Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • Aurobindo
  • २१ व्या शतकातही श्री अरविन्द विचारांची समर्पकता
  • Aurobindo

२१ व्या शतकातही श्री अरविन्द विचारांची समर्पकता

Narendra Nadkarni March 14, 2023

तर्कशास्त्रावर आधारित वैचारिकता जपणारा , व्यावसायिक दृष्टीकोन ठेवणारा

आणि शास्त्र व तंत्रज्ञान यांच्या विकसित भरभक्कम पायावर उभा असलेला आधुनिक समाज, सामाजिक कार्य समजू शकतो , परोपकार समजू शकतो , त्याला भूतदयाही समजते पण हा आधुनिक समाज अध्यात्मिकता म्हणजे काय ते समजू शकत नाही . जिथे अध्यात्म म्हणजे काय ते ठाऊक नाही, आध्यात्मिक व्यक्तींना ओळखू शकत नाही तिथे आध्यात्मिक क्रांति कशी समजणार ? स्वत:  श्री अरविंदांनीही एका ठिकाणी म्हंटलय की  इतिहासात होऊन  गेलेल्या आध्यात्मिक  क्रांतिकारकांची  हा समाज पूजा करतो ,  त्यांना देव मानतो  पण वर्तमानातील आध्यात्मिक क्रांतीकारकांना मात्र ओळखू शकत नाही ,  त्यांचे द्रष्टे विचार त्याला पचत नाहीत जेव्हा तो थोडा फार प्रयत्न करतो तेंव्हाही तो बाह्य रंग-रूपाला भुलतो. एखादा माणूस योगी झाला म्हणजे  त्याने सामान्य जीवनापासून फारकत   घेतली अशी  त्याची पारंपरिक समजूत असते.  श्री अरविंदानी  जीवनाच्या सर्व विषयांना स्पर्श केला आहे  अस जर  त्याला सांगितलं तर तो चकित होतो , विचारात पडतो आणि म्हणून अशा या  समाजाला पडणार्‍या प्रश्नावर  जे  विचार श्री अरविंदानि व्यक्त केले आहेत आणि तेही  १०० वर्षापूर्वी ते आज  त्यांना  कालानुरूप समर्पक वाटतील का ?

              या   प्रश्नाचं उत्तर “निश्चितच वाटतील” असं आहे  त्याचं मुख्य कारण म्हणजे जीवनाच्या  सर्व प्रश्नांना श्री  अरविंदानी दिलेली उत्तरं ही  शास्त्रशुद्ध दृष्टीकोनातून  आणि तर्कशुद्धं पद्धतीने दिलेली आहेत . ते  पहिलेच असे आधुनिक महायोगी, महर्षि आहेत की  ज्यांनी मानवी समाजाच्या  प्रगतीपथावर आधिभौतिकवाद  आणि बुद्धीप्रामाण्यवाद हे आवश्यक टप्पे आहेत असे मानले आहे . तसेच व्यक्त जगातील अथवा अव्यक्त जगातील जीवनाविषयी  सर्वांगीण  दृष्टिकोन स्वीकारतानाही  त्यांची  आवश्यकता  नाकारलेली  नाही.  श्री अरविंदाचे  विचार असे आहेत की ज्यामुळे व्यक्तिमात्राची समाजाशी एकता निर्माण होईल, सामंजस्य निर्माण होईल शिवाय शारीरिक जीवन , प्राणिक जीवन, भावनात्मकता, मानसिकता  आणि आत्म्याची हांक या सर्वांशी जुळवून घेणे  सहजशक्य  होईल . वेद, उपनिषद, आणि भगवद्गीता यातील विचारधारा आणि आधुनिकाना समजणारा उत्क्रांतीवाद  यांची  सांगड  घालून एक नवविचार नव्या अविष्कारात आणि शास्त्रशुद्ध भाषेत त्यांनी समाजासमोर मांडला.

