गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: | गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: || गुरुगीतेमध्ये साक्षात भगवान श्री शंकरांनी या श्लोकातून देवी पार्वतीस गुरूचे महात्म्य सांगितले आहे . भारतीय संस्कृतीने गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व देऊन गुरूचे श्रेष्ठत्व अबाधित ठेवले . वेद उपनिषदतील अनेक कथा असे सांगतात की गुरुशिवाय तरणोपाय नाही . गुरु परंपरेमध्ये २ प्रकारचे गुरु अभिप्रेत आहेत —–
१) शिक्षा गुरु — जिज्ञासू बुद्धीच्या तृप्तीसाठी शास्त्राचे ज्ञान देणारा तो शिक्षा गुरु .
२) दीक्षा गुरु —- शिष्याच्या अंत:करणात ज्ञानबीज रुजवून ते विकसित करणारा .
गुरु – शिष्य नाते आणि गुरूचा प्रभाव याविषयी तंत्र ग्रंथांनी तपशीलवार विवेचन केले आहे . ” आद्यदेव , महाकाल पुरुष स्वत: गुरुच्या ठिकाणी प्रगट होत असतो ” असे योगिनितंत्र सांगते . तर ” गुरूचे रूप — हे ध्यानाचे मूळ , गुरुचरण — हे पूजेचे मूळ , गुरु वाक्य — हे मंत्राचे मूळ आणि गुरुकृपा — हे सिद्धिचे मूळ ” असे कुलार्णवतंत्रात प्रतिपादन केले आहे. कुलार्णव तंत्रात ६ प्रकारचे गुरु असतात असे संगितले आहे . —-
१) प्रेरक गुरु – साधनेची गोडी उत्पन्न करणारा .
२) सूचक गुरु – प्रत्यक्ष साधना कशी करावी ते जाणण्याची दृष्टी देणारा .
३) वाचक गुरु – साधना पद्धती व अंतिम दृष्टी यांचे विवेचन करणारा .
४) दर्शक गुरु – मार्गाचे तपशीलवार दर्शन घडवणारा .
५) शिक्षक गुरु – तपस्येचे पाठ देऊन विधी विधाने समजावणारा .
६) बोधक गुरु – स्वत:च्या अनुभूतीच्या प्रकाशाने शिष्याची बोधशक्ती जागृत करून त्याच्या
जाणीवेचे स्तर प्रकाशित करणारा .
संसार सागरातून आपल्याला पैलथडीस नेणारी नौका म्हणजेच — सद्गुरू .
गुरु हाच कर्ता — शिष्याच्या ठायी तो स्वत: साधना करतो .
गुरु हाच त्राता — मार्गातील संकटापासून तो शिष्याचे रक्षण करतो .
गुरु हाच हर्ता —- मार्गातील अडथळे दूर करतो .
गुरु हाच मोक्षदाता — तोच शिष्यांना मोक्ष प्रदान करतो.
गुरूचे हे वर्णन अतिशयोक्त वाटण्याचा संभव आहे पण याबाबत तंत्र ग्रंथांचा विचार आणि दृष्टी अत्यंत सुस्पष्ट आहे . त्यांच्या दृष्टीने गुरु हे तत्व आहे . ते स्थूल दृष्टीला गोचर नाही . त्याचे वसतिस्थान सहस्त्रदलात आहे . तेथून तो शाश्वत गुरु नियंता नियंत्रित करतो.
रुद्रयामल तंत्रात प्रत्यक्ष शिव सांगतात की — ” एकमेव सर्वश्रेष्ठ गुरु एकच आहे . तो म्हणजे प्रत्यक्ष मीच .कधी त्याचा वास सहस्त्रार चक्रात असतो तर कधी हृदपद्मात असतो तर कधी मानवरूप धारण करून तो साधकासमोर येतो. ” मानवगुरु सर्वश्रेष्ठ गुरुस आवाहन करून त्या शक्तिशी तादात्म्य पावतो आणि मग तो , ती शक्ति , शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करतो . हे लक्ष्यात घेऊन जो शिष्य गुरुच्या ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवतो त्याची प्रगति होण्यास अडचण येत नाही .
श्री अरविन्द म्हणतात — ” साधकाच्या अंतरात्म्याचे उद्घाटन झाले असेल , गुरुच्या ठायी श्रद्धा आणि शरणभाव असेल तर गुरुच्या मानवी अपूर्णताही साधकाच्या प्रगतिच्या आड येत नाहीत . गुरु म्हणजे परमेश्वर शक्तीचे वाहन किंवा परमेश्वराचा प्रत्यक्ष आविष्कार . गुरु ज्या पदापर्यंत चढला असेल त्यामानानेच गुरुपदाचा प्रत्यय येणार हे उघड आहे . मात्र गुरूला उन्मुख होणे म्हणजे परमेश्वराला उन्मुख होणे . साधकाच्या समर्पणांनुसार निर्भरतेनुसार आणि ग्रहणक्षमतेनुसार त्याला लाभ होत असतो . देवावर भार टाकण्याचा साधा सरळ भाव , आणि कशाचाही विचार न करता सरळ सरळ स्वत:चे दान ईश्वरचरणी करण्याची प्रवृत्ती या रूपातहि निर्भरता आणि ग्रहणक्षमता व्यक्त होत असते . या गोष्टी जर असतील तर शिष्याखेरीज इतर मंडळींना जी व्यक्ति आध्यात्मिक सामर्थ्याच्या दृष्टीने सामान्य वाटत असेल अशा व्यक्तीकडूनही अध्यात्ममार्गावर सहाय्य मिळू शकते आणि तो सामान्य मानवीगुरु ज्या गोष्टी देऊ शकणार नाही त्या गोष्टी भगवतकृपेने यथावकाश साध्य होतात.”
