आपण सुख शोधत असतो. आपल्याला वाटत असते की तो आनंद कुठल्यातरी वस्तूमध्ये आहे. कारण ती वस्तू कोणाकडे तरी आहे आणि ते खुश दिसत आहेत. म्हणून आपण ती वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करतो लहानपणी आपल्याला जे हवे आहे ते आई वडील देतात. जसजश्या आपल्या मागण्या वाढतात तसतसे आई-वडील सांगायला सुरुवात करतात की तुला हे सगळे पाहिजे असेल तर तुला तसा पैसा कमवावा लागेल, आणि तो पैसा मिळवण्यासाठी तुला ठराविक उच्च शिक्षण घ्यावे लागेल. असे करत करत पालक मुलांना कळत नकळत पैसाच कसा सगळ्यात महत्त्वाचा आहे हे शिकवू लागतात.
पैसा नक्कीच महत्त्वाचा घटक आहे कारण जर आपल्या दैनंदिन गरजा भागल्या नाहीत तर आपण दुसरा कसलाही विचार करू शकणार नाही. पण एकदा का आपण सुखवस्तू झालो, आपल्या सगळ्या गरजेच्या सोयीनहून होऊन पण जास्त मिळाले तरी सुद्धा आपण पैशाचाच विचार करतो. तसा विचार कमी करत नाहीच तर तो अधिकच मिळवण्यासाठी अजूनच कष्ट आणि ताण घेतो.
आपण असे का करतो? कारण जे लहानपणापासून मनावर बिंबवलेले असते ते इतके घातक होत जाते की आपण हेच विसरून जातो की आपण पैसे का कमावणार होतो.
उच्च ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे कारण ध्येय नसेल तर उत्साह टिकवणे कठीण होईल आणि आपण आळशी आणि निराश होऊन आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नैराश्यमय होऊन जाईल.
म्हणूनच आपल्याला स्वतःला आणि पुढच्या पिढीला ही जाणीव कायम ठेवणे खूप जरुरी आहे की आपण जे काही करत आहोत म्हणजे नोकरी, काम, धंदा त्याचा ओरिजनल उद्देश काय होता आणि तो अजून कायम आहे का? की हरवला आहे?
आपण सुख आणि आनंद शोधात होतो, पण नकळत तणाव, काळजी आणि असमाधान पदरात पडून घेतो.