Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • Aurobindo
  • ब्रम्हचर्य एक वरेण्य तत्व
  • Aurobindo

ब्रम्हचर्य एक वरेण्य तत्व

Narendra Nadkarni March 14, 2023

        कविवर्य बा भ बोरकर यांनी सांगितलेली एक गोष्ट वाचत होतो . काका कालेलकर आणि विनोबाजी या दोघांना बोरकर आधुनिक दर्शनकार म्हणून मानत . पण या दोघांच्याही विपुल साहित्यात रतिभावनेचा परामर्श घेतलेला बोरकरांना कुठेही आढळला नव्हता . विनोबा हे बालब्रम्हचारी , त्यांनी रतिभावनेचा विचार टाळला हे बोरकर समजू शकले . पण काकांसारख्या ग्रुहस्थाश्रमी माणसाने ही रतिभावना का टाळावी हा बोरकरांना प्रश्न पडला . अखेर त्यांनी काकांना तसा सरळ सवाल केला . त्यावर काकांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक आणि विचारप्रवर्तक होतं . काका म्हणाले – ‘’  श्रुंगार हा रसराज आहे . ब्रम्हचर्याची साधना पूर्ण झाल्याशिवाय त्याला स्पर्श करणं जितकं धार्ष्ट्याचं तितकंच धोक्याचंही आहे . आणि माझी ती साधना अजून पूर्ण झालेली नाही . ‘’ 

          काकांच्या या उत्तराने बोरकर अंतर्मुख झाले . श्रुंगार हाताळताना भले भले कसे चकतात आणि चुकतात , त्याचे दाखले त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले . आणि त्याचबरोबर कालिदास , रविन्द्रनाथांसारख्यांना तो समर्थपणे का पेलता आला त्याचं रहस्यही उमगलं . आणि श्रुंगारातून भोगानंद शोधणारा रसानंदाला कसा आंचवतो तेही ध्यानात आलं .

          कविवर्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं . श्रुंगार रसाचा वापर कोणी करावा , कसा करावा , कोणी टाळावा व का ते स्पष्ट झालं . पण माझ्या मनांत मात्र अनेक विचारांची मालिका निर्माण झाली . केवळ साहित्यच नव्हे तर कोणत्याही कलाक्रुतीची निर्मिती जेंव्हा संयमाच्या पायावर उभी राहते तेंव्हा तिला एक अतुलनीय सामर्थ्य प्राप्त होतं . संयम हा तर भारतीय संस्क्रुतीचा आत्मा . साऱ्या चराचर स्रुष्टीत भारतीय संस्क्रुतीने आपली जीवनसाफल्याची प्रतिकं शोधली . शंकराच्या मंदिरातील कासव हे संयमाचं प्रतीक . त्याला वंदन करायचं ते तो संयम आपल्याही अंगी बाणावा म्हणून . नदी जोपर्यंत दोन्ही बाजूस तटांनी सीमित असते तोपर्यंत ती आपल्या ध्येयाकडे वेगात धाव घेऊ शकते . पण जेंव्हा ते तट कोसळतात तेंव्हा नदीचा प्रसार जरूर होतो पण ध्येयाकडे जाण्याचा तिचा वेग मंदावतो , ती इतस्तत: भरकटते हे ध्यानात घ्यायला हवे .

       परंतु संयमाचा हा विचार येण्यापूर्वी निर्मितीचा हेतू महत्वाचा आहे . एखादा चित्रकार एखादं सुंदर द्रुश्य पाहतो . त्यानं त्याचा अंतरात्मा आनंदित होतो आणि मग तो आनंद इतरांनाही मिळावा या भावनेनं तो सुंदर चित्र रेखाटतो . एखादा कवी समाजातलं दु:ख अनुभवतो , त्यानं त्याचं ह्रदय पिळवटून जातं आणि मग एखाद्या सुंदर काव्याची निर्मिती होते .