              या  ठिकाणी  असा  प्रश्न  निर्माण  होतो की हा  नवविचार त्यांनी  नव्या आविष्कारात का मांडला ? श्री अरविन्द  म्हणतात  की  मानवी समाजाची प्रगति ही चक्राकार गतीने  परंतु  ऊर्ध्व  दिशेने  होत  आहे  म्हणजेच मानवी समाज हळू हळू उत्क्रांत होत आहे , जाणीवेच्या वरच्या स्तरावर जात आहे . चिरंतन सत्य हे जरी कालातीत असलं तरी ते कालद्वारा स्वत:ला प्रकट करते. आणि म्हणून प्रत्येक पवित्र शास्त्रात दोन घटक असतात, एक—तात्पुरता ,विनाशी , आपल्या उदयाच्या काळातील, देशातील  प्रचलित कल्पनांनी  निर्मिलेला  तर दूसरा –अविनाशी , सर्वकाळ टिकणारा , सर्व युगात सर्व देशात कार्यक्षम ठरणारा . आणि म्हणून  प्रगत पावलेल्या ,जाणीवेच्या वरच्या स्तरावर जात असलेल्या मानवी समाजासमोर चिरंतन सत्याचा हा कालातीत , अविनाशी  असणारा  घटक जर  नव्या आविष्कारात मांडला तरच तो त्यांना रुचतो  पचतो , आणि  तो समाज त्याचा स्वीकार करतो . प्रकृतीच्या  नियमानुसारही  प्रत्येक  गोष्टीत  प्रत्येक प्राणिमात्रात , प्रत्येक मानवात  अथवा  मानवाने  निर्माण केलेल्या विचारात कालानुरूप बदल होण्याची गरज असते. जे बदलाचा स्वीकार करत नाहीत ते कालौघात हळू हळू नष्ट होतात .              विज्ञान  आणि  अध्यात्मिकता  यामध्ये  पूर्ण  सामंजस्य निर्माण व्हावे अशा पद्धतीने  श्री अरविंदानी  आपल्या  विचारांचा  पाया  घातला आहे . विज्ञानाच्या  मर्यादा आणि विज्ञानाच्या  दिशाहीन  घोडदौडीमुळे  मानवाच्या समस्यामध्ये पडलेली  भर याबद्दल जरी त्यांनी नाराजी  व्यक्त केली  असली  तरी  समाजाच्या  प्रगतीस विज्ञानाची झालेली मदत पाहून त्यांनी विज्ञानाचे  मुक्तपणे   कौतुकही कसे केले आहे ते   पुढील  उक्तीवरून स्पष्ट होईल – “ Science has already enlarged the intellectual horizons of the race and raised , sharpened and intensified  powerfully the general intellectual capacity of mankind “  आधुनिक विज्ञान ही मुलत: ज्ञांनाचीच एक  शाखा आहे असे प्रतिपादन करून ते म्हणतात की  विज्ञानाने आजपर्यन्त जरी  भौतिकावर विजय मिळवण्यात समाधान मानले असले तरी पुढील झेप घेण्यापूर्वी त्यादृष्टीने समर्थ होण्याचीही आवश्यकता होती 

             श्री अरविंदांचा  योग जीवनाभिमुख  आणि जीवनस्पर्शी  असा आहे . भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून वैयक्तिक मोक्षप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग करण्याच्या संन्यासी वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला आहे ते म्हणतात “  We  have seen  the  result  of   the  agelong  pressure  of  the  Buddhism and  its  successor  Illusionism   No  society  dominated  by  such  denial  of  life -dynamism  can  flourish ,  Far  from  dynamic  it  becomes  static   and  from  that  static  position  it  proceeds  to  stagnation  and  degeneration  “   बुद्ध काळापासून ही प्रवृत्ती आपल्या देशात  वाढीस लागली  अत्यंत हुशार आणि बुद्धिमान माणसं , अनेक शूर वीर , अनेक थोर कलावंत जीवनाकडे पाठ फिरवून वैयक्तिक मुक्तीसाठी हिमालयात गेले .त्यांना मोक्ष मिळालाही असेल  पण  अशा  थोर  व्यक्तींनी लाथाडलेला  समाज हळू हळू  खोल गर्तेत ढकलला गेला आधिभौतिक जीवनाला तुच्छ मानल्यामुळे आपल्या देशाला फार मोठी किमत मोजावी लागली आणि म्हणून आधिभौतिक जीवनाला प्राचीन काळी असणारं वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे

