Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • Religion and Culture
  • भारतीय संस्कृती
  • Religion and Culture

भारतीय संस्कृती

Narendra Nadkarni September 3, 2024

      ज्याप्रमाणे भारतीय शब्दकोशातील ‘  धर्म ‘ म्हणजे ‘ Religion ‘  नव्हे त्याचप्रमाणे  ‘   संस्कृती ‘ म्हणजे ‘ Culture ‘  नव्हे . संस्कृती हा शब्द सम्+क्रु या धातूपासून बनलेला आहे ज्याचा अर्थ शुद्ध करणे , निर्मळ करणे , पवित्र करणे असा होतो म्हणजे अशा गोष्टी ज्यामुळे आपलं शरीर व मन निर्मळ होईल , पवित्र होईल 

      संस्कृतीचा संबंध मुळात व्यक्ती अथवा समाज आपल्या जीवनात कोणती जीवनमुल्ये ठरवतो त्याच्याशी आहे . या मुल्यानुसार समाजाची ध्येये , आदर्श ठरत असतात. जीवनाचे साफल्य कशात आहे ते ठरते . माणूस आपल्या आयुष्यात कशाने मोठा होतो , माणसाने आपला माथा कोणापुढे नम्र करावा , कोणत्या गोष्टीबद्दल आदर बाळगावा ?

        सत्यनिष्ठा , न्यायबुद्धी , प्रामाणिकपणा , कर्तव्यतत्परता , चारित्र्यसंपन्नता , कृतज्ञता , नि:स्वार्थबुद्धी , दृष्टीकोनातील व्यापकता , दु:खितांबद्दल कणव इत्यादी मुल्यांना समाजधारणेत अनन्यसाधारण महत्व आहे . 

         जेंव्हा समाजामध्ये परोपकारी , निष्काम कर्म करणारी , केवळ ज्ञानासाठी विद्यार्जन करणारी , कलेसाठी जीवन वाहणारी माणसं विपुलतेने आढळतात तेंव्हा संस्कृती उत्कर्षाकडे जात असते . 

         याउलट जीवनाकडे आकुंचित द्रुष्टीने पाहणारी स्वार्थी माणसं जेंव्हा खूप आढळतात तेंव्हा संस्कृती अपकर्षाकडे जात आहे असे समजावे . संस्कृतीचा अवनतीचा काळ सुरू झाला की अनेक दुष्ट शक्ती उगम पावतात , जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वार्थ बोकाळतो, देहसुख हे जीवनाचे सर्वस्व बनते , खूप पैसा मिळवून खूप देहसूख भोगणे व खूप सत्ता मिळवून खूप प्रसिद्धी पावणे हे आदर्श जीवन ठरते व त्यास प्रतिष्ठा प्राप्त होते . 

         भारतीय संस्कृती म्हणजे सान्तातून अनंताकडे जाणे , अंधारातून प्रकाशाकडे जाणे , भेदातून अभेदाकडे जाणे , चिखलातून कमळाकडे जाणे , विरोधातून विकासाकडे जाणे , विकारातून विवेकाकडे जाणे , कोलाहलातून संगीताकडे जाणे . भारतीय संस्कृती संग्राहक आहे सर्वांना जवळ घेणारी आहे . ‘  सर्वेषामविरोधेन ब्रम्हकर्म समारभे ‘ म्हणणारी आहे . 

१) भारतीय संस्कृतीची अष्टांगे —

     १) धर्मकारण २) समाजकारण ३) अर्थकारण ४) राजकारण

     ५) वाङमय ६) विज्ञान ७) कला ८) शिक्षण

२) भारतीय संस्कृतीच्या चौकटीतील ३ चतुष्टके —

      १) चार पुरूषार्थ – धर्म , अर्थ , काम , मोक्ष .

      २) चार वर्ण – ब्राम्हण (Wisdom), क्षत्रिय(Power), वैश्य(Harmony), शूद्र(Work)

      ३) चार आश्रम – ब्रम्हचर्याश्रम , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , संन्यासाश्रम 