               या विचाराबरोबर माझ्या डोळ्यासमोर कविवर्य बोरकरांच्या “   अम्रुत खेचून आणू भूवरि  “  या काव्यातील खालील पंक्ती उभ्या राहिल्या —-

“  गड्या तुझ्यापरि मीही प्यालो सूर्याची आग

       परि दर्यापरि आहे वाहे अपुला अनुराग ‘’

या कवितेतून बोरकरांचं चंन्द्राशी असलेलं सख्य समजलं , त्या दोघांमधील एका साम्याचा उलगडा झाला . कवी , काव्यनिर्मिती , जीवनातील सुख-दु:ख यांचा आंतरिक संबंध समजू लागला . बोरकर म्हणतात की , सूर्याच्या प्रखरतेचा दाह चन्द्र आनंदाने स्वीकारतो पण आपल्याला मात्र तो मंद प्रकाश आणि शीतलता देतो . त्याचप्रमाणे कवी सुद्धा जीवनातील दु:ख , क्लेश यांचा अनुभव घेतो पण त्याच्या काव्यकिरणातून तो समाजास मात्र आनंदच देत असतो . शिवाय याचा आदर्श प्रत्यक्ष शिवशंकर , ज्यानं हलाहल पचवलं पण आपणास गंगेच्या रूपानं शीतल , पवित्र असं जलजीवन दिलं . हाच भारतीय संस्क्रुतीनं , विचारधारेनं साहित्य-काव्य निर्मितीसाठी समाजासमोर ठेवलेला महान आदर्श , महर्षी वाल्मिकींच्या उगमापासून चालत आलेला आणि कालिदास , रविन्द्रनाथ यासारख्या महाकवींनी जपलेला महान वारसा .

        परंतू अशा प्रकारच्या संयमातून दर्जेदार निर्मिती व्हायची असेल तर त्यासाठी काकासाहेब कालेलकरांनी म्हंटल्याप्रमाणे ब्रम्हचर्याची साधना करून मानसिक सामर्थ्य प्राप्त करणं अनिवार्य आहे .

ब्रम्हचर्य म्हणजे काय ? —- 

               पण आता ब्रम्हचर्य म्हणजे तरी काय ?  आज तर आपण अनेक शब्दांचे चुकीचे अर्थ लावतो . कोणत्याही अविवाहित व्यक्तीस ब्रम्हचारी म्हणून संबोधलं जातं . ८ व्या  वर्षी उपनयन झाल्यावर गुरूग्रुही जाऊन अध्ययन करण्याच्या सुमारे १२ वर्षाच्या कालावधीस ब्रम्हचर्याश्रम असे मानले जाई . पण केवळ अध्ययन करणाऱ्यास ब्रम्हचारी मानता येईल का?

                 त्या काळातील शिक्षण पद्धतीकडे नजर टाकल्यास आपल्याला असं दिसतं की गुरूग्रुहात शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘  समावर्तन विधि  ‘ म्हणजेच दिक्षांत समारंभ होत असे . ज्याने विद्याध्ययन केले आहे पण व्रताचरण केले नाही अशा विद्यार्थ्यास ‘  विद्यास्नातक  ‘ अशी पदवी प्राप्त होत असे . तर ज्याने वेदाध्ययन आणि व्रताचरण दोन्ही केलं असेल त्या विद्यार्थ्यास ‘  विद्याव्रतस्नातक  ‘  अशी पदवी प्राप्त होत असे . यावरून अध्ययनाबरोबरच व्रताचरणही करणाऱ्यास श्रेष्ठ मानलं जात असे असं दिसून येतं . पण मग अशा प्रकारची ब्रम्हचर्याची साधना करण्याचा आग्रह का धरला असावा ?   त्यातून कोणती वैयक्तिक , सामाजिक  व सांस्क्रुतिक प्रगति साधली गेली ?

