तसं पाहिलं तर गेल्या डिसेंबर जानेवारीपासूनच करोनाचे ढग जमायला सुरुवात झाली होती . पण त्याची व्याप्ती एवढी वाढेल अशी कोणालाच कल्पना करता आली नाही . किंबहुना ज्या युरोप अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात जेंव्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव झाला तेंव्हा तर तेथील वैद्यकीय शास्त्रातील तज्ञ ठणकावून सांगत होते की हा वायरस 35 अंश c तपमानाला नष्ट होईल . साहजिकच भारतासारख्या उष्ण कटिबंधातील लोकांना वाटलं की फार फार तर एप्रिल महिन्यानंतर कोरोंनाचा प्रभाव कमी होईल . काही भविष्यावेत्त्यांनीही छातीठोकपणे सांगितलं की १५ एप्रिल नंतर कोरोंना नाहीसा होईल . आणि म्हणूनच जेंव्हा २४ मार्चला पहिला लॉकडाउन जाहीर केला तेंव्हा असं वाटलं की बस एवढे २/३ आठवडे शिस्तीत काढले की आपण मोकळे होऊ.. या अभूतपूर्व घटनेला सामोरे जातानाही केवढा उत्साह होता लोकांमध्ये . प्रत्येकजण आपापले वेळापत्रक ठरवत होता , गरम पाणी पित होता , हात सारखे धूत होता , जनसंपर्क टाळत होता . त्यानंतर दूरदर्शन आणि सोशल मीडिया वर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांचे पेव फुटले . रोज एक नवीन तज्ञ नवा उपदेश करू लागला . आणि मग एक लॉकडाउन संपला , दूसरा संपला . हां हां म्हणता ६ महीने सरले . जगातील रुग्णांची संख्या ३ कोटीवर पोहोचली तर भारतातील संख्या ७० लाख झाली . भारतात १ लाख लोकांनी प्राण गमावले तर जगात १० लाख मृत्यूमुखी पडले . असंख्य लहान मोठे कारखाने बंद पडले आहेत . ५ महीने हॉटेल्स , मॉलस , सिनेमागृह बंद आहेत .अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले . भारताच्या इतिहासात प्रथमच रेल गाडी बंद झाली . राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली . खाजगी कंपन्यांमध्ये काम करणार्या अगणित लोकांच्या नोकर्या गेल्या तर अगणित लोकांना निम्मा पगार मिळतो आहे . हे महासंकट किती काळ टिकणार , कधी आटोक्यात येणार , अर्थव्यवस्था कधी सुधारणार , कशी सुधारणार ? खरे म्हणजे यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर कुणालाही देता येणार नाही .
आणि म्हणूनच अशा या महाभयंकर परिस्थितीत सर्वसाधारण माणूस ईश्वराला शरण जातो आहे , त्याची करुणा भाकतो आहे , त्याची प्रार्थना करतो आहे आणि या परिस्थितीतून सुखरूपपणे सोडवण्याची विनंती करतो आहे . तर या परिस्थितीत होरपळणारे दुसरे काही दुर्दैवी जीव टाहो फोडून विचारीत आहेत कुठे आहे देव ? आणि असलाच देव तर मानवाला हे सारे अकस्मातपणे का भोगावे लागत आहे ? सर्वसामान्यांच्या अशा प्रश्नांना अधिकारवाणीने उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यास आज कुणीही पुढे येताना दिसत नाही आणि त्यामुळे मानवी श्रद्धेला बसत असलेली ही ठोकर पाहून नास्तिकांचे काही अग्रणी संतोषही पावत आहेत .