3) जीवनव्यवहाराची सप्तपदी —

       १) धैर्य २) उद्योग ३) भक्ती ४) सत्संग ५) तृष्णा परित्याग 

       ६) द्वंद्वास सामोरे जाण्याची शक्ती ७) प्रभूकार्य करण्याची शक्ती व वृत्ती 

४) परमार्थाच्या दृष्टीकोनातून पडणारे मानवाचे चार वर्ग —-

       १) बद्ध २) मुमुक्षू ३) साधक ४) सिद्ध 

५) १६ संस्कार ——-

       १) गर्भाधान – शरीरसंबंध ठेवण्यास सुरूवात 

       २) पुंसवन – मासिकपाळी चुकल्यावर करावयाचा संस्कार 

       ३) सिमन्तोनयन – ७व्या महिन्यातील ओटीभरण , डोहाळे जेवण

       ४) जातकर्म – प्रसूतिकाळात केला जाणारा विधी 

       ५) नामकरण – बारसे 

       ६) निष्क्रमण – मंदिरात घेऊन जाणे 

       ७) अन्नप्राशन – ७/८ महिन्यावर अन्न देण्यास सुरूवात 

       ८) चुडाकर्म – जावळ काढणे 

       ९) कर्णवेध – कान टोचणे 

      १०) वेदारंभ – २ – २|| वर्षावर 

      ११) उपनयन – ७-८व्या वर्षी – गुरूकुलास जाणे 

      १२) समावर्तन – ब्रम्हचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश 

      १३) विवाह – मुलीचे वय किमान १६ व मुलाचे वय किमान २५

      १४) वानप्रस्थ – निव्रुत्त होऊन समाजसेवा व समाजप्रबोधन 

      १५) संन्यास – सर्वसंगपरित्याग 

      १६) अंत्येष्टी – पिंडदान , तिलांजली 

६) वैदिक ग्रंथनिर्देश परिचय —

        १) मूळ वेद – ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद , अथर्ववेद 

        २) उपवेद – आयुर्वेद , धनुर्वेद , गांधर्ववेद , स्थापत्यवेद 

        ३) वेदांगे – शिक्षा , कल्प , व्याकरण , छंद , निरुक्त , ज्योतिष 

               ( वरील सर्वांना मिळून १४ विद्या म्हणतात ) 

        ४) उपनिषदे – प्रमुख १० आहेत .

                  १) इश २) केन ३) कंठ ४) ऐतरेय ५) छांदोग्य

                  ६) प्रश्न ७) मुंडक ८) मांडुक्य ९) तैतिरीय १०) बृहदारण्य

        ५) स्मृती – वेदांवर आधारलेली धर्मशास्त्रे 

                  १) मनुस्मृती २) याज्ञवल्क्य स्मृती ३) पराशर स्मृती 

                  ४) आश्वलायन स्मृती 

        ६) पुराणे – एकूण १८ पुराणे आहेत 

                   ब्रम्ह , पद्म , विष्णू , शिव , भागवत , नारद ,

                   वामन , कूर्म , मत्स्य , गरूड , ब्रम्हांड , ब्रम्हवैवर्त ,

                   मार्कंडेय , अग्नी , लिंग , वराह , स्कंद , भविष्य 

        ७) ब्राम्हणे – वेदग्रंथांच्या विवेचनात्मक भागांना ब्राम्हणे म्हणतात 

                   ऋग्वेद – ऐतरेय व सांख्यायन किंवा कौशितकी 

                   यजुर्वेद – कृष्ण –  तैतिरीय ,  शुक्ल – शतपथ 

                   सामवेद – तांड्य अद्भूत , छांदोग्य , प्रौढ 

                            पंचविश अथवा महाब्राम्हण 

                   अथर्ववेद – गोपथब्राम्हण 

        ८) आरण्यके – वेदांतील गूढ तत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ 

                    ऐतरेय , सांख्यायन , तैतिरीय , बृहदारण्यक 

        ९) श्रौतसुत्रे – यांत यज्ञयागादि विधींचे सविस्तर वर्णन असते 

                    आपस्तंभ , बौद्धायन , भारद्वाज , मानव , 

                     कात्यायन , लाट्यायन , खादिर 

        १०) गृह्यसुत्रे – वर्णाश्रमधर्म व नित्यनैमित्तिक कर्मे यांचे स्पष्टीकरण 

                     कौशिक , गौतम , कात्यायन , मानव 

                     वैखानस , आश्वलायन , सांख्यायन 

७) वैदिक वाङमयातील महत्वपूर्ण सिद्धांत —

         १) “   एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति |  “ 

                          सत्य एकच आहे विद्वान त्याला वेगवेगळ्या नांवाने संबोधतात .

         २) “   ईशावास्यम् इदम् सर्वम्  “

            हे सर्व जग ईश्वराने व्यापले आहे . 

         ३) “   अहिंसा परमो धर्म:   “ 

                           अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे . 

         ४) “    आ नो भद्रा: क्रतवो यन्तु  विश्वत:   “ 

                            सर्व दिशातून आमच्याकडे उत्तम विचार येवोत . 