भारतीय संस्क्रुतीचा अलौकिक वारसा —

        या प्रश्नानं आपल्या डोळ्यासमोर एक दैदिप्यमान असा संस्क्रुतीचा कालखंड उभा राहतो . संस्क्रुतीचा एक महान आदर्श निर्माण करून हजारो वर्षे समाजाला प्रगतिपथावर ठेवणारी रामायण , महाभारतासारखी महाकाव्य ;  मानवी जीवन , त्याचा उद्देश , विश्वाशी असणारा त्याचा अतूट संबंध यांचं अवलोकन करत अखिल विश्वाचं गूढ उकलून दाखवणारे आणि हजारो वर्षानंतर आजही प्रमाण मानले जाणारे वेद , उपनिषदे यांसारखे ग्रंथ ;   भरतमुनींनी निर्माण केलेलं नाट्यशास्त्र , शास्त्रीय संगीताची महान परंपरा , कालिदास , भवभूती , माघ वगैरेंनी केलेल्या दर्जेदार रचना , विविध लेण्यांतून आणि बौद्ध विहारातून आढळणारी शिल्पकला , नैसर्गिक रंगांनी साकारलेली आणि आजही टिकून असणारी पेंटिंग्ज , याशिवाय गणितशास्त्र , न्यायदानपद्धती , वैद्यकशास्त्र , खगोलशास्त्र , इत्यादी विषयात साधलेली प्रगति आजही आपणास स्तिमित करते . प्रत्येक व्यक्तिमात्रानं आणि समाजानं केलेली ही प्रगति कोणत्या मूलभूत तत्वावर अथवा पायाभूत विचारसरणीवर केली असावी ?

विशेष शिक्षण पद्धती —-

        आश्रम-शाळातून दिल्या गेलेल्या केवळ बाह्य शिक्षणामुळे ही प्रगति साधली गेली नाही . कारण केवळ माहितीजन्य ज्ञान हे अलौकिक बुद्धीचा पाया असूच शकत नाही . महायोगी श्रीअरविंद म्हणतात – “ शरीर , मन व आत्मा यांना एका अत्यंत शिस्तबद्ध अशा शिक्षण पद्धतीनं विकसित करून उच्च पातळीवर नेल्याशिवाय अशी प्रगति अशक्य आहे. “ त्यासाठी स्मरणशक्ती , कल्पनाशक्ती , निर्णय क्षमता , आकलन , तर्कशास्त्र , युक्तीवाद आणि निर्मितीक्षमता या मनाच्या आणि बुद्धीच्या निसर्गदत्त शक्तींची जोड लागेल . ही शक्ती कशी प्राप्त होणार ?

         मानव हा काही या प्रुथ्वीतलावर अधिराज्य गाजवणारा स्वतंत्र घटक नाही . तो या निसर्गाचा आणि पर्यायाने विश्वाचा एक घटक आहे . याची पूर्ण जाणीव प्राचीन ऋषी-मुनींना होती . त्याचबरोबर या वैश्विक शक्तीचा अंश सूक्ष्म रुपाने प्रत्येक घटकामध्ये , प्रत्येक मानवामध्ये वास करतो याचीही त्यांना जाणीव होती . एखाद्या विशिष्ठ प्रक्रियेने मानवामध्ये सूक्ष्म रुपाने वसणाऱ्या या शक्तीस जाग्रुत करून तिला वैश्विक शक्तीशी जोडून दिल्यास एक अनन्यसाधारण असा शक्तीचा स्त्रोत मानवाला उपलब्ध होऊ शकेल हेही स्पष्ट जाणवत होतं . हा शक्तीचा स्त्रोत जितका अधिक सक्षम करता येईल त्या प्रमाणात अधिक बुद्धीमत्ता व अजोड निर्मितीक्षमता प्राप्त करून घेता येईल . या निर्णयाप्रत आलेल्या ऋषी-मुनींनी हे साध्य करण्यासाठी ज्या विविध प्रक्रियांचा अवलंब केला त्यातील ब्रम्हचर्यपालन ही एक महत्वाची प्रक्रिया होती .  

