अलीकडे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतीय संस्क्रुती आणि भारतीय कला यांच्या अभ्यासाकडे अनेकजण आकर्षित होताना दिसत आहेत . त्यातही अनेक पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विद्वान , हिंदू मंदिरांची स्थापत्यकला , त्यात केलेले कलाकुसरीचे कोरीवकाम आणि त्यातून होणारे भारतीय संस्क्रुतीचे दर्शन य़ांचा विशेषत्वाने अभ्यास करू लागले आहेत . त्यामुळे साहजिकच अशा विषयांवर लिहिलेले लेख अथवा पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली आहेत. या लेखांतून अथवा पुस्तकातून आपल्याला कोणती माहिती मिळते ? तर सर्वसाधारणपणे मंदिरांच्या स्थापनेचा व निर्मितीचा इतिहास , स्थापत्यकला कोणत्या प्रकारात मोडते त्यावर भाष्य , तिची वैशिष्ठ्ये , कलाकुसरीची वर्णने आणि बहुधा त्या मंदिरातील देवतेशी निगडीत असणाऱ्या धार्मिक , पौराणिक आणि सामाजिक कथा . परंतू या संपूर्ण विषयाच्या मुळाशी असणारा जो आध्यात्मिक पाया आहे त्यावर मात्र सहसा प्रकाश टाकलेला दिसत नाही . तथापि मंदिरांच्या या निर्मितीमधील आध्यात्मिक सत्यतेचे दर्शन घेण्यापूर्वी मुळात मंदिरांची निर्मिती होण्यास कधी सुरूवात झाली , कोणत्या परिस्थितीमुळे झाली आणि त्यांनी कोणत्या सामाजिक हेतूची पूर्तता केली , ते पाहणे ईष्ट होईल .
जवळ जवळ १८०० वर्षे या भारतवर्षातील मंदिरे ही शहरांतील अथवा खेड्यांतील सार्वजनिक जीवनाच्या केन्द्रस्थानी राहिले आहेत आणि त्यांनी निरनिराळ्या मार्गांनी भारतीय समाजाची सेवा केली आहे . भारतीय समाजात प्रकर्षाने दिसून आलेल्या संगीत , न्रुत्य , नाट्य तसेच स्थापत्यशास्त्र , कलाकुसर व रंगकाम इत्यादी कलांचे स्फुर्तीस्थान ही मंदिरेच होती . या मंदिरांच्या परिसरात राहणारा समाज एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात जमून उत्सव साजरा करीत असे व त्यातूनच त्यांच्यातील कलागुणांना जसे प्रोत्साहन मिळाले तसेच त्यांच्यात एकतेची भावना निर्माण होण्यास मदत झाली . काही मंदिरांनी शैक्षणिक कार्यास आणि काही मंदिरांनी बौद्धिक उपक्रमास आपला हातभार लावला . जवळ जवळ सर्वच मंदिरांच्या बाजूस धर्मशाळा बांधल्या जात त्यामुळे त्या परिसरातून जाणाऱ्या वाटसरूंना आणि यात्रेकरूंना विसावा घेण्यास तेथे निवारा मिळे आणि मग गांवकरी त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा मोठ्या आनंदाने व प्रेमाने व्यवस्था करत . यामुळे बंधूभाव वाढण्यास मदत झाली .
वेदकाळात आणि त्यानंतरच्या उपनिषद् काळात यज्ञ हाच उपासनेचा प्रमुख मार्ग होता . त्यामुळे तेंव्हा साहजिकच मंदिरांची गरज नव्हती . आणि म्हणून तत्कालीन वाङमयात अथवा पुराणवस्तूसंशोधनाच्या अभ्यासात मंदिराच्या अस्थित्वाचे पुरावे अपेक्षेप्रमाणे सापडत नाहीत . सर्वप्रथम मंदिरांची निर्मिती ही साधारणपणे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात सुरू झाली असावी . परंतू महाभारतात आणि काही पुराणात मंदिरांचा उल्लेख क्वचित आढळत असल्याने इसवी सन पूर्व ३०० वर्ष काही मंदिरे अस्थित्वात असावी असे वाटते . त्यानंतरच्या काळात मंदिर निर्मितीची गरज का निर्माण झाली आणि त्यांच्या आराखड्याच्या आणि रचनेच्या मागे कोणती कल्पना होती तो विषय चित्तवेधक तर आहेच पण त्याचबरोबर आध्यात्मिक साधकांसाठी मोलाचा सुद्धा आहे .