         ५) “   उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत  “

            उठा , जागे व्हा , अंतिम लक्ष्य साधल्याशिवाय थांबू नका . 

         ६) “   असतो मा सद्गमय , तमसो मा ज्योतिर्गमय , मृत्योर्मा अमृतं गमय “

                           असत्यातून सत्याकडे , अंधारातून प्रकाशाकडे , मृत्यूपासून अमरत्वाकडे .  

८) वैदिक वाङमयातील ४ महावाक्ये —- 

         १) ऋग्वेद —  प्रज्ञानम् ब्रम्हम् | —  पैल 

         २) यजुर्वेद —  अहम् ब्रम्हास्मि | —  वैशंपायन 

         ३) सामवेद —  तत्वमसि |     —-  जैमिनी 

         ४) अथर्ववेद — अयमात्मा ब्रम्ह  | — सुमन्तु   

९) प्रक्रुतीची २४ मूलतत्वे —-

         अ)  ५ प्राथमिक मूलतत्वे –

             १) शब्द  २) स्पर्श  ३) रूप  ४) रस  ५) गंध

         ब) ५ ज्ञानेंद्रिये –

                १) कान  २) त्वचा  ३) डोळे  ४) जीभ  ५) नाक 

         क) ५ कर्मेन्द्रिये –

             १) वाणी २) हात ३) पाय ४) जननेन्द्रिय ५) गुदद्वार  

         ड)  ५ प्राण —-

             १) प्राण  २) अपान ३) व्यान  ४) उदान  ५) समान 

         इ)  मनोव्यापाराची आंतर-इन्द्रिये —

             १) मन २) बुद्धी ३) चित्त ४) अहंकार 

१०) शरीराचे ३ प्रकार —-

          १) स्थूल  २) सूक्ष्म  ३)  कारण 

११) ५ प्रकारचे कोश —-

          १) अन्नमय कोश २) प्राणमय कोश ३) मनोमय कोश 

          ४) विज्ञानमय कोश ५) आनंदमय कोश  

१२) इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता —-

           १) हातांची देवता ——————— इंद्र 

           २) पायांची देवता  ——————— विष्णू 

           ३) वाणीची देवता  ——————— अग्नि 

           ४) उपस्थाची देवता ——————– प्रजापती 

           ५) पायूची देवता  ———————- यम 

           ६) मनाची देवता  ———————- चन्द्र 

           ७) नासिकेची देवता ( गंध ) ———- अश्विनीकुमार 

            ८) कानांची देवता ( शब्द ) ———— दिक्देवता 

            ९) जीभेची देवता ( रस ) ————– वरूण 

           १०) नेत्रांची देवता ( कंठ ) ————– सूर्य 

           ११) त्वचेची देवता ( स्पर्श ) ———— वायू 

१३) ३३ प्रकारच्या ( कोटि ) देवता —–

            अ) ८ प्रकारचे वसू  —– Spheres  of   Existance  

                                    अग्नी , प्रुथ्वी , वायू , सूर्य , चन्द्र , तारे , आकाश , वातावरण 

            ब) ११ रुद्र —–  Divinities   of   Life  

                                    10  Forms  of  Life  Energy  in   Man  and   Mind  

                            क) १२ आदित्य —  Sovereign  Principles 

                                    ६ प्रमुख – मित्र , वरूण , आर्यमान , दक्ष , भग , अंसा 

                ६ कनिष्ठ – सवित्रु , पुंसा , विष्णू , विवस्वत , सक्रा , त्वस्ट्रा 

            ड) इंद्र आणि प्रजापती 

१४) ८ दिशांच्या देवता —- 

   १)  उत्तर —  कुबेर  ( Wealth ) 

    २) इशान्य —- सोम / ईशान ( Purity )     

    ३) पूर्व —— इन्द्र ( Power / courage ) 

          ४) आग्नेय —– अग्नी ( Ritual / sacrifice )

    ५) दक्षिण ——  यम ( Justice , help for the  dead ) 

    ६) नैऋत्य ——- सूर्य , निरुति ( Misery )

    ७) पश्र्चिम —— वरूण ( Knowledge ) 

          ८) वायव्य ——- मरुत , वायु ( Life and breath ) 

१५ ) भारतीय संस्कृति मधील सप्तके ——-

 अ) सप्तसरिता — गंगा , यमुना , गोदावरी , सरस्वति , नर्मदा , सिंधू , कावेरी 

 ब) सप्तस्वर — सा रे ग म प ध नी

 क) सप्तलोक — भु  भुव:  स्व:  महा:  जन:  तप:  सत्यम् 

    ड) सप्तरसातल – अतल, वितल, सुतल, महातल, तलातल, रसातल, पाताल .

