Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • Aurobindo
  • पूर्व आणि पश्चिम
  • Aurobindo

पूर्व आणि पश्चिम

Narendra Nadkarni March 14, 2023

विसाव्या शतकाच्या साधारण मध्यावर जेट युगाचा प्रारंभ झाला . मात्र विसावं शतक संपता संपता दूरध्वनी , दूरचित्रवाणी आणि संगणक या क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी सुधारणांमुळे सारं जग जवळ आलं . सामान्य माणसंही या ना त्या कारणाने जगभर फिरू लागली . जीवनपद्धतीमधील साम्य आणि फरक याची माणसं नोंद घेऊ लागली . भौतिक सुखाचा मनमुराद आस्वाद घेऊन कंटाळलेल्या काही पाश्चिमात्यांना आध्यात्मिकतेचं आकर्षण वाटू लागलं तर पूर्वेकडील माणसाला पाश्चिमात्यांचे भौतिक सूख आकर्षित करू लागले आणि मग या सरमिसळीचा संभाव्य धोका ओळखून आपापल्या विचारसरणीचे , संस्क्रुतीचे महत्व रेटणारे विचारही प्रकर्षाने पुढे येऊ लागले .

डी. टी. सुझुकी —

         हा सारा कोलाहल सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे जवळ जवळ ७० वर्षापूर्वी डी. टी. सुझुकी या ऋषीतुल्य जपानी तत्ववेत्याने पूर्व आणि पश्चिम या विषयावर एक प्रदीर्घ लेख लिहून या दोन विचारसरणींमधील भेद स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता .

         १८७० साली जपान मध्ये जन्मलेला हा तत्ववेत्ता झेन तत्वज्ञानाचा एक मोठा भाष्यकार म्हणून साऱ्या जगात प्रसिद्ध होता . इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व असणाऱ्या सुझुकींनी झेन व बौद्ध धर्मग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे केली . वयाच्या ९५ व्या वर्षी म्हणजे १९६६ मध्ये आपल्या मात्रुभूमीत येऊन देह ठेवलेल्या या थोर जपानी तत्ववेत्त्याने आयुष्याची जवळ जवळ ४० वर्ष अमेरिकेत राहून तेथील विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून काम केलं होतं आणि म्हणूनच या दोन्ही संस्क्रुतींचा प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या त्यांच्या लेखाला एक विशेष महत्व आहे . परंतू त्याहीपेक्षा दोन प्रतिभावंत कवींच्या काव्यरचना घेऊन त्यातून दिसणाऱ्या जीवनद्रुष्टीच्या तुलनेवर त्यांनी आपल्या लेखाची उभारणी केल्यामुळे त्या तात्विक विचारांतही एक खास रंगत निर्माण झाली आहे .

बाशो आणि त्याचे हायकू —

             बाशो हा १७ व्या शतकात होऊन गेलेला एक थोर जपानी कवी . त्यानं लिहिलेल्या एका फक्त १७ ( जपानी ) शब्दांच्या हायकूकडे सुझूकी आपलं लक्ष्य वेधतात . त्या हायकूचं त्यांनी इंग्रजीत केलेलं रुपांतर —

When  I  look  carefully  , 

I  see  the  Nazuna  blooming  , 

By  the   hedge  !

या छोट्याशा हायकूतील मर्म स्पष्ट करताना सुझूकी म्हणतात — ‘’ बाशो हा बहुदा एखाद्या खेड्यातल्या आडवाटेने कुठेतरी जात होता . अचानक त्याची द्रुष्टी एका झुडूपाच्या कुंपणाकडे गेली आणि जसा तो त्या कुंपणाच्या जवळ पोहोचला तेंव्हा त्याला चकित करून टाकणारी एक गोष्ट तिथे आढळली . त्या झुडूपाच्या आधारानं वाढणाऱ्या ‘ नाझुना ‘ नावाच्या एका रानवट रोपट्याला कुणाचंही मन मुग्ध करून टाकणारा बहर आला होता . बाशो ही एक सरळसोट ढोबळ घटना या हायकूत व्यक्त करतो . मात्र त्या हायकूची अखेर तो ‘ काना ‘  या जपानी भाषेतील एका अव्ययाने करतो .’’ या अव्ययाचा वापर कौतुकाने झालेल्या आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो . इंग्रजीत त्याला समांतर शब्द नसल्याने सुझूकींनी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला आहे .