या संपूर्ण पार्श्वभूमीवर माझेही विचारचक्र चालू होते . खरेच , का म्हणून चालू आहे हा महाभयंकर संहार ? दुसर्या महायुद्धानंतर ७५ वर्षानी या संहाराने सार्या जगाला ग्रासून टाकले आहे . केवळ नरसंहारच नव्हे तर अनेक उद्योग , व्यवसाय उध्वस्त झाले आहेत . त्यांचा जम पुन्हा बसेल का , सांगता येत नाही . लोकांच्या आवडी निवडी बदलतील गरजा बदलतील , क्रयशक्तीचा प्रश्नही असेल . यातून कशी काय आणि कोणती नवनिर्मिती होणार ? केवळ भारतात नव्हे तर सार्या जगातील व्यवस्थेत काही आमुलाग्र बदल होणार का ? तसे पहिले तर गेल्या काही वर्षात भारतातील व्यवस्थेत आमुलाग्र बदल होताना दिसत होता . सुरक्षा व्यवस्था मजबूत होत होती , सुरक्षा आणि उद्योग-व्यवसाय या सर्वांना पूरक ठरणारी रस्तेबांधणी , ऊर्जाक्षेत्र , रेल्वे आणि नद्यांवरील पूल यात झपाट्याने वाढ होत होती , उद्योग-सहजता कैक पटींनी वाढली मात्र एवढं सारं करूनही फार मोठा फरक दिसत नव्हता . अशा या वेळी कोरोंना प्रकरण निर्माण झाले . ज्या तर्हेने चीनने ते हाताळले त्यामुळे सार्याच राष्ट्रांचा रोष चीनला पत्करावा लागला . त्यात चीनला भारतावर हल्ला करण्याची दुर्बुद्धि झाली आणि त्यामुळेही सारी राष्ट्रे भारताच्या अधिक जवळ आली आणि त्यांना यापुढे सारी गुंतवणूक भारतात करावी असे वाटू लागले . जागतिक पातळीवरील व्यवस्थेत असा हा फार मोठा बदल घडून येईल का ?
पण या विचाराबरोबर आणखी एक विचार मनात आला , इतिहासाची पुंनरावृत्ती तर होत नाही ना ? बरोबर १०० वर्षापूर्वी जगाने अशाच एका महामारीचा अनुभव घेतला होता . लाखो माणसे त्यावेळी एन्फ्लुएंजाच्या साथीने मृत्यू मुखी पडली होती . संहारानंतर सुरू होणार्या नव-निर्मितीवर ताबा मिळवण्यासाठी एका बाजूने दैवी शक्ति पुढे येऊ लागल्या की दुसर्या बाजूने आसुरी शक्ति जोर करतात . आपल्या पुराणातील कथा वाचल्या तर लक्ष्यात येतं की सर्व आसुरी शक्ति एकत्र येण्यास वेळ लागत नाही . अशीच काहीशी परिस्थिति १९२०च्या महामारीनंतर निर्माण झाली व त्यातूनच दुसर्या महायुद्धाचा सर्वनाशी वणवा पेटला कोट्यावधी लोकांची आणि त्यांनी केलेल्या निर्मितीची आहुति त्या महाभयंकर यज्ञात पडल्यावरच तो शांत झाला . आणि मग नव्या दिशेने नव निर्माण सुरू होऊन मानवाने अल्पावधीत कल्पनातीत झेप घेतली होती .
जागतिक पातळीवर दुसर्या जागतिक महायुद्धात हा जो फार मोठा संहार झाला होता त्या महायुद्धापूर्वीचे जग वेगळे होते . महायुद्धानंतर मानवी समाजाने सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगति केली . पूर्वी बोटीने अमेरिकेत जाण्यास २/३ महीने लागायचे ते आता विमानाने १५/२० तासात जाता येते . दूरध्वनी क्षेत्रात झालेली प्रगति तर कल्पनातीत आहे . वेग , वेग आणि प्रचंड वेग हा जवळ जवळ सर्वच क्षेत्रातील मूलभूत नियम बनला आहे . मानवाचे सारे जीवन या अति-वेगाने आणि त्यातून निर्माण होत असलेल्या जीवघेण्या स्पर्धेने व्यापून टाकले आहे पण चिंतनशीलतेला फाटा देऊन झटपट यशश्री मिळवण्यामुळे अनेक क्षेत्रात आपल्याला mediocracy निर्माण झालेली दिसते . या सार्याला आता कुठे तरी Brake लागायला हवा होता . दुसर्या महायुद्धातील नरसंहाराचा फारसा फटका भारताला बसला नव्हता आणि त्यानंतर झालेल्या प्रगतीतही भारताचा वाटा नगण्यच होता . स्वातंत्र्यप्राप्ती नंतरची ४० वर्षे तर आमची प्राथमिक प्रगतीतच खर्च झाली . आता मात्र परिस्थिति बदललेली आहे . नरसंहार आणि जीवनपद्धतीची उध्वस्तता दोन्ही गोष्टी आमच्याही वाट्याला आल्या आहेत . नवनिर्माणात मानवी समाज कोणत्या प्रगतिची झेप घेणार ते आता अगम्य आहे . पण त्या प्रगतीत अथवा त्या बदलात आपला ठसा उमटवण्याची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती आता भारताने निश्चितच प्राप्त केली आहे . पण तरीही प्रश्न राहतोच की अशा नवनिर्माणाच्या आधी हे सारे उध्वस्त का होते आहे ? नवनिर्माणाच्या आधी अशी उध्वस्तता अपरीहार्य असते का ? आणि मग हा संहार कधी थांबणार ?
