एके काळी ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही असं म्हंटलं जायचं . पुढे ते साम्राज्यच लयाला गेलं. पण इंग्रजांचा खेळ आणि त्यांची भाषा आजही अनेक देशांना जोडणारा दुवा ठरतेय. त्याचप्रमाणे त्यांची कालगणना, ख्रिस्ती सन सार्या जगात आता मान्यता पावलंय. साहजिकच सार्या जगात नव-वर्ष दिन १ जानेवारीलाच साजरा होतो.
काही वर्षापूर्वी ३१ डिसेंबरला मी अमेरिकेत असल्याने मुलाबरोबर न्युयॉर्क मधील टाइमस्क्वेअर मधला नववर्ष स्वागताचा जल्लोष पहायला निघालो होतो .कडाक्याची थंडी होती. तपमान शून्य अंशाच्याच आसपास रेंगाळत होत. स्वेटर ,त्याच्यावर लेदर जॅकेट असा कडेकोट बंदोबस्त करून निघालो असलो तरी गारठून जाण्याचं टेन्शन होतं. खाजगी आणि सार्वजनिक इमारतींवर केलेली दिव्यांची रोषणाई डोळे दिपवून टाकणारी होती पण इतरत्र नजर फिरवली तर सारी सृष्टी
आखडून गेली होती. निष्पर्ण झालेली झाडं जमिनीत रोवलेल्या निर्जीव काठ्यांसारखी भासत होती. सर्वत्र पसरलेला तो पांढरा शुभ्र बर्फ पाहून एक अभद्र विचारही मनाला स्पर्शून गेला की या मृतप्राय झालेल्या सृष्टीवर निसर्गाने ही पांढरी चादर तर पसरली नाही ना ? आणि मग मनात विचार आला की अशा या निरुत्साही , गोठलेल्या वातावरणात सृष्टीची ही लेकरं नववर्षाचा जल्लोष कसा काय साजरा करणार आहेत ?
आणि मग या विचारापाठोपाठ आणि हे सारं अनुभवल्यावर माझ्या डोळ्यापुढे हिंदू नववर्षाच्या प्रारंभीचा गुढी पाडव्याचा दिवस उभा राहिला. खरच आपले पूर्वज किती विचारी आणि किती धोरणी होते. नववर्षाची पहांट साजरी करण्यासाठी त्यांनी वसंतऋतुच्या आगमनाची वाट पाहिली. हिवाळ्यांत गारठून गेलेली मृतप्राय भासणारी सृष्टी जेव्हां फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या पांढर्या राखेतून बाहेर पडून उभी राहते , तेव्हां वातावरणात उबारा येऊ लागतो. झाडांच्या निष्पर्ण फांद्या पुन्हा तजेलदार होऊन छोटी छोटी हिरवीगार पानं हरखून नववर्षाचं स्वागत करण्यास सज्ज होतात. सारं वातावरण एका नव्या उत्साहाने आणि चैतन्याने भारलं जातं. आमरायांमधून या सृष्टीचा श्रेष्ट शाहीर कोकीळ आपल्या कुहूकुहूच्या मधुर संगीताने वसंत ऋतुच्या आगमनाची ललकारी देऊ लागतो अशा या मंगलमय वातावरणात आपण भारतीय चैत्र प्रतिपदेपासून सुरू होणारा नववर्षाचा प्रारंभ गुढ्या तोरणं उभारून साजरा करतो. हाच गुढी पाडवा.
३|| मुहूरतापैकी एक मुहूर्त. या दिवशी कोणतंही मंगलकार्य कोणत्याही घटिकेला करावं असं शास्त्र सांगतं. ब्रम्हपुराणांनुसार प्रजापिता ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. आणि याच दिवसापासून सृष्टीचं कालयंत्र सुरू झालं. आणि म्हणून हा चैत्रातील पाडवा सृष्टी निर्मितीचा दिन म्हणूनही मानला जातो. आणि आपण जी गुढी उभारतो तिला ‘ब्रह्मध्वज’मानून तिची पूजा केली जाते.
भारतीय संस्कृतीत गुढी हे विजयाचे प्रतिक म्हणूनही मानले जाते. प्रभू श्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलूमातून त्याच्या प्रजेची मुक्तता केली तेव्हां वालीच्या प्रजेने गुढ्या, तोरणं उभारून विजयोत्सव साजरा केला तो याच दिवशी . पुढे प्रभूरामचंद्रांनी रावणाचा वध केला. दैत्यांचा पराभव करून सीतामाईला मुक्त केलं आणि सर्व प्रजेलाही भयमुक्त केलं. हा पराक्रम करून व १२ वर्षे वनवास भोगून श्रीराम अयोध्येस परतले ते याच दिवशी. सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या ,तोरणे उभारून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करत प्रभूरामचंद्रांचे स्वागत केले. सर्व भारतवासीयांच्या हृदयसिंहासनावर हजारो वर्षे विराजमान असलेल्या अयोध्यापती श्री रामचंद्रांच्या विजयोत्सवाची आठवण ठेवण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. याशिवाय शालीवाहनाने मरगळलेल्या समाजात चैतन्य निर्माण केलं. प्रजेला सामर्थ्यवान बनवलं आणि बलाढ्य परकीय शत्रूंचा पराभव केला त्याची आठवण म्हणून ही शकगणना पाडव्यापासून सुरू करण्यात आली .
