्षातील जहाल मतवादी मवाळ पंथीयांच्या बोटचेप्या धोरणाला कडाडून विरोध करत होते . याची परिणति अखेर १९०७ च्या सुरत अधिवेशनात कॉंग्रेस फुटण्यात झाली . जहाल मतवाद्यांनी वेगळ्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली . राष्ट्रीय पक्षाचे नेते भारतभर फिरून व भाषणे देऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकमत तयार करत होते .  

                 या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिपिनचंद्र पाल यांचं चेन्नईमध्ये भाषण होतं . २०/२१ वर्षाचे कपालीशास्त्री आपल्या काही मित्रांसमवेत या व्याख्यानाला गेले होते . अत्यंत प्रभावी असं ते भाषण संपल्यावर कोणीतरी म्हणालं – “   हे बिपिनबाबू खूप प्रभावी बोलतात . पण पडद्याआड राहून या चळवळीची सुत्रं हालवणारे प्रज्ञावंत मार्गदर्शक वेगळेच आहेत . त्यांचं नांव अरविंदबाबू . ते साधू पुरूष आहेत आणि शक्तिउपासक आहेत असे म्हणतात .                     “ दुसरा एक मित्र काही दिवसांनी म्हणाला — ‘’   मी अरविंदबाबूंचं व्याख्यान ऐकलं आहे . ते अतिशय हळूवार आवाजात बोलतात पण ते बोलू लागल्यावर श्रोते मंत्रमुग्ध होतात .  ‘’ अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकून कपालीशास्त्रींच्या मनात श्रीअरविंदांबद्दल कुतुहुल निर्माण झालं होतं .  

श्रीक्रुष्णाचे श्रीअरविंदांना मार्गदर्शन —–     

         अशा पद्धतीने कपालीशास्त्रींची वाटचाल चालू होती आणि त्याच काळात श्रीअरविंदांच्या जीवनातील घडामोडींनाही वेग आला होता . अलिपूर बॉंब प्रकरणाच्या निमित्ताने ब्रिटीश सरकारने श्रीअरविंदांना पकडून वर्षभर तुरुंगात ठेवले . याच बंदिवासाच्या काळात भगवंताने श्रीअरविंदांना दर्शन देऊन मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली . एक वर्षात अलिपुर खटल्याचा निकाल लागून श्रीअरविंदांची निर्दोष मुक्तता झाली . परंतु त्यानंतर लवकरच भगवंताच्या आदेशानुसार स्वातंत्र्यलढ्याकडे पाठ फिरवून त्यांनी पॉंडिचेरीच्या तपोभूमीकडे प्रयाण केले . पॉंडिचेरी येथील एकांतवासात त्यांची योगसाधना चालू होती . १९१३ साली आपल्या जन्मदिनी मोतीलाल रॉय या आपल्या एका जुन्या सहकाऱ्याला   त्यांनी एक पत्र लिहिलं होतं . या पत्रात आपली योगसाधना आता कोणत्या टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे व यापुढे ती कोणत्या दिशेने , कोणत्या साध्यासाठी चालू राहणार आहे त्याचा स्पष्ट उल्लेख आहे . तसेच , त्यानंतर ते असेही म्हणतात की – “  माझ्या हातून यापुढे कोणते कार्य करून घेतले जाणार आहे त्याची मला आता  पूर्ण कल्पना आलेली आहे . ‘’ त्यानंतर ते कार्य कोणते ते स्पष्ट करताना ते म्हणतात –  ‘’   Srikrishna  has  shown   me   the  true  meaning  of  the  Vedas  , not  only  so  ,   but  he  has  shown  me   a  new  science  of  Philology   showing  the  process  and   origins  of  human  speech  ;  so  that  a  new  Nirukta   can  be  formed   and  the  new  interpretation  of  the  Vedas   based  upon  it  .  ‘’   आणखीही इतर अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख आहे . परंतु त्यांची वरील इच्छा मात्र लवकरच पूर्ण झाली . १९१४च्या सुमारास माताजी व त्यांचे पती श्री रिचर्ड हे भारतात आले होते . त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार १९१४ सालीच श्रीअरविंदांनी ‘  आर्य  ‘  मासिक सुरू केलं . त्यानंतर सतत ७ वर्षे श्रीअरविंद एकटे व एकटाकी आणि एकाच वेळी अनेक विषयांवर लिहित होते . त्या लिहिण्यामागे कोणत्याही प्रकारचं पूर्व नियोजन नव्हतं , चिंतनाची  गरज नव्हती . “   It  is  out  of  silent  mind  that  I  write  whatever  comes  ready-shaped  from  above  .  “   असं श्रीअरविंदांनी स्वताच्या या लेखनाचं वर्णन केलं आहे .