————- ********* ———–
कुलार्णव तंत्र सांगते की साधकाच्या ठायी श्रद्धा , भक्ति , विचारक्षमता , विवेक कृतज्ञता , उत्साह इत्यादि गुण असणे आवश्यक आहे .
* साधकास सत्यदर्शनाची तळमळ हवी .
* सामान्य जीवनाचा फोलपणा मनावर बिंबलेला हवा .
* मुक्तीची ओढ दर्शवणारी अभिप्सेची ज्योत सतत तेवत हवी .
* अंगात खंबीरपणा , धीर आणि चिकाटी हवी .
* गुरुवाक्य आणि साधना मार्ग यावर अविचल श्रद्धा हवी .
परंतु हे सर्व जरी असले तरी गुरु प्रथम काही काळ या गोष्टींची परीक्षा घेतो . शिष्याच्या आंतर्बाह्य जीवनाचे निरीक्षण करतो. आणि मग गरजेनुसार मार्गदर्शन करतो . शिष्याच्या पात्रतेनुसार खालील साधंनाक्रमाची दीक्षा देतो.
* कर्म मार्ग – नाना क्रिया , विधी , यज्ञ इत्यादि . — एखादी मुंगी झाडाच्या बुंध्यावरून हळू
हळू शेंड्यापर्यंत पोहोचते तसा हा प्रवास आहे .
* धर्म मार्ग – साधक शास्त्राज्ञांचे परिपालन श्रद्धेने करीत राहतो . — वानर ज्याप्रमाणे
फांद्याफांद्या वरुन उड्या मारीत शेंड्यापर्यंत पोहोचते तसा हा प्रवास .
* ज्ञान मार्ग – आत्मज्ञान , ब्रम्हज्ञान प्राप्त करणे अभिप्रेत असते . — एखादा पक्षी जसा
उंच भरारी मारून झाडाच्या शेंड्यावर बसतो तसा हा मार्ग .
यापैकी कोणताही मार्ग दाखवून गुरुने मार्गदर्शन केले असले तरी जोपर्यंत गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये आंतरीक नाते निर्माण झालेले नसते तोपर्यंत खर्या अर्थाने साधनेस प्रारंभ झाला असे म्हणता येत नाही .
गुरुच्या चेतनेच्या अंशाचे बीजारोपण जेंव्हा शिष्याच्या अंत:करणात होते तेंव्हाच गुरु-शिष्याचे आंतरीक नाते निर्माण होते . यालाच शास्त्रीय परिभाषेत ‘ शक्तिपात ‘ असे म्हणतात . शक्तिपात करण्याच्या क्रियेस दीक्षा म्हणतात . ही दीक्षा बाह्य किंवा अभ्यंतरी अशा दोन प्रकारे केली जाते . बाह्य विधी विधांनावाचून दिली जाते तिला अभ्यंतरी दीक्षा म्हणतात . आणि तिचे पुन्हा 3 प्रकार आहेत . —
* स्पर्शद्वारा दिली जाणारी ती ‘ स्पर्शी ‘ दीक्षा .
* केवळ दृष्टिक्षेपाने दिली जाणारी ती ‘ चाक्षुशी ‘ दीक्षा .
* केवळ स्मरणाने दिली जाणारी ती ‘ मानसी ‘ दीक्षा .
या दीक्षा विधीचे आणखी एक वर्गीकरण ३ मुख्य प्रकार पाडते .
* शांभवी दीक्षा — शिष्य समोर नसताना आपल्या योग शक्तीने त्याच्या देहात आपल्या
चेतनेचा अंश उतरवून त्याची साधना गुरु आपल्या हातात घेतो.
* शाक्ती दीक्षा — नुसत्या दृष्टिक्षेपाने , स्पर्शाने अथवा संभाषणाने गुरु शिष्याच्या जीवनात
क्रांति घडवून आणतो .
* आणवी / मांत्रि दीक्षा — मंत्र अथवा अशाच प्रकारे गुरु दीक्षा देतो. याचे १० प्रकार आहेत .
स्मार्ती दीक्षा ( स्मरणाने दिली जाणारी ) ; मानसी दीक्षा ( मनाने दिली जाणारी ) ;
योगी दीक्षा ( योगशक्तीने देहात शिरून दिली जाणारी ) ; चाक्षुशी दीक्षा ( दयार्द्र दृष्टीने )
स्पर्शी दीक्षा ( मस्तकावर हात ठेऊन ) ; मांत्रि दीक्षा ( मंत्राने दिली जाणारी ) ;
वाचकी दीक्षा ( गुरुमुखातून मंत्रोच्चार श्रवण करून ) ; हौत्री दीक्षा ( हवनाने दिली जाणारी )
शास्त्री दीक्षा ( शास्त्रोक्त पद्धतीने ) ; अभिषेचिकी ( अभिषेक करून )
——– By M. P. Pandit —— संजीवन त्रैमासिकातून .