         सुझूकी म्हणतात – ‘’ बाशो हा निसर्गात रमणारा , किंबहुना निसर्गाशी एकरूपता साधू पाहणारा कवी आहे . अशा प्रकारच्या इतर कवींप्रमाणे त्यालाही निसर्गाच्या नसानसातून वाहणाऱ्या प्रवाहाचे ठोके जाणवतात . बहुसंख्य पाश्चिमात्य कवी निसर्गाचं सौंदर्य न्याहाळतात . त्याने वेडं होऊन त्या सौंदर्याची वर्णनं करतात पण निसर्गाशी एकरूप होण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही . कारण ते मानवाला निसर्गाहून वेगळा मानतात . मानवाच्या सुखासाठी , मानवानं वापरण्यासाठी निसर्ग निर्माण झाला आहे अशी त्यांची धारणा असते . परंतू पूर्वेकडचा माणूस मनोमन ‘  व्रुक्षवल्ली अम्हा सोयरे ‘ असे मानणारा असतो . स्वताला तो चराचर स्रुष्टीचा घटक मानतो आणि म्हणूनच अत्यंत दुर्लक्षित असं ते नाझुनाचं रानवट रोपटं त्या झुडुपाच्या कडेला बहरताना जेंव्हा बाशोनं पाहिलं तेंव्हा काय दिसलं त्याला ? त्या रोपट्याचा निरुपद्रवीपणा , नम्रता आणि कौतुकाच्या नजरेचीही अपेक्षा न ठेवणारी निरिच्छता , निर्व्याजकता  हे सारे पाहून बाशो मंत्रमुग्ध झाला . त्या नाजूक फुलाच्या सौंदर्यात त्याला दैवी तेज दिसलं . त्या फुलाची प्रत्येक पाकळी त्याला जीवनाचं गूढ उकलून दाखवीत होती . ‘’

                         सुझूकी पुढे म्हणतात — ‘’  हिमालयाची भव्य उत्तुंगता आणि पॅसिफिकची विशाल विस्तीर्णता पाहून कुणालाही अनंताची जाणीव होते पण जेंव्हा एखाद्याचं मन काव्यात्मकतेनं अथवा कोणत्या तरी गूढ शक्तीच्या प्रभावानं उमलू तागतं तेंव्हा त्या मनाला गवताच्या साध्या पात्यातही असणारं दैवी शक्तीचं सौंदर्य जाणवू लागतं आणि त्या जाणीवेनं ते मन अव्यक्ताकडे झेप घेऊन स्वर्गीय सुखाच्या आनंदात डुंबू लागतं . ‘’ सुझूकींच्या या विचारानं मला आठवण झाली ती कविवर्य बोरकरांच्या खालील पंक्तींची —–

‘’  ह्रदयच होते जेंव्हा कोकीळ जरठ वनांतही फुले वसंत

   ह्रदयच होते भजन जेधवा त्रुणातही भेटे भगवंत ‘’   

टेनिसन आणि त्याची काव्यरचना —– 

             यानंतर सुझूकी वळतात टेनिसनच्या खालील काव्यरचनेकडे —-

Flower  in  the  crannied  wall

I  pluck  you  out  of  the  crannies

Hold  you  here  ,  root  and  all  in  my  hand

Little  flower  —  but  if  I  could  understand 

What  you  are  ,  root  and  all  and  all  in  all

I  should  know  what  God  and  man  is  .

सुझूकी म्हणतात — ‘’  टेनिसनची ही काव्यरचना निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे ही कविताही एका रानवट रोपट्यावर केली आहे . हे रोपटं एका भिंतीला पडलेल्या भेगेतून वर आलं आहे . त्यावरही एक सुंदर फूल आलं आहे . पण असं ते सुंदर रोपटं आणि त्यावरचं सुंदर फूल पाहून टेनिसन काय करतो ?  तो ते फूल तोडून हातात घेतो . तेही मुळासकट उपटून . कदाचित त्याचंही मन बाशोसारखं दिपलं असेल .

       पण बाशो फूल तोडत नाही . तो त्याला नुसता न्याहाळतो आणि विचारमग्न होतो . त्याच्या मनात काही दिव्य कल्पना निर्माण होतात पण त्याही तो शब्दात मांडत नाही . एका उद्गारवाचक शब्दात तो आपल्या साऱ्या भावना व्यक्त करतो . कारण त्या भावना आणि ते विचार इतके उत्तुंग असतात , इतके विशाल असतात की त्या अव्यक्त जाणीवांना व्यक्त करण्यास शब्द असमर्थ असतात आणि त्या कवीलाही त्याची गरज वाटत नाही . त्यानं धारण केलेल्या मौनात त्या व्यक्ततेचं सामर्थ्य असतं .

