काही वर्षापूर्वी एक गोष्ट वाचनात आली होती . सिस्टर निवेदिता नुकत्याच भारतात आल्या होत्या . काही तरी सामाजिक कार्य करावं अशी त्यांची इच्छा होती . विशेषत: भारतीयांना शिक्षित करावं असा त्यांचा मानस होता . स्वामी विवेकानंदांजवळ ही इच्छा जेंव्हा त्यांनी बोलून दाखवली तेंव्हा स्वामी म्हणाले – “ प्रथम तुम्ही सर्वत्र फिरा , इकडील लोकांशी संवाद साधा आणि नंतर काय करायचं ते ठरवा . “
सिस्टर निवेदिता सहा महिने सर्वत्र फिरल्या . लोकांशी संवाद साधला . चर्चा केल्या आणि त्यानंतर त्या जेंव्हा स्वामीजींना भेटल्या तेंव्हा म्हणाल्या – “ भारतातील लोकांना शिक्षण द्यावं अशी माझी इच्छा होती , पण इथं तर दोन मोठ्या शिक्षण संस्था ते कार्य आधीच करत आहेत . “ स्वामीजी त्यांच्याकडे प्रश्र्नार्थक मुद्रेने पाहू लागले तेंव्हा त्या म्हणाल्या — “ रामायण आणि महाभारत या त्या दोन संस्था . “
ब्रिटीशांसारख्या मतलबी आणि धूर्त पाश्र्चिमात्य राज्यकर्त्यांना इकडचा प्रत्येक भाषिक गट म्हणजे एक राष्ट्र वाटलं आणि भारताचे तसे तुकडे पाडता येतील अशी आशाही ते बाळगून होते . परंतु , काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून आसाम पर्यंत संपूर्ण भारतवर्षाला या दोन ग्रंथांनी एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेत घट्ट बांधून ठेवलं होतं .
त्यातही भारतीयांच्या नसानसातून भिनलेल्या आणि हजारो वर्षानंतर आजही प्रतीत होणाऱ्या नैतिकतेचं बीज रामाय़ण कथेतून रुजलेलं होतं हे नाकारता येणार नाही . पित्याने सावत्र आईला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी राज्यपदाचा त्याग करून १४ वर्षांचा वनवास स्वीकारणारा श्रीराम , जिथे पती असेल तोच आपला राजमहाल असे मानून वनवासास सिद्ध झालेली सीता , बंधूप्रेमाने वनवास पत्करणारा लक्ष्मण , रामाला वनवासास धाडल्याबद्दल स्वताच्या सख्ख्या आईची निर्भत्सना करून राज्यपद ठोकरणारा भरत , कसलीही पर्वा न करता प्रभू रामचंद्रांसाठी कोणतेही कार्य करण्यास सदैव तत्पर असणारा रामभक्त हनुमान , असे महान आदर्श निर्माण करून रामायण कथेने भारतीय संस्क्रुति घडवली . भारतातील जवळ जवळ सर्व भाषांतून ती प्रगट झाली .
या कथेने एका बाजूला मानवी सद्गुणांचं दर्शन घडवलं . या सद्गुणांच्या परमोच्च आविष्कारातूनच मानवाच्या अंतर्यामी असणाऱ्या दैवी अंशाचं प्रगटीकरण होतं असा विश्वास निर्माण केला . तर , दुसऱ्या बाजूला ऐहिक सुखासाठी , स्वार्थ साधण्यासाठी मानव कोणत्या थराला जातो व त्यामुळे सामाजिक मुल्यांना आणि समाज-मनाला कसा धक्का बसतो त्याचेही दर्शन घडवले .
सर्वात महत्वाचं म्हणजे आसुरी शक्ती , त्यांचा अहंकार व त्यातून समाजावर चालणारी त्यांची जबरदस्ती यांचंही दर्शन घडवलं आणि या प्रुथ्वीतलावर “ रामराज्य ‘’ निर्माण करावयाचे असेल तर दैवी-मानवी शक्ती व आसुरी शक्ती यांचा संघर्ष अटळ आहे हे समाजास दाखवून दिले . तसेच अशा प्रकारच्या संघर्षात दैवी शक्तींचे पाठबळ सत्प्रव्रुत्तींच्या मागे उभे राहते आणि अंतिम विजय हा सत्प्रव्रुत्तींचाच होतो असा विश्वास निर्माण केला .
एका बाजूने लोकांचे मनोरंजन करत ही रामकथा भारतातील सर्व भाषांतून निरनिराळ्या पद्धतीने सांगितली गेली . परंतु काही विचारवंतांना आणि सत्यशोधकांना त्या कथेमध्ये काही मूलभूत तत्वांचेही दर्शन घडले . प्रत्येक व्यक्तिरेखा , प्रत्येक घटना त्या मूलभूत तत्वांचे एक प्रतिकात्मक स्वरुप आहे असे जाणवले . हे प्रतिकात्मक स्वरूप आणि त्यातून निर्माण होणारा बोध यांचं दर्शन घडवण्याचा असाच एक प्रांजल प्रयत्न प्रभू रामचंद्रांवर आणि त्यांच्या जीवन कथेवर नितांत प्रेम करणाऱ्या श्रीरामभक्तांना आवडेल अशी आशा व्यक्त करून त्या प्रतिकात्मक कथेस प्रारंभ करतो .