 इ) इन्द्रधनुतील ७ रंग – तांबडा , नारिंगी , पिवळा , हिरवा , पारवा , जांभळा 

 फ) सप्तद्वीपे – जंबू , प्लक्ष , शल्मली , कुश , क्रौंच , शाक , पुष्कर . 

 ग) मोक्षदायी सप्तपुरे – अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवन्तिका, द्वारका, जगन्नाथपुरी

 ह) वैवस्वत मन्वंतरातील सप्तर्षी — कश्यप , अत्रि , भारद्वाज , विश्वामित्र 

                               गौतम , जमदग्नी , वसिष्ठ . 

 ज) सप्तसागर – क्षीर , इक्षुरस , सुरा , घ्रुत , दधि , स्वादु , लवण . 

 ल) सात कुलपर्वत – हिमालय , हेमकुट , निषद , नील , श्र्वेत , श्रुंग , मेरू . 

१६) सूक्ष्म देहातील ७ चक्रे —  

               1) मुलाधार चक्र — ( Governs  the  Earth  principle .) 

                      Governs  the  Sex  center  and  the  Physical .

               2) स्वाधिष्ठान चक्र – ( Governs the  Water principle )

                      This  is  called  lower  vital . All  petty  desires  , impulses  emanate  from  here  . 

                3) मणिपुर चक्र — ( Governs  the  Fire  principle )

                        Tall  ambitions  and  courageous  movements  emanate  from  here . 

                 4) अनाहत चक्र — ( Governs  the  Air  principle  )

                         It  is  the  fount  of  Love  and  Unity . 

                 5) विशुद्धी चक्र — ( Governs  the  Ether  principle ) 

                         This  is  a  place  for  Expression . One  who reaches  here  attains  Expression 

                 6) अज्न चक्र — (  Center  of  Will  and  Vision . )

                             Aspirant  sees  the  vision  Divine  Forms  ,  Light  and  Flashes  . 

                   7) सहस्त्रार चक्र — (  Exit  gate  to  Superconscient )

                             One  who  reaches  here  experiences   Bliss . 

१७) भारतीय संस्कृतीची वैशिष्ठ्ये —–

  १) अद्वैताचे अधिष्ठान –  

 अद्वैत म्हणजे ज्या चैतन्याचा अंश माझ्यामध्ये आहे तेच चैतन्य प्रत्येक मानवात आहे , प्रत्येक पशुपक्षात आहे , तेच चैतन्य सर्व चराचर स्रुष्टीत भरून उरले आहे . ‘ सर्वम् खलू इदम् ब्रम्हम् ‘ या चिरंतन वेदतत्वावर आधारलेली व विश्वबंधुत्वाच्याही पलीकडे नेणारी एकात्मतेची ही थोर कल्पना . ‘  सर्वेsत्र सुखिन:  सन्तु , सर्वे सन्तु निरामय: | सर्वे भद्राणि पश्यन्तु , मा कश्चित दु:खमाप्नुयात् ‘ || अशी सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणारी अद्वैताची ही कल्पनाच दुसऱ्या व्यक्तीबद्दल , तिच्या मतांबद्दल , संप्रदायाबद्दल आदर आणि सहानुभूती निर्माण करते .  

   २) बुद्धीचा महिमा –

       भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही . वेद हा भारतीय संस्कृतिचा पाया . वेद म्हणजे ज्ञान . ज्ञानावर उभारलेली ही संस्कृती . विचारांना व बुद्धीला विशेष महत्व देणारी . सनातन धर्माचा एकच ऋषी नाही , एकच प्रेषित नाही , एकच ग्रंथ नाही . जीवनाला सम्रुद्ध करणारे नव विचार , नवीन ज्ञान यांचं इथे स्वागतच झालं . य़ास्कांनी अनेक अभ्यास मंडळांची नांवे घेतली आहेत , सर्वत्र तत्वज्ञानाची चर्चा चाले , शेकडो मते शेकडो विचार . प्रत्यक्ष भगवंतानेही अर्जुनाला पडलेल्या भ्रमाचे निराकरण करण्यासाठी , त्याच्या मनातील सर्व शंका दूर करण्यासाठी १८ अध्याय सांगितले आणि विश्वरूप दर्शन दिल्यावरही आदेश दिला नाही तर ‘’  यथेच्छसि तथा कुरू “ असं सांगून त्याच्या बुद्धीवर सारं सोडून दिलं .