परंतू वर उल्लेखिलेल्या मंदिररचनेकडे वळण्याअगोदर साधारण इसवी सनापूर्वी ६०० वर्षाच्या काळात तत्वज्ञानाचे , गूढवादाचे अथवा योगसाधनेचे कोणकोणते प्रवाह अस्थित्वात होते त्याच्याकडे एक नजर टाकू . तत्वज्ञानातील पूर्वमीमांसेची विचारधारा उपासनेसाठी य़ज्ञमार्गाचाच पुरस्कार करीत होती . मात्र याचसुमारास निर्माण झालेल्या जैनमतामुळे आणि बौद्धमतामुळे बहुसंख्य समाजावरील यज्ञसंस्थेचा प्रभाव नाहीसा होत चालला होता . ’पुरूष’ आणि ‘ प्रक्रुती ’ अशी दोन भिन्न तत्वे मानून प्रक्रुतीवरील पुरूषाचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करणाऱ्या ‘ सांख्य ’ दर्शनाचा प्रभाव होता . तार्किक प्रुथक्करणाच्या पायावर आधारलेल्या ‘ न्याय ‘ आणि ‘ वैशेषिका ‘ दर्शनामध्ये विचारांच्या सूक्ष्मतेची गरज असल्याने त्यांचा प्रभाव फक्त विद्वान पंडीतांपुरता मर्यादित होता . अष्टांग योगपद्धतीनुसार ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारी पातंजल पद्धती आपला प्रभाव पाडू लागली होती . तर शक्तीपूजेच्या माध्यमातून तेच साध्य करू पाहणारी तंत्र पद्धतीही निर्माण झाली होती . वेदकाळानंतर गौतमबुद्ध आणि महावीर जैन यांच्या विचारांच्या पायावर उभी राहिलेली तत्वज्ञाने सर्वसामान्य माणसास आकलन होण्यास प्रथम जरी सोपी वाटली तरी नंतर अनुसरण्यास अवघड वाटू लागली . शिवाय त्या विचारातील शुष्कपणाही समाजास रुचला नाही . अशा या परिस्थितीत परमेश्वराला शरण जाऊन त्याच्यावर निष्ठेने प्रेम करण्यास सांगणाऱ्या भक्तीयोगाचा उदय झाला . रामायण-महाभारत-श्रीमद्भागवत आणि इतर पुराणे यांच्यामुळे संपूर्ण समाजावर भक्तीमार्गाचा प्रभाव पडू लागला . समजण्यास आणि अनुसरण्यास तो सोपा तर होताच शिवाय परमेश्वरी क्रुपेचे तत्व त्यात अंतर्भूत असल्याने संपूर्ण समाजाने त्याचा अंगीकार केला या सर्व विवेचनावरून लक्ष्यात येईल की भक्तीयोगाचा उदय आणि त्याला मिळालेली योगमार्गाची व तंत्रमार्गाची जोड यातूनच मंदिर निर्मितीची गरज निर्माण झाली . बौद्ध धर्मातील महायान पंथानेही या मंदिर निर्मितीस हातभार लावला .
भक्तीयोगाच्या विचारधारेने विश्वनिर्मितीबाबत आणि मानवाबाबत उपनिषदांनी आणि पुराणांनी घेतलेला द्रुष्टीकोनच स्वीकारलेला दिसतो . आणि त्याच विचारांच्या आधारावर मंदिरांची रचना आणि आकार विकसित झाला . उपनिषदांत आणि पुराणांत निर्मिती ही ‘ व्याह्रतिंची ‘ बनलेली आहे असे म्हंटले आहे . ‘ भु: , भुव: , स्व: , मह: , जन: , तप: , सत्यम् ‘ या अस्थित्वाच्या ७ पातळ्या आहेत . कोणी त्याला ब्रम्हसोपान म्हणतात किंवा श्रीअरविंदांच्या भाषेत भौतिक जग आणि सर्वश्रेष्ठ परमेश्वर यांना जोडणाऱ्या जाणीवेच्या ( चेतनेच्या ) ७ पायऱ्या आहेत . मानवाचे वर्णन एक अंतर्भूत आत्मा किंवा संपूर्ण विश्वाची एक प्रतिक्रुती म्हणून केले जाते . मन , प्राणिक जीव आणि शरीर ही साधने असलेला एक आत्मा परंतू ज्याला अजूनही उत्क्रान्त न झालेले एक कारण शरीर आहे ज्यामध्ये विज्ञान ( Supermind ), आनंद ( Bliss ), चित्त ( Pure Consciousness ), आणि सत् ( Truth-Being ) यांचा समावेश होतो .
