जीवनात शारीरिक , मानसिक , किंवा आध्यात्मिक या 3 पातळीतील सुसंवाद बिघडला , या ३ स्तरांवर असमतोल निर्माण झाला की रोग निर्माण होतात. म्हणून या प्रत्येक पातळीवर आरोग्यवर्धक वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करावा लागतो . काहीतरी बाह्य कारणांनी रोग होतो असा सर्वसाधारण समज असतो . पण खरोखरी आंतरीक जीवनशक्ती मंद किंवा दुर्बल झाली आणि प्रतिकार शक्ति कमी झाली म्हणजे रोग होतो . ज्यावेळी काही पेशी अथवा अवयव यांचे ठिकाणी होणारे जीवनशक्तीचे कार्य मंदावते त्यावेळी तेथे अस्वास्थ्य किंवा रोग निर्माण होतो अशा वेळी त्या पेशींना किंवा त्या अवयवाला पुन्हा कार्यरत करण्यासाठी काढे , औषधे , गुटिका , मात्रा , चूर्णे , शरीर-मर्दन इत्यादि उपाय केले जातात . या सर्वांचा परिणाम काय होतो ? रक्तात रासायनिक बदल घडवून आणल्याने किंवा पेशींना उत्तेजित केल्याने शरीरातील बिघडलेला सुसंवाद पुन्हा सुरू होतो . मुख्य काम जीवन शक्तीच करते कारण तसे नसते तर निर्जीव शरीरातही ही औषधे आपला प्रभाव दाखवू शकली असती . पण तसे होत नाही . औषधाना स्वत:ची अशी स्वतंत्र रोग निवारणाची प्रेरणा नसते . शरीरात सदा विद्यमान असलेली जीवन शक्ति या सर्वांचा उपयोग करून रोग निवारण करते .
शारीरिक अस्वास्थ्य चटकन समजते पण भय , क्रोध , अनिष्ट सवयी , निरुत्साह , पराभूतवृत्ती , आत्म- विश्वासाचा अभाव , या गोष्टी सुद्धा विशिष्ट पातळीवरील रोगच आहेत . तसेच उदासीनवृत्ती , दैवाधीनता , नैराश्यवृत्ती , बौद्धिक आढ्यता , स्वमताग्रही वृत्ती , संशयी वृत्ती , अश्रद्धा , विस्मरण हे सुद्धा एक प्रकारचे रोग होत . शारीरिक आरोग्य रक्षणासाठी निसर्ग नियमांचे काटेकोर पालन , अन्नग्रहणाच्या बाबतीत संयम आणि स्वच्छतेचे नियम कसोशीने पाळायला हवेत .
भय , क्रोध , चिंता यांचा हृदय क्रियेवर परिणाम होतो म्हणून ते टाळायला हवे . मानसिक आरोग्य रक्षणासाठी विश्वशक्ति कार्यरत आहे अशी श्रद्धा व शांति यांची जोपासना करावी . मनातील विक्षेप वाढविणारे विचार घालवून त्या जागी प्रेम आणि आनंद आणावयाचा प्रयत्न करावा .
बरेचसे आजार सर्वसाधारण उपायांनी बरे होऊ शकतात परंतु काही विशिष्ट आजारांच्या बाबत मात्र विशिष्ट चिकित्साप्रणालीचा उपयोग करणे गरजेचे ठरते . पण त्याच बरोबर प्रत्येक व्यक्तीने नियमित जीवनक्रम ठेवायला पाहिजे आणि आपली आंतरीक अवस्था स्वस्थ आणि सुंदर ठेवायला हवी .
एक चांगला जीवनक्रम याचा अर्थ योग्य आहार , उचित विहार , पुरेशी झोप , कार्यमग्नता आणि विश्रांति यांचा सामंजस्यपूर्ण ताळमेळ . जर आम्हाला पूर्ण आरोग्य संपन्न रहावयाचे असेल तर जितका योग्य आहार -विहार आवश्यक आहे तितकेच चांगले विचार आणि चांगला प्रभाव आवश्यक आहे . त्याच बरोबर जीवनात एका चांगल्या मनोरंजनाला देखील स्थान असायला हवे कारण त्यामुळे आमच्या शरीरातील ग्रंथिंचे पोषण चांगले होते . आहार- व्यायाम- निद्रा याबाबत– —
१ ) भोजनाची एक नियमित वेळ ठरवावी म्हणजे त्यावेळी पाचक रस आपोआप श्रवू लागतात .