    ३) ज्ञान – भक्ती – कर्म 

        ज्ञान आणि बुद्धीचा महिमा वर पाहिला . भक्ती हा तर आध्यात्मिकतेचा आत्मा आहे . मात्र भारतीय संस्कृती कर्मालाही प्राधान्य देते . कोणतेही कर्म तुच्छ मानलेले नाही . रामायणात एक कथा आहे . श्रीराम जेंव्हा शबरीच्या आश्रमात पोहोचले तेंव्हा त्यांना जमिनीवर सर्वत्र फुले फुललेली दिसली . शबरी म्हणाली – इथे पूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता . मातंग ऋषी व त्यांचे शिष्य रानांतून लाकडाच्या मोळ्या घेऊन येत तेंव्हा घामाघूम झाल्यावर त्यांचा जो घाम खाली पडला त्यांतून फुललेली ही फुलं – घर्मजानि कुसुमानि . आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं हे श्रमाचं महत्व . केरसुणीला पाय लावू नका , जात्याला पाय लावू नका सांगणारी ही संस्कृति . सेवासाधनालाही मान देणारी . 

                 ४) संयम –

           भारतीय संस्कृतिचा संयम हा आत्मा आहे आणि शंकराच्या मंदिरातील कासव हे त्याचे प्रतिक आहे . सारी सृष्टी ही संयमावरच आधारलेली आहे . वृक्षाला मुळांनी जखडून ठेवले आहे म्हणून तो उंचच उंच जातो . नदी दोन तटांनी बांधलेली आहे म्हणून तिला गति आहे . ती आपल्या ध्येयाकडे धावत जाऊ शकते . जेंव्हा तिला पूर येतो तेंव्हा इतस्तत: पसरून तिचा विस्तार होतो पण तिचा ध्येयाकडे जायचा वेग मंदावतो . वाफेला बंधन नसेल तर तिला शक्ति नाही . थोडक्यात स्वैरसंचार करणारी वाफ आणि नदी दोन्ही दुबळ्या ठरतात . आणि म्हणून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे . स्वातंत्र्य म्हणजे विकास आणि संयमा शिवाय विकास होत नाही . 

       ५) कर्मफलत्याग — भगवंताने गीतेत कर्मफलत्यागाची शिकवण दिली आहे . मानवाचा खरा आनंद फलात नसून कर्मात आहे . कर्म उत्कृष्ट व्हावे म्हणून कर्मफलत्यागाची जरूरी आहे . फलाचे सतत चिंतन करण्यापेक्षा कर्मातच जो रमतो त्याला अधिक थोर फल मिळते . भारतीय संस्कृति साधना करण्यास शिकवते , तपश्चर्येचे महत्व पटवते . तिला कल्पतरूवाद मान्य नाही . तुमच्या कर्मास दुबळी फले नको असतील , भव्य दिव्य फले हवी असतील तर श्रमावे लागेल , साधना करावी लागेल , संयम बाळगावा लागेल . 

        ६) गुरू-शिष्य परंपरा – गुरू-शिष्य परंपरेचं महत्व भारतीय संस्कृती एवढं दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीने गायलेलं नाही . गुरू म्हणजे शिक्षक नव्हे . शिक्षक हा विशिष्ठ ज्ञानाशी तुमचा परिचय करून देतो , तो मार्गदर्शक असतो . खरा गुरू तुम्हाला ज्ञानाच्या गाभाऱ्यात तर घेऊन जातोच शिवाय तुमच्या अंतर्यामी सुप्तावस्थेत असणाऱ्या ज्ञानालाही वाट मोकळी करून देतो . मात्र अशा गुरूजवळ जाताना रिक्त मनाने प्रणाम करून सेवाही करण्यास तयार रहावे लागते . विहीरीत अपरंपार पाणी असेल पण भांडे जर वाकले नाही तर त्यांत पाण्याचा थेंबही शिरणार नाही . यासाठी गुरूजवळ नतमस्तक होऊन जायला हवे . 

         ७) चार पुरूषार्थ – धर्म , अर्थ , काम , मोक्ष —–

भारतीय संस्कृती ४ पुरूषार्थ मानते . भारतीय संस्कृती दैन्य-नैराश्याची गाणी गाणारी नाही , ती पैशाला वमनवत् मानत नाही . तसेच मानवाला भावना आहेत , विकार आहेत हेही ती जाणते . आणि म्हणून तिने अर्थ व काम नाकारले नाहीत . पुरूषार्थाचा आरंभ धर्माने करून शेवट मोक्ष ठेवला . म्हणजे मोक्षप्राप्ती हे मानवापुढील ध्येय आहे पण ते प्राप्त करण्याच्या मार्गात असताना अर्थ व काम यांची जरूर प्राप्ती करावी मात्र ती धर्माच्या अधिष्ठानावर असावी , धर्माच्या पायावर करावी . धर्ममय अर्थशास्त्र आणि धर्ममय कामशास्त्र हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ होत .  