या सर्व विवेचनावरून आपण असे निष्चितपणे म्हणू शकतो की भारतातील हिंदू मंदिरे ही काही आदिमानवाच्या काळातील निर्मिती नसून तत्वज्ञानात प्रगत असणाऱ्या आणि आध्यात्मिकरीत्या जाग्रुत असणाऱ्या मानवी समुहाची ती निर्मिती आहे आणि स्वताविषयीचा आणि विश्वविषयीचा त्याचा द्रुष्टीकोन या मंदिरांच्या रचनांमध्ये आणि आकारांत प्रतिबिंबित झाला आहे . निरनिराळ्या काळात भारताच्या निरनिराळ्या भागांत हजारो मंदिरांची निर्मिती झाली आहे . त्यातील काही मंदिरांच्या रचनेतील बाह्य तपशील काही बाबतीत वेगळाही आहे परंतू त्यांच्या रचनेतील मूलभूत गोष्टी मात्र सर्वत्र समान आढळतात .
सर्वसधारणपणे भारतातील मंदिरांत ३ किंवा अधिक प्रांगणांचा समावेश असतो . प्रत्येक प्रांगण हे दुसऱ्याच्या आंत व काहीसे वरच्या पातळीवर असते . बाहेरील प्रांगणास भिंती नसतात . मात्र छतास आधार देण्यासाठी खांब उभारलेले असतात . प्रांगणाच्या शेवटी आंत शिरण्यासाठी दरवाजा असणारा गाभारा असतो . काही ठिकाणी हा खोलवर उतरून असणारा व काहीसा काळोखी असतो . गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्तीची स्थापना एखाद्या चौकटीवर केलेली असते व त्या चौकटीच्या खाली आध्यात्मिक संपत्तीचे प्रतिक असणाऱ्या वस्तू पुरलेल्या असतात . गाभाऱ्याच्या वर मंदिराची रचना एखाद्या शिखरासारखी असते . हे शिखर अनेक पातळ्यांचे करून त्यावर कळस ( कलश ) चढवलेला असतो .
मंदिराची रचना व आकार यांचा खरा अर्थ य़ा विवेचनातून स्पष्ट होऊ लागतो . मंदिर ही मानवाची प्रतिक्रुती आहे . गाभारा हे त्याचे ह्रदय व त्यातील मूर्ती हा त्याचा आत्मा . गीतेत भगवंत ९व्या अध्यायात म्हणतात – ‘‘ मानवी देहात वास करणाऱ्या मला अज्ञानामुळे लोक जाणू शकत नाहीत ‘‘ आणि १८व्या अध्यायात म्हणतात – ‘’ ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ह्रदयात राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवत असतो ‘’ . गाभाऱ्याबाहेरील ३ प्रांगणे म्हणजे मानवी शरीर , प्राणमय जीव आणि मन . शिखर म्हणजे भौतिकापासून सर्वश्रेष्ठ परमात्म्यापर्यंत वाढत जाणाऱ्या जाणीवेच्या पातळ्या . आणि त्यावर असणारा कलश म्हणजे सर्वश्रेष्ठाशी एकरूप झाल्यावर प्राप्त होणाऱ्या ब्रम्हानंदाच्या आणि अमरत्वाच्या अम्रुताचा कुंभ .
