आपला इतिहास काहीही असो , गेली काही शतके आपल्या देशात जीवनातील सौंदर्य नष्ट झाले आहे . आपण जीवनाचे जे तत्वज्ञान स्वीकारले आहे त्यामध्ये सौंदर्याला स्थान नाही . रोजच्या जीवनात आपण आनंदाला हद्दपार केले आहे. साध्या रहाणीच्या नावाखाली आपण आपला वैभवशाली इतिहास , सौन्दर्यदृष्टी , निसर्गातील आनंदात सहभागी होण्याची वृत्ती व निर्मितीच्या सर्व पायर्यांवरील म्हणजे पशुपक्षी , वृक्षवल्ली, देव, या सर्वात आढळणारे सौन्दर्य व आनंदापासून स्वता:ला मुक्त केले आहे .
उपनिषदात एक अवतरण आहे – ” हे सर्व विश्व आनंदातून निर्माण झालेले आहे . त्या आनंदातून सर्व जीवन , जीवनयात्रा चालत आहेत . त्या आनंदातच सर्वांना जीवन संपल्यावर परतायचे आहे . हा आनंद जीवनाचा मूळ स्रोत आहे , तो निर्मितीच्या झर्याचा उगम आहे .”
असे आहे तर या जगात फारसा आनंद , फारसे सुख का दिसत नाही ? श्री अरविन्द आणि माताजी म्हणतात की जीवनातील आनंद , जीवनातील सौन्दर्य याला आपण मुकतो , कारण जीवन जगण्याची कला आपल्याला अवगत नाही , ती कला आपण विसरून गेलो आहोत . जीवन जगण्याचे एक शास्त्र आहे , एक कला आहे , पण आपण यांत्रिक पद्धतीने जीवन घालवतो.
जीवनाला अर्थ आहे , आपल्या जन्मालाही अर्थ आहे . आपल्या प्रत्येकामध्ये असणारा परमेश्वरचा अंश याचा आपणास साक्षात्कार झाला पाहिजे . आपल्या जीवनक्रमात परमेश्वराचे जतन करणे , दयाबुद्धी , उपकार , पावित्र्य व सुख याचा प्रत्यय घेणे जमले पाहिजे . आपला देश वैशिष्ठ्यपूर्ण आहे कारण आपण परमेश्वराची पूजा सौन्दर्य , आनंद अशा स्वरुपात करतो व म्हणून आपण परमेश्वराला श्यामसुंदर असे नाव दिले आहे . आपणाला देवाची भीती वाटत नाही , आपल्याला त्याची प्रीती वाटते . विश्वात परमेश्वर अवतरतो व प्रकट आहे . आपल्या मनात ज्ञांनाच्या रूपाने , आपल्या हृदयात प्रेमाच्या रूपाने , आपल्या जीवनात शक्तीच्या रूपाने , आपल्या बाह्य स्वरुपात सौंदर्याच्या रूपाने परमेश्वराचे अस्थित्व प्रकट होत असते .
सौंदर्य म्हणजे काय ? सौन्दर्य म्हणजे प्रत्येक अवयवाचा प्रमाणबद्ध , योग्य , नियंत्रित , सुबद्ध आविष्कार . सौन्दर्य केवळ आपल्या चेहेर्यावर नसते , परंतु तुम्ही कसे चालता , तुम्ही कशा हालचाली करता , तुम्ही तुमचे आयुष्य कशा पद्धतीने नियंत्रित करता या सर्वात सौन्दर्य आहे . सौन्दर्य आकारात आहे , सौन्दर्य हालचालीत आहे , तालात आहे , ते विचारात आहे . चांगल्या विचारलहरी प्रत्येकाच्या मनात आनंदाच्या लहरी निर्माण करतात . जे हृदय इतरांबद्दलही प्रेमाने भरलेले असेल , तर ते सुंदर असते . तुम्ही नेहमी सर्वांचे भले व्हावे अशी इच्छा करता . तुम्ही स्वत: सुखी असता व इतरांना व तुमच्या सहवासात येणार्या दुसर्या माणसानाही सुखी करता . धैर्य , त्याग , वीरवृत्ती यासारखे गुण जीवनाच्या आकृतिबंधाला सौन्दर्य मिळवून देतात . वैशिष्ठ्यपूर्ण प्रमाणबद्धतेत व शारीरिक जीवनातील आकृतीबंध यातूनही हे सौन्दर्य प्राप्त होते.
देव तुम्हाला अनंतहस्ते देत असतो . तुमचे आई – वडील , तुमचे गुरुजन , तुमचे समाजसेवक या सर्वांकडून तुम्हाला ज्ञान मिळत असते . पण तुम्ही जर जागृत असाल तर त्या प्रत्येक गोष्टीमागे तुम्हाला परमेश्वराचा हात दिसेल. प्रत्येक गोष्टीचा सर्वतोपरी वापर केला पाहिजे . त्या फुकट घालविणे , इतस्तत: टाकून देणे , त्यांचा योग्य तो आदर न करणे हे चूक आहे .कारण प्रत्येक जड वस्तूमध्ये एक चेतना आहे . म्हणून वस्तु मनुष्यस्वरूपी आहे असे मानून तिचा वापर केला पाहिजे . हे एक सौंदर्याचे अंग आहे . सर्व वस्तु व्यवस्थित ठेवणे याला एक सौंदर्यदृष्टी लागते . माताजी जेंव्हा जपानमध्ये गेल्या होत्या तेंव्हा जपानी घरातून त्यांना ती सौंदर्यदृष्टी दिसली ज्या प्रकारे जपानी लोक पुष्परचना करतात , बागा फुलवतात , गिरिशिखरावर सुंदर मंदिरे बांधतात त्या सर्वात त्यांची सौंदर्यदृष्टी दिसून येते . जपान मध्ये सौंदर्याचा आत्मा आला आहे असे माताजींचे मत होते . जपानी लोकांचा चहाचा समारंभ , त्यांची घरामध्ये घेण्याची पद्धत या सगळ्यात सौन्दर्य आहे , उच्च अभिरुचि आहे , सुसंवाद आहे म्हणून आनंद आहे .