ब्रम्हचर्य – प्रक्रिया —-

         यावर भाष्य करताना महायोगी श्रीअरविंद प्रथम म्हणतात – “  The  source of  life  and  energy  is  Spiritual  and  not  material  . “  परंतू ज्या पायावर ते जीवन आणि ती प्राणशक्ती उभी असते तो पाया मात्र भौतिक असतो . प्राचीन ऋषी-मुनींनी ‘ कारण ‘   व          ‘  प्रतिष्ठा ‘  यातील भेद जाणला होता . जड तत्व ही ‘ प्रतिष्ठा ‘ आणि ब्रम्ह हे ‘ कारण  ‘ , अस्थित्वाचे दक्षिण व उत्तर ध्रुव . श्रीअरविंद पुढे म्हणतात – “  To  raise  up  the  physical  to  spiritual  is  Bramhacharya  .  “  कारण हे उत्तर व दक्षिण ध्रुव जेंव्हा एकमेकांशी जोडले जातात तेंव्हा एकातून निर्माण होणारा शक्तीचा स्त्रोत दुसऱ्याला प्राप्त होतो .

                     या संपूर्ण प्रक्रियेचं वर्णन करताना श्रीअरविद म्हणतात —   ‘’  या प्रक्रियेतील मूलभूत भौतिक एकक ‘  रेत ‘ हे होय . मानवी शरीरात असणारी उष्णता , प्रकाश व विद्युत या रेतामध्ये सूप्तरुपाने असतात . रेतसंख्या वाढू लागली की प्रथम उष्णता निर्माण होते व ही उष्णता संपूर्ण शरीर प्रणालीला उत्तेजित करते व त्यातून प्रथम ‘  तेजस्विता ‘  निर्माण होते . हे तेज , हा प्रकाश हेच सर्व ज्ञानाचा उगम . नंतर त्याचे रुपांतर ‘  विद्युत ‘  मध्ये होते . सर्व प्रकारच्या शारीरिक आणि बौद्धिक क्रियाशीलतेचा हा पाया असतो .  या ‘  विद्यूत ‘ मध्येच  ‘ ओजस ‘  अथवा प्राणशक्तीचाही अंतर्भाव असतो . अशा तऱ्हेने Retas  refining  from  Jala to Tapas ,  Tejas  ,  Vidyut  and  Ojas  fills  the  system  with  physical  strength  ,  energy  and  brain  power ,  ‘’  या प्रक्रियेतून शारीरिक व बौद्धिक शक्ती प्राप्त होते असे श्रीअरविंद म्हणतात . याच प्रक्रियेला ऊर्ध्वरेत होणे असेही म्हणतात .

उरू – ज्योती —

         श्री वासुदेवशरण अगरवाल , प्राध्यापक , हिंदू विश्व विद्यालय यांनी सुमारे ७० वर्षापूर्वी ‘’ उरू – ज्योती – वैदिक अध्यात्म सुधा ‘’  हा आध्यात्मिक निबंधांचा संग्रह प्रसिद्ध केला होता . त्यात ते म्हणतात –  ‘’  जब मनुष्य विधीपूर्वक आहार-विहार और प्राणायामके द्वारा उर्ध्वरेत बनने लगता है , उस समय सूक्ष्मातिसूक्ष्म रसोंका प्रवाह ब्रम्हांड या मस्तिष्ककी ओर जाता है | आर्य संस्क्रुतीमे सबसे अधिक वरेण्य तत्व ब्रम्हचर्य है |  ‘’

                 याच संदर्भात ‘ वाजपेयी ‘  या एका परिवारास प्राप्त झालेल्या नांवाबद्दल या पुस्तकात केलेले भाष्य महत्वपूर्ण आहे . आपले पूर्व-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सर्वानाच ज्ञात आहेत . या आडनांवात कोणते पेय अथवा प्राशनक्रिया अभिप्रेत आहे ? ‘  वाजपेय    ‘ नांवाचा यज्ञ करणाऱ्या ब्राम्हणांना वाजपेयी म्हणतात हा सर्वसाधारण समज . पण मग हा यज्ञ कोणता ?   सर्वसाधारण समज असलेला बाह्य स्वरुपातील यज्ञ की मानसिक प्रक्रियेतील आंतरिक यज्ञ ?  