श्रीअरविंदांची  भेट  —– 

                  अशा तऱ्हेने भव्य दिव्य विचार संपदा घेऊन आलेला आर्य मासिकाचा पहिलाच अंक कोणत्या तरी गूढ अशा पूर्वसंकेतानुसार , एका दुकानदाराने कपालीशास्त्रींच्या हाती सोपवला . त्यानंतर पुढील प्रत्येक अंक कुठून तरी मिळवून कपालीशास्त्री वाचत गेले . श्रीअरविंदांनी व्यक्त केलेले विचार आणि त्यांची भाषा या दोन्ही गोष्टींनी कपालीशास्त्री प्रभावित झाले . हे विचार त्यांना पटत होते , रुचत होते . किंबहुना त्यांच्याही मनात अशाच प्रकारचे विचार आलेले होते . विशेष म्हणजे वेदशास्त्रसंपन्न असणाऱ्या कपालीशास्त्रींनी वेदवाङमयातील गूढ आध्यात्मिक अर्थ उलगडून दाखवणारे ते लेख वाचल्यावर त्यांची मनोमन खात्री पटली की प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय अशा प्रकारचे विचार मांडणे केवळ अशक्य आहे . श्रीअरविंदांना भेटण्याची आधीच निर्माण झालेली इच्छा आता हळू हळू तीव्र होऊ लागली . आणि मग या इच्छेचं मूळ बीजारोपण झाल्यानंतर जवळ जवळ १० वर्षांनी म्हणजे १९१७ साली त्या भेटीचा योग जुळून आला .

        कपालीशास्त्रींना पॉंडिचेरी येथे एका व्याख्यानासाठी  निमंत्रित केलं होतं . पुडूचेरी येथे राहणारे सुब्रम्हण्यम् भारती यांच्यामार्फत कपालाशास्त्रींनी श्रीअरविंदांशी संपर्क साधला . या पहिल्या भेटीचं वर्णन करताना कपालीशास्त्री म्हणतात —  ‘’   जिना चढून मी  वर गेलो .वरच्या मजल्यावर एक वऱ्हांडा होता . पाठीमागे एक खोली होती . त्या खोलीच्या दारात श्रीअरविंद उभे होते . एखाद्या सजीव पुतळ्याप्रमाणे निर्व्यक्तिक , तटस्थ . श्रीअरविंदांना मी ज्या क्षणी पाहिलं त्या क्षणी अचानकपणे माझ्या संपूर्ण शरीरात डोक्यापासून पायापर्यंत अत्यंत जोरदार स्पंदने मला जाणवू लागली . शरीर सतत थरथरत होतं , कंप पावत होतं . जणू प्रचंड वेगाने फिरणाऱ्या एखाद्या जनित्रावर मी उभा आहे असे मला वाटले . हा अनुभव जितका प्रभावी होता तितकाच अभिनव होता . जवळ जवळ चार ते पांच मिनिटे तो टिकला त्यानंतरही पुढे बऱ्याच वर्षांनी जेंव्हा जेंव्हा मी त्यांनी भेटावयास गेलो तेंव्हा तेंव्हा हा अनुभव मला येतच राहिला . ‘’ 

व्यापक हिंदुत्ववाद —

         या पहिल्या भेटीत कपालीशांस्त्रींनी श्रीअरविंदांना महत्वाचे असे ३ प्रश्न विचारले . त्यातील २ त्यांच्या वैयक्तिक साधनेविषयी आणि जीवनाविषयी असावेत . त्याबद्दल त्यांनी साहजिकच मौन पाळलं आहे . मात्र तिसऱ्या प्रश्नाविषयी ते म्हणतात –  “   देशाच्या भवितव्याचा प्रश्न मला सर्वात महत्वाचा वाटत होता . या मुत्सद्दी , द्रष्ट्या पुरुषाकडून , या ईश्वरदत्त  प्रेषिताकडून , देवपुत्राकडून मला काहीतरी आशादायक इच्छा होती आणि म्हणून मी त्यांना विचारलं की नजिकच्या भविष्यकाळात हिंदुस्थानच्या बाबत काय शक्यता आहे ?  “  त्यावर श्रीअरविंद म्हणाले – “   शक्यता काय म्हणून ? ती निश्र्चितता आहे . “