अयोध्येचा राजा कोण तर दशरथ . दशरथ म्हणजे दहा इन्द्रियांच्या रथात बसून जीवनाची मार्गक्रमणा करणारा . दहा इन्द्रिये म्हणजे कान , डोळे , नाक , जीभ व त्वचा ही पांच ज्ञानेन्द्रिये आणि हात , पाय , वाणी , जननेन्द्रिय व गुदद्वार ही पांच कर्मेन्द्रिये .
या राजा दशरथाला ३ बायका होत्या – कौसल्या , सुमित्रा व कैकेयी . म्हणजे वस्तुत: या जीवनाच्या खडतर प्रवासात मानवाला सहाय्यभूत ठरणारे अनुक्रमे – भक्ती , ज्ञान व कर्म असे ३ मार्ग .
परमेश्वराच्या क्रुपाप्रसादाने दशरथाला राम , लक्ष्मण , भरत व शत्रुघ्न असे ४ पुत्र प्राप्त होतात . हे ४ पुत्र म्हणजे वस्तुत: अनुक्रमे धर्म , अर्थ , मोक्ष व काम असे चार पुरूषार्थ . ज्याप्रमाणे लक्ष्मण हा कधीही रामाची साथ सोडत नाही त्याप्रमाणे अर्थ हा नेहमी धर्मावर अधिष्ठित असायला हवा . तसेच ज्याप्रमाणे भरताने शत्रुघ्नाला संयमित केले त्याचप्रमाणे मोक्षेच्छेने काम संयमित करायला हवा .
भक्ती आणि ज्ञान यांना दूर सारून मानव जेंव्हा स्वार्थ साधण्यासाठी कर्मरत होतो तेंव्हा त्याची स्थिती कौसल्या व सुमित्रा यांना दूर सारून कैकेयीरत झालेल्या दशरथा सारखी होते .
ज्याप्रमाणे कैकेयीने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कौसल्या व सुमित्रा यांना दूर सारून दुराग्रहाने रामाला वनवासात धाडले त्याच प्रमाणे भक्ती आणि ज्ञान यांचा तिरस्कार करणारा मानव जेंव्हा केवळ स्वार्थ साधण्यासाठी कर्म करू लागतो तेंव्हा त्याच्या जीवनातून धर्म हद्दपार होतो .
रामाला वनवासास धाडताना राजा दशरथ दु:खाने व्याकूळ झाला होता . पण कैकेयीची इच्छा , कैकेयीत गुंतलेले त्याचे मन आणि तिला दिलेले वचन यामुळे त्याचा नाईलाज होतो . पण ते कर्म करताना आणि केल्यावरही त्याचे मन त्याला सारखे खात होते . मानवाची शुद्ध जाणीव नेहमीच जिवंत असते . आणि वासनेच्या आहारी जाऊन तो जेंव्हा करू नये ते करून बसतो तेंव्हा त्याचं मन त्याला खात राहतं . त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या शुद्ध जाणीवेला होणारं दु:ख त्याला आंतून जाळत असतं . आणि त्यातच त्याचा दशरथा प्रमाणे अंत होतो .
धर्माच्या अधिष्ठानाचं सर्वश्रेष्ठ प्रतिक असणारा राम , प्रभूरामचन्द्र म्हणजे साक्षात परमात्मा आणि त्याची पत्नी सीता म्हणजे जीवात्मा . उपनिषदातील दोन पक्ष्यांच्या कथेप्रमाणे वस्तुत: एकजीव असणारे परंतु अज्ञानामुळे अलग भासणारे .
प्रभु रामचन्द्र जेंव्हा वनवासात जाण्यास निघतात तेंव्हा सीतामाई सुद्धा त्यांच्याबरोबर वनवास पत्करते . प्रभु रामचन्द्रांच्या सहवासात अरण्यातील झोपडीमधील खडतर जीवनही तिला राजमहालापेक्षा सुखाचे वाटते . जेंव्हा जीवात्म्याला परमात्म्याची ओढ लागते व तो त्याच्या चिंतनातच अहोरात्र मग्न राहतो तेंव्हा कितीही दुर्धर परिस्थितीत तो जगत असला तरी त्याला चिरंतन आनंदाचा आणि अवर्णनीय सुखाचा लाभ होतो . मात्र हे सुख आणि हा आनंद परमात्म्याच्या सहवासाची गोडी जोपर्यंत कायम असते तोपर्यंतच टिकते . जर त्या जीवात्म्याला प्रुथ्वीवरील क्षणिक सुखांची अभिलाषा वाटू लागली , प्रत्यक्ष परमात्म्याचा सहवास असतानाही इतर क्षणिक सुखं अधिक गोड वाटू लागली तर त्या जीवात्म्याची गत सुवर्णम्रुगाच्या प्राप्तीची भुरळ पडलेल्या सीतेसारखी होते . आणि तो जीवात्मा परमात्म्यापासून दूर फेकला जातो .