================= ################ ==============
खरा गुरु आणि गुरुची कार्यपद्धती —–
* एक फार मोठा अपरीहार्य मदतगार आहे तो गुरु . आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी यथायोग्य समजण्याची गरज असते . आपल्याला कदाचित ज्ञानाचे फार मोठे भांडार मिळू शकते परंतु त्याचे यथायोग्य आकलन होते अथवा कदाचित होतही नाही . प्रत्येक टप्प्यावर आपल्याला खात्री करून देण्याची , मार्गदर्शन करण्याची गरज असते ज्यामुळे आपल्याला ज्ञांनाचा फायदा होऊ शकतो तसेच आपले प्रयत्न योग्य दिशेने चालू आहेत हे आपणास समजण्याची सुद्धा गरज असते . आपण जेंव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो , विशेषत: आध्यात्मिक जीवन जगू पाहणार्यांकडे दृष्टिक्षेप टाकतो तेंव्हा आपणास असे दिसते की अनेकांचे प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू आहेत , अनेकांच्या प्रयत्नात चुका होत आहेत याचे कारण म्हणजे त्या प्रयत्नांना योग्य प्रवाहात जाण्यासाठी मार्गदर्शन मिळालेले नसते . आपल्याला कुणीतरी हवा असतो जो आपणास शिकवेल , मार्गदर्शन करील , काही गोष्टी दाखवून देईल आणि आपल्या मनात खात्री निर्माण करील . ज्याप्रमाणे सत्यज्ञान आपल्या अंतर्यामी असते त्याचप्रमाणे खरा गुरु सुद्धा अंतर्यामी असतो . तोच खरा गुरु असतो जो प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी असतो . तो आपल्या अंतर्यामी गुप्तपणे असतो आणि त्याच्या स्वयंप्रकाशित ज्ञानाने आणि तेजाने आपल्या अज्ञानाचा अंध:कार कमी होत असतो . त्याची कृपा आणि त्याची अनुमति हीच खरी आपल्या प्रयत्नांना जबाबदार असते . असे म्हंटले जाते की माणूस परमेश्वराचा विचार करू लागतो तो परमेश्वराने त्याचा विचार केल्यावरच . त्याने आपला विचार केलेला असतो म्हणूनच आपण परमेश्वराचा विचार सुरू करतो , उच्च मूल्यांचा विचार करतो आणि दैवी-जीवनाची अभिप्सा बाळगू लागतो. त्याचे सामर्थ्य आणि त्याची शक्ति प्रवासाची सुरुवात करून देतात आणि त्यास गती देतात . आपल्या मानवी प्रकृतीला उच्चत्वात नेणे आणि परमेश्वराशी एकरूप होणे हे महान कार्य आपले मामुली प्रयत्न करू शकत नाहीत तर आपल्या अंतर्यामात असणारी त्याची शक्तिच ते करू शकते ही श्रद्धा एकदा बळकट झाली की आपल्या वैयक्तिक न्यूनतांचा अडथळा बंद होतो . जोपर्यंत मीच हे सारे प्रयत्न करीत आहे ही माझी भावना कायम असते तोपर्यंत या न्यूनता आपल्या मार्गात फार मोठा अडथळा ठरतात . पण एकदा आपण आपल्या आंतरीक शक्तीला जागृत केलं आणि अंतर्यामातून येणार्या त्या शक्तीच्या मदतीला उन्मुख होऊन आपण फक्त एक साधन आहोत हे मानण्यास शिकतो तेंव्हा आपल्या न्यूनता आपल्या मार्गात कधीही अडथळा होऊ शकत नाहीत .
आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी असणार्या मार्गदर्शकाची जाणीव कदाचित एक निर्व्यक्तिक प्रेम , शहाणपण अथवा सामर्थ्य म्हणून होत असते . कदाचित एखाद्या सर्वश्रेष्ठाचे या सार्या गोष्टीत झालेले प्रगटीकरणही जाणवू शकते . कदाचित एखाद्याचा सर्वश्रेष्ठ आत्मा म्हणून आणि तो आत्मा हाच इतर सर्वांचाही आत्मा म्हणूनही जाणीव होऊ शकते . कदाचित आपणास परिचित असणारे नाव असलेली कोणत्याही स्वरुपातील दैवी व्यक्ति म्हणूनही अनुभव येऊ शकतो . असे असंख्य मार्ग आहेत ज्यामधून हा दैवी गुरु स्वत:चे दर्शन घडवतो मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी या दर्शनाचा तो वेगवेगळा मार्ग निवडतो. तो मार्ग त्या व्यक्तीच्या उत्क्रांतीचा पूर्वेतिहास आणि आजची स्थिति यांचेवर ठरलेला असतो .
परंतु हा आंतरीक गुरु आपल्या वैयक्तिक प्रयत्नांच्या तीव्रतेने अनेकदा पडद्याआड झाकोळला जातो . आपण आपले विचार , कल्पना , कार्यक्रम यामध्ये इतके गढून गेलेलो असतो की आपल्याला तो दिसू शकत नाही , खरा कार्यरत तो आहे हे समजत नाही . तीव्रता आणि उतावळेपणा यामध्ये फरक आहे . अनेकदा खूप वाट पहावी लागते आणि उतावळेपणा करून फायदा होत नाही . एक पोकळ म्हण आहे की आम्ही स्वर्गाच्या दारावर जोरदार धडका मारू पण वेळ आणि क्षण त्यानेच निश्चित केलेला असतो . आपले सारे कार्य आणि आपले सारे प्रयत्न यांना त्याची अनुमति असल्याशिवाय फलप्राप्ती होत नाही .