२ ) दोन वेळा मुख्य जेवण आणि एक वेळा नाश्ता घेण्यास हरकत नाही . जेवण चौरस असावे . कोणत्याही एका पदार्थाचा अतिरेक टाळावा. खूप उपवास करणे उचित नाही .
३ ) ऋतुमानानुसार फळे खावीत व भोजनात सर्व प्रकारच्या भाज्या ज्यात सर्व आवश्यक तत्वे ,आणि तंतुमय पदार्थ तसेच कोंडा असतो त्या सर्व गोष्टी पोट , आतडी रक्त व हृदय या सर्वांसाठी चांगल्या असतात . राहिलेली कमतरता एक कप दूध , डाळ , भात , पोळ्या यांनी भरून जाते .
४ ) चौरस शाकाहारी आहार हा मांसाहारापेक्षा चांगला असतो पण काही वेळा अंड्याचा पांढरा भाग आणि मासे काही आजारात उपयोगी ठरतात .
५ ) शरीरस्वास्थ्यासाठी पाण्याची नितांत गरज असते . ६ ते ८ ग्लासपर्यन्त पेय पदार्थ पोटात गेल्यास शरीर पूर्ण स्वास्थ्याकडे वाटचाल करते . जपानमध्ये झालेल्या संशोधनानुसार पाणी भावपूर्णतेने ( मंत्रोच्चार किंवा प्रार्थना करून ) प्यायले असता त्यातील अणू परमाणु आपल्या शरीरात आश्चर्यकारक बादल घडवून आणतात .
६ ) व्यायाम केवळ शरीराचेच नव्हे तर मनाचे पोषण करतात . नियमित व्यायाम मस्तकात अशी रसायने निर्माण करतो ज्यामुळे आम्हास प्रसन्नता वाटते तसेच त्यामुळे रक्तप्रवाह , हृदयाच्या नसा मोकळ्या होणे , मांसपेशींचे कार्य सुधारणे , पचन सुधारणे , चरबी कमी होणे इत्यादि लाभ होतात . व्यायाम श्यक्य नसेल तर श्वासाकडे लक्ष्य देऊन कमीतकमी ४५ मिनिटे ते १ तास पायी चालावे . आसने , पोहोणे , खेळ व नृत्य यांचाही चांगला उपयोग होतो .
७ ) आहाराप्रमाणे तसेच व्यायामाप्रमाणे निद्रा ही घेणे आवश्यक आहे . निसर्गत: शरीरात निद्रेचे रसायन रात्री १० ते ५ या वेळेत तयार होते . निद्रानाशाच्या विकारावर योग्य तो व्यायाम व झोपण्यापूर्वी मधाबरोबर एक कप दूध घ्यावे . सार्या चिंता भगवंतावर सोपवाव्या . आणि त्याच बरोबर जप व थोडे ध्यान करावे
शारीरिक आरोग्यावर माताजींनी निरनिराळ्या दृष्टीकोनातून विचार व्यक्त केले आहेत , केवळ आजारपणापासून मुक्ति हा काही शरीरी आरोग्याचा एकमेव निकष नाही . आजारापासून मुक्ति हा नकारात्मक विचार आहे तर शारीरिक आरोग्य सकारात्मक विचार आहे . शरीरास होणार्या रोगामागे केवळ शारीरिक कारणे नसतात तर मानसिकतेचाही परिणाम असू शकतो . आपल्या भौतिक शरीराच्या भोवती एक सूक्ष्म आवरण असते त्याला theosophists
Etherik Body म्हणतात . माताजी त्यास ‘ nervous envelope ‘ म्हणतात .