        आणि टेनिसन – तो जसा क्रुतीशील आहे तसाच तो प्रुथक्करणशीलही आहे . तो फूल तोडून सरळ हातात घेतो तेही रोपटं मुळापासून उपटून . ज्या मातीतून ते रोपटं वर आलं होतं त्या मातीपासून त्या रोपट्याला तो अलग करतो . या अतिरेकी क्रुत्यानं त्या रोपट्याचा जीव जातो . पण टेनिसनला त्या रोपट्यावर कोसळलेल्या दुर्दैवी विघिलिखिताची खंत नाही . त्याची जिज्ञासापूर्ती त्याला अधिक महत्वाची वाटली . काही वैद्यकीय शास्त्रज्ञांप्रमाणे त्याने कदाचित त्या फुलाची चिरफाडही केली असती . कवितेच्या दुसऱ्या चरणात टेनिसन त्या फुलाला उद्देशून म्हणतो — “   मी जर तुला समजू शकलो , तुझी मुळं , तुझी उत्पत्ती , तुझा जीवनव्यवहार हे सारं सारं समजू शकलो तर कदाचित मला परमेश्वराचे ज्ञान होईल आणि मानवाविषयीचेही ज्ञान होईल  ‘’. म्हणजे टेनिसनच्याही मनात परमेश्वराविषयीचं कुतुहूल आहे . पण तो बुद्धीनिष्ठ आहे . त्याच्याकडे भावनेची खोली कमी आहे . श्रद्धा तर फार दूर राहिली आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून हे सारं गूढ उकलावं अशी त्याची इच्छा आहे . शिवाय ईश्वर , मानव आणि निसर्ग यांच्यामधील अतूट नात्याची त्याला कल्पनाही नाही . टेनिसनच्या जिज्ञासू आणि क्रुतिशील पण आक्रमक चैतन्यव्रुत्तीच्या समोर त्या फुलाला स्पर्शही न करता नुसता निरखून पाहणारा आणि त्यातून चिरंतनाचा स्पर्श अनुभवणारा बाशो कदाचित अनेकांना बाह्यत: निष्क्रिय वाटत असेल पण त्याची ती तथाकथित बाह्य निष्क्रियता पाहणाऱ्यांना त्याची आंतरिक प्रगति कशी जाणवणार ?  “ अशा प्रकारे या दोन कवींच्या काव्यरचनांची आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मानसिकतेची तुलना करून सुझूकी पौर्वात्य मन आणि पाश्चिमात्य मन यांची वैशिष्ठ्ये सांगतात .

पाश्चिमात्य मन —

प्रुथक्करणशील , चिकित्सक , भेद जाणणारं , अनुमान काढण्यासाठी धडपडणारं , व्यक्तीवादाचा पुरस्कार करणारं , बुद्धीवादी , विज्ञानवादी , वस्तुनिष्ठ , सामर्थ्याचा वापर तत्परतेने करणारं , स्वत:स रेटणारं . 

पौर्वात्य मन —

संयोग साधू पाहणारं , एकात्मतेवर भर देणारं , चिकित्सा टाळणारं , आत्मनिष्ठ , विशिष्ठ मतप्रणालीवर ठाम श्रद्धा ठेवणारं , आध्यात्मिकतेमध्ये व्यक्तीवादी पण सामाजिकतेमध्ये गटवादी .  