                यानंतर हिंदू मुसलमान ऐक्यावर चर्चा झाली . नुकताच लखनौ करार झाला होता . तरी हे ऐक्य किती टिकेल यावर अनेकांच्या मनात असणारी भीती कपालीशास्त्रींनी व्यक्त केली . त्यावर भाष्य करताना श्रीअरविंद म्हणाले – “  हा एक फार मोठा अडथळा आहे . मात्र सुधारणाविषयक चळवळी उदयास येऊन समाजातील पुरोगामी विचारसरणीच्या लोकांवर त्यांचा प्रभाव पडेल अशी आशा करू या . “ मात्र त्यानंतर थोडा विचार करून ते म्हणाले  “   अधिक व्यापक हिंदुत्ववादाने त्यातून मार्ग निघू शकेल आणि तशीच आवश्यकता  आहे .  “

         या भेटीला आणि त्यात झालेल्या चर्चेला जवळ जवळ १०० वर्ष होत आली . हिंदू मुसलमानांचे ऐक्य तर टिकले नाहीच उलट त्यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला . श्रीअरविंदांना मातेसमान असणाऱ्या त्यांच्या प्रिय मात्रुभूमीचे दोन तुकडे झाले . त्यानंतर तरी हा प्रश्न मिटेल असे काही जणांना वाटले असावे . परंतु आजही तो प्रश्न कायम आहे . किंबहुना अधून मधून उग्र स्वरूपही धारण करीत आहे . श्रीअरविंदांच्या या विचारांची यापूर्वी दखल घेतली गेली की नाही त्याची कल्पना नाही . आजमितीला तर हिंदुत्व म्हणजे काय या मुद्द्यावरूनच गोंधळ निर्माण झाला आहे . आणि या गोंधळामध्ये व्यापक हिंदुत्ववाद म्हणजे काय त्याचा खोलवर जाऊन खल करणे दुरापास्त ठरत आहे . तिथे त्याची अंमलबजावणी कशी होणार ?

गुरूचरणांचा आसरा —

        कपालीशास्त्री म्हणतात — “   श्रीअरविंदांना भेटावयास आलेला  मी  निरोप घेताना तोच राहिलो होतो का ?  वर वर पाहतो जरी तोच होतो तरी माझा  मी  राहिलो नव्हतो . असे काही तरी घडले होते की त्यामुळे मी जणूं हवेत उडू लागलो होतो .  “ त्यानंतर कपाली शास्त्री अनावर अशा उत्कटतेने अधून मधून पॉंडिचेरीस येऊन श्रीअरविंदांना भेटत राहिले . अखेरीस ६ वर्षांनी म्हणजे १९२३ साली मात्र ते आले ते साधक म्हणून , गुरूचरणांचा  आसरा घेण्यासाठी , एक शिष्य म्हणून . या भेटीच्या प्रसंगी श्रीअरविंदांच्या शरीरकांतिमध्ये झालेला बदल पाहून ते चकित झाले व म्हणाले – “   गुरूदेव , पूर्वी आपला वर्ण काळसर होता . पण आता आपली कांति खूपच उजळली आहे आणि सोनेरी , तेज:पुंज झाली आहे . आपल्या योग साधनेचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे . ‘’

