येऊरचे दिवस – महाशिवरात्र ——-
यशवंत साने आणि हेमा मथुरे या मित्रांमुळे मी येऊरला गुळवणी महाराजांच्या मठात १९९५/९६ पासून अधून मधून जात होतो . धार्मिक कार्य चालणारा मठ आणि आदिवासी मुलांसाठी वसतिगृह अशा दोन संस्था या परिसरात भगवानराव पटवर्धन चालवत होते . गुळवणी महाराज आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक थोर व्यक्तींच्या पद स्पर्शाने पुनीत झालेला हा सारा परिसर अत्यंत शांत आणि रमणीय होता . तिथे गेलं की मन प्रसन्न व्हायचं . पण माझा निकटचा संबंध आला तो मात्र धर्म-तत्वज्ञान संमेलनानंतरच .
धर्म आणि तत्वज्ञान सम्मेलन ——–
१९९८ च्या ऑक्टोबर मध्ये मी निवृत्त झालो . आणि त्यानंतर केवळ ईश्वरी इच्छेने त्याच वेळी येऊ घातलेल्या एका भव्य दिव्य कार्यक्रमात स्वप्नातही नसताना मी ओढला गेलो. कौपीनेश्वर मंदिराच्या पुढाकाराने ठाण्यात दर वर्षी एक धर्म-तत्वज्ञान सम्मेलन आयोजित केलं जात असे . मात्र आयोजनाची जबाबदारी दरवर्षी कोणत्यातरी संस्थेकडे दिली जात असे . १९९९ चे संमेलन आयोजित करण्याची जबाबदारी भगवानराव पटवर्धन आणि त्यांच्या येउर येथील सद्भक्ती सेवा मंदीराकडे होती . निव्रुत्तीनंतर मी आता पूर्णपणे मोकळा झालेलो होतो . आणि त्यामुळे मी त्या कार्यात स्वताला पूर्णपणे झोकून दिलं .
लवकरच कार्यकर्त्यांची एक मोठी टीम तयार झाली . मी , हेमा मथुरे , मनोहर जोशी , बाळासाहेब मोकाशी , महेश गुप्ते , वैद्य पती-पत्नी , सुळे पती-पत्नी , दीक्षित बाई , गोरे बाई आणि इतर अनेक . आयोजनाच काम जवळ जवळ ६ महीने चालू होतं . माझ्यावर मुख्य कार्यवाहाची जबाबदारी होती . ६ महीने मी रोज सकाळी १० वाजेपर्यंत भगवानरावांच्या कचेरीत जात असे . अनेकदा त्यांचे समवेत पुण्यास गेलो , मुंबईस गेलो . ठाण्यातही अनेकांना भेटलो .
संमेलन दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललं . नानजी खीमजी कॉलेजच्या हॉल मध्ये जवळ जवळ ७००/७५० मंडळींची उपस्थिती होती . सकाळी नाश्ता , दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा सर्वांना देण्याची आम्ही व्यवस्था केली होती . संमेलनाचे अध्यक्ष होते माधवानंद स्वामी अर्थात डॉक्टर माधव नगरकर . संमेलनात डॉक्टर शुक्ल , डॉक्टर श्रीवास्तव , कल्याणी नामजोशी अशा अनेक थोर व्यक्तींची भाषणे झाली . भारतीय संस्कृतीवर परिसंवाद झाला . संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी भव्य शोभायात्रा काढली होती . एक सुंदर स्मरणिका काढली . शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक निबंध स्पर्धा घेतली . स्टेजवर मागील बाजूस शिकागो परिषदेचा भव्य सीन उभारला होता . एकूण सर्वच दृष्टिनी परिपूर्ण आणि भव्य दिव्य असे हे संमेलन झाले .
संमेलनाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील अनेक थोर व्यक्तींशी माझा संबंध आला . धर्म तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीची चांगली ओळख झाली . अध्यात्मातील निरनिराळे प्रवाह जवळून पाहिले , समजून घेतले . आता 20 वर्षांनंतर विचार केला तर असं वाटतं की माझ्या अध्यात्मिकतेच्या वाटचालीस या संमेलनाने भक्कम पाया दिला . नियती जणू काही मी निवृत्त होण्याची वाट पाहत होती . Everything was planned from above .
महाशिवरात्र —–
या काळात तिथे अनेक यज्ञ , याग जवळून अनुभवता आले , त्यात सहभागी होता आलं . विशेषत: महाशिवरात्र आली की अजूनही येउरमधली महाशिवरात्र आठवते . कार्यक्रमाची सुरूवात अग्नी प्रज्वलनाने होत असे. सायंकाळी ५ च्या सुमारास मावळत्या सुर्याच्या साक्षीने आणि डॉ. आपटे यांच्या वेदमंत्रांच्या घोषात गारगोटी घासून अग्नी प्रज्वलित केला जायचा . हा अग्नी त्यानंतर १२ तास चालणाऱ्या यामपूजांमध्ये सतत प्रज्वलित रहायचा प्रत्येक यामपूजा २ II तास चालायची . एकूण चार यामपूजा संपन्न व्हायच्या . रात्री निषिध काळात १ तास पूजाविधी बंद असे . निषिध काळ सुरू होण्यापूर्वी वीजेचे सर्व दिवे बंद केले जायचे .असायचा तो फक्त मंदिरातील समया आणि निरांजनांचा मंद प्रकाश . आजूबाजूला गर्द झाडी असलेल्या त्या मंदिराच्या परिसरात ध्यान-धारणेस पोषक असं एक वेगळंच प्रशांत वातावरण निर्माण होत असे आणि अशा त्या सुरम्य पण गंभीर वातावरणात सुप्रसिध्द सतारवादक श्री मारुती पाटील यांचे सतारीचे स्वर एका वेगळ्याच जगात घेऊन जायचे .
यामपूजा करून आपलं शरीर आणि मन शिवचरणी लीन करावे आणि निषिध काळात ध्यान-धारणा करून शिवास प्रसन्न करावे ही मूळ संकल्पना . निषिध काळात शिवाचे प्रुथ्वीवर भ्रमण चालू असते असे मानले जाते.
चारही यामपूजा संपन्न झाल्यावर दुसरे दिवशी अग्नीतेज उगवत्या सुर्यास वेदघोषात परत करून अग्नी विझवला जाऊन सोहोळ्याची सांगता होत असे . अशा या अद्वितीय धार्मिक सोहोळ्यात सहभागी होता आले हे आमचे परमभाग्य .
जनसंघाचे ठाण्यातील एक ज्येष्ठ नेते आणि ठाणे जनता सहकारी बँकेचे संस्थापक असलेल्या खुद्द भगवानराव पटवर्धन यांचे समवेत काम करण्यास मिळणे हाही एक मोठा अनुभव होता . याशिवाय निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक थोर सत्पुरूष तिथे येत असत , त्यांचे विचार ऐकायला मिळाले , काहींचा सहवास लाभला . निव्रुत्तीनंतरच्या जीवनाला सुयोग्य दिशा देणारा असा तो काळ होता