आपल्या भारतात सुद्धा आपण नेहमी एक मन , एक हृदय , व एक विश्व हे सर्व परमेश्वराचे उद्यान आहे असे समजत असू . ज्या वेळेला आपल्या येथे बुद्धधर्माचा प्रसार झाला तेंव्हा ती सौंदर्यदृष्टी व जीवनातील आनंद भोगण्याची वृत्ती यांचा धिक्कार करण्यात आला . लोकांनी मुंडन करण्यास सुरुवात केली . सुंदर वस्त्रे धरण करण्याचे सोडून दिले . या सर्व गोष्टींचा निषेध करून त्यागामुळे आपल्या संस्कृतीला एक वेगळे वळण लागले .
आपले उत्तम शरीर देवाने आपणास दिलेले आहे ते धारण करण्याचे नाकारणे , अर्धपोटी राहून त्या शरीराला शिक्षा करणे याचा आपल्याला अधिकार नाही . आपल्या शरीरामध्ये परमेश्वराचे एक मंदिर आहे या दृष्टीने त्याच्याकडे पहावे .आपण ते शरीर पवित्र , सुंदर व मंगल ठेवले पाहिजे .
जड वस्तूंचा आदरपूर्वक वापर करणे , त्याला एका शिस्तीत ठेवणे , वह्या , पुस्तके , पेन , कपडे , यांच्या वापरामध्ये एक अभिरुचि बाळगणे हे लहान वयातच शिकायला हवे .
मानसशास्त्राचे एक तत्व आहे की , जे तुम्ही पुन्हा पुन्हा बघता , तेच तुमच्या मनावर ठसते , ते तुमचं स्वभाव होतेच . त्यामुळे तुमच्या नजरेसमोर जर अमंगळ नकारात्मक रुक्ष असे दिसत गेले तर तुमचे मनसुद्धा आपोआप रुक्ष होते . तुमची सौन्दर्यदृष्टी नष्ट पावते आणि काही काळांनंतर वैभव , सौंदर्य व आनंद यांचा तुम्हाला तिटकारा वाटू लागतो
श्री अरविंदांच्या तत्वज्ञानात जग व परमेश्वर यात काही फरक नाही . परमेश्वर सर्वत्र आहे . ज्या वेळेला तुम्हाला प्राणिमात्रात परमेश्वर दिसेल , गरीब भिकार्यात दिसेल , धनाढ्य माणसात दिसेल , एका फुलात दिसेल तेंव्हा तुमची मनोवृत्ती उन्नत होऊन आनंदाचा प्रवाह तुमच्या शरीरातून वाहू लागेल . कितीही कठीण परिस्थिति आली तरी तुम्ही सुखाने आयुष्य जगू शकाल . तुमच्या आयुष्याला एक नवा अर्थ येईल .
आपले ऋषि म्हणतात , ‘ परमेश्वर स्वत:च आनंद रसरूप आहे , रसौ वै स:| ‘ जीवनात आनंद भरला आहे याची जाणीव तुम्हाला जेंव्हा होईल तेंव्हा तुमच्यावर आलेल्या संकटांचा चेहेरामोहरा बदलून जातो . हे जग म्हणजे परमेश्वराची लीला आहे असे एक तत्वज्ञान सांगते , याउलट दुसरे तत्वज्ञान म्हणते जग म्हणजे माया आहे . ती फसवी आहे , लटकी आहे . तिचा त्याग करा आणि स्वर्गात जा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल . खरे म्हणजे जग ही परमेश्वराची लीला आहे तेंव्हा तीत परमेश्वराचे गुणधर्म आहेत . म्हणजे सौन्दर्य आणि सुसंवाद व सुख हे आपण अंगात बाणवावे . कोणालाही मरण आवडत नाही . कोणालाही जग सोडावेसे वाटत नाही . कितीही गरीब असला आणि त्याच्यावर कितीही संकटे आली तरी त्याला अंत पाहावं असे वाटत नाही . त्याच्या अंतर्यामी खोल हा जीवनाचा आनंद भरून राहिलेला असतो व जर या जगातील सर्व दू:ख व कष्ट एकत्र केले व सर्व आनंद व सुख एकत्र केले तर आनंदाचे पारडे नेहमी जड असते म्हणून माणसाच्या मनात जगण्याची तीव्र इच्छा असते .
संकलन — नरेंद्र नाडकर्णी
मूळ इंग्रजी लेख — श्री माधव पंडित
मराठी रूपांतर —- श्री सुहास टिल्लू