        अर्थातच यानंतर शिष्याच्या भूमिकेतून आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी कपाली शास्त्री श्रीअरविंदांकडे  वारंवार येऊ लागले . परंतु २४ नोव्हेंबर १९२६ चा सिद्धिदिनानंतर श्रीअरविंदांनी स्वताला जणूं एकांतवासात बंदिस्त केलं आणि साधनेतील पुढील शेवटचा टप्पा आणि अंतिम साध्य प्राप्त करण्यासाठी घोर तपश्र्चर्येस प्रारंभ केला . आश्रमाचा केवळ कारभारच नव्हे तर आश्रमातील साधकांना मार्गदर्शन करण्याचाही भारही त्यांनी माताजींवर  टाकला . तोपर्यंत कपालीशास्त्रींनी माताजींची योग्यता किंबहुना त्यांचे खरे स्वरूप जाणले नव्हते . असाच एका प्रसंगाच्या निमित्ताने श्रीअरविंदांनी स्वताचे एक हस्तलिखित त्यांच्या हातात ठेवले . “ The  Mother  “ या नावाने पुढे प्रसिद्धी पावलेल्या या पुस्तिकेत आद्यशक्तीच्या महेश्वरी , महाकाली , महालक्ष्मी व महासरस्वती या रुपांचे वर्णन आहे . त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे सामर्थ्य यांचे वर्णन आहे . ते हस्तलिखित वाचल्यावर कपालीशास्त्रींच्या ह्रुदयात स्वच्छ प्रकाश पडला आणि – “   He  recognized  in  her  a  conscious  embodiment  of  the  whole  Divine  ,  a  Living  Moorti  in  whom   are  present  all  the  Four  Personalities  of  the  Adya  Shakti  spoken  of  by  Shree Aurobindo  .  “ कपालीशास्त्रींच्या हेही ध्यानात आलं की   “  She  is  the  manifested  dynamic  part  of  his  soul  . “     आणि यानंतर श्रीअरविंद आणि माताजी अशा दोघांवरही द्रुढ श्रद्धा ठेवून संपूर्ण समर्पण भावनेने कपालीशास्त्री आश्रमात येऊ लागले . १९२९ साली त्यांनी आपल्या संस्क्रुत शिक्षकाच्या नोकरीचा राजिनामा दिला व ते श्रीअरविंद आश्रमात कायमचे वास्तव्यास आले .

पूर्णयोगाचा स्वीकार —-

         या ठिकाणी असा एक प्रश्न निर्माण होतो की कपालीशास्त्रींनी श्रीअरविंदाश्रमात जाण्याचा निर्णय का घेतला असावा ?   किंबहुना मुळात त्यांनी श्रीअरविंदांचे शिष्यत्व का स्वीकारले असावे ? योगसाधनेसाठी की वेदांची गूढ उकल करण्यासाठी ? का श्रीअरविंदांच्या व्यक्तिमत्वाने भारून गेल्यामुळे ? कपालीशास्त्री हे स्वता एक प्रकांड पंडीत आणि सखोल चिंतन करणारं परिपक्व असं व्यक्तिमत्व होतं . श्रीअरविंदांप्रमाणेच रमण महर्षी आणि गणपतीमुनी हीही थोर व्यक्तिमत्व होती व त्या त्या काळात त्यांचाही प्रभाव कपालीशास्त्रींवर पडला होता शिवाय श्रीअरविंदांचे शिष्यत्व स्वीकारून कपालीशास्त्रींची रमण महर्षी व गणपती मुनी यांचेवर असणारी श्रद्धा तसूभरही कमी झालेली नव्हती . वेदांतील गूढ अर्थाची उकल करण्यासाठी म्हणावं तर श्रीअरविंदांनी दाखवलेली दिशा त्यांना समजली होती . दूर राहूनही त्यांना ते कार्य साधता आलं असतं . बरे योगसाधनेसाठी म्हणावं तर रमण महर्षींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आत्मशोध चालूच होता . परंतू या संपूर्ण विवेचनाबरोबरच आणखी एक मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे .

       कपालीशास्त्रींना परमेश्वर प्राप्तीची ओढ होती , मुक्तीची आंच होती पण त्याचबरोबर त्यांना समाजाची चिंता होती , राष्ट्रमुक्तीचीही आंस होती . शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे कपालीशास्त्री हे सच्चे वैदिक होते . वेदकालीन विचारधारेशी त्यांची नाळ जोडलेली होती आणि म्हणूनच त्यांना प्रथमपासून ‘  Asceticism ‘  मंजूर नव्हता . श्रीअरविंदांनी ‘ सावित्री ‘ मध्ये म्हंटल्याप्रमाणे ‘’  Escape  brings  not  the  victory  and  the  crown  . ‘’  हे त्यांना मनोमन पटलं होतं आणि म्हणूनच त्यांना श्रीअरविंदांचा Integral  Yoga  अधिक श्रेयस्कर वाटला , स्वताच्या अंत:प्रेरणांशी अधिक जुळणारा वाटला तसेच वेदांतील गूढ अर्थाची उकल होण्यासाठी आत्मशोधाबरोबरच Integral  Development ही आवश्यक आहे हेही मनोमन पटले असावे . असो तर काय वैशिष्ठ्य आहे अशा या महामार्गाचं ?

