मानवाच्या हृदयात दिव्य परमेश्वर प्रेम रूपात अवतरतो. हे दिव्य प्रेम मानवी शारीरिक प्रेमापेक्षा निराळे असते . या जगात माणूस ज्याला प्रेम म्हणतो ते परस्पर संबंधांवर आधारित असते . मानवी प्रेमाच्या मागे शारीरिक व मानसिक अहंकार असतो. मुळात तो एक सौदा असतो. मानवी प्रेमामागे एक दावा असतो . व ही मागणी पूर्ण झाली नाही की त्याक्षणी संताप व स्फोट होतो व ते प्रेम संपुष्टात येते. ते प्रेम आध्यात्मिक जीवनापासून कितीतरी कोस दूर असते व ते प्राणिक वासनांच्या जवळ असते .
दिव्य प्रेम हे सर्वस्वी निराळे असते . ते आत्म्यापासून निर्माण होते व मानवातील परमेश्वरी अंशाचे ते स्वरूप असते. त्या प्रेमाचे स्वरूप निरपेक्ष , कसलीही मागणी न करणारे व परत फेडीची इच्छा नसलेले असते. त्याला परमेश्वराशी एकरूप व्हावयाचे असते ते केवळ त्या ब्रम्हानंदासाठी . यात अहंकाराची सावली सुद्धा नसते .
ज्यावेळी विश्वाची निर्मिती सुरू झाली त्यावेळी चैतन्य अवतरण करू लागले. व चैतन्याकडून जडापर्यंतचा प्रवास सुरू झाला. एक वेळ अशी आली की चैतन्याशी जडाचा संपर्क तुटला व सर्वत्र अंधार झाला . तेंव्हा परमेश्वराला करुणा आली व त्याने प्रेमाचा एक किरण पाठवला . त्या किरणाने त्या अंधार्या जड भौतिकात एक चेतनेची ज्योत पेटवली . ही ज्योत अजूनही चैतन्याच्या दिशेने वर झेपावते आहे व जडाचा चैतन्याकडे प्रवास व्हावा म्हणून कार्यरत आहे. दिव्य प्रेम जडाच्या अंतर्यामी आहे व ते एकाला दुसर्याची ओढ लावते . त्या ओढीतून एक समविचारी समाज निर्माण होतो व तो परमेश्वराला अभिमुख होऊन चैतन्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो.
ज्या साधकाला दिव्य प्रेमाची आस लागली असेल त्याला शुद्धीकरणासाठी घोर तपस्या करावीच लागते. आपल्या स्वभावातील क्षुद्र , स्वार्थी , अहंकारी , आवडी निवडी , आसक्ती अशा सर्व हीन प्रवृत्तींचा त्याग करावाच लागतो. मग हळू हळू दिव्य प्रेम प्रगट होऊ लागते. मानवी प्रेमाचा उपयोग करून दिव्य प्रेमाकडे वाटचाल करावी लागते.
मानवाच्या ठायी असलेल्या प्रेमाच्या स्थानास ” हृदय केंद्र ” म्हणतात. हे आपले शारीरिक हृदय नसते तर जेथे या शुद्ध आणि दिव्य प्रेमाचा उदय होतो त्या केंद्रास हे नाव आहे. आकांक्षा , एकाग्रता , चिकाटी आणि गुरुकृपा यांच्या सहाय्याने ह्या आत्म्याच्या केंद्रात खोल आंत साधक प्रवेश करू शकतो. साधक जेंव्हा अंतरंगी डोकावतो तेंव्हा त्याला एका पाठोपाठ एक उच्च प्रतीच्या भावना , आनंद व औदार्याच्या भावना उचंबळून येताना दिसतात. पण या वरवर असतात . आणखी खोल बुडी मारल्यावर तेथे काहीही हालचाल नसते . एक शांत समाधान असते. एक नीरव अचल शांति असते व त्या शांततेतून प्रेमाचे प्रवाह वाहत असतात. आपली चेतना या केंद्र स्थानी आणण्यासाठी व स्थीर करण्यासाठी खूप तप करावे लागते. व एकदा या केंद्रापासून मानव यशस्वीपणे मार्ग चालू लागला की दिव्य प्रेमाच्या अवतरणाचा तो एक वाहिनी बनून प्रेमस्वरूप होतो .
या सर्व प्रक्रियेमध्ये पहिली महत्वाची पायरी म्हणजे माणसाने आपल्या अस्थित्वाच्या सर्व गुणधर्मांना दिशा देऊन त्यांना आत्मकेंद्राकडे आंत नेले पाहिजे. एकदा ते गुणधर्म असे केंद्रीभूत होऊन अंतरात्म्याशी निगडीत झाले की त्यांचा विस्तार केला पाहिजे. मग साधक विश्वाशी एकरूप होतो आणि मग अविरत, अखंड दिव्य प्रेमाचा वर्षाव सुरू होतो.
=============== ########### =================
संकलन : नरेंद्र नाडकर्णी . संदर्भ : ” Art of Living ” by M . P . Pandit
मराठी रूपांतर — सुहास टिल्लू