आपल्या एका उपनिषदामध्ये असे स्पष्टपणे म्हंटले आहे आणि त्यानंतर अनेक धर्म ग्रंथातून त्याची पुनरुक्ती झाली आहे की — ” ज्याला परमात्मा निवडतो त्यालाच परमात्मा दर्शन देतो . परमात्म्याला आपल्या ज्ञानाने , तपश्चर्येने , सामर्थ्याने अथवा वादविवादाने , चर्चेने जिंकता येत नाही तर परमात्म्याच्या कृपेनेच जिंकता येते . ”
नेहमी लक्ष्यात ठेवा की वरील टोकाला परमेश्वराची कृपा आहे आणि खालील टोकाला आपल्या बाजूने आपले प्रयत्न असतात . जेंव्हा हे प्रयत्न शांतपणे चालू असतात , काहीसे स्वमग्न पण सातत्याने आणि परमेश्वरी कृपेवर श्रद्धा ठेऊन तेंव्हा सारे काही शांत शांत असते . आपण प्रत्येक क्षणाला परिणामाचा विचार करीत बसत नाही , सारे काही परमेश्वरी इच्छेवर सोडून देतो . या शांत स्थितीत प्राप्त होत असलेल्या ज्ञानाने आपणास समजू लागते की भूतकाळात जे जे म्हणून घडले आहे त्या सर्वास काहीतरी अर्थ आहे . आपणास आलेले अपयश आणि क्वचित घ्यावी लागलेली माघार यांचीच परिणती आपण परमेश्वराच्या दिशेकडे वळण्यात झाली हे नाकारता येणार नाही . आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा , ह्या अंतर्यामीच्या परमेश्वराने आपल्या जीवनातील परिस्थितीचा आणि अनुभवाचा उपयोग करून आपली आध्यात्मिक प्रगति कशी साधली , ते आपण समजू शकतो तसेच या जीवन संघर्षामध्ये त्याच्या अदृश्य हाताने मार्गदर्शन करून आपणास परिपूर्णतेकडे कसे नेले तेही समजते . सर्वश्रेष्ठाचे आपल्या अंतर्यामी असणारे हे अस्थित्व हेच जीवमात्राचे खरे मूलतत्व असते , सार असते .
आपण जर आपले पृथक्करण केले तर आपण कोण आहोत ? हे आपले भौतिक शरीर वैश्विक जडतत्वाच्या अणुंपासून बनलेले आहे . माझ्यामध्ये असणारी ही प्राणशक्ती म्हणजे सभोवताली सर्वत्र पसरलेल्या अथांग प्राण-सागराचा एक प्रवाह आहे . माझे मन म्हणजे वैश्विक मनाचा एक तुकडा आहे . मग काय उरले ? ज्याला मी माझे स्वत्व मानतो , ज्याला मी माझे व्यक्तित्व समजतो तो माझा इगो . फक्त ह्या इगोची सावली म्हणजे मी स्वत: आणि तो एक बुडबुडा आहे . माझ्या अस्तित्वाचे खरे मूलतत्व जे माझ्या जीवनाला काही अर्थ देते ते म्हणजे माझ्या अंतर्यामी असणारे दैवी अस्थित्व . शरीराची सारी रचना त्याच्या भोवती संघटित केलेली असते आणि त्याच्यामुळेच सार्या रचनेला अर्थ प्राप्त होतो .
परंतु आपल्या इगोने बंदिस्त केलेल्या चेतनेला हा अंतर्यामीचा परमेश्वर शोधून काढणे , त्याला ओळखणे अवघड असते . जे डोळ्यांनी दिसत नाही ते मानवी चेतना मान्य करू शकत नाही , त्यावर विश्वास ठेवू शकत नाही , त्यासाठी एखाद्या बाह्य खुणेची अथवा बाह्य मदतीची गरज असते . इगो निषेध करतो , न दिसणार्या अस्तित्वाच्या विरोधात पुन: पुन: बंद करून उठतो . परंतु आपल्या या बंडाने अंतर्यामीचे देवत्व दुखावले जात नाही . या आंतरीक कार्याची सत्यता मान्य करणे मनाला खूप अवघड जाते कारण हा अंतर्यामीचा परमेश्वर आपल्या प्रकृतीच्या मार्फत कार्य करीत असतो . तो कोणत्याही लहरी चमत्कारानी कार्य करीत नाही पण अज्ञानी मानवाला चमत्कारच हवा असतो कारण त्यामुळेच तो विश्वास ठेवू शकतो . परंतु सर्वसाधारणपणे स्वत:च्या साक्षात्कारासाठी परमेश्वर कधीही चमत्काराचा अवलंब करीत नाही .
परंतु या परिस्थितीत एक धोका संभवतो . कोणताही चमत्कार न दिसल्याने काहीसा निराश झालेला मानवी इगो काही विकृत शक्तींना आवाहन करू लागतो . विश्वात अशा अनेक कनिष्ठ आणि विद्रूपिकरण करणार्या शक्ति आहेत ज्या परमेश्वरपेक्षाही अधिक तेजस्वी असल्याने आपणच परमेश्वर असल्याचा बहाणा करतात , अशा प्रकारची काही उदाहरणे आहेत ज्यात लोक या विकृत शक्तींना आवाहन करतात आणि त्यांना एखादे दैवी नाव देतात . ह्या शक्ति खूप हुशार असतात . त्या स्वत:ला राष्ट्र-देवता , जीवन-देवता , निर्मिती-देवता इत्यादि नावांनी सादर करतात आणि लोक थक्क होऊन जातात . या शक्ति झटपट यश प्राप्ती करून देतात आणि त्यामुळे अनेकांना भुरळ पडते , अनेकजण मोहाने भारले जातात आणि सरतेशेवटी ह्या विकृत शक्ति त्यांना चुकीचा मार्ग दाखवतात .