         ८) व्यक्तिगत ऋणे — भारतीय संस्कृतीने एकूण ५ व्यक्तिगत ऋणे कल्पिली आहेत व त्या ५ ऋणांतून मुक्त होण्यासाठी ५ यज्ञ सांगितले आहेत ——

             अ) पितृऋण – पितृयज्ञ – सर्व पितरांचे आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचे स्मरण ठेवणे व त्यानुसार व्यवहार करणे . 

            ब) ऋषीऋण – ब्रम्हयज्ञ – आपल्या ऋषी-मुनींनी मांडलेले शाश्वत् विचार आणि संस्कार पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे म्हणजे ब्रम्हयज्ञ . 

             क) देवऋण – देवयज्ञ – देव ही एक शक्ती आहे व त्या शक्तीमुळे आपले जीवन सुखकर होते . कुटुंबात वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते , कुलदैवत असते , उपासनेच्या परंपरा असतात . त्यानुसारप्रार्थना , उपासना करणे , स्तोत्रे म्हणणे म्हणजे देवयज्ञ होय . 

              ड) मनुष्यऋण – मनुष्ययज्ञ – मी जे जीवन जगतो ते समाजाच्या आधारामुळे ही भावना सतत मनात असणे आवश्यक आहे . आणि म्हणून समजाला जिथे जी गरज आहे तिथे मला समाजासाठी जे शक्य आहे ते करणे म्हणजे समाजऋणातून मुक्त होणे  यालाच मनुष्ययज्ञ म्हणता येईल . 

               फ) भूतऋण – भूतयज्ञ – भूत म्हणजे पृथ्वी , जल , वायू , आकाश ही पंचमहाभुते व प्राणी , वनस्पती इत्यादी निसर्ग निर्मिती , या सर्वांवरच माणूस म्हणून आपले अस्थित्व अवलंबून आहे . आणि म्हणून या ऋणातून मुक्त होण्यासाठी पशु-पक्ष्यांशी सौहार्दाने वागणे , वृक्षारोपण करणे व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशी काळजी घेणे हाच भूतयज्ञ .  

           ९) मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध —–

सर्व चराचर सृष्टीमध्ये परमेश्वराचा अंश आहे या विचाराच्या पायावरच भारतीय संस्कृतीने मानवेतर सृष्टीशी प्रेमसंबंध ठेवले . 

गाय आपल्याला दूध देते अथवा तिचा पुत्र आपल्याला शेतीसाठी उपयोगी पडतो हे तर खरेच पण गाय आपल्या अंगणात आली की ती आपल्या कुटुंबाचा घटक बनते . ती म्हातारी झाली , दूध देत नाही म्हणून तिला कसायाच्या स्वाधीन करणे ही कृतघ्नता ठरते . मानव केवळ उपयुक्ततावादावर जगू शकत नाही . त्याला भावना आहेत . या भावना उपयुक्ततावादाच्या हत्याराने मारून टाकल्या तर मानवाची किंमत शून्य होईल . वसुबारसच्या दिवशी आपण गाय वासराला पुजतो . पोळ्याचा सण साजरा करतो . नागपंचमीला नागाची पूजा करतो . हे सारं त्यांचेविषयी वाटणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी .  

पशू पक्ष्यांप्रमाणे वृक्ष-वनस्पतींनाही आपण मान देतो . तुळशीला रोज नमस्कार करतो . वड , पिंपळ , उंबर यांना पार बांधून त्यांची पूजा करतो . देवाला बेल , दुर्वा , तुळस वाहतो .    निर्जीव सृष्टीवरही आपण प्रेम करतो . नद्यांचे उत्सव करतो , गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते . घरातल्या चुलीलाही नमस्कार करतो . सकाळी उठल्यावर पृथ्वीमातेला वंदन करतो .  अशी ही सर्व चराचरांवर प्रेम करणारी संस्कृती . 

          १०) बलोपासना —-भारतीय संस्कृतीने ज्ञान व प्रेम यांचेबरोबरच बलोपासनेलाही महत्व दिले आहे . सूर्यनमस्कारासारखा व्यायाम करण्यास सांगितले आहे . योगसाधनेतही आसने व प्राणायाम यांचा समावेश करून ‘  शरीरमाद्यम् खलु धर्म साधनम् ‘  या तत्त्वाचा पुरस्कार केलेला दिसतो . 