इंटिग्रल योग —-

          योगसाधनेचा हेतू ईश्वरप्राप्ती हाच असतो . परंतु ईश्वर जरी एकच असला तरी योग्यांची ईश्वरविषयक कल्पना वेगवेगळी असल्याने त्यांना ईश्वराच्या भिन्न स्वरुपांचा अनुभव येतो . काहींना अंतर्यामी वास करणाऱ्या ईश्वराचा साक्षात्कार होतो , काहींना ‘ ब्रम्हम् सत्यम् जगन्मिथ्या ‘ वचनातील ब्रम्हाचा अनुभव येतो , काहींना विश्वातीत , निर्गुण , निराकार आत्म्याचा साक्षात्कार होतो , कुणाला ‘  सर्वम् खलु इदम् ब्रम्हम् ‘  अशा सर्व प्राणीमात्रात , वस्तुमात्रात वास करणाऱ्या परमेश्वराचे दर्शन होते तर कुणाला सच्चिदानंद अशा परमेश्वराचंही दर्शन होतं . बहुतेक योगी ईश्वरात किंवा ब्रम्हात विलीन होऊन जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती , मोक्ष मिळवू इच्छितात कारण हे जग त्यांना मायारूप तरी भासतं किंवा हे जग दु:ख , रोग , यातना यांनी भरलेले असून मानवी प्रक्रुतीचे परिवर्तन असंभव आहे असं वाटतं .

         श्रीअरविंदांच्या योगदर्शनात परमेश्वराचा , अंतर्यामी , विश्वात्मक , विश्वरुपी , निर्गुण , निराकार व सच्चिदानंद इत्यादी सर्व स्वरुपात साक्षात्कार करून घेण्याचा संकल्प आहे . तसेच परमेश्वराच्या अतिमानस शक्तीच्या सहाय्याने हे अज्ञानात बुडलेले असार , दुखमय जीवन दिव्य करण्याचाही संकल्प आहे . यासाठी श्रीअरविंदांनी पूर्णयोगात समर्पण भावनेला सर्वश्रेष्ठ महत्व देऊन ज्ञानयोग , कर्मयोग व भक्तियोग या तीनही मार्गांचा समन्वय साधला आहे . श्रीअरविंदांचा पूर्णयोग जीवनाभिमुख आहे . विश्व आणि जीवन यांना माया मानून त्यातून निव्रुत्त होऊ पाहणारा नाही . अर्थहीन देहदंडन आणि रसहीन वैराग्य त्याला मंजूर नाही . श्रीअरविंदांची विचारधारा  Consciousness च्या उत्क्रान्तिवर आधारलेली आहे . परमेश्वराने स्रुष्टी निर्माण केली त्यांत आध्यात्मिक विकसनाने दिव्य जीवन निर्माण करायचा त्याचा हेतू आहे असे ते मानत . मानव हा या विकासातला शेवटचा टप्पा नाही कारण माताजींनी म्हटल्याप्रमाणे – ”  –Nature  endeavors   to  bring  out  a  being  which  will   be  to  man  what  man  is  to  animal  . “   मानवात अतिमानस चेतनेचा विकास होऊन किंवा अन्य प्रकारे दिव्य चेतना असणारा अतिमानव प्रगट होईल आणि त्याच्या प्रभावाने  प्रुथ्वीवरील  संघर्ष समाप्त होऊन शांती , आनंद व एकात्मतेचे साम्राज्य निर्माण होईल असा श्रीअरविंद स्वानुभवाच्या बळावर विश्वास व्यक्त करतात .      