अशा प्रकारच्या धोक्यापासून आपले रक्षण करण्यासाठी सार्या जगातील आध्यात्मिक प्रणाली एखादा बाह्य आधार देतात ज्यामुळे एखाद्याला दुसर्या कुणावर तरी विश्वास ठेवून सुरक्षित राहता येईल . तो एकतर कोणत्या तरी रूपातील देव असू शकतो किंवा त्याचा एखादा प्रतींनिधी असू शकतो . तो मानवी प्रतिंनिधी परमेश्वराचा अवतार असेल किंवा देवदूत असेल किंवा एखादा गुरु असेल . प्रत्येक धर्म एखादा केंद्रबिंदू देतो मात्र काही धर्म अनेक स्वरूपांचे दर्शन घडवतात . सतत वाढत जाणारी देवांची स्वरुपे पाहून एखाद्या नास्तिकाला त्याकडे प्राचीन काळातील भोळसट समजूत मानून कुत्सितपणे हसणे सोपे आहे पण खरे म्हणजे निर्मितीमधील केवळ देवांच्याच नव्हे तर सर्वच रुपाना काही तरी अर्थ आहे . नाव आणि रूप यांना मिळून एक विशिष्ट अर्थ आहे , महत्व आहे . प्रत्येक रूप हे जीवमात्राच्या गुण वैशिश्ठ्यांचे प्रगटीकरण असते , दर्शन असते , ज्याप्रमाणे एखादे देवाचे नाम हे त्या देवाच्या शक्तीला आवाहित करू शकणारी चावी ठरते .
याप्रमाणे विचार केला असता , निरनिराळ्या धर्मातील निरनिराळ्या देवांच्या रूपाना एक पार्श्वभूमी आहे . एखाद्या कलावंताच्या कल्पनेतून त्या रूपांची निर्मिती झालेली नसते व त्यानुसार ते लोकप्रियही झालेले नसतात . परमेश्वराच्या रुपाचे एखाद्या साक्षात्कारी व्यक्तिला दर्शन घडवले जाते किंवा अशी साक्षात्कारी व्यक्ति त्याच्या उच्च अभिप्सेने त्या रूपाची कल्पना साकार करते आणि परमेश्वर त्या रूपास मान्यता देतो . आणि म्हणून त्या रुपाचे दर्शन घडवलेले असो अथवा ते नंतर देवाने मान्य केलेले असो त्याला एक विश्वसनीयता प्राप्त होते आणि असे प्रत्येक रूप हा त्या रूपाच्या मागे जे काही असते त्याकडे जाण्याचा एक विश्वसनीय मार्ग ठरतो .
आपण परमेश्वराच्या रूपांवर बोलतो . परमेश्वर जेंव्हा त्याची आराधना करणार्या एखाद्या साधकाला दर्शन देतो तेंव्हा त्या साधकाच्या स्वभावाशी , प्रकृतीशी सुसंगत अशाच स्वरुपात देतो . खरे आहे की परमेश्वराला कोणत्याही एका रूपात मर्यादित करता येणार नाही पण त्याचबरोबर हेही खरे आहे की त्याला निराकार , निरुपा म्हणूनही मर्यादित करता येणार नाही . उपनिषदात सांगितल्याप्रमाणे तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही स्थितीत असतो . आणि अशा वेगवेगळ्या रूपात मानव त्याची भक्ति करतो , त्याचेशी संबंध प्रस्थापित करतो, त्याची मदत घेतो आणि त्याचेशी वैयक्तिक नाते जोडतो . परमेश्वराची अशा तर्हेने भक्ति करणार्या माणसाचे त्याच्याशी ८ किंवा ९ प्रकारांनी नाते जुळू शकते . देव खरा आहे आणि तुम्ही किंवा इतर कोणाहीपेक्षा तो मला अधिक खरा वाटतो. परमेश्वर निश्चितच अनंत आहे सर्वत्र आहे आणि त्यामुळे बरेचजण त्याच्या या निर्व्यक्तिक रूपावर श्रद्धा ठेवतात . पण अशी माणसं खूप थोडी आहेत . बहुसंख्य लोकांना वैयक्तिक नाते हवे असते आणि वैयक्तिक नात्याला रूप असावेच लागते . आणि म्हणून परंपरा अवताराच्या रूपाने हे सादर करते .
आपल्यासाठी अवतार म्हणजे मानवी रूपातील देवता होय . ते म्हणजे दैवी जीवमात्राचे शरीर धारण करणे अथवा मानवी रूपातील दैवी चेतना होय . एका परीने विश्वातील प्रत्येक रूप म्हणजे अवतारच असतो कारण प्रत्येक जीवमात्राच्या अंतर्यामी दैवी चेतनेचा किरण असतो . पण आपल्याला त्याची जाणीव नसते .