             यतिवादातील आत्यंतिकता आणि कर्मठ धर्मनिष्ठा यामुळे जीवनातील आनंद आणि सौन्दर्य नाहीसे होऊन जीवन कुरूप होते ,नीरस होते  या प्रवृत्तीचा धिक्कार करून ते म्हणतात की परमेश्वर हा जसा पावित्र्यमूर्ती आहे  तसाच तो प्रेममूर्ती आहे आणि सौन्दर्यमूर्तीही आहे हे या मंडळींना समजले नाही “ To  find  highest  beauty  is  to  find  God , to reveal ,

 to   embody , to create   as  we  say  ,  highest beauty   is  to  bring  out  of  our  souls  the  living  image  and  power  of  God “   आपलं वैयक्तिक जीवन अथवा सामाजिक जीवन पूर्णत्वाला न्यायच असेल तर जीवनातील सौन्दर्य नाकारता येणार नाही असे प्रतिपादन करून ते म्हणतात –

“ A  complete and universal appreciation of beauty  and  the  making  entirely beautiful our whole life  and  being  must  surely  be  a  necessary  character  of  the  perfect  individual  and  the  perfect  society .”    

               आजची समाजव्यवस्था  अर्थप्रधान आहे आणि आजच्या मानवाला आजच्या जीवनशैलीसाठी पुरेशा अर्थप्राप्तीवाचून पर्याय नाही . वस्तूत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष  हे चार पुरुषार्थ  मानणार्‍या आमच्या संस्कृतीने ‘ अर्थ ‘ कधीही नाकारलेला नव्हता .  त्याला धर्माचे अधिष्ठान असावे , तो अधर्माने प्राप्त करू नये एव्हढाच संस्कृतीचा आग्रह होता परंतु गेल्या १००० वर्षात संन्यासवाद आणि निवृत्तीपर तत्वज्ञानातील काही विचारधारांनी त्याला वीषवत मानलं . या पार्श्वभूमीवर श्रीअरविन्द एक वेगळाच विचार मांडतात “ All wealth belongs to the Divine and those who  hold it  are trustees and not possessors . “  पुढे ते म्हणतात की सात्विक प्रवृत्तीच्या लोकांनी  संपत्तीकडे  पाठ  फिरवल्यामुळे  असुरानी  तिचा कब्जा घेतला  आणि  तिचा  वापर  स्वार्थासाठी , समाजविघातक कार्यासाठी ते करू लागले. सात्विकानी त्यांच्याशी लढून ती संपत्ति पुन्हा प्राप्त करावी आणि तिचा उपयोग दैवी कार्यासाठी करावा. यावरून एक गोष्ट आठवली —

पोंडीचेरी आश्रमातील साधकांना त्यांच्या दैनंदिन गरजा ज्या खात्यामार्फत पुरवल्या जातात त्या खात्याला माताजींनी ‘समृद्धी( प्रोस्पेरीटी)” असे नाव दिले होते ते पाहून थोर वैदिक पंडित श्री सातवळेकर  शास्त्री म्हणाले “ येथे खरी अध्यात्मिकता आहे वेदांमध्ये संन्यासमार्गाचा कोठेही उपदेश केलेला नाही . पार्थीव जीवनावर ,समृद्धीवर बहिष्कार किंवा जगाकडे पाठ फिरवून परलोकाचे चिंतन ही वैदिक शिकवण नाही माताजी तुम्हाला समृद्धीचा उपदेश देत आहेत रुक्ष जीवनाचा नाही.  जिते जागते वैदिक युग इथे जन्म घेत आहे .”

             यानंतर पुढील मुद्दा म्हणजे शिक्षणपद्धतीमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे असे ते मानतात .योग्य शिक्षण दिल्याशिवाय चांगली मानवता निर्माण होणार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.या शिक्षणात अध्यात्मिकतेचा (धार्मिकतेचा नव्हे किंवा नैतिकतेचाही नव्हे)

ठसा उमटणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते सुसंवाद , प्रेम आणि एकता या चिरंतन गुणावर शिक्षण पद्धती आधारित असावी. डॉक्टर स्टीफन व्हाइट हा अमेरिकेतील एक शिक्षण तज्ञ म्हणतो की जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे सारं जग जवळ आलं आहे . अशा परिस्थितीत जागतिक एकते साठी राष्ट्रवादाच्या जोडीने जागतिक नागरिकत्वाची संकल्पना शिक्षणातून देणं हे शिक्षणतज्ञांपुढील फार मोठे आव्हान आहे  त्यादृष्टीकोनातून श्री अरविंदांची विचारधारा आणि त्यांचे शिक्षणावरील विचार हे महत्वपूर्ण ठरतात . डॉक्टर व्हाइट काय म्हणतात ते त्यांच्या शब्दात पाहू .—–

“ 20th century  saw  the birth of a  new social phenomenon  termed globalization .  The  world  is  evolving  into  an  interconnected  social  system  producing  a  corresponding  higher  level  of  collective  consciousness  on  a  planetary  scale . Therefore  humankind  now  has  a  communal  responsibility  to  fascilitate  evolutionary  movement  towards  global social  integration , the  construction  of  a  new  social  reality  and  to  cultivate  planetary  collective  consciousness .