                    माताजी म्हणतात  “    पूर्णयोग’ म्हणजे भौतिक जीवनापासून पलायन नव्हे, की जे त्याला त्याच्या नशिबावर अपरिवर्तनीय रुपात, आहे तसेच सोडून देते; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे, किंवा विश्व हे ‘ईश्वरी इच्छे’चे अंतिम आविष्करण आहे असे मानून, विश्वाचा स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे.

                   सामान्य मानसिक चेतनेपासून, अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या चेतनेच्या सर्व श्रेणी चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येणे आणि – पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतुने – प्राप्त करून घेतलेल्या त्या अतिमानसिक शक्तीनिशी व चेतनेनिशी ,   हे  भौतिक विश्व प्रेरित करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे  “ 

                    श्रीअरविंदांना अभिप्रेत असणारी अतिमानस चेतना अथवा दिव्य जीवनाची संकल्पना सांप्रतच्या योगप्रणालीमध्ये नसल्यामुळे हा योग अनेकांना काहीसा नवीन वाटतो परंतु वेद , उपनिषदातील विचारधारांचा लाक्षणिक अर्थ पाहिला अथवा भगवद्गीतेतील  योग समन्वय पाहिला तर असं दिसून येतं की श्रीअरविंदांचा योग हा ध्येय व साधनापद्धती या दोन्ही द्रुष्टीने वेदकालीन योग परंपराच एका नव्या आविष्कारात पुढे चालू ठेवणारा आहे .

जीवितकार्य आणि अखेर —

        कपालीशास्त्रींसारख्या थोर वैदिकालाही वरील विचार मनोमन पटला आणि म्हणूनच त्यांनी पूर्णयोगाचा मार्ग स्वीकारला . कपालीशास्त्री ज्ञानयोगी होते , मंत्रोपासनाही चालू होती . आता त्याच्या जोडीला कर्मयोग आणि भक्तीयोगही चालू झाला . माताजींनी नेमून दिलेले कोणतेही काम हे दैवी कार्य आहे या भावनेने ते चोखपणे पार पाडत . आपल्या कामाव्यतिरिक्त उरलेला सर्व वेळ ते आपली साधना , उपासना अथवा वाचन , लेखन यातच व्यतीत करत . आपल्या खोलीतूनही ते सहसा बाहेर पडत नसत . अपवाद होता तो अर्थातच फक्त श्रीअरविंद अथवा माताजी यांचे आशीर्वाद अथवा मार्गदर्शन घेण्यासाठी बाहेर पडण्याचा . अशा रितीने जवळ जवळ १७ वर्षे पूर्णयोगाची साधना चालू होती . त्यांनी प्राप्त केलेल्या सामर्थ्याबद्दल असं म्हणतात की त्यांनी आवाहन केल्यावर प्रत्यक्ष देवता हजर होत आणि या कथेची सत्यता खुद्द माताजींनी मान्य केली आहे .

       भगवंताच्या आदेशानुसार श्रीअरविंदांनी १९१४ / १५ च्या सुमारास आर्य मासिकातून अनेक लेख लिहिले आणि वेदवाङमयातील गूढ अर्थाचा शोध घेण्याचा मार्ग दाखवला . श्रीअरविंदांचा हा काहीसा Pilot Exercise  होता . त्यानंतर हे काम संस्क्रुत भाषेचा विशेष अभ्यास केलेल्या , वेदशास्त्र संपन्न असणाऱ्या अशा कोणीतरी हे काम पूर्णत्वास नेणं आवश्यक होतं . त्यानंतर जवळ जवळ ३० वर्षांनी १९४६ साली कपालीशास्त्रींनी ते कार्य आपल्या अंगावर घेतलं . श्रीअरविंदांसारख्या दैवी व्यक्तिमत्वाच्या हातून तो अत्यंत महत्वाचा असा ‘ बॅटन ‘ स्वीकारला . त्यानंतर ‘  सिद्धांजन  ‘ या नावाने पुढे प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचे चार भाग अवघ्या ३ वर्षात पूर्ण केले . श्रीअरविंदांनीही  ते ग्रंथ वाचून त्यांना मान्यता दिली . ५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंदांनी या जगाचा निरोप घेतला . त्यानंतर आणखी ३ वर्षे कपालीशास्त्री आश्रमात राहून आपलं इतर काही लेखन पूर्ण करत होते . अशा तऱ्हेने पूर्ण योगाची साधना करून आणि वेदवाङमयाचा गूढ अर्थ शोधून समाजापुढे ठेवण्याचं आपलं  जीवितकार्य पूर्ण करून या थोर वैदिकाने १५ ऑगस्ट १९५३ रोजी म्हणजे श्रीअरविंदांच्या  जन्मदिनी आपली इहलोकीची यात्रा संपवली .