अशा या परिस्थितीत ज्याप्रमाणे दशमुखी रावणाने सीतेला पळवून नेऊन लंकेत बंदिवासात ठेवलं त्याचप्रमाणे मोहवश झालेला जीवात्मा त्याच्या दहा इन्द्रियांच्या बेडीत अडकतो आणि या दु:खमय संसारात बंदिवान होतो .
वस्तुत: सीता बंदिवान असली तरी ती अशोकवनात होती . परंतु अज्ञानामुळे तेथून बाहेर कसे पडावे हे तिला समजत नव्हते . तेवढे सामर्थ्य व इच्छाशक्तीही दु:खामुळे तिच्याजवळ उरली नव्हती . त्यामुळे अ-शोकवनात असूनही ती शोकमग्न होती . परमेश्वराने निर्माण केलेलं हे जग खरोखर सुंदर आहे , सुखकारक आहे . परंतु अज्ञानामुळे अंध बनलेल्या जीवात्म्याला सत्याचा प्रकाश दिसत नाही . त्यामुळे त्याला हे जग दु:खकारक वाटतं . अशोकवनात राहूनही तो शोक करत बसतो . महायोगी श्रीअरविंदांनी म्हंटल्याप्रमाणे — त्या मानवी जीवात्म्याचं मानवी मन जेंव्हा उत्क्रान्त पावेल , तो जाणीवेच्या उच्च स्तरावर जाईल तेंव्हा त्याला सत्याचा प्रकाश दिसेल , चिरंतन आनंदाचा अनुभव मिळेल आणि मग या प्रुथ्वीतलावरही स्वर्गीय सुखाची जाणीव निर्माण होऊन दैवी जीवनाची सुरूवात होईल . पण पण , तोपर्यंत काय …….
सीतामाईलाही मुक्त कशी करायची त्याची चिंता प्रभुरामचन्द्रही वाहत होतेच . त्यांच्याच आदेशाने हनुमंताने सीतामाईला शोधून काढले . तिची प्रत्यक्ष भेट घेऊन तिला दिलासा दिला की लवकरच प्रभुरामचन्द्र तुमची मुक्तता करतील . जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश . त्याच्या मुक्तीची काळजी परमात्मा वाहतच असतो . मात्र , त्यासाठी तो एखाद्या भक्तश्रेष्ठाची , संताची मध्यस्थी घेतो . त्यांच्यामार्फत जीवात्म्याला मार्गदर्शन करून मुक्त करतो .
अशा तऱ्हेने सीतामाईला मुक्त करण्यासाठी रावणाच्या लंकेवर चालून जाण्याची श्रीरामचन्द्रांची सिद्धता सुरू असताना रावणाचा भाऊ बिभिषण प्रभुरामचन्द्रांच्या सत्यपक्षाला येऊन मिळाला व त्याच्या सहकार्याने श्रीरामचन्द्रांनी लंकेवरील स्वारीची संपूर्ण व्युहरचना केली .
बिभिषण , रावण आणि कुंभकर्ण हे तीन बंधू म्हणजे वस्तुत: सत्व , रज आणि तम या गुणांचे अनुक्रमे प्रतिनिधित्व करतात . रावणाच्या राज्यात सात्विक प्रव्रुत्तीच्या बिभिषणाला किंमत उरली नव्हती आणि कुंभकर्णाला निद्रिस्त ठेवलं होतं . स्वत:चं आसन स्थीर ठेवण्यासाठी आणि स्वत:च्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजसिक प्रव्रुत्तीचा स्वार्थी शासनकर्ता एका बाजूला सात्विक प्रव्रुत्तीच्या लोकांना झोडपत असतो तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य समाजात अज्ञान कायम ठेवून त्यांस निद्रितावस्थेत ठेवत असतो . श्रीरामचन्द्रांनी म्हणजेच परमात्म्याने सत्वगुणाला आधार दिला , त्याचं बळ वाढवलं आणि त्याच्या सहाय्याने रजोगुणाचा आणि तमोगुणाचा नाश करून जीवात्म्याला म्हणजेच सीतामाईला बंधनातून मुक्त केलं .
अशी ही श्रीरामकथा , जशी ५ हजार वर्षापूर्वी घडली तशीच ती आजही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडत असते आणि म्हणूनच त्या कथेचे संदर्भ आजही आपल्याला पटतात , जिवंत वाटतात आणि ते बोधाम्रुत प्राशन करून आजही आपण त्रुप्त होतो .
—- नरेन्द्र नाडकर्णी .
( हा लेख VPM समुहाच्या ‘ दिशा ‘ मासिकाच्या एप्रिल २००७ च्या अंकात प्रथम प्रसिद्ध झाला होता . )