The  involution  of  the  divine  spirit  into  individual  consciousness  is  driving  societies  towards  increasingly  complex  and  advanced  levels  of  collective  consciousness . Global  societies  will  continue  to  evolve  towards  greater  interaction  and  convergence constructing  ever  higher  degrees  of  collective  consciousness  and  social  globalization .

The  most  significant  educational  value  of  Aurobindonian  thought  is  the  idea  that  humankind  must  become  educated  of  the  actual  possibility  of  genuine  global  cooperation

             २०व्या शतकाच्या अखेरीस माहिती तंत्रज्ञांनातील प्रगतिने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेस फार मोठी चालना मिळाली. आणि त्यामुळेच ज्ञांनाची मक्तेदारी संपुष्टात येऊन ज्ञांनाची कवाड सर्वांसाठी खुली झाली जवळ जवळ १०० वर्षापूर्वी या गोष्टीची अपरिहार्यता व्यक्त करताना श्री अरविन्द म्हणतात – “  the  universalisation  of  knowledge and  intellectual  activity  in  the  human  race  is  now  only  a  question  of  time . “   सुसंस्कृत समाजाने आपल्याकडील ज्ञान आपणापाशीच न ठेवता आपल्या भोवताली असणार्‍या अज्ञ समाजालाही द्यायला हवे असे मत व्यक्त करून ते म्हणतात की असे जर त्यांनी केले नाही तर त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते .इतिहासातील अशा प्रकारच्या अनेक घटना आपणास ठाऊक आहेत . मात्र आधुनिक समाजाने इतिहासापासून योग्य तो धडा घेतला असल्याने आपणाजवळील ज्ञान इतरांना देण्यास तो आता कटिबद्ध झाला आहे हे लक्ष्यात घेऊन श्री अरविंदानी वरील मत व्यक्त केले     

                               यानंतर पुढचा मुद्दा येतो  तो  व्यक्तिस्वातंत्र्याचा .श्री अरविन्द तर स्वत:ला

Spiritual Anarchist  मानत . याचे मुख्य कारण म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक पातळीवर आपली प्रगति साधत असताना मानवी आत्म्याला संपूर्ण स्वातंत्र्य हवे असते असे ते मानत. परंतु त्याच बरोबर अशाप्रकारचे स्वातंत्र्य उपभोगत असताना त्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये , त्यावर गदा येऊ नये असेही त्यांचे ठाम मत होते. स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व या आधुनिकाना मानवणार्‍या तत्वांवरच पोंडीचेरी आश्रमाची वाटचाल झाली आहे सर्वजण कधीही समान नसतात , समान पातळीवर नसतात ,समान कुवतीचे नसतात मात्र अशा सर्वांना आपआपल्या पातळीवर आपापली प्रगति साधण्यासाठी समान संधि मिळायला हवी

पोंडीचेरी आश्रमात कर्मयोगालाही महत्व आहे. प्रत्येक साधकाने नेमून दिलेले काम तन्मयतेने पार पाडले की मग आपली योगसाधना कशी करावी , कोणत्या पद्धतीने करावी , त्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. आश्रमाच्या सर्व व्यवहारांमध्ये पुरुष व स्त्रिया यांना समानतेने वागविले जाते. मात्र या समानतेचे बीज कशात असेल तर ,प्रत्येक व्यक्ति म्हणजे शरीर व मन यांच्या आवरणाखाली असणारा एक आत्मा आहे या दृष्टीकोनात आहे. पंडित सातवळेकर शास्त्री यांना जेंव्हा हा दृष्टिकोन समजला तेंव्हा ते म्हणाले ,” माताजी तर येथे शुद्ध आध्यात्मिक समाजाची स्थापना करत आहेत. वेदांप्रमाणे आत्म्याच्या दृष्टीने स्त्री पुरुष असा भेद नाही ज्या देशात स्वयंशक्तीची स्त्री रूपात कल्पना केली गेली त्याच देशात स्त्रीचा सतत अपमान केला गेला ,तिला वेदपठणाचाही अधिकार ठेवला नाही स्त्रीची खरी प्रगति मला येथे दिसली वैदिक आदर्श येथे प्रत्यक्षात उतरलेले दिसले. “ 

