आज 8 नोव्हेंबर . पु ल देशपांडे यांची 101वी जयंती . आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे या दोन थोर साहित्यिकांनी मराठी साहित्यातील विनोदी वांग्मयावर अधिराज्य गाजवलं . विशेष म्हणजे या दोघांच्या चतुरस्त्रतेपुढे सारा महाराष्ट्र नतमस्तक झाला . परंतु या दोघांच्या विनोदाची जातकुळी जशी वेगळी होती तशीच त्यांच्या चतुरस्त्रतेची क्षेत्रेही वेगळी होती . समाजातील ढोंग आणि व्यंग दाखवताना अत्र्यांनी केलेला विनोद हा फटकार्यासारखा होता क्वचित एखादा फटका कमरेखालीसुद्धा बसायचा . याउलट इंग्रजी साहित्यातील पी जी वूडहाऊसची आठवण करून देणारा पुलंचा नर्म विनोद गुदगुल्या करून हसवणारा होता . ज्या व्यक्तीवर केला असेल त्यालाही दुखावणारा नव्हता . अत्रे हे बराच काळ राजकीय फड गाजवित होते मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांच्या सभा परिणामकारक ठरल्या . पूलंनी राजकीय सभा गाजवल्या त्या फक्त आणीबाणी पर्व संपल्यावर . त्यापूर्वी आणि त्यानंतर ते कधीही त्या प्रांतात शिरले नाही . दोघांच्याही लेखणीने जशी आपली हसून मुरकुंडी वळवली तसेच डोळ्यात पाणीही आणले . पुलंचे किस्से नेहमीच आठवतात पण मला मात्र आठवते ते अंदमानला सावरकरांच्या कोठडीचे दर्शन घेतल्यावर पूलंनी केलेले भाषण . अत्र्यांनी पुलंसारखे केलेले लिखाण निदान माझ्या पाहण्यात नाही मात्र पुलंचे एक फटकारे मारणारे जळजळीत लिखाण अत्र्यांच्या शैलीची आठवण करून देणारे आहे . १९६२ साली चीन बरोबर झालेल्या युद्धात आपला जो दारुण पराभव झाला त्यावर दि वि गोखले यांनी लिहीलेल्या पुस्तकाला पुलंची प्रस्तावना आहे . त्यातील एक अविस्मरणीय भाग —–
—- ” हा लहानसा ग्रंथ म्हणजे आमच्या नेत्यांच्या नाकर्तेपणाची , नामुष्कीची आणि एका राजकीय न्युंनगंडाने पीडित अशा लोकांची केविलवाणी कथा आहे . घरच्या म्हातारीलाच काळ ठरलेल्या महापुरुषांच्या महापतनाचा हा ताजा इतिहास आहे . आपल्या राजकारणपांडित्याने दुष्टांतल्या दुष्टांचे देखील हृदय परिवर्तन करू म्हणणार्या अहंकाराच्या पराजयाची ही विलापिका आहे . ‘ रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति ‘ या षंढसुत्राला मानवतेचे महन्मंगल स्तोत्र समजणार्या वाचीवीरांच्या भ्रमनिरासाची ही मर्मभेदक कहाणी आहे . शत्रू दाराशी धडका देत असताना जगाला शांतिपाठ देत हिंडणार्या आणि स्वताचे घर पेटत असताना दुसर्याची कोळीष्टके झाडायला धावून जाणार्या आमच्या वांझोटया नेतृत्वाचे जगभर जे हसे झाले त्याचा हा प्रथमाध्याय आहे . दुबळ्यांची अहिंसा आणि नपुंसकाचे शील याला कवडीचीही किंमत नसते , हा जगाच्या इतिहासाने लाख वेळा शिकवलेला धडा विसरल्याबद्दलची ही शिक्षा आहे आणि शिवरायांचे प्रताप आठवायचे , तिथे हिंसा-अहिंसेच्या विचारांचा खुळखुळा वाजवित बसण्याच्या पापाबद्दल घ्यावयाचे हे प्रायश्चित्त आहे … ”