चुआंग-त्से ची कथा —

        यानंतर सुझूकी वळतात ते चुआंग-त्से या २३०० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या चिनी साधूच्या कथेकडे – “  परमेश्वराची निर्मिती पूर्णत्वास जाण्यापूर्वीच्या काळात सर्वत्र काहीसा गोंधळ होता . CONFUSION  होतं . त्या काळात ‘  कॉनटॉन ‘ हा एक अद्भूत जीव होता . त्याला कोणतीही बाह्य इंद्रिये नव्हती . पण त्याच्या अद्भूत सान्निध्यामुळे त्याच्या अनेक मित्रांना अलौकिक यश संपादन करता आलं . या यशाची काहीतरी भरपाई करायला हवी अशा विचाराने प्रेरित होऊन त्या मित्रांनी असं ठरवलं की कॉनटॉनला आपण एक एक ज्ञानेंद्रिय बहाल करून आपल्या सारखा संवेदनक्षम बनवायचं . याप्रमाणे ते त्याला एक एक इंद्रिय बहाल करू लागले . शेवटी सर्व ज्ञानेंद्रिये देऊन झाल्यावर आता तो आपल्यासारखा संवेदनक्षम होईल अशा आनंदात असणाऱ्या त्या मित्रांना समजलं की कॉनटॉन मरण पावला ‘’  . —  सुझूकी म्हणतात – “ The  East  is  Chaos  and  the  West  is  group  of   those   grateful  ,   well  meaning  but  undiscriminating  friends  “  ही सुंदर रुपकात्मक कथा वाचा आणि त्यावर स्वत:च विचार करा .

यांत्रिकीकरण —  

                  यानंतर सुझूकी वळतात ते यांत्रिकीकरणाकडे . विज्ञानवादी मनाच्या पाश्चिमात्यांनी आपली सारी बुद्धीमत्ता वेळोवेळी वापरून आपल्या श्रमात बचत करणारी अनेक सुखसोयीची साधने शोधून काढली . पूर्वेकडील माणसांना मात्र ते   शारीरिक कष्ट उपसत राहणंच योग्य वाटलं . कारण सुझूकी म्हणतात –   “   The  East  does  not  like  to  be  machine minded  ,  to  turn  itself  into  a  slave  to  the  machine .    आपल्या कामावरचं प्रेम हाच पूर्वेचा एक फार मोठा गूण आहे  . “  या संबंधी एक कथा सांगताना सुझूकी म्हणतात —-

       “  चीनमधला एक शेतकरी विहिरीतून एक एक बादली पाणी काढून शेतातील झाडांना पाणी देत होता . ते पाहून एक वाटसरू त्याला म्हणाला –      ‘’  एखादा पंप का बसवून घेत नाहीस म्हणजे तुझे श्रम वाचतील . ‘’ यावर तो शेतकरी म्हणतो –-   माझे श्रम वाचतील हे तर मला ठाऊक आहे , पण म्हणूनच मला पंप बसवायचा नाही कारण त्यामुळे मी सुस्त , आळशी होईन .’’  

               पाश्चिमात्यांना अनेकदा प्रश्न पडतो की चीन सारख्या देशाने औद्योगिक क्रांतीचा   विचार का केला नाही ? मॅग्नेट , कागद आणि गनपावडर या सारख्या वस्तुंचा शोध लावणाऱ्या देशात यंत्रनिर्मितीचा ध्यास का घेतला गेला नाही ? रसायनशास्त्र , वैद्यक , गणित आणि खगोलशास्त्रात प्रगति साधलेल्या भारताने यंत्रामुळे मिळणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष का केलं असावं ?  सुझूकी म्हणतात – “ पूर्वेकडील माणूस आपल्या जीवनावर प्रेम करतो आणि आपल्या जीवनपद्धतीवरही प्रेम करतो . कोणतंही काम करताना त्यांत तो आनंद घेतो. ते काम कसं तरी संपवावं असं त्याला वाटत नाही . कारण – Mechanical devices  are  far  more  efficient  &  accomplish  more  but  the  machine  is  impersonal  &   non-creative  and   has  no  meaning  .  Mechanisation  means   intellection   and   as  the  intellect   is  primarily  utilitarian  ,  there  is  no  spiritual  estheticism   or   ethical   spirituality   in  machine  .  “   

सुझूकींच्या य़ा भाष्याने विशेषत: त्यातील Esthetics च्या निर्देशाने मला आपल्याकडील पूर्व जीवनाची आठवण झाली .

        आपल्याकडे पूर्वी स्त्रिया घरीच जात्यावर दळत असंत . पण त्यांचं ते दळणं ओव्या म्हणत म्हणत चालायचं आणि त्यामुळे त्यातील श्रम न जाणवता उलट आनंद मिळत असे . तसंच चे कांडण , त्यातील लयबद्धता . शिवाय या साऱ्या कामात सहजीवनाचाही आनंद मिळे . शेतात काम करणारा शेतकरी मोटेने पाणी काढताना सुंदर गाणी म्हणायचा आणि मातीची सुबक भांडी बनवणारा कुंभार तर स्वत:ला त्या सर्वश्रेष्ठ निर्मात्याचा अंश मानून ती गाडगी बनवण्यात धन्यता मानत असे , एक प्रकारचा आनंद घेत असे . आता ती सारी कामं यंत्रावर होतात . श्रम वाचले , वेळही वाचला . पण तो आनंद नाहीसा झाला आणि ते काव्यही इतिहासजमा झालं .