          आपल्या जीवनमूल्यांची पुन्हा नव्याने उभारणी करून एखादा नवीन विश्वधर्म निर्माण व्हावा आणि त्यायोगे प्रत्येक व्यक्तिमात्राला चिरंतनाशी सुसंवाद करता यावा असे त्यांना वाटे.

          काव्यनिर्मितीच्या प्रांगणात भावी काळातील कविता कशी असेल ते दाखवून अलौकिक प्रतिभेच्या सहाय्याने मंत्रसामर्थ्य असणारी काव्यपंक्ति कशी निर्माण होते त्याचे त्यांनी दर्शन घडविले .                                                                           

           समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून प्राचीनकाळापासून मानवतेची वाटचाल कशी झाली त्याचा त्यांनी शास्त्रशुद्ध असा आढावा घेतला आहे त्यातील विविध टप्प्यांना  symbolic , typal, conventional,  individualistic,  and  subjective  period   अशी नावे दिली आहेत . त्यातील प्रत्येक टप्प्याची वैशिष्ठ्ये सांगून पुढील टप्प्यात  मानवता का व कशी संक्रमित होते त्याचे त्यांनी शास्त्र्शुद्ध विवेचन केले आहे ,त्यातील पहिले दोन टप्पे जरी भूतकाळात जमा झाले असले तरी तिसरा टप्पा अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे चौथ्या टप्प्याचा प्रभाव वाढतो आहे आणि पाचवा टप्पा अधून मधून तुरळक डोकावू लागला आहे आणि त्यामुळेच मानवता आता सैरभर झाली आहे , सत्याच्या शोधार्थ ती तळमळू लागली आहे यातूनच ती अध्यात्मिकतेकडे संक्रमित होईल आणि मगच तिला सत्य सापडेल . हे सारं जरी स्वप्नवत वाटलं तरी त्यांचं शास्त्रशुद्ध तार्किक विवेचन विचारी मनाला पटणार आहे .

            राजकीय पातळीवर 100 वर्षापूर्वी त्यांनी अस  स्पष्ट म्हटलं आहे की जरी राष्ट्रा  राष्ट्रा मध्ये झगडे चालू असले , युद्ध होत असली तरी आपण मानवतेच्या संपूर्ण ऐक्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे यात संशय नाही . 100 वर्षापूर्वी त्यांनी जागतिक दृष्टीकोनाचा आणि जागतिक जाणीवेचा विचार केला होता आणि म्हणूनच डॉक्टर स्टीफन व्हाइट त्याच्या लेखाची अखेर करताना म्हणतो –“  Aurobindonian  thought  is  an  educational  motif  of  globalization  that  promotes  a  sense  of  Ultimacy  giving  rise  to  civil  future  of  world  unity. “

             या सर्व विचारांचा आणि त्यावर झालेल्या विविध भाष्याचा विचार केला तर  आपल्या ध्यानात येईल की जग कितीही पुढे गेल असलं तरी १०० वर्षापूर्वी श्री अरविंदानी  जीवनाच्या सर्व बाजूंवर  व्यक्त केलेले विचार आजही समर्पक आहेत ,यापुढेही ते समर्पक राहतील आणि त्यांची सत्यता मानवी समाजाला अधिकाधिक पटत जाईल  

                      ============= 0=========******=========0=============

श्री नरेंद्र नाडकर्णी

सीडी. १०१ ; सी १ श्रीरंग सोसायटी ठाणे

( हा लेख दिशा मासिकाच्या मार्च २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता )                      

Continue Reading

Previous: रोग –  रोग निवारण  –  रोग मुक्ति
Next: जीवन सौन्दर्य  

Related Stories

  • Aurobindo

जीवन साफल्य – सौंदर्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

प्राणिक सामर्थ्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

  दैवी प्रेमाची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.