मला आठवतय काही वर्षापूर्वी युरोप मधून काही वास्तु तंत्रज्ञ भारतात आले होते . त्यावेळी औरोविल्ले हे नवीन शहर तयार होत होते . त्या शहरातील काही इमारतींच्या रचनेचा आराखडा काढण्यासाठी ते आले होते . त्या मंडळीपैकी एक तरुण माणूस भारतातील आणि विशेषत: आश्रमातील काही गोष्टी पाहून चकित झाला होता . त्याला असे दिसले की आश्रमात माताजींना देवासमान किंवा देव म्हणूनच मानले जात होते . भारतीय परंपरेनुसार हे काही वेगळे नव्हते मात्र तो ते पाहून पूर्णपणे चकित झाला होता . त्याने माताजींना एक ओळीचे पत्र लिहून विचारले — ” माताजी , तुम्ही देव आहात का ? ” माताजींनी त्याला ताबडतोब उत्तर दिले —- ” होय , आणि तू सुद्धा देव आहेस आणि ते जाणून घेणं हेच तुझ्या आयुष्याचे उद्दीष्ट आहे . ”
आपल्यापैकी प्रत्येकाची ही कथा आहे . आपल्यापैकी प्रत्येकजण हा अजून व्यक्त न झालेला देव आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही . अवताराला मात्र तो देव आहे याची पूर्ण जाणीव असते , आपले अवतारकार्य काय त्याची जाणीव असते आणि त्याची संपूर्ण चेतना ही ते उद्दीष्ट साध्य करण्यासाठी क्रियाशील असते . सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या इतिहासात अशा प्रकारचे अवतार क्वचितच जन्म घेत असतात . जेंव्हा चेतनेला फार मोठी झेप घ्यायची असते आणि प्रकृतीला स्वत:ला ते कार्य पार पाडणे शक्य नसते तेंव्हाच अवतार घेतला जातो. परमेश्वर मानवी रूपात पृथ्वीवर येतो आणि उत्क्रांतीची ती झेप साकार करण्यासाठी तसेच नवे सत्य आणि नवा दैवी कायदा पृथ्वीवर प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारा चेतनेचा प्रकाश स्वत:मध्ये घेऊन येतो . खरे म्हणजे अशी अनेक प्रगटीकरणे असतात . मात्र एक जो मुख्य प्रगट होतो तो परमेश्वर असतो आणि इतर अनेक प्रगट होत असतात .
आपल्याकडे असे अनेक धर्मात अनेक अवतार निर्माण झाले , त्यातील काहींनी नवे धर्म निर्माण केले , नवीन मार्ग सांगीतले , नवीन कायदे स्थापन केले , त्यांचे अनुयायी आणि साधक त्यांचा मार्ग अनुसरतात , त्यांचा शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य मानतात आणि जरी त्यांना प्रत्यक्ष देव मानले नाही तरी देवाचे प्रतिंनिधी , देवाचे दूत मानतात . परंतु भूतकाळातील अवतार कदाचित पुरेसा नसतो . जोपर्यंत त्याचे उदाहरण , प्रभाव आणि शिकवण ताजी असते तोपर्यंत गोष्ट वेगळी असते परंतु शेकडो वर्षांनंतर त्याच्या शिकवणुकीचे सामर्थ्य क्षीण होते . मानवी मनाला एखादी नवी ताजी प्रेरणा हवी असते . भूतकाळातील शिकवण , उदाहरणे ही नव्या क्रियाशील प्रयत्नांना प्रेरणा देण्यास अपुरी पडतात . अशा बाबतीत सुद्धा परंपरा दूसरा एखादा पर्याय निर्माण करते .
पुढील मुद्दयाकडे वळण्यापूर्वी अवतारवादाचे तत्व आपणास चांगले समजले आहे का त्याची खात्री करून घेऊ . अवतार म्हणजे सर्वश्रेष्ठाने सरळ प्रगट होऊन मानवी शरीर धारण करणे . तो सत्य घेऊन येतो आणि त्या सत्याची इथे कायमस्वरूपी स्थापना करतो . विशेष म्हणजे अवताराने या पृथ्वीतलावरून आपले शारीरिक अस्थित्व संपवल्यावरही त्याचे व्यक्तिमत्व , त्याची दैवी चेतना आणि शक्ति पृथ्वीतलावर कायम राहते , मानवतेला मार्गदर्शन करते आणि मानवी आवाहनाची दखल घेऊन त्याला प्रतिसाद देते . यालाच आंतरीक बुद्ध किंवा आंतरीक ख्रिस्त किंवा आंतरीक कृष्ण म्हणतात . या अवतारांच्या ऐतिहासिक कथां प्रत्यक्ष सत्याशी किती जुळतात त्याला आपल्या हेतूच्या दृष्टीकोनातून फारसे महत्व नाही . तशा अनेक कथा असू शकतील आणि त्यातील सर्वच कदाचित खर्याही नसू शकतील . त्यातील अनेक प्रतिकात्मक असतात . पण एक गोष्ट मात्र शिल्लक राहते की आंतरीक ख्रिस्त अथवा आंतरीक कृष्ण यांचा अनुभव घ्यायला हवा . आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्यामध्ये तो आंतरीक बुद्ध , आंतरीक कृष्ण अथवा आंतरीक ख्रिस्त निर्माण करायला हवा . इतर सार्या गोष्टी फुकट आहेत . मला मरण पावायला हवे म्हणजे माझा जन्म परमेश्वरात होईल . परमेश्वरात माझा पुंनर्जन्म होण्यापूर्वी मला माझा इगो समूळ नष्ट करायला हवा . तसेच श्रीकृष्ण हा माझ्या जीवमात्राचा सारथी आहे . माझे संपूर्ण शरीर हा एक रथ आहे . या रथाच्या घोड्यांचे लगाम आपल्या व्यक्तिमत्वाच्या इगोच्या हातात देण्याऐवजी त्या दैवी सारथ्याच्या हातात सोपवायला आपण शिकले पाहिजे . आपल्यापैकी प्रत्येकाला हा आंतरीक अवतार आपल्या जीवनात निर्माण करता आला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या सार्या हालचाली आणि क्रिया संघटित केल्या पाहिजेत . हे अर्थातच सोपे नाही पण ते निश्चितच शक्य आहे .
परंतु परमेश्वर फार क्वचितच अवतार घेतो . आणि म्हणून एक नवी स्फूर्ति , एक नवी प्रेरणा देण्यासाठी देवदूताची योजना असते . देवदूत हा एक स्फूर्तीशाली मानव असतो ज्याला दैवी प्रेरणा प्राप्त होते आणि मग देव त्याच्या मुखातून बोलतो . जेंव्हा तो बोलतो तेंव्हा त्याला एक परिणामकारी शक्ति प्राप्त झालेली असते आणि म्हणून त्याचे बोल हे देवाचे शब्द म्हणून मानले जातात .