          ११) ध्येयाची पराकाष्टा —- भारतीय संस्कृतीने त्याग व पावित्र्य या गुणांना अनन्यसाधारण महत्व दिले आहे . भारतीय संस्कृतीने निर्माण केलेल्या सर्व आदर्शांचे मूळ सांपडते ते रामकथेत आणि म्हणूनच रामकथेचा प्रभाव ५००० वर्षे टिकून राहिला आहे . 

मर्यादापुरूषोत्तम राम – पित्याचा शब्द खरा करण्यासाठी राज्यत्याग करून अरण्याची वाट धरणारा , या परिस्थितीस कारणीभूत असणाऱ्या सावत्र मातेचा राग न धरणारा , लोकांची पावित्र्यावर श्रद्धा रहावी म्हणून स्वताच्या जीवनाचाही होम करणारा प्रजाहितदक्ष राम . 

सीतेची सहनशक्ती , पतीप्रेम , पाण्याशिवाय मासा कसा राहिल असा सवाल करून रामाबरोबर वनात जाणारा लक्ष्मण , “  हे राज्य रामाचे आहे “ असे म्हणून त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करणाऱ्या भरताचे बंधुप्रेम . ब्रम्हचर्य , भक्ती व सेवा यांचा आदर्श निर्माण करणारा हनुमान . 

याशिवाय   *   शुकाचार्य हा वैराग्याचा आदर्श . 

        *     निश्चयमूर्ती ध्रुवबाळ हा ध्येयाची पराकाष्टा करण्याचा आदर्श .

        *     परमेश्वराच्या चिंतनात गढून गेलेला व मरणाची पर्वा न करणारा प्रल्हाद .

        *     स्वप्नातीलही शब्द खरा करण्यासाठी अलौकिक त्याग करणारा राजा हरिश्चन्द्र

                   *     स्वताचे मरण समोर दिसत असतानाही त्याची पर्वा न करता आपले व्रत चालू ठेवणारे  महारथी कर्ण आणि बळीराजा . 

                   *     आश्रयार्थ आलेल्या कपोताचे रक्षण करण्यासाठी स्वताच्या मांडीचे मांस कापून देणारा शिबी राजा .

                   *      पतीला दृष्टीसुख नाही म्हणून आपलेही डोळे जन्मभर बांधून ठेवणारी गांधारी . या त्यागाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही . 

        *     कुत्रा पोळी कोरडीच खाईल म्हणून कासावीस होऊन तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धांवणारे संत नामदेव .

        *     विषाचा पेला आनंदाने पिणारी , कृष्णसर्पाला शाळीग्राम मानणारी मीराबाई . 

        *     दर ५ वर्षांनी स्वताचा खजिना वाटून टाकणारा ,अकिंचनत्वाने शोभणारा  राजा हर्षवर्धन . 

                   *     प्रजेने लावलेल्या झाडासही हात लावू नका असा आदेश काढणारे , परस्त्रीस मातेसमान वागणूक देणारे छत्रपती शिवाजी महाराज . 

                   *     स्वताच्या जीवाची पर्वा न करता पावनखिंड लढवणारा स्वामीनिष्ठ बाजीप्रभू .

        *     “   आधी लगीन कोंडाण्याचे “ असे म्हणत राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा वीर तानाजी मालुसरे

        *     देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही असे प्रत्यक्ष राज्यकर्त्याला सुनावणारे रामशास्त्री प्रभुणे .

अशी ही भारतीय संस्कृतीची थोर परंपरा .                 

    १२) भारतीय संस्कृतीची महान प्रतिके आणि परंपरा —- 

प्रत्येक संस्कृती काही प्रतिके निर्माण करत असते व त्यानुसार काही परंपरा निर्माण होतात . प्रतिक म्हणजे संस्कृतीचे सूत्र . भारतीय संस्कृतीत शेकडो प्रतिके आहेत . या प्रतिकांच्या मागे असणाऱ्या अर्थाची जोपर्यंत समाजाला जाणीव असते किंबहुना समाजाची भावना जोपर्यंत त्या अर्थाशी निगडीत असते तोपर्यंत ते प्रतिक पूजलं जातं , परंपरा पाळल्या जातात . मात्र जेंव्हा अर्थहीन झालेलं प्रतिकही पूजलं जातं , परंपरा पाळली जाते तेंव्हा ती संस्कृती यंत्रवत् होते. अशी यांत्रिक प्रतिकं व परंपरा अर्थहीन झाल्यामुळे नव-विचारांचां वर्ग ती फेकून देतो . 

