२९ जानेवारी , बरोबर १० वर्षापूर्वी दादाजी गावंड यांनी या जगाचा निरोप घेतला , त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण .
दादा तेली यांच्या घराच्या समोर मोतीलालची चाळ आणि त्या चाळीशेजारी गावंडांची चाळ . हे गावंड कुटुंबही ठाणे शहरातील आगरी समाजातील एक सुशिक्षित , सुसंस्कृत आणि सुखवस्तू कुटुंब . अशा या सुखवस्तू कुटुंबात दत्ताराम उर्फ दादा गावंड या थोर आध्यात्मिक व्यक्तीचा जन्म ४ सप्टेंबर १९१७ रोजी झाला . दादा हे उत्तम क्रिकेटपटू होते . काही काळ ते नगरपालिकेवरही निवडून गेले होते . त्यांना शिकारीचाहि शौक होता . अशीच एकदा शिकार करताना त्यांनी एक ससा मारला पण त्यानंतर त्या सशाची झालेली तडफड पाहून त्यांचं मन द्रवलं . त्यानंतर त्यांनी शिकार करणं सोडून दिलं . त्याच सुमारास त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले . कुटुंबाची सारी जबाबदारी दादांवर आली. पण ती जबाबदारी पार पाडताना दादा मात्र विचार करू लागले होते की हे जीवन म्हणजे काय आहे ? मृत्यू का येतो ? आणि मग पुढे काय ? यानंतर दादा थिओसोफी कडे वळले . रा स भागवतांपासून कृष्णमूर्ती पर्यन्त सर्वांशी संवाद साधू लागले . रमण महर्षींकडे गेले . अनेक आध्यात्मिक पुस्तकं वाचली . पण प्रत्यक्ष अनुभव येत नसल्याने त्यांना चैन पडत नव्हते . मन तळमळत होते . याच काळात ते आपल्या कौटुंबिक जबाबदार्या मात्र पार पाडत होते . सर्व बहीणींची आणि नंतर धाकट्या भावाचे लग्न लावून दिल्यावर मात्र ते मोकळे झाले . आणि १९५५ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी एक दिवस सज्जन गडाच्या डोंगर उतारावर असलेल्या एका झोपडीत जाऊन राहिले . ७ महीने एकांतवासात मौन पाळून आणि चिंतनात मग्न राहून ते राहिले . अनेक आपत्तीना न डगमगता त्यांची साधना चालू होती . शेवटी अंतरीक विस्फोट होऊन त्यांना आत्मज्ञान झाले , अतिशय गहिरा असा आध्यात्मिक अनुभव आला . या घटनेनंतरही १९ वर्ष महाबळेश्वर येथील जंगलात एकांतवासात राहून दादाजींनी त्या चैतन्यमय उर्जेला अंतर्बाह्य कार्य करू दिलं . पुढे दादाजीना भारतात आणि अमेरिकेत अनेक अनुयायी मिळाले . १४ वेळा अमेरिका व इतर कांहीं देशांना त्यांनी भेटी दिल्या . त्यांच्या व्याख्यानाची व प्रश्नोत्तरांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत . ‘’ Beyond the Mind , Towards the Unknown , Intuitive Intelligence , A Pilgrimage Unto Oneself ‘’ ही इंग्रजी मधील तर ‘’ चाहूल अज्ञाताची , मनाच्या पलीकडे , चैतन्याचा विलास ‘’ ही मराठीमधील पुस्तकांची नांवे . दादाजींना लहानपणी छायाचित्रणाची आवड होती पुढे त्या साऱ्या आवडी त्यानी झटकून टाकल्या मात्र सिद्धयोगी झाल्यावर त्यांच्यातील स्रुजनशीलतेला आध्यात्मिक उर्जेची जोड मिळाली व दादाजींनी अनेक सुंदर निसर्ग-द्रुश्यं आपल्या कॅमेऱ्याने टिपली . त्याचेही एक सुंदर पुस्तक आहे . येउर येथे त्यांचा निवांत आश्रम होता . आमच्या कुटुंबाचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते . एकदा आम्हाला डॉक्टर सतीश गावंड यांच्याकडून समजलं की ते येउरला आहेत . आणि मग मी , लता , आक्का , भांनुताई आणि वसंतराव त्यांच्या भेटीस गेलो . प्रथम काही जुन्या गप्पा झाल्या . नंतर मात्र त्यांनी त्यांचे विचार आम्हाला सांगितले . त्यानंतर अधून मधून मी त्यांना भेटत होतो . त्यांच्या काही इंग्रजी काव्य रचंनांच मराठी भाषांतर त्यांनी केलं होतं . पाडगावकरांनी त्यात काही दुरुस्त्या केल्या होत्या . ते बाड पुन्हा लिहून काढण्यासाठी मी त्यांना काही दिवस मदत केली . सकाळी ९ वाजता त्यांचेकडे जाऊन ५ वाजेपर्यंत मी त्यांचे समवेत असे . त्यांचं असं सान्निध्य मला लाभलं . मला त्यांचं आकर्षण होतं . त्यांचेबद्दल आदरही होता . पण कसे कुणास ठाऊक मी त्यांना चिकटून राहिलो नाही . माझा मार्ग पुढे बदलायचा होता . त्यामुळे येऊर येथे त्यांचे वास्तव्य असताना मला त्यांच्या सहवासाचा थोडाफार लाभ मिळाला . ” चाहूल अज्ञाताची ” या त्यांच्या पुढे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे हस्तलिखित दुरुस्त करण्याच्या निमित्ताने मी त्यांचेकडे जाऊन बसत असे . त्यांच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर ” उदय वैश्विक प्रज्ञेचा ” हे २००९ मध्ये मंगेश पाडगांवकर यांचे हस्ते प्रकाशित झाले त्या दिवशी प्रकाशनाच्या कार्यक्रमास जवळ जवळ ४०० / ५०० लोक हजर होते . प्रकाशन झाल्यावर दादाजी भाषण करताना म्हणाले – आता मी अज्ञातवासात जाणार आहे , माझा राम राम घ्यावा , हे ऐकून सर्वजण हेलावून गेले . नंतर प्रत्येकास ते भेटले . त्यादिवशीचं त्यांच तेज आजही स्मरणात आहे . त्या तेजाच्या चरणांवर त्या दिवशी मस्तक टेकता आले , त्यांचे आशीर्वाद मिळाले हे आमचे परमभाग्य . त्त्यानंतर दादाजींनी सर्वांचा निरोप घेतला व ते सज्जन गडापासून ७ किलोमीटर अंतरावर बोरणे गांवातील ‘तपोवन’ या आपल्या आश्रमात जाऊन राहिले व तिथेच २९ जानेवारी २०१२ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला .
—- नरेन्द्र नाडकर्णी