देवदूत सुद्धा रोज जन्माला येत नाहीत तर शेकडो वर्षातून एखादा देवदूत येतो . मानवाला काहीतरी ताबडतोब हवे असते , काहीतरी अधिक परस्पर हवे असते आणि म्हणून गुरु परंपरा निर्माण झाली आहे . खर्या आध्यात्मिक परंपरेतला गुरु हा केवळ सूचना करणारा नसतो . तो सूचना करण्याऐवजी जागृत करीत असतो . गुरु म्हणजे आई आणि वडील अशा दोन्ही भूमिकांचा संयोग असतो . भारतीय आध्यात्मिक परंपरेत जेंव्हा एखादा जिज्ञासू साधक अनुग्रह घेण्यासाठी एखाद्या गुरुकडे जातो तेंव्हा गुरु त्याला प्रथम त्याच्या घरी किंवा आश्रमात बरेच दिवस ठेऊन घेतो , त्याचे निरीक्षण करतो , त्याच्या उत्क्रांतीचा पूर्वेतीहास तपासतो , त्याच्या आत्म्याचा स्वभाव कसा आहे ते पाहतो , त्याच्या मनाचा साचा कसा आहे ते पाहतो , त्याच्या आत्म्याचे उद्दीष्ट काय आहे ते पाहतो , त्याच्या साठी कोणती आध्यात्मिक प्रणाली सुयोग्य ठरेल त्याचा विचार करतो . आणि हा सारा अभ्यास त्याच्या स्वतासाठी पूर्ण झाला , त्याचे समाधान झाले की मग तो गुरु त्या साधकाला शिष्य म्हणून स्वीकारावयास तयार होतो . आणि अशा पूर्ण तयारीनंतर जेंव्हा गुरु त्या साधकाला अनुग्रह देतो तेंव्हा त्या गुरुच्या जीवातून शिष्याचा जन्म होतो . हा सोहोळा पाहण्यासाठी प्रत्यक्ष देव हजर असतात असे मानले जाते . हे केवळ विद्यार्थी आणि सूचना देणारा असे नाते नसते , गुरु आपल्या चेतनेने शिष्याला आच्छादुन टाकतो . तो त्याला प्रेम देतो , आधार देतो , सुरक्षित कवचाची खात्री देतो आणि मार्गदर्शक प्रकाश , ज्ञान देतो . तो स्वताचे उदाहरण त्याचेसमोर ठेवतो . गुरुच्या केवळ बाह्य पोषाखाचे , बाह्य क्रियाकर्मांचे अनुकरण करून उपयोग नसतो . गुरूचे संपूर्ण जीवन चालविणारा , शासित करणारा दैवी साक्षात्कार हाच एक आदर्श उदाहरण म्हणून स्फूर्तिदायक असतो . तो केंद्रीभूत साक्षात्कार स्वताला प्राप्त करून घेण्यासाठी शिष्याला मदत मिळते .
यानंतर येतो परिणामवाद . गुरुकडून साधला जाणारा परिणाम हा बाह्य अधिकारातून साधलेला नसतो तर संपर्काच्या शक्तितून , आत्म्याच्या जवळीकेतून साधलेला असतो . ज्याला दैवी साक्षात्कार झालेला आहे अशा विश्वसनीय गुरुच्या सान्निध्यात प्रत्येक गोष्ट बोलत असते , संदेश देत असते — छोटेसे हावभाव , हातवारे , त्याचे श्वसन , त्याचा दृष्टिक्षेप — प्रत्येक गोष्टीत काहीतरी संदेश असतो आणि जे अशा गुरुच्या सान्निध्यात असतात त्यांचेवर उच्च कंपंनांचा सतत वर्षाव होत असतो . हा त्याच्या चेतनेचा परिणाम असतो , तो प्रत्येक क्षणाला होत असतो आणि तुम्हाला त्याची जाणीव होवो अथवा न होवो तुम्ही तो परिणाम शोषून घेतच असता . त्याचे सान्निध्य हेच स्फूर्तिदायक असते आणि त्याची जवळीक त्याची शक्ति उपयोगात आणीत असते . अशा गुरुच्या भोवतालच्या परिसराचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की त्याच्या भोवती असणारे प्राणी , वनस्पति , अगदी जड सामान सुद्धा एका उच्च चेतनेने कंप पावत असते . अशा गुरूला स्वताच्या शिष्यांच्या जीवनावर स्वताला लादावे लागत नाही . अशा गुरूला शरण जाण्यात , स्वताला समर्पित करण्यात आणी त्याच्या दैवी तेजाच्या ज्योतिला आणी दैवी प्रकाशाला सामोरे राहण्यात शिष्याचा फार मोठा फायदा होत असतो .