या ठिकाणी हिंदू मंदिराची तुलना बौद्ध स्तुपाशी करणेही योग्य ठरेल . बौद्धांचा स्तूप हा एखाद्या उलट्या ठेवलेल्या अर्धगोलासारखा असून त्याची तुलना मानवी मस्तकाशी करता येईल . कदाचित याचे कारण असे असू शकेल की गौतम बुद्धांनी शरीरांतर्गत आत्म्यावर कधीही भाष्य केलेलं नाही . उलटपक्षी मस्तकातील केन्द्रावर चित्त एकाग्र करून वैयक्तिक प्रयत्नांनी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर निर्वाण प्राप्त करण्याचा सल्ला दिला आहे
पण आता यानंतर प्रश्न निर्माण होतो की मंदिरांची काय गरज होती ? परमेश्वराचा साक्षात्कार होईपर्यंत मानवाची जाणीवही बाह्य गोष्टींत गुंतलेली असते . त्याला ज्या गोष्टींची गरज असते अथवा ज्या गोष्टी मिळाव्या अशी त्याची इच्छा असते त्या सर्व गोष्टी त्याला बाह्य जगातूनच मिळतात आणि म्हणून जेंव्हा तो परमेश्वरप्राप्तीची इच्छा करतो तेंव्हा त्याचा शोध हा वरील गोष्टींशिवाय सुरू होतो आणि मग जेंव्हा तो आपल्या अंतरंगांत डोकावतो तेंव्हा त्याला तेथे अपवित्रता दिसते , पाप दिसते , आणि सगळा गोंधळ दिसतो . ‘ सिंथेसिस ऑफ योग ‘ या ग्रंथात श्रीअरविंद म्हणतात – “ बऱ्याचशा मानवी जीवांना त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बाह्य आधाराची गरज असते . एखादी आपल्या बाहेरील अशी वस्तू की जिच्यावर श्रद्धा ठेवता येईल . त्यांना परमेश्वराच्या बाह्य प्रतिमेची गरज असते “ . हीच गरज मंदिर भागवते आणि त्याच्या ह्रदयातील परमेश्वराला जाग्रुत करण्यास मदत करते .
यानंतर शेवटी आणखी एक प्रश्न विचारला जातो की मंदिराच्या रचनेचा आणि आराखड्याची ज्यांनी मूळ कल्पना केली त्यांना मंदिर हे मानवाचे , एका अंतर्भूत आत्म्याचे प्रतिक आहे याची जाणीव होती कां ? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच होय असे आहे . कारण मंदिराच्या स्थापत्यशास्त्रावरील प्रबंधात असे म्हंटले आहे की ‘ भक्ताचे शरीर हे मंदिर आहे आणि त्याचा आत्मा हा परमेश्वर आहे ‘ . तुकोबारायांनी सुद्धा म्हंटले आहे ‘ देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर ‘ . मंदिराची बांधणी ही त्याच्या गाभाऱ्यापासून सुरू होते . ही गोष्टच मानवाचे शरीर आणि त्यांत असणाऱा आत्मा यांच्या संबंधांच्या द्रुष्टीकोनातून महत्वपूर्ण आहे. कारण मंदिर बांधून झाले की वेदमंत्रांच्या घोषात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते व त्यामुळे ती दगडाची मूर्ती एक जिवंत देवता बनते .
जर मानवाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बाह्य आधारापासून आंतरिक उपासनेकडे वळणे इष्ट असेल तर त्यासाठी मंदिर ही मानवाची प्रतिक्रुती आहे , हे सत्य अधिक जोरदारपणे मांडायला हवे आणि मंदिराच्या माध्यमातून सात्विक भाव जाग्रुत झालेल्या उपासकाची आंतरिक उपासना ही प्रेम आणि भक्ती यांच्या जोडीने सुरू करायला हवी . ज्यामुळे वैयक्तिक पावित्र्य तर निर्माण होतेच , पण त्याचबरोबर समर्पणाची भावनाही वाढीस लागते आणि परिणामी आपल्या अंतर्यामीच्या मंदिरात परमेश्वराचा प्रवेश होतो . अथवा ह्रदयातील पवित्र स्थानी असणाऱ्या देवत्वाचा साक्षात्कार होतो .
मूळ इंग्रजी लेखक – कै. विजय बोंडसे ( श्रीअरविंद आश्रम )
मराठी रुपांतर – नरेन्द्र नाडकर्णी
=================== $$$$$$$$ ====================