हे आवरण जर मजबूत असेल तर कोणताही बाह्य आजार – रोग आपल्या शरीरात शिरू शकत नाही पण बर्याच जणांच्या बाबतीत या आवरणास छिद्रे असू शकतात कारण नकारात्मक विचार , हताशपणा , क्रोध आणि नकारात्मक वागणूक यामुळे हे आवरण कमकुवत होऊन त्यास छिद्रे पडू शकतात . आणि म्हणून एखादा माणूस सशक्त दिसत असला तरी तो रोगाला बळी पडू शकतो .
काही माणसे मुळातच आनंदी असतात . प्रत्येक गोष्टीचा स्वीकार आनंदाने व सहजतेने करतात . त्रास झाला तरी सारखी कुरकुर करीत नाहीत . याचे कारण अशी माणसे वैश्विक प्रकृतीशी जोडलेली असतात . स्वत:वर विश्वास हवा . आपल्या शरीराच्या व मनाच्या क्षमतेवर विश्वास हवा . परमेश्वरी शक्तिवर विश्वास हवा . अशा प्रकारची श्रद्धा म्हणजे सर्वश्रेष्ठ सकारात्मकता . तसे असेल तर कोणताही रोग आपल्यावर हल्ला करू शकत नाही .
माधवजी पंडितांनी एक कथा सांगितली आहे . एकदा त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्नात एक भला मोठा वाघ झुडपातून बाहेर येऊन त्यांच्या अंगावर धावून येतो . त्यांनी माताजींची प्रार्थना करून वाचवण्याची विनंती केली . त्याबरोबर वाघ मागे वळला आणि झुडपात नाहीसा झाला . थोड्या वेळाने पुन्हा बाहेर आला त्यांनी माताजींची पुन्हा प्रार्थना केली पुन्हा तो मागे वळला . झुडपात नाहीसा झाला . यानंतर मात्र त्यांच्या मनात विचार आला की तो पुन्हा आला तर माझ्या प्रार्थनेचा उपयोग होईल ना ? आणि असा विचार येताच एका झटक्यात वाघ बाहेर आला आणि त्याने आपल्या पंजाने एक फटका मारला . कथेचा अर्थ असा की श्रद्धा डळमळीत झाली की आपल्यावर बाह्य हल्ला होणारच .
रोग निवारणाच्या विचारात रोग्याच्या स्वभावाचा कल लक्ष्यात घेऊन कल्पनाशक्ति , तर्कशक्ती , श्रद्धाशक्ती , भावनाशक्ती व इच्छाशक्ती यांचे त्यानुसार सहाय्य घ्यावे लागते . आंतरिक स्थिति अनुकूल झाली म्हणजे मग संकल्प सुत्रे दृढ संकल्पाने पुन: पुन: उच्चारावी . या सूत्रांच्या मुळाशी असलेल्या सारतत्वाने संकल्पशक्ती भरून जाईल व त्यायोगे आंतरिक जीवनशक्ती रोग निवारणाचे आपले कार्य जोमाने व अधिक सुलभतेने करू लागेल .
सकाळी उठल्यावर अथवा झोपी जाण्यापूर्वी हा प्रयोग करावा .
श्यक्य तितकी शांत जागा निवडावी . मनातील खळबळ शांत करून ते रिकामे करावे . नंतर खालीलप्रमाणे `संकल्प प्रथम मोठयाने म्हणावा , नंतर हळू हळू लहान आवाजात म्हणत शेवटी मनात म्हणावा उदा . ” माझे विचार व भावना व इच्छा परमेश्वरी इच्छेशी एकरूप होऊ दे . माझी प्रतिकार शक्ति वाढू दे . माझी चेतनाशक्ति विश्वशक्तिशी जोडली जाऊ दे . माझ्या विचारात , भावनात व शरीरात समतोल निर्माण होऊ दे . ” असे करताना एकाग्रता साधावी . मात्र जागृत राहून संकल्प चिंतन चालू ठेवावे . याप्रमाणे आणखी खोल गेल्यावर शांति आणि आनंद यांची जाणीव होऊ लागेल आणि संकल्पाचे रोग निवारक सामर्थ्य प्रतीत होऊ लागेल .
============== ########## ==============
संकलन : —- नरेंद्र नाडकर्णी संदर्भ : ” Satsang ” by M.P. Pandit