हे सारे विचारचक्र चालू असताना अचानक श्रीअरविंदांच्या समाज-शास्त्रीय विचारांचे भाष्यकार किशोर गांधी यांचे ” Social Philosophy of Sri Aurobindo and the New Age ” हे पुस्तक हातात आले आणि चाळता चाळता समोर शब्द आले ——- ” Will the New Creation be Preceded by Destruction ? ” नवनिर्मिती होण्यापूर्वी प्रचंड संहार होईल का ? १२ सप्टेंबर १९६५ रोजी किशोर गांधी यांनी दिलेल्या भाषणाचा हा मथळा होता .
काय आहे हा विचार ? पण तो विचार समजून घेण्यापूर्वी त्यामागील घटनाक्रम प्रथम जाणून घेऊ . २९ फेब्रुवारी १९५६ रोजी सायंकाळच्या प्रार्थंनेंनंतर पोंडीचेरी आश्रमाच्या माताजींनी जाहीर केले की अतिमानसाचा प्रकाश , शक्ति आणि चेतना यांचे पृथ्वीतलावर अवतरण झाले आहे . एका नव्या युगाची ही नांदी होती . उत्क्रांतीच्या पुढल्या टप्प्यावर जाण्यासाठी मानवतेला आता सज्ज होण्याची गरज होती . अखिल मानवतेच्या जीवनात काहीतरी आंतर्बाह्य आमुलाग्र बदल होणार आहे याची अनेकांना जाणीव होऊ लागली होती . मात्र काय बदल होईल , कसा होईल ते कुणालाच समजू शकत नव्हतं . शिवाय जेंव्हा कधी असा बदल घडून येत असतो तेंव्हा त्या बदलाला विरोध करणार्या काही शक्ति , आसुरी शक्ति , जोरदारपणे विरोध करू लागतात . आणि म्हणून किशोर गांधी एक प्रश्न समोर ठेवतात की अशा या परिस्थितीत नवनिर्माणाची शक्यता निर्माण करून मानवतेला उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर नेऊ पाहणारा ईश्वर त्या विरोधी शक्तींशी कसा काय सामना करतो . मानवतेच्या प्रगतीला खीळ घालणार्या त्या विरोधी शक्ति आणि त्यांनी निर्माण केलेली कुव्यवस्था या सार्यांचा तो प्रथम नाश करतो का ? किशोरजी म्हणतात सर्वसामान्य माणसाची ईश्वराची संकल्पना असते ती एक प्रेममूर्ती म्हणून , करुणामूर्ती म्हणून . परमेश्वराची संहार करणारी प्रतिमा त्याला धक्का देते , भयंकर वाटते मात्र विश्वाचा एकूण व्यवहार पाहिला तर आपल्या ध्यानात येईल की या वैश्विक प्रणालीत निर्मिती आणि संगोपन किंवा संवर्धन यांना जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व संहाराला आहे . प्रथम संहार , नाश केल्याशिवाय नवनिर्मिती होऊच शकत नाही . श्रीअरविन्द म्हणतात —— ” Destruction is always a simultaneous or alternate element which keeps pace with creation and it is by destroying and renewing that the Master of Life does His long work of preservation . More , destruction is the first condition of progress . “
या सृष्टीच्या कार्य प्रणालीतील संहाराचे महत्व कळले , त्याची गरज कळली पण दूसरा प्रश्न कायम आहे . हा संहार कधी थांबतो आणि कसा थांबणार ?