या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करूनकडूलिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे. कडूलिंब आरोग्यदायी असल्याने पुढील संपूर्ण वर्ष आरोग्य उत्तम राहावे ही यामागील भावना आहे. त्यानंतर कळकाच्या काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे अथवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडूलिंबाचे डहाळे फुलांची अथवा बत्ताशांची माळ घालून गुढी उभारली जाते. या गुढीची यथासांग पूजा करून तिला मिष्टान्नाचा आणि कडूलिंबाच्या चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. ही चटणी करण्याची एक विशेष पद्धत आहे.कडूलिंबाची कोवळी पानं आणि फुलं आणून त्यांचं चूर्ण करतात व त्या चूर्णात साखर, मिरं, हिंग, मीठ, जिरे आणि ओंवा घालून ते मिश्रण एकजीव करतात. व तोच गुढी पाडव्याचा प्रसाद म्हणून सर्वांस वाटतात . जीवनात कडू आणि गोड , सुख आणि दु:ख समान भावनेने स्वीकाराव हा संदेश यातून मिळतो. शिवाय काही वेळा प्रगतिपथावर प्रथम कडू घोट घ्यावा लागतो याची जाणीवही या प्रतिकातून दिली जाते. गुढीची पूजा झाल्यावर सहकुटुंब देवदर्शनाला जावे अशी प्रथा आहे.
या दिवशी काही ठिकाणी ज्योतिषाकडून नवीन वर्षाच्या पंचांगातलं वर्षफल श्रवण करण्याचीही पद्धत आहे. या पद्धतीमागे“ तिथीच्या श्रवणामुळे लक्ष्मी लाभते, आयुष्य वाढतं ; नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो ; योगश्रवणाने रोग जातो ; करणश्रवणाने चिंतलेलं कार्य यशस्वी होतं तर संपूर्ण पंचांगाच्या नित्य श्रवणामुळे गंगास्नानाचं फल लाभतं “ अशीही अनेकांची श्रद्धा आहे.
या दिवशी घरात पक्वान्न करून प्रथम देवाला नैवेद्य दाखवला जातो. नंतर सर्वजण तो प्रसाद मानून मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. मित्रमंडळी व आप्तजनांसह काव्य-शास्त्र-विनोदाने मोठ्या आनंदात हा दिवस घालवावा असा संकेत आहे. भारतीय संस्कृतीला मौजमजा करण्याचे वावडे नाही मात्र आनंदाने बेहोश होऊन नंगानाच करणेही मानवत नाही. उत्सव आणि सण अगदी जल्लोषात साजरे करतानाही विवेकाच्या पायावर उभ्या असलेल्या या संस्कृतीने अनेक श्रेष्ठ मूल्यांची जपणूक करण्याचे भान सतत ठेवले होते.
पूज्य साने गुरुजींनी म्हंटलय “ भारतीय संस्कृती ही हृदय व बुद्धी ची पूजा करणारी आहे भारतीय संस्कृती म्हणजे त्याग,कृतज्ञता, सहानुभूती, विशालता, जगात जे जे सुंदर, शिव, आणि सत्य असेल ते ते घेऊन वाढणारी, संग्राहक, सर्वाना जवळ घेणारी . “ सर्वेशामविरोधेन ब्रह्मकर्म समारंभे “ असं म्हणणारी ——भारतीय संस्कृती म्हणजे सांतातून अनंताकडे जाणे , अंधारातून प्रकाशाकडे जाणे , भेदातून अभेदाकडे जाणे ,चिखलातून कमळाकडे जाणे , विकारातून विवेकाकडे जाणे, कोलाहलातून संगीताकडे जाणे . “
हजारो वर्षाच्या इतिहासात या संस्कृतीला अनेकदा मरगळ आली. अनेक परकीय आक्रमणाशी सामना करताना ती निष्प्रभ झाल्यासारखी वाटली पण
महायोगी श्री अरविंदांनी म्हंटल्याप्रमाणे “ या संस्कृतीच्या अंतरंगात उच्च तत्वांची
प्रेरणा होती . तत्वात्मक, बौद्धिक, कलात्मक निर्मितीने व निर्माणशक्तीने ती संपन्न होती. आणि तिच्या ठिकाणी महान जीवनदायी प्राणशक्तीही भरपूर होती.” या मुळेच ती कधीही नष्ट होणार नाही. गेल्या काही वर्षात गुढी पाडव्याच्या निमित्ताने जो अभूतपूर्व असा उत्साह निर्माण झालेला दिसतो त्यास विधायक आणि वैचारिक दिशा दिल्यास ही थोर संस्कृती एका नव्या आविष्कारात पुन्हा एकदा संपन्नतेकडे झेप घेईल असा विश्वास निर्माण होतो
—– नरेंद्र नाडकर्णी