

गणपती बाप्पा मोरया !!
खरं सांगा हं, तुम्ही सुरात म्हटलं की नाही ?
म्हटलंच असणार ! कारण मराठी माणूस हा गणपती आले की त्याच बाप्पाच्या धुंदीत वावरायला लागतो.
आणि मराठीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांसाठी गणपती हा एक सण नसून एक ‘इमोशन’ आहे. [त्याचं अस्तित्व आहे(?)].
It is the heartbeat of the State!
राज्यात थोड्या-फार फरकाने गणपती बाप्पा पूजन केले जाते. परंतु सार्वजनिक गणपती सुरु होण्याआधीपासून कोकणात घराघरात गणपती पुजायची पद्धत होती आणि आजही ती परंपरा नवीन पिढ्या तितक्याच उत्साहाने अभिमानाने पाळत आहेत. कोकणी माणसाचा हा सर्वात आवडता/अभिमानाचा सण, खर म्हणजे हा सण कोकणी माणसाची आयडेंटिटीच आहे म्हणाना . प्रत्येक कोकणी माणूस दीड दिवस गणपती समोरच दिसणार. आपल्या घरात नसेल तर दुसऱ्याच्या, पण तो गणपतीत गणपतीला भेटल्याशिवाय राहणार नाही !
गणपतीत कोकणात जणार्यांचे इतके विनोद त्या काळात येतात ते काही तितकेसे खोटे ही नाहीत. त्यांचं सोवळं-ओवळं, त्यांची खूप आधी पासून तयारी, म्हणजे नवीन कालनिर्णय आलं की पहिले गणपती कधी येतोय ते बघायच, वगैरे वगैरे आणि इतकं सगळं करून बहुतांशी घरात दीड दिवसांचा किंवा फार फार तर पाच दिवसांचा गणपती असतो.
गणपती बसले हा वाक्प्रचार कोकणात नाही. तो मुंबईचा छे बहुधा पुण्याचा असावा; मुंबईत बसायला वेळ आहे कुणाकडे? असो. मखर, सजावट, देखावे, रोषणाई हे सगळं मुंबई पुण्यात. आमच्या कोकणात असते ती “माटोळी” किंवा आमच्या मालवणीत “माटवी”. आता माटवी म्हणजे काय ते ऐका आणि बघाच….
माटवी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटवी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची चौकट वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.
कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्या बहाराने ते अजून नटून जाते. माटवी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटवी मध्ये केला जातो.
माटवी मधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ( पाडलेला नाही), शिप्टा आणि तवसा( खूप मोठ्या प्रकारची काकडी). ह्या शिवाय माटवी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो.
‘माटवी’ साठी लागणारी झाडे लोकांनी घराभोवती लावावीत आणि टिकवावीत ह्याचा विचार करून ‘माटवी’ ची प्रथा आपल्या दूरदृष्टी असलेल्या पूर्वजांनी सुरु केली असावी.
आजच्या युगात – आमची हि कोकणी – माटवी – आहे कि नाही ‘इको फ्रेंडली’!!