        १) कमळ — कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रधान प्रतिक आहे . कमळाजवळ अलिप्तता हा गूण आहे . पाण्यांत असून ते पाण्याच्या वर असतं . चिखलात असून चिखलावर फुलतं . वाईटातून चांगलं घेऊन ते स्वताचा विकास साधतं . सुर्याकडे , तेजाकडे ते सतत उन्मुख असतं . प्रकाश पडताच ते फुलू लागतं . भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे .  ‘   तमसो मा ज्योतिर्गमय ‘ ही आमची प्रार्थना . कमळ शतपत्र आहे , सहस्त्रपत्र आहे . शेकडो जाती , जमाती , वंश , पंथ या साऱ्यांना सामावून घेणारी अशी ही थोर संस्कृती . 

        २) यज्ञ किंवा होम — भारतीय संस्कृती म्हणजे त्याग . कोणताही संस्कार असो , कोणताही धार्मिक विधी असो तेथे होम असतोच , उपनयनाच्या वेळी सुद्धा होम असतो . ज्ञान मिळवायचे तर सुखाचा , आलस्याचा होम करावा लागेल ही त्यामागील संकल्पना . तसाच विवाहाचे वेळी होम असतो , या एकत्रित जीवनाची सुरूवात करताना अनेक वैयक्तिक इच्छांचा होम करावा लागतो . 

         ३) कपाळास गंध लावणे — देवास गंध लावल्यावर आपण आपल्या कपाळास गंध लावतो . हे मस्तक आता आपले नाही , परमेश्वराचे आहे . त्यामध्ये चांगले विचार यायला हवे , चांगली कृत्य घडायला हवी . 

         ४) देवाला अभिषेक — अभिषेक म्हणजे संतत धार . जशी मूर्तीवर पाण्याची धार पडते तशीच मनाची धारही परमेश्वराच्या चरणी पडावी , सतत त्याचाच विचार करावा ही संकल्पना . 

         ५) दक्षिणा ओली करून देणे — जे दान देतो त्यात ह्रुदयाचा ओलावा आहे ही संकल्पना . 

         ६) ब्रम्हचाऱ्याच्या हातातील दंड —- दंड जसा सरळ असतो , वाकत नाही तद्वत् ब्रम्हचाऱ्याने कुणापुढेही वाकू नये – मोहापुढे , कामक्रोधापुढे , विकारापुढेसुद्धा वाकू नये ही संकल्पना . 

          ७)  तीळ-गूळ — तीळ हे स्नेहाचे प्रतिक व त्या स्नेहास गोडवा आणण्यासाठी गुळाची जोड . 

          ८) कासव — शंकराच्या मंदिरातील कासव हे इन्द्रिय-संयमाचे प्रतिक . 

          ९)  तांदूळ – वधू-वरांच्या मस्तकावर अक्षता टाकतात कारण तांदुळ हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते . 

          १०) सुपारी – नारळ —- हे सद्भावनेचे प्रतिक आहे . 

          ११) परगांवी जाणाऱ्याच्या हातावर दही ठेवणे — प्रवासात दह्याची शीतलता लाभावी असा अर्थ . ते दही खायचे पण हात धुवायचा नाही , ह्रुदयातील स्निग्धता तशीच कायम ठेवावी हा त्यामागील आशय . 

           १२) हुताशनी पोर्णिमेस होळी समोर बोंब मारणे — जे काही वाईट आहे , घातक आहे , मनात दबलेली घाण आहे , वासना आहेत , कुविचार आहेत त्या सर्वांची होळी करून ते सर्व नष्ट झाले अशी बोंब मारायची . आणि मग दुसऱ्या दिवशी निर्भेळ आनंदाची रंगपंचमी खेळून आनंद साजरा करायचा . 

संकलन —- नरेन्द्र नाडकर्णी              

Continue Reading

Previous: Integral Yog – Part 2
Next: Scattered Thoughts

Related Stories

  • Religion and Culture

रामायण – एक चिरंतन संस्कार प्रतिक

Narendra Nadkarni March 24, 2023
6e9a2448-f6fd-49a6-a8a5-88724cb5c76a.jpg
  • Religion and Culture

गुढी पाडवा — भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा

Narendra Nadkarni March 22, 2023
81834faf-0d92-4da5-9c3b-e1901c1cc8d0.jpg
  • Religion and Culture

महाशिवरात्र

Narendra Nadkarni March 9, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.