किशोर गांधी म्हणतात – ती एक उत्क्रांतीच्या निम्न स्तरावरील तात्पुरती गरज आहे कारण त्या स्तरावर माणूस त्याच्या इगोयुक्त जाणिवेमुळे अज्ञानात गुरफटलेला असतो , आणि अंधपणाने निम्न प्रकृतीच्या शक्तिच्या प्रभावाखाली असतो. यामुळे वैश्विक शक्तीच्या प्रागतिक इच्छेला तो पुरेसा प्रतिसाद देऊ शकत नाही . एवढेच नव्हे तर कित्येकदा तो खोटेपणावर आधारलेल्या आसुरी शक्तींच्या हातातले खेळणे बनतो आणि दैवी सत्याच्या , नवनिर्मितीच्या प्रगटीकरणाला विरोधही करतो . यातूनच ती जुनी व्यवस्था उध्वस्त करण्याची गरज निर्माण होते . ईश्वराला हा संहार केवळ संहारासाठी करण्यात आनंद नाही आणि केवळ संहारकर्ता हे त्याचे स्वरूपही नाही . जेंव्हा माणूस जाणीवपूर्णतेने ईश्वराला प्रतिसाद देऊ लागतो , ईश्वराची इच्छा समजून घेतो , संहाराकडे दुर्लक्ष्य करून नवनिर्मितीला उन्मुख होऊ लागतो तेंव्हा संहाराची गरज संपुष्टात येऊ लागते . ” When higher nature of man begins to consent to God’s will , then God also changes his manner of dealing with him . The fierce and terrible face of the Destroyer changes into the sweet and smiling face of the Friend ”
जेंव्हा समाज परमेश्वरी इच्छेला समजून घेऊन नवनिर्मितीला उन्मुख होईल तेंव्हा संहार संपुष्टात येईल आणि संहारकर्त्याच्या भयानक चेहेर्याचे रूपांतर मित्रत्वाच्या हसर्या , गोड चेहेर्यात होईल हाच विचार आजच्या परिस्थितीत मानवाला दिलासा देणारा आहे .
अर्थात , त्यामुळे आजचे संकट संपुष्टात येईल पण नव-निर्मितीवर ताबा मिळवण्यासाठी आसुरी शक्ति पुढे सरसावण्याची शक्यता नाकारता येणार नाही . सध्या मध्य युरेशियात आणि दक्षिण-पूर्व पॅसिफिक भागात जे काही घडत आहे त्यावरून इतिहासाची पुंनरावृत्ती अटळ आहे असे वाटू लागले आहे . तसे झाल्यास दैवी शक्तींना एकत्र येऊन आसुरी शक्तींवर विजय मिळवावा लागेल . त्यानंतरच खर्या नव-निर्माणास सुरुवात होईल .
गेल्या ५/६ वर्षात योग , आयुर्वेद आणि अध्यात्मिकता यात जागतिक पातळीवर जे काही बदल घडून आले त्यावरून असे वाटते की यावेळी होणारा बदल केवळ आर्थिक व औद्योगिक पातळीवर नसेल तर सांस्कृतिक व आध्यात्मिक पातळीवरही घडून येईल . शेकडो वर्षे जपलेल्या जीवनमूल्यांची गेल्या ६०/७० वर्षात हेळसांड झाली होती . पण आता ती जीवनमूल्ये आणि नव्या युगाची मूल्ये यांच्या समन्वयातून नव विचारांची निर्मिती होईल आणि भारत त्या दृष्टिकोनातूनही जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका पार पाडेल , सार्या जगाला मार्गदर्शन करू शकेल असा विश्वास आता निर्माण झाला आहे . आणि त्यातूनच फार मोठे नवनिर्माण सुरू होईल .
================= $$$$$$$$$$$$$$$$ =====================
——- नरेंद्र नाडकर्णी .