        या संपूर्ण विवेचनाची सांगता करताना शेवटी सुझूकी साहेब म्हणतात – “   व्यक्ती आणि यंत्र या दोन्ही गोष्टी मुळात एकमेकांशी विसंगत आहेत आणि या विसंगतीमुळेच पाश्चिमात्यांच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण झाला आहे . व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तीमत्व आणि व्यक्तीगत जबाबदारी ध्वनित करते तर यंत्र ही आकलन , शून्यमनस्कता सर्वांच्या आवाक्यात आणणं आणि सामुहिक जीवन अशा सर्वांची मिळून उत्पत्ती आहे . यांत्रिक मानसिकतेच्या द्रुष्टीतून विचार केल्यास व्यक्तिगत जबाबदारीस अर्थ उरत नाही .

        स्वातंत्र्य ही अशीच एक अर्थशून्य कल्पना आहे . आपण ज्या समाजात राहतो तो समाज या ना त्या मार्गाने आपल्या शारीरिक , मानसिक हालचालींना पायबंद घालत असतो आणि म्हणून केवळ बाह्य सुखाचा उपभोग हेच स्वातंत्र्य मानल्यास त्याचा जागोजागी संकोच होतो . या उलट पूर्वेकडचा माणूस सुखोपभोगाची इच्छा हेच बंधन मानतो व त्या बंधनातून मुक्ती हेच खरेखुरे  स्वातंत्र्य मानतो .

         एक व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये जी निर्मितीक्षमता असते तीही यंत्रनिर्मितीमुळे नाहीशी होते . व्यक्तीमत्वाचा संकोच होतो . मानवाची कुचंबणा होते आणि ही सारी कुचंबणा यांत्रिक गुलामगिरीत सहन करावी लागत असल्याने त्याचा मानसिक तणाव वाढत जातो . “

                    सुझूकी साहेबांनी म्हंटल्याप्रमाणे आता तर पूर्व आणि पश्चिम हा भेदही नष्ट होत चालला आहे . सारं जग आता यांत्रिकीकरणात अडकलं आहे . या दुष्ट चक्राचे काटे आता उलट फिरवणंही केवळ अशक्य आहे . कमीतकमी ही सारी परिस्थिती डोळसपणाने स्वीकारली तर यांत्रिकीकरणातून निर्माण होणारे तणाव थोडे कमी होतील .

         पण पौर्वात्य संस्क्रुतीच्या प्रभावाने झिरपलेल्या ज्या मूलभूत प्रेरणा आहेत , जी जीवनद्रुष्टी आहे , जी निसर्गाशी एकरूपता साधणारी प्रव्रुत्ती आहे , व्यष्टीतून समष्टीशी संयोग साधू पाहणारी एकात्मता आहे , आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे काव्यात्मकतेने अथवा कोणत्या तरी गूढ शक्तीच्या प्रभावाने उमलू शकेल असे श्रद्धाळू मन आहे , या सर्वांची जर जपणूक केली तर सुझूकी म्हणतात त्याप्रमाणे अशा उमलत्या मनाला गवताच्या पात्यांतही असणारं दैवी शक्तीचं सौंदर्य जाणवू लागेल आणि त्या जाणीवेनं ते मन अव्यक्ताकडे झेप घेऊन स्वर्गीय सुखाच्या आनंदाचा उपभोग घेईल आणि मग पाश्चिमात्य संस्क्रुतीचा प्रभाव पचवून पौर्वात्य संस्क्रुती एका नवीन आविष्कारात ठामपणे उभी राहिलेली दिसेल .

—– नरेन्द्र नाडकर्णी

( Essays in  Philosophy या पुस्तकातील डी.टी. सुझूकी यांच्या ‘  East and West ‘  या निबंधावर आधारीत )

( हा लेख V.P.M. समुहाच्या ‘ दिशा – मार्च  २००९  ‘ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला होता )     

Continue Reading

Previous: श्री अरविंदांचा पूर्णयोग
Next: ब्रम्हचर्य एक वरेण्य तत्व

Related Stories

  • Aurobindo

जीवन साफल्य – सौंदर्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

प्राणिक सामर्थ्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

  दैवी प्रेमाची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.