         कपालीशास्त्री म्हणत असत – “  By  Tapas  is  its  shore  to  be  reached  “  खरोखर तपश्चर्येने आणि परमेश्वरी क्रुपेच्या सहाय्यानेच तो पलीकडचा तीर गाठता येतो . केवळ मानवतेच्या उत्कर्षासाठी तपश्चर्या करून कपालीशास्त्रींनी तो तीर गांठला आणि वेदगंगेचा  प्रवाह प्रकाशित केला . गुरूक्रुपेच्या मदतीने लाखो लोकांतून एखादाच असे भव्य दिव्य कार्य करून जातो . कपालीशास्त्री हे त्यापैकी एक थोर विभुति होते . सिद्धांजनाच्या रुपाने अमर झालेल्या त्यांच्या स्म्रुतीला प्रणाम करत असताना श्रीअरविंदांचे शब्द आठवतात —-               

                “   I  seek  not  science  ,  not  religion  ,  not  theosophy   but  Veda  —  the  truth  about   Bramhan   ,  not  only   about   His   essentiality   but   about   His   manifestation  …….   I  believe  that  veda  to  be  the  foundation  of  the  Sanatan   Dharma  ,  I  believe  it  to  be  the  concealed  divinity  within  Hinduism  —  but  a  veil  has  to  be  drawn  aside  ,  a  cortain  has  to  be  lifted  .   I  believe  it  to  be  discoverable  .  “ 

पण आता तो पडदा बाजूला  सारला गेला . तो बहुमोल खजिना  कोणत्या  चावीने  उघडायचा ती चावी श्रीअरविंदांनी दाखवली आणि अलौकिक सामर्थ्य प्राप्त करून कपालीशास्त्रींनी त्या खजिन्यातील  बहुमोल रत्न समाजासमोर मांडली . पण हे सर्व कशासाठी ?  कोणतं  दैवी कार्य करण्यासाठी ?  श्रीअरविंदांनी पुढे म्हंटल्याप्रमाणे  —-

                      “    I   believe  the  future  of  India  and  and  the  world  to  depend  on  its   discovery  and  on  its  application   not  to  the  renunciation  of  life   but  to  life  in  the  world  and  among  men  .  “ 

                  ज्या जगन्नियंत्याने ५००० वर्षापूर्वी निर्माँण केलेल्या वेदविचारांचा गूढ आध्यात्मिक अर्थ , ज्या योजनाबद्ध अशा पद्धतीनं   माध्यमांची निर्मिती करून आणि त्यांना एकत्र आणून जगाला उलगडून दाखवला , तोच जगन्नियंता श्रीअरविंदांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्या वेदविचारांना व्यवहारान्वित करून केवळ भारताचेच नव्हे तर साऱ्या जगाचे भवितव्य घडवून उज्वल करेल याबद्दल संदेह बाळगण्याची गरज नाही . कारण श्रीअरविंदांनी  “  सावित्री “  या महाकाव्यात म्हंटल्याप्रमाणे —-

“  This  world  was  not  built  with  random  bricks  of  chance

    A  blind  God  is  not  destiny’s  architect 

    A  conscious  power  has  drawn  the  plan  of  life 

   There  is  a  meaning  in  each  curve  and  line  .  “

—–  नरेन्द्र  नाडकर्णी .

संदर्भ : १) Versatile  Genious  —  Shree T  V  Kapalishastri

                     A  Compilation  edited  by  M P  Pandit .

              २) संजीवन त्रैमासिक – १५ डिसेंबर २००८

      ३) The  Mother  India .

( हा लेख VPM समुहाच्या दिशा मासिकाच्या  मे-२०१० च्या अंकात प्रथम प्रसिद्ध झाला )  

Continue Reading

Previous: सुखाच्या शोधात
Next: Integral Yog – Part 2

Related Stories

  • Yog

Integral Yog – Part 2

Narendra Nadkarni June 18, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.