खरा आध्यात्मिक गुरु स्वताकडे देवत्वाचा अधिकार घेत नाही . तो त्याचे कार्य म्हणजे वरुन टाकलेला विश्वास समजतो . तो कार्य करतो ते एक साधन म्हणून , एक वाहक म्हणून अथवा परमेश्वराचा एक प्रतींनिधी म्हणून . स्वताला देव म्हणून जाहीर करण्याइतका तो उद्दाम नसतो , त्या दृष्टीने तो खूपच विनयशील असतो . जेंव्हा अशा प्रकारची विनयशीलता असेल , आत्म्याची विनयशीलता असेल तेंव्हा तुम्ही नेहमीच समजायला हवे की ही आध्यात्मिक सच्चेपणाची खूण आहे . ती कदाचित बाह्य रूपातून व्यक्त होईल कदाचित होणारही नाही परंतु त्या विनयशीलतेचा कल स्वाभाविक आणि खर्या अध्यात्मिकतेचे वैशिष्ठ्य दाखवणारा असतो . जिथे तुम्हाला क्षोभ दिसेल , चिडचिड दिसेल , श्रेष्ठत्वाची भावना दिसेल आणि तसा दावा केला जात असेल तर तुम्ही खात्रीने समजा की हे काही खरे आध्यात्मिक सत्व नाही . श्री अरविन्द म्हणतात की —- गुरु हा त्याच्या भावंडांना मदत करणारा एक माणूस असतो , लहान मुलांचे नेतृत्व करणारे एक लहान मूल असते , अनेक ज्योति उजळवून टाकणारी एक ज्योत असते , अनेक आत्म्याना जागृत करणारा एक जागृत आत्मा असतो , एक परमेश्वराची शक्ति आणि अस्थित्व असते जे इतर शक्तींना आणि अस्थित्वांना परमेश्वराकडे घेऊन जाते . विनयशीलता , सच्चेपणा आणि परमेश्वराचे साधन म्हणून कार्य करण्याची तयारी ही मानवी गुरुची वैशिष्ठ्ये आहेत .
From — Spiritual Life : Theory & Practice By M.P. Pandit
Part 2 : Chapter 2
मराठी रूपांतर : नरेंद्र नाडकर्णी
====================##############==================
माताजींनी केलेल्या सूचनांचे कपालिशास्त्रीनी केलेले टिपण आणि त्यावरील भाष्य ——-
” आम्ही जेंव्हा एखाद्याला साधक म्हणून स्वीकारतो त्यावेळी आम्ही काहीतरी ठोस असे त्याच्या ठिकाणी स्थापन करतो त्याला ‘ अंश – विभूति ‘ असे पाहिजे तर म्हणा . ती साधकाला मार्गदर्शन करते . त्याची साधना करते .”
गुरु आणि शिष्य यातील नात्याचे हे सार . ” शिष्य आचार्यांच्या पोटी पुंनर्जन्म घेतो ” हे वैदिक ऋषींचे वर्णनही काहीसे अपुरे आहे . कारण गुरु-शिष्य नाते अधिक जवळचे आहे . तंत्र म्हणते पिता आपल्या पुत्राला अज्ञानी जगतात भौतिक जन्म देतो तर गुरु प्रकाशाच्या जगात आपल्या शिष्याला मुक्तिदायक आध्यात्मिक जन्म देतो .
गुरूचा एक अंश , त्याच्या चेतनेचे व व्यक्तित्वाचे एक विशेष मूर्त रूप , एक अंश विभूति शिष्याच्या व्यक्तित्वात प्रवेश करते , स्थीर होते . तेंव्हापासून हे प्रक्षेपण शिष्याचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करते . गुरूला प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याची गरज नसते . शिष्यामधील गुरुच्या उपस्थितीची शक्ति त्या शिष्याची साधना करते . शिष्याने फक्त तिला कार्य करू द्यावे त्यासाठी आपले देहमंदिर शुचिर्भूत ठेवावे . श्रद्धा , भक्ति , आणि निष्ठा यात कुठेही कमी पडू नये .
गुरु-शिष्य नात्याचे परिणाम शिष्यावरच होतात असे नव्हे तर गुरुवरही होतात गुरु जसा साधनेचा भार घेतो तसा शिष्याच्या कर्माचाही घेतो . शिष्याच्या जीवनातील प्रत्येक कृत्याचे परिणाम गुरुच्या चेतनेमध्ये उमटतात .
शिष्याची सत्कृत्ये , उच्च अभिप्सा आणि देवोचित क्रिया गुरुच्या व्यक्तित्वाला पोषक ठरतात तर त्याच्या विरुद्ध प्रकारच्या क्रियांचा गुरुवर विपरीत परिणाम होऊ शकतो .
============= $$$$$$$$$$$$$$$ ============
” विचार – प्रक्रिया ही आवरण घालते . जेंव्हा अभिप्सा विकसित होते तेंव्हा आवरणे नाहीशी होतात . हृदयाचे उन्मीलन होते . ”
ही योगसाधना मानसिक विचार-प्रक्रियेने चालत नाही . तर योगशक्तीने चालते. या योगशक्तीचा उगम मानवी मनाच्या उच्चतम शिखराच्या पलीकडे आहे . गुरुच्या संकल्प शक्तीने ही योगशक्ती मानवी आधारामध्ये म्हणजे मन-प्राण-शरीरामध्ये कार्यान्वित केली जाते . ती मानवी चेतनेवर कार्य करते , तिला व्यापक करते . आणि मानवी अवस्थेपासून उत्तरोत्तर दिव्य होत जाणार्या अवस्थेत तिचे रूपांतर करते .
जसजशी अभिप्सा विकसित होत जाते तसतशी साधनेची तीव्रता वाढत जाते आणि तसतशी विचार मनाची क्रिया कमी होत जाते . मनाच्या ऐवजी अंत:करणाचे कार्य सुरू होते . अंत:करणाच्या ठिकाणी असे एक चक्र आहे ज्याच्या खोलवर मनुष्याचा अंतरात्मा वसत असतो . ते चक्र जेंव्हा उघडते तेंव्हा अंतरात्म्याच्या प्रभावाचे कार्य सुरू होते , मानसिक आवरणे विरून जातात आणि साधनेला एक गती मिळते .
=============== $$$$$$$$$$$$$ ===============