                  गीतेवरील निबंधामध्ये महायोगी श्रीअरविंद म्हणतात –   “  यज्ञ आदि शब्द गीतेने प्रतिकात्मक द्रुष्टीने वापरले आहेत . गीतेला जो यज्ञ अभिप्रेत आहे त्याचे स्वरूप मानसिक आहे . यज्ञाचा अग्नी भौतिक ज्वाला नव्हे तर ब्रम्हाग्नी आहे . यज्ञाच्या विविध प्रकारात कनिष्ठ , वरिष्ठ अशी श्रेणी आहे . सर्वात कनिष्ठ द्रव्ययज्ञ तर सर्वात श्रेष्ठ ज्ञानयज्ञ .  “  आपल्या आतापर्यंतच्या विवेचनाच्या अनुषंगाने यज्ञ या शब्दाचा निम्न स्तरावरील पारंपारिक, रूढ व बाह्यस्वरूपी अर्थ दूर सारून आध्यात्मिक अर्थालाच प्राधान्य देणे योग्य ठरेल . आणि म्हणून वाजपेय यज्ञाचाही विचार याच द्रुष्टीकोनातून करणे आवष्यक आहे .

         श्री वासुदेवशरण अगरवाल उरूज्योति या ग्रंथात म्हणतात ‘’   अध्यात्म वाजपेय उस क्रुत्यका नाम है जिसमे मनुष्य ‘  वाज ‘ को अपना पेय कल्पित करता है . किशोरावस्थाके आरम्भमे देहके भीतर एक विलक्षण प्रकारका रस बनने लगता है . इसीका नाम वीर्य है , और इसेही ‘  वाज ‘  भी कहते है . वीर्यं वै वाज: ( शतपथ ब्राम्हण ) जिसे भीतर ही भीतर पचानेका नाम ‘  वाजपान ‘  है . प्रत्येक ब्रम्हचारीको ‘  वाजपेयी  ‘   होना चाहिये . पिया हुआ वाज अम्रुत बनकर अमरपन देता है , शरीरके प्रत्येक घटक कोशमे अम्रुत बहने लगता है , उनकी चेतना असीम हो जाती है . ‘’ 

                अशा तऱ्हेने   श्रुंगार रसाचा वापर करण्यापूर्वी  ब्रम्हचर्याची साधना पूर्ण होणे आवश्यक आहे या काकासाहेब कालेलकरांच्या  उत्तराने माझ्या मनात निर्माण झालेल्या विचारमालिकेने एक वर्तुळ पूर्ण केलं होतं . एखाद्या साहित्यक्रुतीची निर्मिती करताना मनाला लगाम घालण्यासाठी मानसिक ताकद कमावणं आवश्यक होतं आणि त्यासाठी ब्रम्हचर्याची साधना केली जात असे हे समजलं . या साधनेने मानवाच्या शरीरात अनाकलनीय असे बदल घडून येतात , शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्य प्राप्त होतं . ज्यायोगे व्यक्तीमात्राला आणि समाजाला आपला सर्वांगीण विकास साधता येतो . प्राचीन काळी या साधनेला सत्वगुणांचा विकास आणि योगसाधना यांचीही जोड दिली गेली व त्यातूनच आपल्या महान संस्क्रुतीचा आदर्श निर्माण झाला . महायोगी श्रीअरविंदांच्या शब्दांत सांगायचं तर – “   Bramhacharya and  Satvik  development  created  the  brain  of  Ancient  India   and  was  perfected   by  Yoga sadhana  . “   

 —– नरेन्द्र नाडकर्णी    ( 9969717989  )

( This article was earlier published in  Disha – June , 2007  )

                 =================== $$$$$$$$$$$$$ =====================             

Continue Reading

Previous: पूर्व आणि पश्चिम
Next: भारतातील हिंदू मंदिरे आणि मानव, एक अंतर्भूत आत्मा

Related Stories

  • Aurobindo

जीवन साफल्य – सौंदर्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

प्राणिक सामर्थ्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

  दैवी प्रेमाची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.